Source :- BBC INDIA NEWS

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातल्या ताडगाव परिसरातील विहीर

फोटो स्रोत, BBC/Alpesh Karkare

रविवारी, 11 मे रोजी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात ताडगाव परिसरात घडलेल्या घटनेची परिसरात भरपूर चर्चा आहे.

ताडगावातील विहिरीत काही व्यक्तींनी संशयास्पद काहीतरी टाकलं, त्यामुळे सुरुवातीला गावकऱ्यांना विष टाकल्याचा संशय आला आणि हे प्रकरण पोलिसांकडे गेले.

मुरुडमधील साळाव, ताडगाव आणि चोरढे गावातील सार्वजनिक विहिरीत कुणीतरी काही वस्तू टाकतोय असे ग्रामस्थांनी पाहिले.

त्याच प्रमाणे ताडगावमध्ये देखील एक महिला आणि एक पुरुष विहिरीत काहीतरी टाकत आहेत असं दिसलं. त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना थांबवून या संदर्भात विचारणा केली.

संशयास्पद गोष्टी आढळल्याने हे प्रकरण नंतर रायगड मधील रेवदंडा पोलीस ठाण्यामध्ये गेले आणि यात अंधश्रद्धेतून हा प्रकार झाल्याचे समोर आले.

प्रकरण काय आहे?

नवी मुंबईत सीवूड्स दारावे येथे राहणारे अखलाक खान आणि रेश्मा खान हे दाम्पत्य मुरुड तालुक्यातील मेहुणीच्या लग्नासाठी आले होते.

कार्यक्रम करून परत येत असताना खान कुटुंबीय मुरुड परिसरात असताना काहीतरी कामानिमित्ताने रेवदंड्याला उतरले.

खान दाम्पत्याने तिथून भाड्याने रिक्षा केली आणि साळावपासून चोरढेपर्यंत येणाऱ्या विहिरींमध्ये त्यांनी आपल्याकडे असलेल्या विटा टाकण्यास सुरुवात केली.

ताडगावमध्ये हा संशयास्पद प्रकार त्यांना करताना पाहून, ग्रामस्थांनी काय करतात म्हणून अखलाकला जाब विचारला.

त्यावर त्याला नीट उत्तर देता आले नाही आणि त्याने दिलेले कारण ग्रामस्थांना पटले नाही. त्यामुळे काही काळ तिथे गोंधळ उडाला होता.

पोलिसांनी मांत्रिक खलिक रझा अन्सारी आणि संशयित आरोपी अकलाख खान यांना ताब्यात घेतलं आहे.

फोटो स्रोत, BBC/Alpesh Karkare

या घटने संदर्भात अनेक तर्कवितर्क तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी लावले. यामध्ये विहिरीत विटा टाकण्याचा हा विष टाकण्याचा तर प्रकार नाही ना असा संशय देखील ग्रामस्थांना आला.

त्यावरून ग्रामस्थ आणि खान दाम्पत्य यांच्यामध्ये काही काळ घटनास्थळी वादविवाद देखील झाला.

त्यानंतर ग्रामस्थांनी थेट रेवदंडा पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत खान दाम्पत्याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी रेवदंडा पोलीस ठाण्यात आणले.

मुरुडवासियांची पोलीस ठाण्याबाहेर गर्दी

ग्रामस्थांनी रेवदंडा पोलीस ठाण्याबाहेर विहिरीत विष टाकले आहे किंवा काय केले या शंकेचे निरसन करण्याची मागणी पोलिसांकडे केली.

रेवदंडा पोलीस ठाण्याबाहेरची गर्दी

फोटो स्रोत, BBC/Alpesh Karkare

या घटनेनंतर अनेक व्हीडिओ समाज माध्यमावर फिरू लागले आणि अनेक चर्चा राज्यभर घडू लागल्या.

ही घटना घडल्याचं समजताच आजूबाजूच्या गावकऱ्यांनी देखील पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली व संशयास्पद असणाऱ्या या व्यक्तींवर कारवाईची मागणी केली.

सार्वजनिक विहिरीत विटा टाकल्या म्हणून स्थानिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करण्यासह पाणी दूषित करण्याच्या दृष्टीने चंद्रकांत मोहिते यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली.

पोलिसांच्या चौकशीत काय निष्पन्न झाले

रेवदंडा पोलिसांनी या घटनेनंतर खान दाम्पत्यांची विविध पद्धतीने चौकशी करायला सुरुवात केली.

सुरुवातीला खान दांपत्य काही केले नसल्याचं सांगत होते, मात्र लोकांनी तुम्हाला पाहिलं आहे तुम्ही विहिरीत काय टाकलं सांगा याबाबत पोलिसांनी सज्जड दम खान यांना दिला.

यानंतर पोलिसांनी खान दांपत्याची कसून चौकशी केली असता, एक धक्कादायक बाब यातून समोर आली.

मुलीचे प्रेम संबंध तोडण्यासाठी हा उपाय

अखलाक खान याने पोलिसांना सांगितलं की, माझी 23 वर्षीय मुलगी सादियाचे पाच-सहा वर्षांपासून तुर्भे येथील एका मुलासोबत प्रेमसंबंध आहेत. मात्र, त्याला आमचा विरोध आहे.

त्यामुळे सादियाने एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. म्हणून यावर उपाय करण्यासाठी आम्ही कल्याणमधील मांत्रिकाची मदत घेतली.

रायडग पोलीस

फोटो स्रोत, BBC/Alpesh Karkare

सादियाचे प्रेमसंबंध तोडण्यासाठी मांत्रिकाने खान दांपत्याला 21 विटा दिल्या. त्यावर मंत्रतंत्र केले आणि या विटा 21 विहिरींमध्ये टाकण्यास सांगितले. हे केल्यानंतर मुलीचे प्रेमसंबंध तुटतील, असे मांत्रिकाने खान यांना सांगितले.

त्यानुसार खान दांपत्यान काही विटा नेरुळ, नवी मुंबईतील विहिरीत टाकल्या होत्या. त्यानंतर काही विटा मुरुड मध्ये टाकण्याच्या दृष्टीने ते गावात उतरले होते असे पोलिसांना चौकशीत खान दाम्पत्यांनी सांगितलं.

‘ग्रामस्थांच्या शंका, पोलिसांनी पाणी पिऊन दाखवले’

या घडलेल्या प्रकारामुळे ग्रामस्थांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या होत्या. मुरुड परिसरातील आसपासच्या गावातील लोकांनी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. विहिरीत विष टाकल्याची एक प्रमुख शंका त्यांच्यात होती.

या शंकेचं काय असा सवाल मुरुड आणि अलिबाग परिसरातील काही लोकप्रतिनिधींनी पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित केला.

खान दाम्पत्यांनी पोलिसांना दिलेली सगळी माहिती, गावकऱ्यांनाही पोलिसांनी सांगण्यात आली. मात्र त्यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता.

मग शंका दूर करण्यासाठी थेट पोलिसांनी विहिरीतील पाणी ग्रामस्थांसमोर पिऊन दाखवले. तसेच अखलाक खान आणि रेश्मा खान यांनीही यावेळी पाणी पिऊन दाखवले. त्यामुळे विष टाकल्याचा संभ्रम दूर झाला.

कोणताही अनुचित प्रकार पोलीस ठाणे किंवा घटनास्थळी घडू नये म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या सूचनेनुसार पेण उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग मुख्यालय मुरुड येथून अधिक पोलिस कर्मचारी यांची घटनेच्या वेळेला अधिक कुमक मागविण्यात आली होती.

यावेळी पेण उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे, रेवदंडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांनी जमलेल्या ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांना कारवाई करीत गुन्हा दाखल करण्यात येतोय असे आश्वासन देत शांत केले.

 अखलाक खान

फोटो स्रोत, BBC/Alpesh Karkare

खान दाम्पत्य आणि मांत्रिकाविरोधात गुन्हा

पण मुलीने प्रियकराचा नाद सोडावा यासाठी हे सगळं घडलं असल्याचं अंधश्रद्धेचे वास्तव पोलीस चौकशी दरम्यान समोर आले.

या प्रकरणी मांत्रिकाचा आधार घेत अंधश्रद्धेला खतपाणी घातले म्हणून खान दाम्पत्य आणि कल्याण पश्चिमेकडील गोविंदवाडीमधील मांत्रिक खालिद यांच्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

भारतीय न्याय संहिता कलम 279, 3(5) महाराष्ट्र अंधश्रद्धा व जादूटोणा अधिनियम 2013 चे कलम 3 (1) (2) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खानकडून कच्च्या मातीची आयताकृती वीटही जप्त करण्यात आली आहे. रेवदंडा पोलिसांनी विहिरींच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.

पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत अशी माहिती रेवदंडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांनी दिली.

तसेच मांत्रिक याला देखील आमच्या टीमने ताब्यात घेतला आहे. त्याची देखील चौकशी सुरू असल्याचं किरवले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची एकुलती एक मुलगी

या प्रकाराने मुख्य आरोपी अखलाक अयुब खान (वय 47 वर्षे), व त्यांची पत्नी रेश्मा अखलाक खान (वय 47 वर्षे) दोन्ही सध्या रा. परशुराम बिल्डिंग, रूम नं. 301, सेक्टर 23, नेरुळ सी वूड्स दारवे, नवी मुंबई येथे वास्तव्यास आहेत.

तर ते मूळचे रा. केळशी, दाभोळ जि. रत्नागिरी येथील आहेत. 23 वर्षाची सादिया खान ही त्यांची एक मुलगी आहे, ती सध्या शिकत आहे तर 26 वर्षीय एक मुलगा आहे.

मांत्रिकावर कठोर कारवाई करा : अंनिस

या घटनेसंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्याचे सदस्य मिलिंद देशमुख बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, “जादूटोणा विरोधी कायदा होऊन महाराष्ट्रात अकरा वर्षापेक्षा अधिक वर्षे उलटली आहेत. तरीदेखील आज वेगवेगळे प्रश्न घेऊन लोक मांत्रिकाकडे जात आहेत. हे दुर्दैवी आहे.”

पुढे देशमुख म्हणाले की, “या प्रकरणामध्ये मुलीचे प्रेम संबंध, आत्महत्येचा प्रयत्न आणि त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी हे घडलं असल्याचं समोर येतंय. यात मांत्रिक यांनी विटा टाकण्यासाठी सांगितल्या, उद्या अशाप्रकारे मांत्रिक काही सांगतील. अज्ञान आणि अंधश्रद्धा लोकांमध्ये अजूनही खूप आहे, ते कुठल्याही स्वरूपाला जाऊ शकतात. खरंतर पोलिसांनी खान याला अटक केली तशी मांत्रिक याला देखील अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमची आहे.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC