Source :- BBC INDIA NEWS
मुकेश चंद्राकर. तीन जानेवारीला संध्याकाळी फेसबुकवर एक पोस्ट दिसली, अलविदा मुकेश…
अचानकपणे पुढ्यात आलेले ते शब्द वाचून काही सुचेना. बिजापूरच्या आमच्या कॉमन मैत्रिणीला फोन केला तर तिथे रडारड चाललेली.
खून झाला इतकंच कळलं. पुढे मग न्यूजमधून सगळं उलगडलं. कोणाला शिक्षा होईल, कधी कशी होईल तो वेगळा भाग झाला. पण आमचा मित्र गेलाय हे दुःख अजून पचवता येत नाहीये.
2017 मध्ये मी छत्तीसगडच्या बिजापूर जिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ञ म्हणून रुजू झाले. बस्तर संभागातील बिजापूर जिल्हा हे एक अजब रसायन आहे. जंगलातील गावागावांतून वसलेले आदिवासी, शोषित. शोषक कोण कोण, तर त्याची गिनतीच नाही.
प्रशासनातील भ्रष्ट लोक, फसवणारे व्यापारी, लुटणारे मध्यस्थ, जंगलातील खाणी विकत घेणारे अदानी, अंबानी, स्वार्थी राजकारणी.
त्यात पुन्हा जंगलातील प्रस्थापित माओवादी आणि बस्तरच्या सुरक्षेची जबाबदारी वाहणारी सुरक्षा दले, पोलीस दले यांच्या अंतर्गत युद्धात, गनिमी काव्यात पुन्हा पुन्हा बळी जात राहणारे निरपराध आदिवासी.
इतकी वर्षे बस्तर हा विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित भाग. आता वेगाने विकास सुरू झालाय. म्हणजे रस्ते बनवणे, पूल बांधणे, नवीन इमारती आणि या सगळ्यासोबत आले भ्रष्ट ठेकेदार.
आता तर तेथील शासकीय रुग्णालये सुद्धा भ्रष्टाचारातून सुटत नाहीयेत. आपल्यात आणि बस्तरमधील लोकांच्या समस्यांमध्येमोठा फरक काय? तर बस्तरमधील आवाज बाहेर पोहोचू दिला जात नाही.
तिथे काही घडले, की बातमी बाहेर पोहोचेपर्यंत ती शंभर प्रकारे बदलली जाते. तिथल्या गोळीबारात नक्की कोण मेलं, नक्षली की आदिवासी की शाळकरी मूल हे बाहेरच्यांना कळू दिलं जात नाही.
तिथे आदिवासी लोकांनी केलेली आंदोलने आपल्या पेपरमध्ये ठसा उमटवू शकत नाहीत. या सगळ्या नैराश्यपूर्ण परिस्थितीला छेद द्यायचे मोठे काम पत्रकार करतात.
खुद्द बस्तरचे स्थानिक पत्रकार आणि त्यांची दखल घेऊन, त्यांना राष्ट्रीय पातळीवर अवकाश आणि आवाज देणारे दिल्लीतील काही जागरूक पत्रकार. या उमद्या पत्रकारांच्या फळीतील दोन माणसांच्या मैत्रीने मला बस्तरमधील वास्तव समजून घ्यायला मोठी मदत झाली. त्यातील पहिली व्यक्ती म्हणजे मुकेश चंद्राकर.
बस्तरच्या जंगलात निर्भीड पत्रकारिता करणारा मुकेश
आमची पहिली भेट मला अजूनही लख्ख आठवते. आम्ही काही लोक मिळून तारलागुडा या बदनाम गावाजवळील जंगलात गेलेलो. तिथे गोदावरी नदीच्या उगमाचे स्थान आहे.
मी जंगलात माझी कार न्यायला घाबरत होते. माझ्या पुढे मुकेश आणि त्याचा मित्र स्कोर्पियोमध्ये होते. त्या ट्रिपमध्ये माझी मुकेशशी ओळख झाली. त्याच सुमारास मी साप्ताहिक साधना मध्ये बिजापूर डायरी या नावाने लेख मालिका लिहित होते.
डोक्यात पुढच्या लेखासाठी विषय शोधायचा असायचा. मुकेशचे किस्से ऐकून ठरवलं की बिजापूर जिल्ह्यातील पत्रकारितेबद्दल लेख लिहू. लेखाचे नाव, दहशतीच्या छायेतील पत्रकारिता. त्यावेळी मुकेश अवघा 26 वर्षांचा तरुण होता. पण वयाच्या मानाने त्याची परिपक्व समज, हुशारी आणि धडाडी कोणालाही प्रभावित करणारी होती.
जे खरे आहे तेच लोकांसमोर मांडायचे असा खाक्या असलेला हा पत्रकार. सत्य मांडताना त्यात दोस्त किंवा शत्रू दुखावला तरी त्याची तमा तो बाळगायचा नाही. पोलीस किंवा नक्षली किंवा प्रशासन यांच्या भीतीने दडपून जायचा नाही.
बासागुडा या अतिदुर्गम आणि नक्षली त्रासाने पोळलेल्या गावचा हा तरुण. काही पिढ्यांपूर्वी महाराष्ट्रातून बासागुडा या गावी अनेक मराठी लोक येऊन वसले, अशा अनेक मराठी कुटुंबापैकी त्याचेही एका कुटुंब. युकेश त्याचा थोरला भाऊ. वडील लहानपणीच वारले.
शेतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून कुटुंबाची गुजराण चालू होती. पुढे त्यांची आई अंगणवाडी सेविका बनली. त्यामुळे दोघांचे शिक्षण व्यवस्थित चालू राहिले.
2005-2006 च्या सलवा जुडूममध्ये त्यांचे गाव पोळून निघाले. घर जाळले गेले, शेतजमीन गेली. अनकेदा शाळकरी मुकेश पैशांसाठी बाजारात महुआची दारुही विकायचा. आधी बासागुडा, नंतर आवापल्लीच्या वसाहतीत कुटुंब रहायला गेले. आईला कर्करोगाने ग्रासले. भावांनी मिळून काही व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घेतले होते, ते पैसे आईच्या उपचारांमध्ये संपले. आईचाही मृत्यू झाला.
आईची लहानशी इच्छा होती, की मेल्यानंतर तिला वडलांशेजारीच दफन करण्यात यावे आणि सोबत घरातील एखादी वस्तू ठेवण्यात यावी. हळव्या आवाजात मुकेश सांगत होता की, जुडूममध्ये घर उध्वस्त झाल्याने त्याला एकही वस्तू आईसोबत दफन करायला मिळाली नाही.
पुढे दोघा भावांना इमारतीच्या कामाचे मोठे कंत्राट मिळाले. पण एकीकडे कंत्राट देणाऱ्या अधिकाऱ्याला काही टक्के रक्कम द्यायची तर दुसरीकडे नक्षली लोकांना मोठा हप्ता पोहोचवायचा अशी परिस्थिती.
मग दोघांनी ते कामच सोडून दिले. पुढे दोघे भाऊ विविध न्यूज चॅनेल्सना माहिती पुरवायच्या कामातून 2011 पासून पत्रकारिता क्षेत्राकडे वळले.
2013 पासून दोन वर्षे मुकेश बन्सल न्यूज, नंतर दोन वर्षे सहारा समय अशा लोकल चॅनेल्ससाठी काम करत होता. नंतर त्याला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या ETV, जे पुढे जाऊन News 18 नावाने आलं, त्यासाठी काम करायची संधी मिळाली.
या संधीचे मुकेशने अक्षरशहः सोने केले. प्रचंड मेहनत घेऊन तो नाना प्रकारच्या बातम्या चॅनेलसाठी मिळवत असायचा.
नक्षलवाद्यांनी दोन तास बंदूक रोखली तेव्हा
बिजापूरमध्ये काम करताना, तुम्हा पत्रकार लोकांना काय समस्या येतात, या साध्याशा प्रश्नाला त्याने अनेक उदाहरणे देऊन, त्याच्या क्षेत्रांत किती प्रकारचे धोके आहेत, हे शब्दशः पटवून दिले.
नक्षली लोकांना प्रेस नोट रिलीज करायची असते, तेव्हा पत्रकारांना बुलावा पाठवला जातो. त्यांची खबर घेऊन, हे पत्रकार ती बातमी वरती त्यांच्या मुख्यालयात पाठवतात.
बऱ्याचवेळा ती खबर बातम्यात येते, तर कधी दुसऱ्या महत्वाच्या बातम्या चालू असतील, तर नक्षलांना हवी असलेली ती बातमी येत नाही, मग तेव्हा पत्रकार नक्षल लोकांच्या नाराजीचे बळी ठरतात.
कधी त्यांचा बुलावा आल्यावर, पत्रकार काही कारणामुळे त्यांना भेटायला जाऊ शकले नाहीत, तरी हे त्यांची नाराजी ओढावून घेतात.
लालतंत्राच्या पट्ट्यात येणाऱ्या भागात नक्षली लोकांच्या परवानगीशिवाय ना हे प्रवेश करू शकतात, ना की फोटो काढू शकतात. अशा अतिदुर्गम भागात, जिथे लोकतंत्र नाही तर माओवादी राज्य करतात, तिथे कोणतीही बातमी करताना, नेहमी नक्षली लोकांच्याच बाजूने करावी लागते, कधीही त्यांच्या विरोधी बातमी करता येत नाही.
अशा वेळी हमखास नक्षली लोक गावकऱ्यांना पुढे करून, त्यांना हवे टे वदवून घेतात, पोलीस विरोधी, सरकार विरोधी, अनेकवेळा ते खरेही असू शकते, किंवा खोटेही.
अशा परिस्थितीचा या तरुण, सळसळत्या रक्ताच्या पत्रकाराला मनस्वी राग येतो. 2015 मध्ये, मुकेश आणि त्याचा पत्रकार भाऊ, दोघांनी हुसूर या अतिदुर्गम भागात, नक्षली लोकांच्या परवानगीने प्रवेश करून, तेथील अतिभव्य आणि विलक्षण सुंदर ‘नंबी’ धबधबा रिपोर्टिंग करून, प्रथमच जगासमोर आणला. त्यांच्या ETV news channel वरून ही स्टोरी चांगलीच गाजली.
पुढे पाच सहा महिन्यांनी हे दोघे, सहज फिरायला म्हणून त्याच भागात पुन्हा गेले, परंतु ‘त्यांच्या’ परवानगीशिवाय. हुसूर गावापासून 4 किलोमीटरचा, पायी जावे लागणारा, दगडांचा, डोंगराळ रस्ता. परतताना त्यांना संध्याकाळ झाली. एक माणूस चाकू दाखवून, त्यांना हुसकावून देऊ लागला. यांना कळले की काहीतरी गडबड आहे.
अंधारात दोघे तातडीने बाईकवर परत निघाले, परंतु रस्त्यातच त्यांची गाठ नक्षली लोकांशी पडली. यांना बाईकवरून उतरवले गेले. हात वरती करायला लावले आणि तत्क्षणी दोघांच्या डोक्याला बंदूक लावली गेली.
दोघेही सतत सांगत होते की “आम्ही पत्रकार आहोत. पूर्वी येऊन गेलो आहोत.” पूर्वी त्यांनी ज्या नक्षली लीडरची परवानगी घेतली होती, त्याचे नावही त्यांनी वानगीदाखल सांगितले.
परंतु दोन तास, बंदुक कानशिलावर ठेऊन त्यांची उलटतपासणी घेतली गेली, सर्व सामान, कागदपत्रे तपासली गेली, कॅमेरातील फोटो तपासून, डिलीट करण्यात आले.
या 2 तासात, मृत्यू समोर पाहून, ते दोघेही प्रचंड घाबरले होते, कारण त्याच काळात नक्षली लोकांनी बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यात 2 पत्रकारांची हत्या केली होती.
नुकताच मुकेशने नवा, मोठा अँड्रॉइड मोबाईल घेतला होता, तो पाहून त्यांना आणखी शंका आली. शेवटी नक्षली लोकांची खात्री पटली, तेव्हा बंदुका हटल्या.
शेवटी त्यांनी खुलासा केला, की हे दोघे खांद्यावर कॅमेरा व शुटींगचे साहित्य घेऊन जाताना एका गावकऱ्याने पाहिले आणि बातमी पसरली, की 2 पोलीस बंदुका घेऊन आले आहेत. त्यामुळे हा सगळा प्रकार घडला.
त्या रात्री त्या दोघांचा मुक्काम, नक्षली तळावर झाला. तेव्हा मुकेशने तळमळीने प्रश्न विचारला की “पत्रकार हा स्वतंत्र व्यक्ती आहे. तुम्ही जर असे बंदुकीच्या धाकावर पत्रकाराला घाबरवले, तर मग काय उपयोग?” त्याने ठराव मांडला की “आम्ही 8-10 पत्रकार आमचे दल बनवून येतो, तुम्हीही तुमच्या वेगवेगळ्या लीडर लोकांना घेऊन या. आपण समोरासमोर चर्चा करू.”
ठरल्यानुसार बिजापूर, सुकमा, दंतेवाडा, किरन्दुल या भागातील 9-10 पत्रकार या भागात पुन्हा आलेही, परंतु नक्षली लोकांशी काही यांची भेट होऊ शकली नाही.
‘रिपोर्टर हु, स्टोरी तो करुंगा ही’
बिजापूरला तेलंगणाशी जोडणारा , पामेड ते चेरला हा रस्ता बनवला जात होता. हा अतिसंवेदनशील भाग असल्याने अवघ्या 12 किमीच्या रोडसाठी 12000 जवान तैनात होते.
या संदर्भात मुकेशने ‘नक्षलनाश मार्ग’ अशी बातमी बनवली. कारण रस्ता बांधणीच्या कामाने, दळणवळण वाढून, आपोआपच नक्षली लोकांचे नियंत्रण कमी होते.
ती बातमी TV वर आल्यानंतर मुकेश मित्रांसोबत अंदमानला फिरायला निघून गेला. त्याचवेळी त्याला नक्षल लीडरचा फोन आला की या रस्त्याच्या बांधणीकामात जवानांनी गावकऱ्यांना मारपीट केली आहे. तरी त्याची बातमी द्यायला त्याला बोलावले गेले.
तेव्हा मुकेशने सांगितले, की तो लगोलग येऊ शकत नाही, काही दिवस लागतील. त्यावर मग त्याला धमकी मिळाली की, “पिछली बार जवानों के लिये आये, अभी नही आ पा रहे हो. जवानोंकी बडी तरफदारी कर रहे हो.”
यावर मुकेशनेही ठणकावून सांगितले होते की, “मै रिपोर्टर हुं, स्टोरी तो करुंगा ही.”
जेव्हा एक मंत्री म्हणाले होते, “मुकेश चंद्राकर को सिर्फ खामिया दिखती है, विकास नही दिखता”
आणखी वेगळ्या प्रकारचा त्रास पोलिसांकडून होतो. जसे की बासागुडापासून, आतील अतिसंवेनशील भागात जवान पहिल्यांदाच जाऊ शकले होते, तेव्हा तेथील पेद्दागेलूर गावातील काही स्त्रियांवर जवानांनी, पोलिसांनी बलात्कार केले. सुरुवातीला 2 चा आकडा कळाला, नंतर तो वाढत 40 वर गेला.
मुकेश प्रामाणिकपणे सांगतो, की तो हा आकडा निश्चित सांगू शकत नाही. कारण बऱ्याचदा नक्षली लोक गावकऱ्यांना भडकवून, खोटेही बोलायला लावतात.
बलात्कार झाले हे खरे होते, आकडा निश्चित नव्हता. याची बातमी मुकेशने दिली, तेव्हा त्याने पोलिसांचा रोष ओढावून घेतला होता. त्याच्यावर कडक नजर ठेवली गेली, फोन रेकोर्ड केले गेले.
एक पूर्वाश्रमीची महिला माओवादी, 8 लाखाचे इनाम असलेली नक्षली लीडर, टीबी झाल्याने काही महिन्यांपासून नक्षली चळवळ सोडून बिजापुरमधील तिच्या गावी राहत होती.
सी.आर.पी.एफ. जवानांनी तिचे घर घेरले. तिला घरापासून दूर, जंगलात नेले, नक्षली गणवेश घातला आणि गोळ्या घातल्या.
अशा फेक एन्काऊंटरची बातमी बनवणाऱ्या या पत्रकाराला पोलिसांची भीती वाटतेच, कारण ते रागाने कधीही खोटी केस दाखवून, याला आत टाकू शकतात.
राजकारणी लोक, हे आणखी एक मोठे प्रस्थ, ज्यांना वाटते की, पत्रकारांनी आपली चापलुशी करावी.
राजकारणी लोकांच्या विरोधात बातमी दिली की, “मुकेश चंद्राकर को सिर्फ खामिया दिखती है, विकास नही दिखता है” असे आरोप भर सभेत एका मंत्र्यांनी त्याच्यावर लावले होते.
मुकेश प्रामाणिकपणे सांगतो की, “भीती वाटते, परंतु आता या सर्व गोष्टींची इतकी सवय झाली आहे की मृत्यूची भीती वाटणे, बंद झाले आहे.”
..तर आवाज कोण उठवणार?
कायदे मोडून होणाऱ्या अवैध गोष्टींबद्दल बोलले की “हा पत्रकार विकास विरोधी आहे” असे आरोप केले जातात. शासनविरोधी बोलले की हा डाव्या चळवळीचा समर्थक आहे, असा आरोप होतो.
सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोलले की हा विरोधी पक्षाला विकला गेला आहे, असे आरोप होतात. बातमी दिली तर याने ब्लॅकमेल केले असा आरोप आणि एखादी बातमी दिली नाही तर, याने पैसे खाल्ले आहेत, असे जनतेकडून आरोप होतात.
अशा कचाट्यात सापडलेल्या पत्रकाराने निर्भीड वृत्ती ठेवून, कुठलाही पक्ष न घेता, बातमी देणे, हे किती अवघड आहे, हे मला मुकेशच्या बोलण्यातून जाणवत होते.
“आज का मिडिया भी बिकाऊ हो रहा है,” हे तो दुःखाने सांगत होता.
पत्रकारांना बातमी दिली तरच पैसे मिळतात, दरमहा ठराविक वेतन मिळत नाही. जितकी मेहनत करावी लागते, त्याच्या तुलनेने खूप कमी कमाई होते.
शुटींग करायला लागणारी सामग्री स्वतःच्या खर्चाने घ्यावी लागते, या सर्व कारणांमुळे ग्रामीण पत्रकारितेचा स्तर ढासळतो आहे, असे त्याचे म्हणणे आहे.
पैशाच्या विवंचनेतून मग पत्रकारांनी लोकांना ब्लॅकमेल करणे, किंवा राजकारणी लोक म्हणतील तशी बातमी देणे, असे प्रकार घडतात. परंतु असे झाले, तर मग सामान्य माणसाने जायचे कोणाकडे, हेही मुकेश पोटतिडीकेने बोलतो.
“सामान्य माणसावर जेव्हा शासकीय व्यवस्था अन्याय करते, तेव्हा आवाज उठवण्यासाठी पत्रकार सहाय्यभूत ठरतो. परंतु जर पत्रकारच व्यवस्थेला विकला गेला, राजकारण्याच्या पैशावर पोसू लागला, तर मग व्यवस्थेला प्रश्न विचारणार कोण ? आवाज उठवणार कोण ?”
‘कधीकधी पत्रकार आहे हे सांगायची लाज वाटते’
2018 मध्ये छत्तीसगडमध्ये पक्षांतर होऊन, काँग्रेस सत्तेवर आले होते. बिजापूरमध्ये महेश गागडाजीचा पराभव होऊन, विक्रम मंडावी हा पूर्वाश्रमीचा सलवा जुडूमचा नेता सत्तेवर आला. तो मुकेशचा मित्र होता. परंतु मुकेश म्हणाला होता की, “उद्या जर यानेही दिलेली आश्वासने पाळली नाहीत, तर मी त्याच्या विरोधात बातमी बनवणारच. तिथे आमची मैत्री आड येणार नाही.”
यावर तो, शहीद पत्रकार गणेश शंकर विद्यार्थी यांचा विचार सांगतो की, ” पत्रकारिता का मूल चरित्र सत्ता का स्थायी विपक्ष होता है. यानी चिजो का आलोचनात्मक विश्लेषण. वह तटस्थ भी नही होती. व्यापक जनता का पक्ष उसका पक्ष होता है. सत्ता के खिलाफ सवाल खडे करने से जनता का ही पक्ष मजबूत होता है.”
असा आदर्श असणारा मुकेश सांगायचा की, कधीकधी पत्रकार आहे हे सांगायचीही लाज वाटते, इतकी पत्रकारिता सध्या सत्तेला विकली जाते आहे.
काही वर्षांपूर्वी, खोटे एन्काउंटर , खोटे समर्पण, आदिवासींवर अन्याय, ह्युमन राईट अक्टीव्हिस्टना त्रास देणे असे आरोप असणारे, परंतु पोलीस डिपार्टमेंटमध्ये खूप नावाजलेले बस्तर संभागाचे पोलीस महानिरीक्षक कल्लुरी यांनी पत्रकारांवरही दबाव टाकायला, केस करून तुरुंगात टाकायला सुरुवात केली, तेव्हा सर्व पत्रकारांनी पुढाकार घेऊन, एकत्र येऊन, कल्लुरी विरोधात जेलभरो आंदोलन केले.
शेवटी प्रशासनाने त्यांची बदली केली. अनेकदा जिथे स्फोटके शोधली जात असतात, अशा ठिकाणीही हे पत्रकार रिपोर्टिंगसाठी पोहोचलेले असतात. तिथे त्यांच्या जिवालाही धोका संभवतो.
मुकेशने आठवण सांगितली होती की, बिजापूर जिल्ह्यातील गंगालूर रोडवरील चेरपाल जवळ, 30-30 किलोची स्फोटके मिळाली होती. एका ठिकाणी प्रेशर आईडी मिळाले होते, जे ब्लास्ट करूनच नष्ट करावे लागतात.
हे पत्रकार लोक सुरक्षित अंतरावर जायच्या आधीच, सर्व तयारी होण्याच्या आधीच जवानांनी ते आईडी ब्लास्ट केले. अशाप्रसंगी जीवितहानी होऊ शकते.
मुकेशने शोधलेल्या धबधब्याजवळ पोलीस जातात तेव्हा
2015 मध्ये मुकेश चंद्राकरने शोधलेल्या, अतिसंवेदनशील भागातील नंबी धबधब्याच्या ठिकाणी, 2017 मध्ये जिल्हाधिकारी डॉ. अय्याज तांबोळी, बिजापूर SP ध्रुव, बस्तर संभाग IGP विवेकानंदा सिन्हा, बिजापुरचे CEO असे महत्वाचे लोक हुसूरपासून चालत, शे-दीडशे जवानांची, पोलिसांची सुरक्षा घेऊन पोहोचले.
पहाटे मुकेशला SP चा फोन आला की ‘चल’ म्हणून, कुठे जायचे हे त्याला माहिती नव्हते, तिथे पोहोचल्यानंतरच त्याला कळले.
या नक्षली गढामध्ये सरकारी अधिकाऱ्यांचा प्रवेश ही मोठी क्रांतिकारी घटना होती. मुकेश चंद्राकरने ही बातमी News18 द्वारे सर्वत्र पोहोचवली. या घटनेनंतर नक्षली लोक चवताळले, त्यांनी पूर्ण रस्ता खड्डे खोदून उध्वस्त केला, आणि धमकी दिली, की पुन्हा कोणी इकडे फिरकायचे नाही.
बिजापुरचे काही तरुण तिथे गेले असता, त्यांना मारहाण झाली. सध्या त्या रोडवर 30-35 प्रेशर आय.डी. लावले गेले आहेत. असे हे नेहमीच जिवाची जोखीम घेऊन काम करणारे बस्तरचे पत्रकार, शुटींगसाठी अतिदुर्गम जंगल भागातही पोहोचतात.
जिथे सरकार पोहोचत नाही, अशा वीजेअभावी अंधारात बुडालेल्या गावांची, पुलाअभावी पावसाने तुटल्या जाणाऱ्या रस्त्यांची व्यथा हे पत्रकार मांडू पाहतात.
2018 मध्ये बिजापूरमधील एकुलत्या एक उडुपी हॉटेलात बसून आमच्या गप्पा रंगल्या होत्या. मुकेशला कुठेतरी निघायची घाई दिसत होती.
मला मात्र या सर्व बातम्यांच्या मागे लपलेला, खरा मुकेश शोधायचा होता. मजुरी करून, महुआ विकून, आज जिद्दीने येथपर्यंत पोहोचलेला हा तरुण, खंत व्यक्त करतो की शिक्षणात गुणवत्ता असूनही, पैशाअभावी बारावीनंतर उच्च शिक्षण घेता आले नाही.
पुढे distant learning मधून त्याने BSc केले होते. त्याच्याबद्दलचा हा लेख साधनात प्रकाशित झाला, पुढे बिजापूर डायरी पुस्तकात समाविष्ट झाला.
बिजापूर डायरी पुस्तक प्रकाशनाच्या वेळी, 2019 मध्ये मला मुकेशला महाराष्ट्र भेटीसाठी बोलवायची इच्छा होती. पण नेमके त्याला तेव्हा कामामुळे जमले नाही. पण तो नेहमी मला म्हणायचा, “मॅम, मुझे पुने घुमने आना है.”
मुकेशबद्दल मी लिहिलेला लेख हिंदीत अनुवादित करून मी रायपूरमधील काही जेष्ठ व्यक्तींना पाठवला होता. त्यांनी तो इंडियन एकस्प्रेसचा जिनिअस पत्रकार आशुतोष भारद्वाज याला पाठवला. त्याने कौतुक केले की, एक डॉक्टर एका पत्रकाराच्या कामाबद्दल लिहिते आहे ही कौतुकाची गोष्ट आहे.
त्यावेळी हा पत्रकार त्याच्या Deathscript पुस्तकावर काम करत होता. हा दुसरा मित्र ज्याच्या रिपोर्टींग आणि पुस्तकाने मला बस्तरचे रक्तरंजित अंतरंग आणि भीषण राजकारण, सत्ताकारण उलगडून दाखवले.
2019 मध्ये माझी आणि मुकेशची शेवटची भेट झाली, कारण मी बिजापूर सोडून बस्तरच्या कोंडागाव जिल्ह्यात शिफ्ट झाले होते. परंतु आमची मैत्री मात्र कायम टिकून राहिली.
असं सुरु झालं ‘बस्तर जंक्शन’
मुकेश होताच लळा लावणारा. त्याशिवाय का आज त्याच्या जाण्याने इतके लोक शोकमग्न झाले आहेत. मुकेशची प्रेमिका माझी मैत्रीण आहे. त्यांचं भांडण झालं तेव्हा मी मुकेशला फोन केला. खरेतर मुकेशने मला स्पष्टीकरण देण्याची काही एक आवश्यकता नव्हती. पण तरी त्याने मला माफी मागितली की, त्याच्याकडून चूक झाली, त्याने तिला दुखावले म्हणून.
असाच आणखी एका वेळी मी मुकेशला फोन केलेला. एका मोठ्या अधिकाऱ्याच्या विरोधात मुकेश आंदोलन करायला उभा ठाकला होता. अचानक ते आंदोलन थांबले.
माझा दुसरा एक मित्र मला उपहासाने म्हणाला, फार कौतुक करते ना, तोही विकला गेला. मी तातडीने मुकेशला फोन लावला. त्याने गर्भगळीत आवाजात सांगितले की, त्याच्यावर चोहोबाजूनी दबाव आणला गेला आणि त्याची पत्रकारिताच संपवायची धमकी दिली गेली.
तो म्हणाला, “मॅम, मै छोटे गाव से हू. ना कोई डिग्री हैं. मुझे जर्नालिझम छोडना नहीं हैं.” त्याचे बॉस लोकसुद्धा त्याच्या विरोधात होते.
कदाचित त्यामुळेच मला वाटतेय, पुढे जाऊन मुकेशने स्वतःचं स्वतंत्र चॅनेल सुरु करण्याचा निर्णय घेतला असावा. अनेक कारणे आहेत. एकतर रायपूर या राजधानीत बसलेले पत्रकार अशा लहान लोकल पत्रकाराकडून माहिती, फूटेज मिळवतात पण त्यांना क्रेडिट मात्र देत नाहीत.
अनेकवेळा या लोकल पत्रकारांना महत्वाचा वाटणारा लोकल इशू मोठ्या चॅनेलला नको असतो. तर कधी न्यूज चॅनेलना सरकारला हवी तशी फायद्याची बातमी बनवायची असते. अशा मुद्द्यांना कंटाळून बस्तरमध्ये हुशार हुरहुन्नरी पत्रकारांनी youtube चॅनेल सुरू केले, ज्याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.
या youtube चॅनेलमुळे या पत्रकारांना स्वतंत्र आवाज मिळाला, त्यांना रायपूरच्या दबावातून मुक्त होत, हव्या त्या मुद्द्यावर हव्या त्या पद्धतीने बातम्या करता येऊ लागल्या.
बस्तरमधील या विविध व्हीडिओ पत्रकारिता करणाऱ्या धाडसी पत्रकारांबद्दल आशुतोष भारद्वाज यांनी Outlook magazine मध्ये 2022 मध्ये लेख लिहिला. त्यात मुकेश चंद्रकारच्या धाडसाचे कौतुक केले होते.
आशुतोषने मुकेशचा प्रवास अगदी सुरुवातीपासून पाहिला आहे. कारण आशुतोष यांनीही काही वर्षे बस्तरच्या जंगलात पत्रकारिता केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मुकेशच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट एक घटना ठरली होती.
एप्रिल 2021 मध्ये नक्षली लोकांच्या हल्ल्यात CRPF Cobra युनिटचे 22 जवान मारले गेले, तर 31 जखमी झाले. सोबतच एका जवानाचे अपहरण झाले. या अपहृत जवानाला सोडवण्यासाठी 7 पत्रकारांचा ताफा नक्षलवादी लोकांना भेटायला जंगलात गेला आणि बोलणी करून जवानाला सुरक्षित परत घेऊन आला.
या ताफ्यात मुकेशने महत्वाची भूमिका बजावली होती. त्याची सगळीकडे नोंद घेतली गेली. मे 2021 मध्ये सुकमा जिल्ह्यात सिलगेर येथे आदिवासिंनी शांततापूर्ण पद्धतीने मोठे आंदोलन केले होते.
सरकारने ते आंदोलन दाबून टाकले. पोलीस गोळीबारात चार आदिवासी मारले गेले. मेन स्ट्रीम मिडीयात याच्या फार बातम्या आल्या नाहीत. मुकेशने सखोल रिपोर्टींग केले.
या सर्व घटनांनी प्रेरित होऊन, मुकेशने मे 2021 मध्ये त्याचं Bastar Junction यूट्युब चॅनेल सुरू केलं आणि तिथून त्याचा यशस्वी प्रवास सुरु झाला.
त्याच्या या चॅनेलची टॅग लाईनच अशी आहे की, “बस तथ्यो से लबरेज सच्चाई की राह होगी. बेबाकी से बस्तरियो की बात दुनिया के साथ होगी.”
त्याच्या या वाक्यांना मुकेश शेवटपर्यंत जागला आणि त्यामुळेच त्याचे मरण ओढवले. त्याच्या या चॅनेलला 1 लाख 77 हजार subscribers आहेत. त्याची पत्रकारिता कधीच कोणाला झुकते माप देणारी नव्हती.
सरकारच्या भ्रष्टाचार विरोधात तो जितक्या पोटतिडीकेने बातमी द्यायचा, तितक्याच तळमळीने नक्षली लोकांचा हिंसाचार जगासमोर मांडायचा. त्याची बांधिलकी फक्त आणि फक्त बस्तरच्या शोषित भूमीशी होती.
आदिवासी लोकांचा आवाज बाहेरच्या जगापर्यंत पोहोचणे हे ध्येय त्याने त्याच्या कार्याशी बांधून घेतले होते. त्यामुळेच त्याला नक्षली लोकांनी कधीही त्रास दिला नही.
बस्तर जंक्शनवर नक्षलवाद्यांचा कॅम्प दाखवला
उलट बिनधास्त त्यांच्यात जाऊन पण त्याने व्हीडिओ बनवले आहेत. नक्षली लोकाच्या नुसत्या नावानेच जिथे लोक थरथर कापतात, हा बाबा त्यांच्याच गोटात जाऊन शूटिंग करायचा.
सर्वात जास्त म्हणजे 3.9 मिलियन views असलेला बस्तर junction चा व्हीडिओ हा जंगलातील नक्षली कॅम्प कसा असतो हे दाखवणारा आहे.
टेन्टमधील लोकांशी बोलत एकीकडे तो ग्रेनेड लॉन्चर, मशीनगन दाखवतो आहे तर दुसरीकडे चुलीवरले भांडे बघत, कसली भाजी बनवली आहे हेही विचारतोय. काय विलक्षण आहे हे. मला वाटत नाही असला पत्रकार पुन्हा होईल. आणखी एका व्हीडिओमध्ये तो दहशत पसरवणारी जन अदालत दाखवतो आहे.
गोंडी भाषेचा आपल्याला अनुवाद करत समजावतो आहे. नक्षली दहशतीबद्दलची जी भयंकर माहिती आपण फक्त पुस्तकात वाचायचो, ती जंगलात जाऊन प्रत्यक्ष समोर उभं करायचं काम या धाडसी माणसाने केलं. तर दुसरीकडे त्याचा 1.9 M views असलेला लेडी कमांडोसोबतचा व्हीडिओ आहे. त्यांचे कष्ट, समस्या याबद्दल त्यांना सहज बोलता करणारा मुकेश.
त्याचे हे वैशिष्ट्यच होते, कोणत्याही थरातील कोणत्याही व्यक्तीसोबत सहज संवाद साधणे. जंगलातील एका कामाच्या ट्रिपवेळी तो सोबतच्या पत्रकारांना विचारतो, “ही चुनौती वाटते की जंगलात पण मजे घेता तुम्ही.”
मला वाटतंय, कामातील आनंद आणि समाधान शोधायचा त्याचा हा स्वभावच त्याला असे साहसी जीवन जगायला बळ देत होता. संकटांना तोंड द्यायला तयार करत होता.
ऑगस्ट 2024 मध्ये एक मोठी घटना घडली. बस्तरमधील काही पत्रकारांना सूचना मिळाली की दक्षिण बस्तर मधील कोंता मधून आंध्र प्रदेशमध्ये वाळूची तस्करी केली जात आहे. सहजपणे वाहने बॉर्डर क्रॉस करत आहेत.
तस्करी करणारे लोक भाजपशी संबंधित आहेत. पत्रकार या घटनेची छानबीन करायला गेले. तर झालं काय की सुकमा जिल्ह्याच्या पोलीस अधिकाराने यांच्या वाहनाशी छेडछाड करत, गांजा बाळगल्याचा आरोप ठेवत, त्या चार पत्रकारांना जेलमध्ये अडकवले.
त्या पोलीस अधिकाऱ्याविरोधात पुरावे मिळाले आणि त्यालाही जेल झाली. पण बस्तरच्या इतर सर्व पत्रकारांनी भूमिका घेतली की या प्रकरणाचा खोलात जाऊन छडा लावला जावा.
गुन्हेगार पोलिसाची चौकशी व्हावी की याचा खरा सूत्रधार कोण आहे. पण अर्थात सरकारने या मागणीवर काही कारवाई केली नाही. या सर्व प्रकरणाची मुकेशने wire हिंदी साठी बातमी केली. Wire हिंदी चे एडिटर आशुतोष भारद्वाज सांगतात की, या बातमीमुळे चिडून एका IPS अधिकाऱ्याने मुकेशला मेसेज केला. तेव्हा घाबरून मुकेशने आशुतोष यांना कॉल केला होता आणि, “कुछ होगा तो नहीं ना?” असं विचारलं होतं.
मुकेश NDTV सोबत काम करू लागला होता. त्याच्या नंबरवरून मला सारे अपडेट्स येत रहायचे. आधी त्याने एखाद्या मुद्द्यावर केलली बातमी आणि मग प्रशासनाने दखल घेत केलली कारवाई.
मला त्याच्या व्हॉट्स अप वरून शेवटचा मेसेज एक जानेवारीच्या संध्याकाळी सव्वा पाच वाजता आलेला आहे. त्याने शिक्षकांना वेळेवर पगार मिळत नाही याची NDTV सोबत बातमी केली होती, त्याची दखल घेत शासनाने पगार द्यायचा आदेश काढला, ती शेवटची बातमी.
पुढे त्याच्यासोबत काय होणार होते यांची किंचितही कल्पना मला का नव्हती याचा राग, दुःख, निराशा आहे. त्याला म्हटलं असतं की, बाळा काळजी घे. कुठे जाऊ नकोस. घरीच थांब.
चुलतभावानेच मुकेशची हत्या केल्याचा आरोप
डिसेंबर 2024 मध्ये मुकेशला त्याचा चुलतभाऊ असलेल्या सुरेश चंद्राकर याने केलेल्या कोट्यवधींच्या गैरव्यवहाराची माहिती मिळाली.
मुकेश NDTV सोबत काम करत होता. NDTV वर ती बातमी आली आणि राज्य सरकारला त्याची दखल घ्यावी लागली, चौकशी बसली. या रागातून त्याचा खून करण्यात आला.
याच भ्रष्ट सुरेश चंद्राकरने डिसेंबर 2021 मध्ये कोट्यवधी रुपये खर्च उधळत, शाही थाटात लग्न केले होते.
मुकेशचा त्या लग्नात नाचताना व्हीडिओ आहे. मुकेशला एक जानेवारीला सुरेशच्या घरी जाताना वाटलेसुद्धा नसेल की त्याला मारून टाकले जाणार आहे.
जो माणूस नक्षली गोटात बेफिकीरने फिरून यायचा, त्याला स्वतःच्या नातेवाईकच्या घरी जायची कशी भीती वाटावी?
मला आठवतंय, खूप वर्षांपूर्वी एका निवडणूकीत त्याचा मित्र निवडून आला होता. तेव्हासुद्धा मुकेश मला बोलला होता, “मॅम, मी आज मित्राच्या विजय मिरवणुकीत नाचतो आहे. पण याने जर उद्या चुकीचे काम केले तर पहिली बातमी मीच करेल.” स्वतःच्या या मूल्यांना मुकेश शेवटपर्यंत जागला.
कोणालाही बिजापूरबद्दल काहीही माहिती हवी असली की मुकेश सर्वांचा पहिला संपर्क असायचा. कोणा पत्रकारला जंगलात जायचे असेल किंवा कसले फूटेज हवे असेल तर मुकेश.
महाराष्ट्रात बसून माझ्या कानावर बस्तरबद्दल काही उलट सुलट कळले की माझा कॉल मुकेशला. महिन्यातून एकदा आमचं बोलणं व्हायचं. त्याच्या आसपास कोणा मुलीला मासिक पाळीचा त्रास असला की, मुकेश मला कॉन्फरन्स कॉल लावायचा. त्याचे मॅम मॅम म्हणत बोलणे अजूनही कानात रुंजी घालते आहे. तो आवाज पुन्हा ऐकू येणार नाही हे अजूनही खरे वाटत नाहीये.
मुकेशने मला एक घटना सांगितली होती. आय डी ब्लास्टमध्ये एका आदिवासी तरुणाचा डोळा गेलेला. बाकीही मार लागलेला. उपचारासाठी पैसे लागणार होते.
मुकेशने देणग्या गोळा करत दीड-दोन लाख त्या तरुणाला नेऊन दिले. तो तरुण म्हणाला, मला पैसे नकोत, मला डोळे हवे आहेत.
आज मुकेश गेल्यावर त्याच्या भावाची, आम्हा मित्र परिवाराची अशीच अवस्था झाली आहे की, आम्हाला आमचा माणूस हवा आहे. राहून राहून वाटतंय की हे त्याचं मरायचं वय नव्हतं.
इतक्या तरुण वयात मित्र मरू नये. मी विचारांत हरवते, तो आणखी जगला असता तर आणखी किती भारी पत्रकार झाला असता. त्याचे वय 33 की 34 होते. वयाच्या 40 व्या वर्षी आणखी mature होऊन त्याची पत्रकारिता किती बहरली असती. आणि मग वयाच्या 50 व्या वर्षी जेष्ठ पत्रकार झाल्यावर त्याने कशाप्रकारचे काम उभे केले असते?
हे फक्त त्याच्या कुटुंबाचे नुकसान नाही, तर बस्तरमधील आदिवासी आवाजाचे आणि पर्यायाने आपल्या देशाचेच खूप मोठे नुकसान आहे. आज देशभरातील सारे पत्रकार मुकेशसाठी न्याय मागायला उभे आहेत, हीच त्याच्या प्रामाणिक कार्याची मोठी पावती आहे.
लेखातील मतं वैयक्तिक आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC