Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
आज वैद्यक शास्त्रानं प्रचंड प्रगती केली आहे. तरीदेखील असे काही आजार आहेत, ज्यांच्याबद्दल अजूनही चिंतेचं वातावरण असतं. मलेरिया हा असाच एक रोग असून या रोगाच्या नावानंच धडकी भरते.
मलेरियाच्या संसर्गाची व्याप्ती आणि त्यामुळे दगावणारे रुग्ण यामुळेच या आजाराबद्दल चिंता निर्माण होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार दर दुसऱ्या मिनिटाला एका मुलाचा मलेरियानं मृत्यू होत असतो. जगभरात दरवर्षी मलेरियाच्या जवळपास 20 कोटी रुग्णांची नोंद होते.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या काही वर्षात मलेरियाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या 2018 च्या ‘जागतिक मलेरियाविषयक अहवाला’नुसार 2015 ते 2017 या दोन वर्षात मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत फारशी घसरण झालेली नाही.
मलेरिया कशामुळे होतो, मलेरियाची लक्षणं कोणती, मलेरिया झाल्यावर कोणती काळजी घेतली पाहिजे, मलेरिया अधिक धोका कोणाला असतो, मलेरियाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळणारे प्रदेश कोणते यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल जाणून घेऊया.
मलेरियाचा प्रादूर्भाव
मलेरिया हा रोग ॲनाफिलिस डासांच्या मादीमुळे होतो. ॲनाफिलिस डासांच्या 400हून जास्त प्रजाती आहेत. यातल्या जवळपास 30 प्रजाती मलेरियाच्या संसर्गासाठी कारणीभूत ठरतात.
हे डास सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी येतात. त्यावेळी मलेरिया पसरवणारे हे डास चावण्याची शक्यता सर्वाधिक असते.

ॲनाफिलिस डासांच्या मादी पाण्यात अंडी घालतात. त्यातून अळी बाहेर येते. पुढे त्यातून डास तयार होतात. या अंड्यांच्या भरणपोषणासाठी मादीला रक्ताची गरज असते.
डॉ. शाल्मली इनामदार, मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये प्रौढ संसर्गजन्य आजाराच्या कन्सल्टंट आणि डॉक्टर आहेत. बीबीसी मराठीने डॉ. शाल्मली इनामदार यांच्याशी मलेरियाशी निगडीत मुद्द्यांविषयी संपर्क साधला
मलेरियाचा सर्वाधिक धोका कोणाला असतो?
डॉ. इनामदार म्हणाल्या, “मलेरिया हा डास चावल्यामुळे होतो. संसर्गजन्य डासांच्या संपर्कात आलेल्या कोणालाही मलेरिया होऊ शकतो. मात्र काही गट गंभीर गुंतागुंतीच्या स्थितीबाबत असुरक्षित असतात.”
“यात ज्यांची रोगप्रतिकार क्षमता पूर्णपणे विकसित झालेली नाही अशी लहान मुलं, रोगप्रतिकार शक्तीतील बदलांमुळे आणि गुंतागुंतीच्या बाबतीत अधिक असुरक्षित झाल्यामुळे गर्भवती महिला, आरोग्याच्या समस्यांमुळे जे अशा संसर्गाच्या बाबतीत अधिक संवेदनशील होतात असे वृद्ध यांना मलेरियाचा अधिक धोका असतो.”

फोटो स्रोत, Getty Images
याचप्रमाणे जे लोक केमोथेरेपी घेत असतात किंवा एचआयव्हीबाधित असतात अशांची रोगप्रतिकारक्षमता कमकुवत झालेली असते, त्यांना मलेरिया होण्याचा धोका अधिक असतो.
जे लोक मलेरियाचा संसर्ग होणाऱ्या प्रदेशात राहणारे लोक, विशेषकरून ग्रामीण भाग किंवा साचलेलं पाणी असलेल्या सखल भागात राहणारे लोक, जे सतत मलेरियाच्या संसर्गाच्या संपर्कात येतात, त्यांनाही अधिक धोका असतो.
याप्रकारच्या प्रदेशात बाहेरून येणारे पर्यटक किंवा प्रवासी देखील अधिक संवेदनशील असू शकतात. कारण त्यांच्या मलेरियाच्या रोगाविरोधात लढण्याची रोगप्रतिकारशक्ती निर्माण झालेली नसते.
मलेरियाच्या आजाराची मुख्य लक्षणं कोणती?
संसर्गजन्य डासांनी चावल्यानंतर साधारणपणे 10 ते 15 दिवसांनी मलेरियाची लक्षणं दिसू लागतात. सुरुवातीच्या टप्प्यात ही लक्षणं व्हायरल तापासारखी असू शकतात.
सर्वात सामान्य लक्षणं म्हणजे खूप ताप येणं, थंडी वाजून येणं, खूप जास्त घाम येणं, अंगदुखी, डोकेदुखी आणि थकवा जाणवणं. अनेक रुग्ण मळमळ होणं, उलट्या होणं आणि भूक न लागणं अशा तक्रारी देखील करतात.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. इनामदार सांगतात, “मलेरियाचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे विशिष्ट पॅटर्नमधील तापाचं चक्र. यात दर 48 ते 72 तासांनी ताप वाढतो. परजीवी किंवा सूक्ष्मजीवाच्या प्रकारावर ते अवलंबून असतं.
गंभीर स्थितीमध्ये गोंधळ होणं, श्वास घ्यायला त्रास होणं, झटके येणं आणि अवयवांचं कार्य बिघडणं यासारखी लक्षणं दिसतात. तुम्हाला अशाप्रकारची लक्षणं दिसली, विशेष करून पावसाळ्यात किंवा त्यानंतर, तर ताबडतोब डॉक्टरचं मार्गदर्शन घ्यावं.”
मलेरिया झाल्यावर काय करावं?
रक्ताची तपासणी केल्यावर मलेरिया झाल्याचं निष्पन्न झाल्यावर, डॉक्टरांच्या देखरेखीखाली ताबडतोब मलेरियाविरोधी उपचार सुरू करणं महत्त्वाचं असतं.
मलेरियाच्या परजीवीच्या प्रकारावर (उदाहरणार्थ, प्लासमोडियम फाल्सिपॅरम किंवा पी. व्हायव्हॅक्स), संसर्गाची तीव्रता, रुग्णांचं वय आणि त्याचं एकूणच आरोग्य यावर कोणती औषधं द्यायची आणि त्यांची मात्रा किती ठेवायची हे अवलंबून असतं.

फोटो स्रोत, Getty Images
मलेरिया झाल्यावर ओव्हर-द-काउंटर प्रकारातील तापाची औषधं घेत स्वत:च उपचार करण्याचा प्रयत्न करू नका. कारण चुकीच्या किंवा अर्धवट उपचारांमुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते किंवा औषधांच्या प्रतिकाराला तोंड द्यावं लागू शकतं.
तसंच जरी बरं वाटत असलं तरी डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा कोर्स पूर्ण करा. विश्रांती घेणं, भरपूर पाणी पिणं आणि डॉक्टरांकडे फॉलो-अप घेणं, हे देखील मलेरियातून बरं होण्यासाठी तितकंच महत्त्वाचं असतं.
मलेरियाकडे दुर्लक्ष केल्यास काय होतं?
मलेरियाकडे दुर्लक्ष केल्यास किंवा उपचार करण्यास उशीर केल्यास त्यामुळे रुग्णाची स्थिती गंभीर होऊ शकते, त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
यात सेलेब्रल मलेरिया (ज्यात मेंदूवर परिणाम होतो), श्वसनाची तीव्र समस्या, मूत्रपिंड निकामी होणं किंवा लाल रक्तपेशी नष्ट झाल्यामुळे गंभीर स्वरुपाचा अशक्तपणा येणं यांचा समावेश असतो.
लहान मुलं आणि गर्भवती महिला यांच्या बाबतीत परिणाम आणखी गंभीर असू शकतात. काहीवेळा त्यातून गर्भपात होतो, बाळ अकाली जन्माला येणं किंवा मृत्यूदेखील होऊ शकतो.
सुरूवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्या आसपासच्या लोकांनादेखील, विशेषकरून जिथे मलेरियाचा धोका अधिक असतो अशा प्रदेशांमध्ये इतरांना हा संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत?
डासांपासून बचाव करणं आणि डासांच्या प्रजननावर नियंत्रण ठेवणं, यावर मलेरियाचा प्रतिबंध अवलंबून असतो. यासंदर्भातील महत्त्वाच्या दैनंदिन सवयी अशा असतात.

मलेरियाची खूप जास्त जोखीम असलेल्या भागात किंवा वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मलेरियाविरोधी औषधांची शिफारसदेखील केली जाऊ शकते.
आहार-जीवनशैलीत बदल करण्यास सांगितलं जातं का?
मलेरिया झालेला असताना आणि नंतर, शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं, पोषक घटकांचं प्रमाण कमी होतं. हलका, पातळ संतुलित आहार, व्हिटामिन्स आणि सहज पचण्यासारखा आहार आवश्यक असतो. यात पुढील गोष्टींचा समावेश करा असं डॉ. शाल्मली इनामदार सांगतात-
- नारळ पाणी, सूप आणि हर्बल टी प्यावं जेणेकरून शरीरातील पाण्याची पातळी राखली जाते.
- रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी संत्री आणि पेरूसारखी व्हिटामिन सी युक्त फळं, संसर्गात कमी झालेलं रक्त पुन्हा तयार करण्यासाठी पालक आणि शेंगासारखं लोहयुक्त अन्न खाल्लं पाहिजे.
- पचनासाठी योग्य आणि ऊर्जेची पातळी वाढण्यासाठी छोटा, मात्र वारंवार आहार घेणं. रुग्णानं पुरेशी विश्रांती घ्यावी आणि गेलेली ताकद परत येईपर्यंत ताण पडणारी हालचाल टाळावी. तेलकट किंवा मसालेदार पदार्थ आणि मद्यपान टाळावं.

फोटो स्रोत, Getty Images
कारण त्यामुळे यकृतावर ताण येऊ शकतो. मलेरियाच्या संसर्गात परजीवींमुळे यकृतावर आधीच ताण आलेला असतो.
डॉ. पल्लवी पाटेकर, नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये अंतर्गत औषधं विभागात कन्सल्टंट आहेत. बीबीसीनं मलेरियाविषयी त्यांच्याशी चर्चा केली. त्या म्हणतात की, महाराष्ट्रात आरोग्याच्या क्षेत्रात मलेरियाचं महत्त्वाचं आव्हान आहे.
“महाराष्ट्रात मलेरिया नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करूनदेखील आरोग्याच्या क्षेत्रात हा रोग एक महत्त्वाचं आव्हान आहे. प्रतिबंधात्मक उपायांसह आणि या आजाराच्या प्रादुर्भावासाठी कारणीभूत ठरणारे संबंधित घटक समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.”
महाराष्ट्रात प्लासमोडियम प्रजातीच्या प्रसारासाठी अनुकूल पर्यावरणीय स्थिती असलेल्या भागात मलेरियाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळतो.
महाराष्ट्रात मलेरियाचा सर्वाधिक धोका कुठे आहे?
डॉ. पल्लवी पाटेकर सांगतात, “गडचिरोली, नंदुरबार आणि चंद्रपूर तसंच कोकणातील काही भाग इथे मलेरियाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळतो. अलीकडच्या काळात नवी मुंबईत मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.”
“या भागांमध्ये ग्रामीण परिसर, पाणी साचलेलं क्षेत्र आणि पायाभूत सुविधांची सुरू असलेली कामं या वैशिष्ट्यांमुळे मलेरियाचा संसर्ग वाढतो आहे. या कारणांमुळे हा भाग मलेरियाच्या प्रसारासाठी मुख्य वाहक असलेल्या या डासांच्या प्रजननासाठी योग्य परिसर ठरतो.”
मलेरियाच्या डासांची नवीन प्रजाती
डॉ. पल्लवी पाटेकर पुढे म्हणाल्या, “जानेवारी 2023 मध्ये वैज्ञानिकांनी गडचिरोलीतील क्युलेक्स काटेझरी या डासांच्या नवीन प्रजातीची ओळख पटवली. ही प्रजाती क्युलेक्स गटातील असून यातील काही प्रजाती फिलेरिया आणि जॅपनीज एन्सेफॅलिटिससारख्या रोगांचा संसर्ग पसरवतात.
या शोधामुळे त्याचे आरोग्यावरील संभाव्य परिणाम निश्चित करण्यासाठी पुढील संशोधनाची आवश्यकता अधोरेखित होते.”
प्लासमोडियम फॅल्सिपॅरममुळे होणारा फॅल्सिपॅरम मलेरिया हा मलेरियाच्या सर्वात धोकादायक प्रकारांपैकी एक आहे. या प्रकारचा मलेरिया अनेक अवयव निकामी होण्यासह गंभीर गुंतागुंत निर्माण करण्याच्या त्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे.
यातील परजीवी लाल रक्तपेशींवर आक्रमण करू शकतो, त्यामुळे या पेशी नष्ट होतात आणि त्यातून सेलेब्रल मलेरिया म्हणून ओळखली जाणारी समस्या निर्माण होते.

फोटो स्रोत, Getty Images
त्याचबरोबर यकृत, मूत्रपिंड आणि फुफ्फुसासह महत्त्वाच्या अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होणं आणि रक्तपुरवठा कमी होण्याशिवाय त्यांचं पुन्हा कधीही भरून न निघणारं नुकसान होऊ शकतं.
जर फॅल्सिपॅरम मलेरियावर उपचार केले नाहीत तर त्यामुळे अवयव निकामी झाल्यामुळे, धक्का बसल्यामुळे किंवा गंभीर स्वरुपाचा अशक्तपणा आल्यामुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
- मलेरियाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी अनेक आघाड्यांवर काम करणं आवश्यक आहे. सार्वजनिक आरोग्याच्या उपक्रमांमध्ये कीटकनाशकं फवारलेल्या जाळ्याचं वितरण, घरात कीटकनाशकांची फवारणी आणि डासांच्या प्रजजनाची ठिकाणं नष्ट करणं यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे.
- लोकांनी डास प्रतिबंधक मलमांचा वापर करून, डासप्रतिबंधक जाळ्यांखाली- मच्छरदाणीत झोपून आणि पूर्ण बाह्यांचे कपडे घालून स्वत:चं संरक्षण केलं पाहिजे.
- वेळीच केलेलं निदान आणि अँटीमलेरियल औषधांसह योग्य उपचार हे मलेरिया गंभीर स्थितीत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात.
जेनेटिकली मॉडिफॉईड डासांद्वारे मलेरियाला प्रतिबंध
अलीकडेच, वैज्ञानिक संशोधनातून मलेरियाशी लढण्यासाठी जैविकदृष्ट्या बदललेले म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड (जीएम) डास आणि जेनेटिकली मॉडिफाईड मलेरियाच्या परजीवींचा उदय झाला आहे.
या प्रकारचे डास मलेरियाच्या डासांचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी किंवा परजीवींचा प्रसार करण्याची क्षमता कमी करण्यासाठी डिझाईन केलेले असतात. तर दुसऱ्या बाजूला परजीवींची रचना कमी हानिकारक किंवा मानवाला संक्रमित करू न शकणारी केलेली असते.

फोटो स्रोत, Getty Images
जागतिक आरोग्य संघटना मलेरियाला आळा घालण्यासाठी मार्गदर्शन करत असते. मलेरियाला प्रतिबंध आणि त्याच्या उच्चाटनासाठी औषधांची परिणामकारकता टिकवून ठेवणं मोठं आव्हान आहे आणि जिथे जिथे मलेरियाचा फैलाव होतो, अशा देशांमध्ये त्यावर नियमित लक्ष ठेवणं गरजेचं आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC