Source :- BBC INDIA NEWS

भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई

फोटो स्रोत, ANI

12 मे 2025

अपडेटेड 5 तासांपूर्वी

भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष थांबवण्यावर सहमती झाल्यानंतर सोमवारी (12 मे) संध्याकाळी पाच वाजता दोन्ही देशांच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (डीजीएमओ) यांच्यात चर्चा झाली.

या चर्चेत दोन्ही बाजूंनी एकही गोळी न चालवणे किंवा कोणत्याही प्रकारची आक्रमकता न दाखवणे यासह इतर मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिली.

दोन्ही देश सीमा भागात तसंच आघाडीच्या तळांवर तैनात असलेल्या सैनिकांची संख्या कमी करण्यासाठी दोन्ही देश त्वरित पावलं उचलण्याचा विचार करतील, यावरही सहमती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

याआधी सोमवारी (12 मे) लष्कराच्या झालेल्या पत्रकार परिषदेत डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले होते की, भारताच्या बहुस्तरीय संरक्षण प्रणालीवर मात करून भारतीय एअरफिल्ड्स किंवा लॉजिस्टिक सुविधांना लक्ष्य करणे पाकिस्तान एअरफोर्सला शक्य नव्हते.

दरम्यान, जम्मू-कश्मीरच्या सांबा परिसरात काही संशयित ड्रोन दिसल्याचं भारतीय लष्कराने सोमवारी रात्री उशीरा सांगितलं.

पहलगाम इथं झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये चार दिवस चाललेल्या लष्करी संघर्षानंतर 10 मे रोजी हा संघर्ष थांबवण्यावर सहमती झाली होती.

भारतीय सैन्याची माहिती, ‘जम्मू-काश्मीरच्या सांबा क्षेत्रात दिसले संशयास्पद ड्रोन्स’

जम्मू आणि काश्मीरच्या सांबा क्षेत्रात संशयास्पद ड्रोन्स दिसल्याची माहिती भारतीय सेनेनी सोमवारी (12 मे) दिली आहे.

हे ड्रोन्स निष्क्रिय करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप भारतीय सेनेनी हे सांगितले नाही की हे ड्रोन्स कोणत्या दिशेनी आले.

भारतीय सेना (संग्रहित छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये चार दिवस सैन्य संघर्ष झाला. त्यानंतर 10 मे रोजी हा संघर्ष थांबवण्यावर दोन्ही बाजूंनी होकार आला.

परंतु, त्याच्या काही तासानंतरच विदेश सचिव विक्रम मिस्री यांनी आरोप केला होता की पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

याआधी, सोमवारी दुपारी भारतीय सैन्य दलाची पत्रकार परिषद झाली. त्यात ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यात आली होती.

भारताने पाकिस्तानच्या ‘न्युक्लिअर स्टोरेज फॅसिलिटी’वर हल्ला केला का? काय म्हणाले एअर मार्शल?

पत्रकार परिषद

फोटो स्रोत, ANI

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या संघर्षानंतर भारतीय लष्कराच्या वतीनं पत्रकार परिषदेत कारवाईबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. रविवारी संध्याकाळी सैन्य दलाने पत्रकार परिषद घेतली होती.

त्यानंतर आज (सोमवारी -12 मे) दुपारीही तिन्ही सैन्य दलाच्या डायरेक्टर जनरल ऑपरेशन्सनी कारवाईबाबत माहिती दिली.

सरगोधा मधील किराना हिल्स याठिकाणी हल्ला करत भारतानं पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठा असलेल्या ठिकाणांना नष्ट केल्याच्या चर्चा माध्यमं आणि इतर सोशल मीडियावर होत होत्या. त्यावर एअर मार्शल ए. के. भारती यांनी उत्तर दिलं.

“पाकिस्तानच्या लष्करानं दहशतवाद्यांना साथ दिली. या परिस्थितीत भारताला प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं. त्यात पाकिस्तानची जी हानी झाली. त्यासाठी ते स्वतः जबाबदार आहे.

“आपली एअर डिफेन्स सिस्टीम देशासाठी संरक्षण भिंतीसारखी होती. ती भेदणं शत्रूला शक्य नव्हतं. पाकिस्ताननं पाठवलेले ड्रोन या सिस्टीमने पाडले,” असंही त्यांनी सांगितलं.

रविवारच्या पत्रकार परिषदेत जी माहिती दिली होती त्या व्यतिरिक्त काही माहिती या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

'न्युक्लिअर स्टोरेज फॅसिलिटी'वर काय म्हणाले?

पाकिस्तानच्या किराना हिल्सवरील ‘न्युक्लिअर स्टोरेज फॅसिलिटी’ला लक्ष्य करत सरगोदामध्ये हल्ला केल्याच्या बातम्या सध्या मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. याबाबत एका पत्रकारानं प्रश्न विचारला.

त्यावर उत्तर देताना डायरेक्टर जनरल एअर ऑपरेशन्स, एअर मार्शल ए. के. भारती यांनी उत्तर दिलं.

“किराना हिल्सवर काही आण्विक यंत्रणा आहे हे सांगितल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला याबाबत माहिती नव्हती. आम्ही त्याठिकाणी हल्ला केला नाही,” अशा शब्दांत भारती यांनी यावर उत्तर दिलं.

यावेळी एका महत्त्वाच्या प्रश्नावरही उत्तर देण्यात आलं.

एअर डिफेन्स यंत्रणांची 'ग्रिड' ठरली अभेद्य

यावेळी डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी भारताची एअर डिफेन्स यंत्रणा कशाप्रकारे सज्ज होती याबाबतही सविस्तर माहिती दिली.

“भारतानं दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तान प्रत्युत्तरात कारवाई करणार याची खात्री होती. त्यामुळं भारतीय लष्करानं एअर डिफेन्स यंत्रणा सज्ज ठेवली होती. त्यासाठी वेगवेगळ्या एअर डिफेन्स यंत्रणांची एक खास ग्रिड तयार करण्यात आली होती.

“या ग्रिडमुळं पाकिस्ताननं 9 आणि 10 मेच्या रात्री हल्ले केले तेव्हा या एअर डिफेन्स ग्रिडला भेदणं त्यांना शक्य झालं नाही. वेगवेगळ्या पातळ्यांवर असलेल्या या एअर डिफेन्स यंत्रणांमधून शत्रूचे ड्रोन किंवा शस्त्रं त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलीच नाही,” असंही त्यांनी सांगितलं.

स्क्रीन ग्रॅब

फोटो स्रोत, Screengrab/PIB

याचा फायदा म्हणजे, भारताच्या एअर फिल्डचं काहीही नुकसान झालं नाही, असंही ते म्हणाले. बीएसएफही या संपूर्ण कारवाईत महत्त्वाच्या भूमिकेत होतं. तेही या ग्रिडचा भाग होते, असंही त्यांनी सांगितलं.

भारताच्या आकाश सारख्या एअर डिफेन्स सिस्टिमनंही उत्तम कामगिरी केली. पाकिस्तानला तुर्कीयेकडून मिळालेली काही ड्रोन आणि पाडलेली क्षेपणास्त्र यांचे अवशेषांचे फोटोही यावेळी दाखवले.

दरम्यान, रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेतूनही अशाच प्रकारची काही महत्त्वाची माहिती समोर आली होती.

रफाल विमानाबद्दल काय सांगितलं.

भारताचे रफाल विमान पाडण्यात आल्याचे पाकिस्तानी सुरक्षा दलानं दावा केला होता. त्यानंतर भारतात सर्वत्र रफाल विमानाबाबत चर्चा सुरू झाली होती.

कालच्या (11 मे) पत्रकार परिषदेत लष्करानं या चर्चा आणि प्रश्नावर उत्तर दिलं.

पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला की, भारताची रफाल विमानं पाकिस्ताननं पाडली का?

रफाल विमान

फोटो स्रोत, DASSAULT RAFALE

त्यावर भारतीय हवाई दलाचे डीजीएओ एअर मार्शल ए. के. भारती हे असं म्हणाले की, “प्रश्न हा नाही की, आपण काय गमावले आहे? तर आपण काय मिळवले आहे, हा प्रश्न आहे. संघर्ष सुरू असताना आपल्या विरोधकांना फायदा होईल, असं काहीही आम्ही बोलू शकत नाहीत. आम्ही यावेळी फक्त इतकेच सांगू शकतो की, आपले सर्व वैमानिक सुरक्षित परत आले आहेत.”

ऑपरेशन सिंदूरमध्ये 5 भारतीय जवानांचा मृत्यू

लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये मृत्यू झालेल्या सुरक्षा दलाच्या जवानांवरही भाष्य केलं.

ते म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीय सैन्याच्या 5 सहकाऱ्यांना आणि ज्या नागरिकांचा यात मृत्यू झाला त्यांना मी आदरांजली वाहतो.”

भारतीय नौदलानं कराचीपर्यंत कारवाई केली का?

खरंच भारतीय नौदलानं कराचीपर्यंत कारवाई केली का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता यावर नौदलाचे व्हॉईस अॅडमिरल ए. एन. प्रमोद यांनी उत्तर दिलं.

ए. एन. प्रमोद म्हणाले, “भारतीय नौदल समुद्रात आणि पाकिस्तानमधील कराचीसह इतर ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी सज्ज होतं.”

“समुद्रात भारतीय नौदलाचा दबदबा होता. यावेळी पाकिस्ताननं काही पाऊल उचलण्याचं धाडसं केलं असतं, तर पाकिस्तानला माहिती होतं की भारतानं काय केलं असतं”, असंही व्हाईस अॅडमिरल प्रमोद यांनी नमूद केलं.

पत्रकार परिषद

फोटो स्रोत, PIB

याआधी, 11 मे रोजी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं की ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. तसेच भारताने पाकिस्तानच्या नागरिकांना लक्ष्य केले नाही तर केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य केले असल्याचे म्हटले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC