Source :- BBC INDIA NEWS

सरन्यायाधीश पदाची शपथ घेणारे भूषण गवई आणि त्यांच्या आई कमलताई गवई

फोटो स्रोत, ANI & BBC

न्या. भूषण गवई यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे.

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (14 मे) न्या. गवईंना देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ दिली.

न्या. भूषण गवई हे सरन्यायाधीश बनणारे दुसरी दलित समाजातील व्यक्ती असतील. यापूर्वी, 2007 साली सरन्यायाधीशपद भूषवलेले केजी बाळकृष्णन हे दलित समाजातील होते. बाळकृष्णन यांनी तीन वर्षे सरन्यायाधीशपद भूषवलं होतं.

सरन्यायाधीश भूषण गवई यांचे वडील रा. सू. गवई हे भारतातील दलित चळवळीतले महत्त्वाचे नाव होते. महाराष्ट्राच्या विधिमंडळात, देशाच्या संसदेत त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. तसंच, राज्यपालपदाची जबाबदारीही रा. सू. गवईंनी पार पाडली होती.

रा. सू. गवई यांच्या पत्नी आणि नवनियुक्त सरन्यायाधीश भूषण गवईंच्या आई कमलाताई गवई यांच्याशी बीबीसी मराठीने संवाद साधला.

प्रश्न – तुमचा मुलगा सरन्यायाधीशपदाची शपथ घेतोय, तुमच्या मनात नेमक्या काय भावना आहेत?

उत्तर – आमचंही कुटुंबदेखील सर्वसामान्यच आहे. तो चढत्या क्रमानंच वर गेला आहे. मुलांनी चांगलं माणूस व्हावं, यासाठीचे संस्कार आम्ही केले. आई-वडिलांचं पाहूनच मुलं त्यांचं अनुकरण करतात. मुलं मोठी झाल्यावर त्यांना शिकवण्याची गरज पडत नसते.

त्यानं बी.कॉम आणि एलएलबी स्वत:च केलं. त्याला कमी गुण देऊन प्राध्यापक, मुख्यापकांनी जेव्हा त्याच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा फेरतपासणी झाल्यानंतर त्याला चांगले गुण मिळाले.

लहानपणापासून तो जिद्दी, सर्वांची सेवा करणं, सर्वांचं आदरातिथ्य करणं, कुटुंबाबाहेरदेखील इतरांना मदत करणं हे गुण त्याच्यात आहेत. लहानपणापासूनच त्याला वाचनाची, अभ्यासाची आवड आहे.

तो सतत वाचन करायचा. गरिबांना मदत करण्याची भावना त्याच्यात लहानपणापासूनच आहे. गरिबांना मदत करण्याची वृत्ती आमच्या घरातच आहे.

प्रश्न – या क्षणी त्यांच्या बालपणाची कोणती विशेष आठवण तुम्हाला आठवते का?

उत्तर – त्याचा जन्म झाला तेव्हा भूमिदानाचा सत्याग्रह सुरू होता. त्याचे वडील सत्याग्रहात होते. त्याचा जन्म झाल्यावर कार्यकर्त्यांनी पेढे वाटले. भूमिदानातून अनेकांचं कल्याण होणार होतं.

न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई

अशा अनेकांसाठीच्या कल्याणकारी आणि महत्त्वाच्या घटनेच्या वेळेसच त्याचा जन्म झाला आहे. जन्मापासूनच त्याच्यावर हे संस्कार झालेले आहेत.

प्रश्न – लहानपणी नेमकी कशी परिस्थिती होती? त्यावेळच्या संघर्षाच्या काय आठवणी आहेत?

उत्तर – परिस्थिती तशी साधारणच होती. तरीही तशा स्थितीतही लोकांना मदत करायची भावना होतीच. मुलं लहान असले तरी जवळच्या नातेवाईकांची त्यांच्या समवयस्क जी मुलं होती, त्यांना शिकवण्याचं काम आम्ही केलं. ते सर्व आता मोठ्या पदांवर आहेत.

भूषण गवई

फोटो स्रोत, ANI

त्या कठीण परिस्थितीतही सेवाभावी वृत्ती जागृत होती. साहेब (रा. सू. गवई) हे फक्त एक टक्काच राजकारणी होते. ते 99 टक्के समाजसेवक होते. ते त्यांचं काम करत राहायचे, घरची जबाबदारी माझ्यावरच होती.

प्रश्न – मुलगा कायद्याचा अभ्यास करुन सर्वोच्च ठिकाणी जातो आहे. डॉ. आंबेडकरांचा आदर्श नेहमीच राहिला असेल. या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांचं स्मरण होतंय का? काय वाटतंय नेमकं?

उत्तर – तो स्वत:च भाषणांमध्ये सांगतो, वैयक्तिक चर्चेतही सांगतो. त्याच्या आचरणातही पदोपदी बाबासाहेब असतात. तो सांगतो की मी आज जे आहे, ते सर्व बाबासाहेबांमुळेच आहे. ती गोष्ट सत्य आहे. फक्त तोच नाहीतर आम्ही सर्वजण जे आहोत ते बाबासाहेबांमुळेच आहोत. बाबासाहेबांनी संघर्ष केला म्हणून आम्हाला हे दिवस दिसत आहेत.

तेव्हा गावकुसाबाहेरचं जगणं होतं. बाबासाहेबांनी जर समानतेचा अधिकार दिला नसता, हिंदू कोडबिल पासं केलं नसतं, तर मी तरी कुठे शिकली असते. इतकं शिक्षण तर सोडूनच द्या, मी शाळेतदेखील गेली नसती. या महापुरुषांच्या संघर्षामुळेच आपण सर्वच आहोत.

कमलताई गवई

मागासवर्गीयांना प्रगती करता आली. साहेबांनीसुद्धा मला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं. माझं लग्न झालं तेव्हा मी जेमतेम शिकलेली होती. त्याकाळी मुलींना शिक्षणासाठी गावाबाहेर पाठवत नसत. मग आमचा साखरपुडा झाल्यावर लग्न होईपर्यंत मी अमरावतीलाच हॉस्टेलमध्ये राहिले. त्यानंतर लग्न झाल्यावर घरून माझं शिक्षण पूर्ण केलं. तेही नोकरी करून.

नोकरी लागण्यापूर्वी परिस्थिती इतकी बेताची होती की मी शिलाई काम करून संसार चालवला. ती शिलाई मशीन मी आजही एक दागिना म्हणून सांभाळून ठेवली आहे. मग मी डीएड केल्यावर नोकरीला लागले. मात्र आम्ही फक्त आमच्या कुटुंबापुरताच कधीही विचार केला नाही.

समाजात ज्याला कोणाला शक्य होईल त्याला आम्ही मदत करत गेलो. इतरांची मदत करणं, सेवा करणं हे आम्हाला व्यसनच आहे. आमच्या मुलांवरही तेच संस्कार आहेत. गाडगेबाबांच्या शिकवणीप्रमाणेसुद्धा काम सुरू आहे. आता वृक्षारोपणाचा कार्यक्रमदेखील हाती घेतलेला आहे.

प्रश्न – गवई कुटुंबाने कायमच वंचितांचे प्रश्न उचलून धरले आहेत, पण अजूनही त्याबाबत बरच काम करण्यासारखं आहे, तुमच्या मलानं सरन्यायाधीशपदावरून या विषयाला कसा हात घालावा असं तुम्हाला वाटतं?

उत्तर – सरन्यायाधीशपदावर असताना जे करणं आवश्यक आहे ते तो नक्कीच करणार याची मला पूर्ण खात्री आहे. याआधीदेखील तो ज्या ज्या पदांवर होता तसंच घरातील जबाबदाऱ्या असो प्रत्येक ठिकाणी त्यानं योग्य तो न्याय दिला. तो मुळातच बुद्धिमान आहे, अभ्यासू आहे. यामागे त्याचे कष्ट आहेत. अभ्यास करून आणि विचार करूनच निकाल देतो. त्यामुळेच आतापर्यंतच्या त्याच्या निर्णयांचं कौतुक झालं आहे. यापुढेही तो तेच करणार याची खात्री आहे.

भूषण गवई

फोटो स्रोत, ANI

अर्थात तो काही आता माझ्या एकटीचाच मुलगा राहिलेला नाही. तो मोठं होण्यामध्ये अनेकांचे हातभार आहेत, त्याचे परिश्रम आहेत. तो कष्टानं अशाच प्रकारे एकएक पायरी वर चढत गेला आहे.

कर्तृत्वान व्यक्तींना जेव्हा अशी महत्त्वाची पदं मिळतात तेव्हा ते त्याला न्याय देतात. मी फक्त त्याची आई म्हणून हे सांगत नाही. प्रत्यक्षात तो माझ्यापेक्षा साहेबांच्या सहवासातच जास्त काळ राहिला. मात्र आईचा आशिर्वाद कायमच त्याच्या पाठिशी आहे. फक्त माझाच नाही तर त्याच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनाच आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे. त्याचबरोबर त्याचं कर्तृत्व आणि परिश्रम आहेतच.

प्रश्न – आज त्यांचे वडील असते तर ते काय म्हणाले असते?

उत्तर – तो आज सर्वोच्च पदावर गेला हे पाहून त्यांना खूपच आनंद झाला असता. साहेबांच्या विचार जेव्हा माझ्या मनात येतो आणि याची वाटचाल मी जेव्हा पाहते, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येतं. साहजिकच साहेबांनाच अत्यंत आनंद झाला असता. त्यांनीच याला घडवलं. त्यांच्यामुळेच हे शक्य झालं. मी जे केलं ते कोणतीही संसारी गृहिणी करते. त्यात काही विशेष नाही.

कमलाताई गवई

प्रश्न – तुमच्या मुलानं वकिली करावी ही तुमची इच्छा होती की त्यांची स्वतःची इच्छा होती? त्यांनी राजकारणात जावं असं तुम्ही कधी त्यांना सांगितलं नाही का?

उत्तर – असं सांगायची गरज नसते, तो राजकारणात जाईल असंच वाटत होतं. तो खूप चुणचुणीत होता, सक्रिय होता. स्टुडंट फेडरेशनमध्ये होता, सत्याग्रहात, मोर्चात असायचा. लोकांशी त्याचे चांगले संबंध होते. त्याला राजकारणात जाण्यासाठी आग्रह केला नाही, मात्र तो साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून राजकारणातच जाईल असंच वाटत होतं. मात्र त्याची दिशा कधी बदलली ते कधी कळलंही नाही, हे तितकंच खरं आहे.

प्रश्न – कुटुंबातील मोठा मुलगा म्हणून इतरांप्रती त्यांचा कुटुंबातला वावर कसा आहे?

उत्तर – तो सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचा. सर्व भावंडामध्ये तो मोठा असल्यामुळे त्याच्यावर जबाबदारी आली.

न्या. भूषण गवई हे सरन्यायाधीश बनणारे दुसरी दलित समाजातील व्यक्ती असतील.

फोटो स्रोत, ANI

लहानपणापासूनच तो प्रगल्भ आहे. कुटुंबातच नव्हे तर जवळच्या सर्वच नातेवाईकांना, कार्यकर्त्यांना तो मदत करायचा.

प्रश्न – गौतम बुद्धांची कुठली शिकवण सतत स्मरणात ठेवण्याचा सल्ला तुम्ही तुमच्या मुलाला द्याल?

उत्तर – गौतम बुद्धानं जगाला दिलेली सर्वात मोठी शिकवण म्हणजे ‘अप्प दीपो भव’. स्वत:चा प्रकाश स्वत:च व्हा, कोणावरही अवलंबून न राहता पुढे जा. हीच सर्वात महत्त्वाची शिकवण आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC