Source :- BBC INDIA NEWS
26 डिसेंबर 2024
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं काल गुरुवारी 26 डिसेंबर रोजी निधन झालं आहे. गुरुवारी सायंकाळी प्रकृती खालावल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते 92 वर्षांचे होते.
त्यांचं पार्थिव दिल्लीमधील 3, मोतिलाल नेहरू रोड या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं आहे. याठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करता येईल.
त्यानंतर शनिवारी (28 डिसेंबर) रोजी सकाळी 8 वाजता त्यांचं पार्थिव काँग्रेस मुख्यालयात ठेवलं जाईल. त्याठिकाणी नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्ते त्यांना श्रद्धांजली अर्पण करू शकतील.
शनिवारी सकाळी 9.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जातील.
भारत सरकारने त्यांच्या मृत्यूनंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
रात्री काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्ष राहुल गांधी, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, केसी वेणूगोपाल यांच्यासहित अनेक काँग्रेस नेते रात्री त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.
22 मे 2004 रोजी मनमोहन सिंग हे देशाचे 13 वे पंतप्रधान बनले होते. त्यानंतर ते सलग 10 वर्षं देशाचे पंतप्रधान राहिले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
Facebook पोस्ट समाप्त
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.
केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, केंद्रीय अर्थमंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, देशाचे अर्थमंत्री आणि शेवटी पंतप्रधान. डॉ सिंग यांचा देशाच्या आर्थिक आणि राजकीय विश्वातील प्रवास हा थक्क करणारा आहे.
पंतप्रधानांसह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
“भारताच्या सर्वात प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण भारत शोकाकुल आहे. अतिशय सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले मनमोहन सिंग एक नामांकित अर्थतज्ज्ञ म्हणून उदयास आले. देशाच्या अर्थमंत्रीपदासह त्यांनी विविध सरकारी पदांवर काम केले. देशाच्या आर्थिक धोरणांवर त्यांची अमीट छाप होती. संसदेत त्यांनी केलेली भाषणं अभ्यासपूर्ण होती. नागरिकांचे आयुष्य सुधारण्यासाठी त्यांनी व्यापक प्रयत्न केले”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनीही मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहताना म्हटलं आहे की, “माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर तसेच देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावली. या दु:खद प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि समर्थकांप्रती संवेदना व्यक्त करतो. वाहेगुरुजी त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.”
जगभरातील नेत्यांनी व्यक्त केला शोक
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभरातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत संवेदना व्यक्त केल्या. ते म्हटले की, भारताने आपल्या सर्वांत हुशार सुपूत्राला गमावलं आहे.
त्यांनी म्हटलं, “डॉ. मनमोहन सिंग अफगाणिस्तानच्या जनतेचे दृढ सहकारी आणि मित्र होते. मी त्यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करतो. तसेच त्यांचे कुटुंबीय, सरकार आणि भारतातील लोकांप्रती आपल्या संवेदना व्यक्त करतो.”
मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांनीही श्रद्धांजली वाहताना मनमोहन सिंग हे मालदीवचे सर्वोत्कृष्ट मित्र होते, असं म्हटलं आहे.
त्यांनी ‘एक्स’वर लिहिलं, “मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झालं. मला त्यांच्यासोबत काम करणं नेहमी आवडायचं. ते पितातुल्य व्यक्तिमत्त्व होते. ते मालदीवचे चांगले मित्र होते.”
ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला डा सिल्वा यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटलंय की, “माझे मित्र, भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त करतो. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात आम्ही सरकारांमध्ये समकालीन होतो. आमच्या दोन्ही देशांचं नातं बळकट करण्यासाठी आणि एक चांगलं जग उभारण्यासाठी आम्ही एकत्र काम केलं. ब्राझिल, दक्षिण आफ्रिका आणि भारताला एकत्र आणून IBSA च्या निर्मितीत आणि BRICS च्या पायाभरणीत सिंग यांची भूमिका महत्त्वाची होती.”
मी मार्गदर्शक गमावला- राहुल गांधी
“मनमोहन सिंग यांनी त्यांची अत्युच्च बुद्धिमत्ता आणि सचोटीच्या बळावर देशाचं नेतृत्व केलं. त्यांचा नम्रपणा आणि अर्थशास्त्राच्या सखोल अभ्यासाने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली.
श्रीमती कौर आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्या मनःपूर्वक संवेदना.
मी एक मार्गदर्शक गमावला आहे. त्यांचे कोट्यवधी हितचिंतक मोठ्या अभिमानाने त्यांना स्मरणात ठेवतील.”, अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डॉ. सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
भारताने अतुलनीय उंचीचा अर्थशास्त्रज्ञ गमावला- मल्लिकार्जुन खर्गे
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अत्यंत भावनिक शब्दांमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे.
ते लिहितात, “इतिहास तुमच्याकडे अधिक करुणेने पाहील यात शंका नाही, डॉ. मनमोहन सिंग जी!
माजी पंतप्रधानांच्या निधनाने भारताने एक दूरदर्शी राजकारणी, निर्विवाद सचोटीचा नेता आणि अतुलनीय उंचीचा अर्थशास्त्रज्ञ गमावला आहे.
त्यांच्या आर्थिक उदारीकरण आणि हक्कांवर आधारित कल्याणकारी धोरणाने कोट्यवधी भारतीयांचे जीवन आमूलाग्र बदलले, भारतात एक मोठा मध्यमवर्ग निर्माण केला आणि कोट्यवधी लोकांना गरिबीतून बाहेर काढले.”
“भारताची स्वप्ने घडवणारे एक अतिशय नम्र व्यक्तिमत्व, जे माझे आयुष्यभराचे ज्येष्ठ सहकारी होते. अत्युच्च समर्पणाच्या जोरावर त्यांनी वेगवेगळी पदे मिळवली. अशा मार्गदर्शकाच्या निधनावर मी शोक व्यक्त करतो.
त्यांच्या मंत्रिमंडळात मी कामगार मंत्री, रेल्वे मंत्री आणि समाज कल्याण मंत्री म्हणून काम केल्याचा मला अभिमान आहे.”
शब्दांपेक्षा कृतीवर भर देणारा माणूस आणि देशाच्या उभारणीत असणाऱ्या त्यांच्या मोठ्या योगदानामुळे त्यांचं नाव इतिहासात कायमचं कोरलं जाईल.
या दुःखाच्या क्षणी, मी त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि असंख्य चाहत्यांना माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. त्यांना या मोठ्या संकटातून सावरण्याची शक्ती मिळो.
भारताच्या विकास, कल्याण आणि समावेशकतेच्या धोरणांना चालना देण्याचा त्यांचा चिरस्थायी वारसा कायम जतन केला जाईल. त्यांच्या आत्म्याला चिरंतन शांती लाभो.”
काँग्रेसच्या नेत्या आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी लिहितात, “राजकारणात सरदार मनमोहन सिंग जी यांनी जितका आदर कमावला तितका आदर फार कमी लोकांना मिळतो.
त्यांचा प्रामाणिकपणा आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. विरोधकांनी केलेला अन्याय आणि गंभीर वैयक्तिक टीकेला तोंड देऊन देशाची सेवा करण्यासाठी वचनबद्ध राहिलेल्या आणि या देशावर खरोखर प्रेम करणाऱ्यांमध्ये ते गणले जातील.
मनमोहन सिंग शेवटच्या श्वासापर्यंत समतावादी, ज्ञानी, दृढनिश्चयी आणि धाडसी राहिले. राजकारणाच्या खडतर जगात एक प्रतिष्ठित आणि सभ्य माणूस म्हणून ते जगले.”
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डॉ. सिंग यांना श्रद्धांजली वाहताना म्हटलं, ” माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळं तीव्र दुःख झालं. भारताच्या आर्थिक प्रवासाची दिशा ठरवण्यात त्यांचं मोलाचं योगदान होतं. देशाच्या प्रगतीचा मुख्य आधारस्तंभ म्हणून त्यांची भूमिका राहील.
अत्यंत नम्र आणि शांत स्वभावाच्या या नेत्यानं कायम देशहिताला प्राधान्य दिलं. मी भाजप अध्यक्ष असताना अनेकदा त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. प्रत्येकवेळी माझ्यावर त्यांचा प्रचंड प्रभाव पडला.
भारतानं आज एक थोर सुपुत्र गमावला आहे. डॉ. सिंग यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मी मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो.
ओम शांती”
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहितात, “देशाचे माजी प्रधानमंत्री आणि आर्थिक सुधारणांचे जनक व जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांनी अतिशय कठिण काळात भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक पातळीवर सन्मान प्राप्त करुन दिला.”
“देशाचे नेतृत्व करताना त्यांनी आपली अद्वितीय बुद्धिमत्ता आणि नम्रतेचे दर्शन घडविले. भारताच्या विकासात त्यांचे योगदान अतुलनीय असेच आहे.त्यांच्या निधनामुळे एका पर्वाचा अस्त झाला आहे,” असं म्हणत शरद पवारांनी त्यांना श्रद्धांजली दिली.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव लिहितात, “माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, एक सत्यवादी आणि सभ्य व्यक्तिमत्व असलेले महान अर्थतज्ञ होते. त्यांचं निधन ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कधीही भरून न येणारी हानी आहे.”
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला: देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. सिंग यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले, “आपले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग जी यांच्या निधनाने आपण एक महान विद्वान, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी गमावले आहेत.
भारतीय आर्थिक सुधारणांमध्ये त्यांनी दिलेले योगदान, पंतप्रधान म्हणून 10 वर्षे देशाची सेवा करणे, हे कायम स्मरणात राहील. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे कुटुंबिय, मित्र आणि हितचिंतकांना हे दुःख पचवण्याचे धैर्य मिळो.”
रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास, फाळणीनंतर घर सोडलं
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गाह या गावात मनमोहन यांचा जन्म झाला. दिवस होता 26 सप्टेंबर आणि वर्ष 1932.
मनमोहन लहान असतानाच त्यांची आई वारली. तेव्हा मनमोहन केवळ काही महिन्यांचे होते. वडील कामानिमित्त सतत बाहेर असायचे. तेव्हा ते त्यांच्या काकांकडे राहायला गेले. तिथे आजीने त्यांची चांगली काळजी घेतली, असं ज्येष्ठ पत्रकार आणि एकेकाळचे डॉ. सिंग यांचे मीडिया सल्लागार संजय बारू यांनी त्यांच्या The Accidental Prime Minister या पुस्तकात नमूद केलं आहे.
त्यांच्या जन्मगावी शाळा किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र नव्हतं. मनमोहन यांना उर्दू माध्यमाच्या शाळेत जाण्यासाठी रोज अनेक मैल पायपीट करावी लागायची.
गावात वीज पोहोचली नव्हती. तेव्हा मनमोहन यांनी रात्री रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास केला.
लहानपणापासूनच ते चिकाटीनं अभ्यास करायचे. स्वभावाने शांत असलेले मनमोहन अभ्यासात मात्र फार हुशार होते.
“1947च्या फाळणीनंतर मनमोहन कुटुंबियांसोबत पाकिस्तानमधून भारतात पोहोचले. आल्यानंतर ते पहिल्यांदा हल्द्वानी (उत्तराखंड) येथे निर्वासित छावणीत राहिले. फाळणीच्या तणावामुळे त्यांना पाकिस्तानमध्ये असताना बोर्डाची परीक्षा देता आली नाही. त्यामुळे भारतात आल्यावर सिंग यांनी बोर्डाची परीक्षा दिली. तसंच पंजाब विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी गेले,” असं ज्येष्ठ पत्रकार मानिनी चटर्जी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
डॉ. सिंग 1991 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपल्याला दिलेल्या सविस्तर मुलाखतीमध्ये बालपणीच्या काही आठवणी सांगितल्याचं चटर्जी यांनी सांगितलं.
भारतात आल्यावरही सिंग यांची घरची परिस्थिती हलाखीची होती. निर्वासित छावणीनंतर ते अमृतसर, पटियाला, होशियारपूर आणि चंदीगडला राहिले.
घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. तरीही डॉ सिंग यांनी पंजाब विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात जाऊन अर्थशास्त्र विषयात उच्च शिक्षण घेतलं. यामागे एक महत्त्वाचं कारण होतं. ते म्हणजे त्यांना शिक्षणासाठी मिळालेली स्कॉलरशिप.
“केंब्रिज किंवा ऑक्सफर्डमध्ये जाऊन शिकायची माझी परिस्थितीच नव्हती. पण भारतात आल्यावर मी चांगला अभ्यास केला. सोबत नशिबानेही साथ दिली आणि मी स्कॉलरशिप मिळवल्या.” डॉ मनमोहन सिंग यांनी अमेरिकन पत्रकार चार्ली रोज यांना दिलेल्या एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली आहे.
डॉ. सिंग सप्टेंबर 2004मध्ये UNGAच्या आमसभेसाठी अमेरिकेत गेले असताना त्यांनी ही मुलाखत दिली होती.
‘भारत देश गरीब का आहे? हे समजून घेण्यासाठी आपण अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला, असंही सिंग यांनी एकदा सांगितलं होतं.
पण गरीब घरातून पुढे आलेले डॉ. सिंग मात्र भांडवलशाहीचे पुरस्कर्ते आहेत. देशाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी भांडवलशाहीची गरज असल्याचं त्यांचं मत आहे.
1991मध्ये केंद्रीय अर्थमंत्री असताना देशाची अर्थव्यवस्था डॉ. सिंग यांनी जगासाठी खुली केली आणि देशात उदारमतवादाचं वारं वाहू लागलं.
याविषयी पत्रकार चार्ली रोजी यांनी सिंग यांना विचारलं की “तुम्ही एवढ्या हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आला. तरीही तुमचा भांडवलशाही आणि मुक्त बाजारपेठेवर एवढा विश्वास का आहे? भारतात गरिबी आणि असमानता मोठ्या प्रमाणात आहे. ती सुधारण्यासाठी समाजवाद आणि नियोजनबद्ध अर्थव्यवस्था यांचा तुम्ही स्वीकार का केला नाही?”
तेव्हा डॉ. सिंग म्हणाले, ” आर्थिक समानता ही एक अशी गोष्ट आहे ज्याची आम्हाला सतत चिंता वाटत आहे. पण माझ्यामते भांडवलशाहीमध्ये मोठ्या प्रमाणात गतीशिलता (Dynamism) दिसून आली आहे. त्यामुळे गरीबी दूर करण्यासाठी मदत होऊ शकते.”
मनमोहन सिंग राजकारणात कसे आले?
1991 मध्ये नरसिंह राव यांचं राजकीय करिअर जवळपास संपलं होतं. रोजर्स रिमूव्ह कंपनीचा ट्रक त्यांच्या पुस्तकांची 45 खोकी घेऊन हैदराबादला रवाना झाला होता.
मात्र त्यावेळी नरसिंह राव यांना त्यांच्या एका मित्रानं ही पुस्तकं इथंच ठेवा, असा सल्ला दिला होता. ते प्रशासनात बडे अधिकारी होते. आणि हौशी ज्योतिषीही. त्यांनी नरसिंह रावांना सांगितलं होतं, की माझ्या अंदाजानुसार तुम्ही पुन्हा दिल्लीत येणार आहात. त्यामुळे ही पुस्तकं इथेच राहू द्या.
विनय सीतापती आपल्या ‘हाफ लायन- हाऊ पी. व्ही. नरसिंह राव ट्रान्सफॉर्म्ड इंडिया’ या पुस्तकात लिहितात की “राव रिटायरमेंट मोडमध्ये गेले होते. त्यांनी दिल्लीच्या इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला होता. कधी दिल्लीत यावं लागलं तर राहण्याची अडचण होऊ नये, हा त्यामागे हेतू होता.”
मात्र काहीच दिवसात सगळं चित्र पालटलं. 21 मे 1991 या दिवशी श्रीपेरंबदूरमध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. या घटनेनंतर बीबीसीचे पत्रकार परवेज आलम यांनी जेव्हा त्यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांना दूरदूरपर्यंत असं वाटलं नव्हतं की राव पुढच्या काही दिवसांत देशाचे पंतप्रधान होणार आहेत.
नटवर सिंह यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, जेव्हा राजीव यांच्या हत्येनंतर विदेशी नेते आणि पाहुणे सोनियांना भेटून परतले त्यानंतर त्यांनी इंदिरा गांधींचे माजी मुख्य सचिव पी. एन. हक्सर यांना 10 जनपथला बोलावून घेतलं. आणि काँग्रेस अध्यक्षपदासाठी कोण योग्य व्यक्ती आहे, असा प्रश्न विचारला. त्यावेळी हक्सर यांनी तत्कालीन उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या नावाची शिफारस केली.
शंकर दयाळ शर्मांचं मन वळवण्याची जबाबदारी नटवर सिंह आणि अरुणा असफ अली यांच्यावर होती. शर्मांनी दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं. सोनियांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास हा आपला सन्मान असल्याचं त्यांनी म्हटलं.
पण “भारताच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी हे पूर्णवेळ काम आहे. माझं वय आणि प्रकृती पाहता देशातील सर्वांत मोठ्या पदाला मी न्याय देऊ शकेन असं वाटत नाही” असं शर्मांनी स्पष्ट केलं.
नटवर सिंह आणि अरुणा असफ अलींनी शंकर दयाळ शर्मांचं म्हणणं सोनियांच्या कानावर घातलं. सोनियांनी पुन्हा पी. एन. हक्सर यांना बोलावून घेतलं. आणि यावेळी हक्सर यांनी पी. व्ही. नरसिंह राव यांचं नाव पुढे केलं. त्यानंतर जे घडलं तो केवळ इतिहास आहे.
नरसिंह राव राजकीय खाचखळग्यातून मार्ग काढत देशातील सर्वोच्च पदावर पोहोचले होते. कुठल्याही पदावर पोहोचण्यासाठी त्यांनी राजकीय पॅराशूटचा उपयोग केला नाही. राव यांचं भारतासाठी सगळ्यांत मोठं योगदान होतं, ते डॉ.मनमोहन सिंग यांचा शोध.
अलेक्झांडर यांनी सुचवलं मनमोहन यांचं नाव
विनय सीतापती यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की “जेव्हा नरसिंह राव पंतप्रधानपदावर विराजमान झाले, तेव्हा ते बऱ्याच विषयात तज्ज्ञ झाले होते. आरोग्य आणि शिक्षण मंत्रालय त्यांनी आधीच सांभाळलं होतं. भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. पण अर्थ खात्यात त्यांना विशेष गती नव्हती. पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी दोन दिवस कॅबिनेट सचिव नरेश चंद्रा यांनी राव यांना आठ पानी नोट सोपवली. ज्यात भारताची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याचं म्हटलं होतं.”
सीतापती पुढे सांगतात, “राव यांना असा एक मुखवटा हवा होता, जो आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि पक्षांतर्गत विरोधकांना हे पटवून देईल, की भारत आता जुन्या अर्थधोरणानं तगणार नाही. त्यावेळी पी. सी. अलेक्झांडर राव यांच्या निकट होते. राव यांनी अलेक्झांडर यांना विचारलं की तुम्हाला असा एखादा अर्थतज्ज्ञ माहिती आहे का, ज्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता आहे. अलेक्झांडर यांनी तात्काळ रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे संचालक आय. जी. पटेल यांचं नाव सुचवलं.”
सीतापती यांच्या माहितीनुसार “आय. जी. पटेल यांना दिल्लीला यायचं नव्हतं. त्यांची आई आजारी होती. त्यावेळी ते बडोद्यात राहत होते. त्यामुळे अलेक्झांडर यांनी डॉ. मनमोहन सिंग यांचं नाव सुचवलं. अलेक्झांडर यांनी शपथविधी सोहळ्याच्या एक दिवस आधी डॉ. सिंग यांना फोन केला. त्यावेळी ते परदेशातून परतले होते आणि घरी विश्रांती घेत होते. त्यांना झोपेतून उठवण्यात आलं. आणि राव यांचा प्रस्ताव सांगण्यात आला. पण डॉ. मनमोहन सिंग यांना त्यावर विश्वास बसला नाही.”
“दुसऱ्या दिवशी शपथग्रहण सोहळ्याआधी अवघे तीन तास यूजीसीच्या कार्यालयात मनमोहन सिंग यांना स्वत: नरसिंह राव यांनी फोन केला. राव यांनी मनमोहन यांना अर्थमंत्रीपदाची ऑफर दिली. मात्र त्याचवेळी आपली आर्थिक नीती यशस्वी झाली, तर श्रेय आपल्या दोघांना मिळेल, पण त्यात अपयश आलं तर तुम्हाला पदावरून जावं लागेल, असं स्पष्ट सांगितलं”
सीतापती सांगतात की 1991 च्या अर्थसंकल्पाआधी दोन आठवडे मनमोहन सिंग मसुदा घेऊन पंतप्रधान नरसिंह रावांकडे गेले. डॉ. सिंग यांचा मसुदा राव यांनी फेटाळून लावला. “हेच करायचं होतं, तर मग मी तुमची निवड कशाला केली?” असा संतप्त सवालही राव यांनी केला.
आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पीय भाषणाला डॉ. मनमोहन सिंग यांनी “ज्या विचारांची वेळ आली आहे, त्याला जगातली कुठलीही ताकद रोखू शकत नाही,” या व्हिक्टर ह्यूगोच्या ओळींनी सुरुवात केली.
आपल्या भाषणात त्यांनी वारंवार राजीव गांधी, इंदिरा गांधी आणि नेहरुंचा उल्लेख केला. पण त्यांच्या आर्थिक धोरणांच्या बरोबर उलट पावलं उचलण्यात डॉ. मनमोहन सिंग यांनी कधीच हयगय केली नाही.
ही बातमी सातत्याने अपडेट होत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC