Source :- ZEE NEWS
Donald Trump Tariff Announcement News: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक मोठ्या निर्णयांचा सपाटा लावला. त्यातच आता आणखी एका निर्णयाची भर पडली असून, त्याची घोषणा ट्रम्प यांनी बुधवारीच केल्याचं पाहायला मिळालं. रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा करताना ट्रम्प यांनी सर्व देशातून आयात होणाऱ्या ऑटो क्षेत्रातील सर्व गोष्टींवर 10 टक्के आयात शुल्क लागू करण्यात येणार असल्याचं सांगितलं.
ट्रम्प यांनी ज्या देशांना आयातशुल्काच्या यादीत टाकलं त्यामध्ये भारताचाही समावेश असल्याचं पाहायला मिळालं. भारतावर अमेरिकेनं 26 टक्के इतका आयात शुल्क कर लागू करत चीनवर 34 टक्के आयात शुल्क लागू केल्यानं जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये उलथापालथ झाली.
माध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी काही गोष्टी अधिकच स्पष्टपणे सांगितल्या. ‘आज मुक्ती दिवस असून, इतिहासात 2 एप्रिल 2025 हा दिवस अमेरिकेचा पुनर्जन्म म्हणून उल्लेखला जाईल. हा तोच दिवस आहे जेव्हा अमेरिकेचं नशीब पुन्हा नवानं लिहिलं जाणार असून, या देशाला समृद्ध करण्यासाठी पुन्हा नव्यानं काम केलं जाणार आहे’, असं ते म्हणाले.
एकिकडे अमेरिकेका इतर देशांकडून मोटरसायकल आयातीवर 2.4 टक्के इतकं आयात शुल्क आकारते. तर, थायलंडसह इतर देश मात्र अमेरिकेकडून 60 टक्क्यांपर्यंतचा कर आकारतात ही वस्तूस्थिती मांडताना ट्रम्प यांनी भारताचंही उदाहरण दिलं. या देशात 70 टक्के इतकं आयातशुल्क आकारलं जातं असं सांगताना अनेक राष्ट्र याहून अधिक आयात शुल्क आकारतात हा मुद्दा मांडताना ट्रम्प यांनी काहीसा नाराजीचा सूर आळवला.
भारताचा उल्लेख करत काय म्हणाले ट्रम्प?
ट्रम्प यांनी अतिशय महत्त्वाची घोषणा करताना इतर देशांकडून आणि अमेरिकेकडून यापूर्वी आकारल्या जाणाऱ्या आयात शुल्कातील तफावत अधोरेखित केली. यावेळी भारत अमेरिका नात्यावरही त्यांनी भाष्य केलं.
‘भारत याबाबतीत कठोर भूमिका घेताना दिसतो. पंतप्रधान (PM मोदी) आताच माझी भेट घेऊन गेले. ते माझे खुप चांगले मित्र आहेत. पण, तुम्ही माझे चांगले मित्र असलात तरीही तुम्ही आमच्यासोबत योग्य व्यवहार करत नाही आहात. तुम्ही आमच्याकडून 52 टक्के शुल्क घेता. तुमच्या ही बाब लक्षात यायला हवी की आम्ही वर्षानुवर्षे तुमच्याकडून कोणचीही रक्कम घेतली नाही. मी जेव्हा 7 वर्षांपूर्वी सत्तेत आलो तेव्हा आम्ही या मुद्द्यांवर लक्ष द्यायला सुरुवात करत चीनपासून हा प्रारंभ झाला’, असं ट्रम्प म्हणाले.
जळजळीत शब्दांमध्येच ट्रम्प यांनी केलेलं वक्तव्यानुसार अमेरिकेची आतापर्यंत इतर देशांनी लूट केली असून आता मात्र आपण ही परिस्थिती सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं दरवर्षी अब्जोंची राजस्व रक्कम मिळणार असल्याची आशाही त्यांनी व्यक्त केली.
जगभरात दिसणार अमेरिकेच्या या धोरणाचे परिणाम
अमेरिकेच्या या ‘टॅरिफ वॉर’ अर्थात आयात शुल्कासंदर्भातील धोरणाचा सामना करण्यासाठी या महासत्ता राष्ट्राशी व्यवहार करणारे देश नवी धोरणं आणि प्रत्युत्तराच्या कृती करण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे. कॅनडामध्ये नुकतंच ट्रम्प यांच्या भूमिकेविरोधात निर्मय घेण्यास सुरुवात करण्यात आली असून युरोपीय संघांमध्येसुद्धा अमेरिकेकडून स्टील आणि अॅल्युमिनिअमवर कर लावण्याविरोधा भूमिका घेत बऱ्याच अमेरिकी उत्पादनांवर कर आकारण्यास सुरुात करम्यात आली आहे. ज्यानंतर ट्रम्प यांनी युरोपीय मद्यावर थेट 200 टक्के आयात शुल्क आकारण्याचा कठोर इशारासुद्धा दिला.
एकंदरच भारतासह जगातील अनेक देशांकडून ट्रम्प यांच्या या निर्णयाचा विरोध केला जात असतानाच जागतिक अर्थव्यवस्थेवरही याचे गंभीर परिणाम होताना दिसत आहेत. ज्यामुळं आर्थिक मंदीचा धोकासुद्धा नाकारता येत नाही. परिणामी जगभरातील अर्थसत्ज्ञ सध्या या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आता भारताकडून अमेरिकेच्या या भूमिकेवर कोणतं प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे.
SOURCE : ZEE NEWS