Source :- BBC INDIA NEWS

भारतीय सैनिक

फोटो स्रोत, Getty Images

“पाकिस्तानकडे अशी ‘विश्वासार्ह गुप्तचर’ माहिती आहे की, भारत पाकिस्तानविरुद्ध पुढील 24 ते 36 तासांत लष्करी कारवाई करण्याचा विचार करत आहे,” असं पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार म्हणाले.

गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्लेखोरांना पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचा आरोप भारतानं केला होता. पाकिस्ताननं मात्र भारताचे आरोप फेटाळले.

या सगळ्यानंतर आता अताउल्लाह तरार यांचं वक्तव्य समोर आलं आहे.

अताउल्लाह तरार म्हणाले की, “लष्करी कारवाई करण्यासाठी भारत पहलगाममधील हल्ल्याचा वापर ‘खोटी सबब’ म्हणून करू इच्छितो. भारताकडून करण्यात आलेल्या अशा कोणत्याही लष्करी साहसाला पाकिस्तानकडून निश्चित आणि निर्णायक स्वरुपाचं उत्तर दिलं जाईल.”

यावरील प्रतिक्रियेसंदर्भात बीबीसीनं भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांशी संपर्क साधला आहे.

पहलगाममधील हल्ल्यानंतर संशयितांवर कारवाई

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगामजवळ झालेला हा हल्ला जम्मू-काश्मीरमधील गेल्या दोन दशकांमध्ये नागरिकांवर झालेला सर्वांत प्राणघातक हल्ला होता.

गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही बाजूच्या सैन्यानं छोट्या शस्त्रांनी अधूनमधून सीमेपार गोळीबार केला आहे.

2016 आणि 2019 मध्ये झालेल्या भयानक कट्टरतावादी हल्ल्यांनंतर भारतानं पाकिस्तानवर लष्करी कारवाई केली होती. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर आता पुन्हा भारत पाकिस्तानवर लष्करी हल्ला करेल का, याबद्दल अंदाज बांधले जात आहेत.

गेल्या आठवड्यात भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली होती. ज्यात त्यांनी 1,500 हून अधिक जणांना ताब्यात घेत चौकशी केली होती. त्यानंतर आणखी लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र, नेमकं किती जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे, याची नेमकी आकडेवारी स्पष्ट नाही.

भारतीय अधिकाऱ्यांनी किमान 10 संशयित कट्टरतावाद्यांची घरं पाडली आहेत. यातील किमान एका घराचा संबंध पहलगाम हल्ल्यातील संशयितांशी असल्याचं वृत्त आहे.

भारतीय सैनिक

फोटो स्रोत, Getty Images

पहलगाममध्ये हल्ला केल्याचा संशय म्हणून भारतानं कोणत्याही गटाचं नाव घेतलेलं नाही. हा हल्ला नेमका कोणी केला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या गटानं सुरुवातीला या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. मात्र, नंतर या गटानं एक निवदेन जारी करत या हल्ल्याशी संबंध असल्याची बाब नाकारली.

‘द रेझिस्टन्स फ्रंट’ हा गट लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असल्याचं वृत्त आहे. लष्कर-ए-तैयबा हा पाकिस्तानस्थित कट्टरतावादी गट आहे.

भारतीय पोलिसांनी चारपैकी तीन संशयित हल्लेखोरांची नावं जाहीर केली आहेत. पोलिसांनी सांगितलं आहे की, यातील दोन जण पाकिस्तानी नागरिक आहेत आणि एक जण काश्मीरमधील स्थानिक नागरिक आहे. चौथ्या हल्लेखोराची कोणतीही माहिती नाही.

पहलगाममधील हल्ल्यात बचावलेल्या नागरिकांनी सांगितलं होतं की, हल्लेखोरांनी हिंदूंना लक्ष्य केलं होतं.

या हल्ल्यामुळे संपूर्ण भारतभर संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे म्हटलं आहे की, “जगाच्या शेवटापर्यंत भारत या संशयितांचा शोध घेईल. ज्यांनी या हल्ल्याचं नियोजन केलं आणि तो घडवून आणला, त्यांना कल्पनेपलीकडील शिक्षा देण्यात येईल.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC