Source :- BBC INDIA NEWS

जयंत नारळीकर

फोटो स्रोत, iucaa.in

मी इयत्ता सातवीमध्ये असेन, तेव्हाची ही गोष्ट. ‘आयुका’च्या लहान मुलांसाठीच्या समर कॅम्पसाठी दौंडच्या आमच्या शाळेकडून मला आणि धवल वैद्यला पाठवण्यात आलं होतं.

‘आयुका’ अर्थात ‘Inter-University Centre for Astronomy and Astrophysics’ ही संस्था होय.

मुलांमध्ये संशोधक वृत्ती वाढावी, यासाठी दरवर्षी काही निवडक मुलांसाठी ‘आयुका’चा हा समर कॅम्प असायचा. यात मुलांचे गट करुन शास्त्रज्ञ त्यांच्याकडून वेगवेगळे प्रयोग करुन घ्यायचे. आयुकात दररोज जाऊन त्या प्रयोगावर काम करायचं आणि शेवटच्या दिवशी सादरीकरण, असं त्याचं स्वरुप होतं.

आम्ही मुलं जमलो, तेव्हा कळालं की, स्वत: डॉ. जयंत नारळीकर सुद्धा एका गटाचे मेन्टॉर असणार आहेत. त्यांना गाईड करणार आहेत. अर्थातच सगळ्यांचीच इच्छा होती त्यांच्या ग्रुपमध्ये काम करण्याची.

आमचा गट तेव्हा तरुण शास्त्रज्ञ असणार्‍या आणि नंतरच्या काळात ‘आयुका’चे प्रमुख म्हणून काम करणाऱ्या शोमक रायचौधरींकडे गेला.

पण, नारळीकरांना कदाचित आपल्या गटात नसल्यामुळे होणारा मुलांचा हा हिरमोड किंवा आपल्यासोबत संवाद साधण्याची इच्छा लक्षात आली असावी.

पहिल्याच दिवशी पहिल्या सत्रात त्यांनी सगळ्या मुलांना आयुकातल्या फोकाल्ट पेण्ड्यूलमपाशी गोळा केलं आणि त्याबद्दल बोलताना नवे प्रश्न, कोडी घालत प्रत्येकाला कामाला लावलं.

त्यांच्या गटातल्या मुलांचं त्या वर्षीचं काम बहुधा या पेण्ड्यूलमभोवतीच होतं. पण त्या संवादातला आपला छोटासा सहभागही मुलांसाठी किती महत्त्वाचा असू शकतो, याची त्यांना जाणीव होती.

आम्ही मुलं जमलो, तेव्हा कळालं की, स्वत: डॉ. जयंत नारळीकर सुद्धा एका गटाचे मेन्टॉर असणार आहेत.

फोटो स्रोत, @DrSEShinde

आमच्या गटाला प्रयोग दिला होता तो ग्रहमालेतल्या सगळ्या ग्रहांची अंतरं प्रमाणात मोजून त्याची आकडेमोड करुन त्याचं स्केल मॉडेल आयुकाच्या पाठीमागे विद्यापीठाच्या रस्त्यावर ते आखण्याचं.

सूर्यापासूनचं प्रत्येक ग्रहाचं अंतर यातून आम्हाला मांडायचं होतं. प्रकल्प पूर्ण झाला तेव्हा त्यात त्यांचा संबंध नसला तरी त्यांनी आवर्जून प्रकल्पाबद्दल मुलांशी संवाद साधला.

आज डॉ. नारळीकर आठवतात ते असे मुलांमध्ये रमणारे, मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवतानाच संशोधक वृत्ती जागवावी, यासाठी विचार करणारे. आयुकाचा प्रत्येक कोपरा डिझाइन करतानाही कदाचित त्यांनी याचाच विचार केला होता.

आयुकाच्या प्रत्येक कोपऱ्यात असं एक इन्स्पीरेशन उभं होतं. न्यूटन, आईनस्टाईन, गॅलिलिओ यांचे पुतळे प्रत्येक कोपऱ्यात बसवले होतेच; शिवाय, तिथं बसून काम करण्याची मुभा होती. मुख्य दरवाज्यातून आत गेलं की रिसेप्शनच्या वरच डॉ. नारळीकरांचं (तेव्हा ते आयुकाचे प्रमुख म्हणून काम करायचे) केबिन आणि थोडं उजवीकडे गेलं की फोकाल्ट पेण्ड्यूलम होता.

आयुकाच्या प्रत्येक कोपऱ्यात असं एक इन्स्पीरेशन उभं होतं. न्यूटन, आईनस्टाईन, गॅलिलिओ यांचे पुतळे प्रत्येक कोपऱ्यात बसवले होते.

फोटो स्रोत, iucaa.in

न्यूटनच्या पुतळ्याकडे जाताना कॅण्टीनजवळ डोममधून खाली काळ्या फरशीवर ग्रह-ताऱ्यांचं प्रतिबिंब उमटायचं. प्रत्येक कोपऱ्याचा असा विचार केला गेलेला होता.

नवीन संशोधन करतानाच संशोधक घडावेत, यासाठी आयुकात एक स्वतंत्र सायन्स पॉप्युलरायझेशनचा विभाग होता. या विभागातर्फे वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जायचे. 28 फेब्रुवारीला विज्ञान दिनाच्या दिवशी सगळ्यांनाच या परिसरात मुक्तपणे बागडता याचचं. पण याशिवायही शाळेतल्या मुलांसाठी महिन्यातून एकदा शास्त्रज्ञांचं व्याख्यान आयोजित केलं जायचं. अर्थातच, सगळ्यात जास्त गर्दी असायची ती डॉ. नारळीकरांच्याच व्याख्यानांना.

आता नेहरू नक्षत्रालयाचे संचालक असणारे अरविंद परांजपे या विभागाचं काम पहायचे. या विभागातर्फे मुलांसाठी सायन्स पार्क उभारायचं ठरलं. यासाठी वेगवेगळी वैज्ञानिक खेळणी निवडण्यात आली.

आयुकातला फोकाल्ट पेण्ड्यूलम

फोटो स्रोत, iucaa.in

स्पेस-टाईमचा विचार, फोर्स कसा काम करतो, ते सांगणारा झोका, असं बरंच काही या सायन्स पार्कमध्ये होतं. ‘जंतर-मंतर’वरच्या ‘सन डायल’सारखा डायलही इथं होता. मला शिक्षक असलेल्या आणि सायन्स पॉप्युलरायझेशनसाठी काम करणाऱ्या मा‍झ्या वडिलांसोबत या सायन्स पार्कच्या उद्घाटनाला उपस्थित राहायची संधी मिळाली. मी आणि अजून एक लहान मुलगा या कार्यक्रमावेळी उपस्थित होतो. तसं आमचा काही संबंध नव्हता, ना आम्ही आमंत्रित होतो. पण मुलं आहेत हे कळल्यानंतर या पार्कचं उद्घाटन झालं, ते आम्हांला ती खेळणी वापरायला लावूनच.

याच आयुकात त्यांनी साधारण वर्षभर मुलं एका प्रकल्पावर काम करतील आणि मग त्यांचं संशोधन त्याचे निष्कर्ष लोकांसमोर मांडतील, अशा स्वरुपाची स्पर्धाही घेतली. विषयांच्या निवडीला खगोलशास्त्राचं बंधन अर्थातच नव्हतं.

दौंडसारख्या गावातल्या उपलब्ध संसाधनात आम्ही गुटखा खाणाऱ्या शाळकरी मुलांच्या आरोग्याचा तुलनात्मक अभ्यास केला होता आणि तो प्रकल्प सादर केला. ग्रामीण किंवा निमशहरी भागातून आलेला एकमेव गट आमचा होता.

शहरातल्या मुलांच्या प्रकल्पांपुढे म्हणावं तर आमचा प्रकल्प अगदीच जेमतेम. पण डॉ. जयंत नारळीकर आणि मंगला नारळीकरांनी प्रदर्शनात भेट देऊन आमचा अहवाल समजून घेतला. इतकंच नाही, तर आवश्यक प्रश्न विचारून काही अर्ग्युमेंट्स खोडूनही काढले आणि आमचे निष्कर्ष योग्य आहेत, हे पटवूनही द्यायला लावलं.

जयंत नारळीकर

जगात चालणाऱ्या संशोधनाचा उपक्रमांचाही भाग मुलांना होता यावं, यासाठी देखील प्रयत्न केला जायचा. उल्कावर्षावाचा वर्षभर आयुकात सुरु असलेला अभ्यास हा त्याचाच भाग.

मी आणि मयुरेश प्रभुणे या गटाचा भाग होतो. अमॅच्युअर अॅस्ट्रॉनॉमर्सनी वर्षभर केलेल्या नोंदी आणि त्याचा पुढे संशोधनासाठी झालेला उपयोग हा सगळ्यांसाठीच अभिमानाचा ठरलेला. आयुकात स्वत: मिरर तयार करुन त्याचा टेलिस्कोप बनण्याच्या प्रयोगातही अनेक जण सहभागी झालेले. अनेकांकडे असे टेलिस्कोप आठवण म्हणून आजही असतील.

डॉ. नारळीकरांभोवतीचा मुलांचा गराडा आणि त्यांच्यात आनंदाने संवाद साधणारे नारळीकर-आयुका म्हटलं की हेच दृश्य आजही डोळ्यांसमोर येतं. त्यांच्याशी बोलणाऱ्या मुलांना हा माणूस एवढा मोठा शास्त्रज्ञ आहे आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरचं महत्वाचं संशोधन केलंय, हे दडपण कुठेही जाणवायचंच नाही.

आयुकातील फ्रॅक्टल गार्डन

फोटो स्रोत, iucaa.in

आयुका उभारणं, हे जसं त्यांचं ध्येय होतं; तसंच मुलांसाठी हे काम करणं हेही असावं.

बरं हा विचार किती असावा, तर आयुकात न्यूटनचा पुतळा होता; पण डोक्यावरचं झाड वेगळं म्हणून ध्यास घेतला गेला की, गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणाऱ्या न्यूटनच्या बागेतील सफरचंदाचे झाड ते आयुकात लावायचं. त्यासाठी खास त्या झाडाचं कलम आणलं गेलं आणि लावलं गेलं.

प्रत्यक्ष भेटणाऱ्यांना डॉ. नारळीकर असे आठवत असतील. पण ज्यांची थेट भेट झाली नाही, अशा अनेकांपर्यंत त्यांची पुस्तकं आणि कादंबऱ्या पोहोचल्या. तेव्हा वाचताना अचंबित करणाऱ्या या कादंबऱ्यांमधल्या अनेक संकल्पना आजच्या पिढीच्या आयुष्यात प्रत्यक्षात आल्या आहेत. संशोधनाची आणि भविष्याची दिशा सांगणार्‍या या कादंबर्‍या होत्या, असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही.

जयंत नारळीकर

यातल्याच एका कादंबरीत ते लिहितात की, (बहुधा 2050 साली) मुलं शाळेत नव्हे तर शाळाच मुलांच्या घरी यायची. घरीच स्क्रीनसमोर प्रत्येक जण वर्गात बसायचा आणि शिक्षक स्क्रीनमधून मुलांशी संवाद साधायचे. शाळांचं हे रूप कोव्हीडमध्ये आपण प्रत्येकानेच अनुभवलं. ‘व्हायरस’, ‘वामन परत न आला’ अशा अनेक विज्ञान कादंबऱ्या वेगवेगळ्या संकल्पना सहज रुजवणाऱ्या. या कादंबऱ्यांमधून त्यांनी विज्ञानाच्या अनेक शाखांबद्दल मांडणी केली.

सहज एखादं कोडं, विचार लोकांच्या मनात कसा रूजवायचा, हे त्यांच्या ‘आकाशाशी जडले नाते’ या पुस्तकातून दिसतं. खगोलशास्त्राची ओळख करुन देणाऱ्या या पुस्तकात म्हटलं तर माहितीचं भांडार आहे आणि म्हटलं तर अनेक किस्से आणि गोष्टी.

पुस्तकात सुरुवातीलाच डॉ. नारळीकर ‘सूर्य पश्चिमेला उगवला’ असं म्हणत विमान प्रवासात पाहिलेल्या ‘सूर्यास्त’ आणि ‘सूर्योदयाची’ गोष्ट सांगतात. आणि यातून फिजिक्सच्या संकल्पना मांडत ग्रहमाला ते आकाशगंगेपर्यंतचा प्रवास घडवतात.

मुलांशी नातं जोडणं हे डॉ. नारळीकरांसाठी ‘आकाशाशी नातं जोडण्या’सारखंच होतं.

याच पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेत डॉ. नारळीकर म्हणतात काव्य शास्त्र विनोदाबरोबर विज्ञानाचाही आस्वाद घेणाऱ्या आणि मला प्रोत्साहन देणाऱ्या श्रोत्यांना आणि वाचकांना कृतज्ञनापूर्वक अर्पण. पुस्तकाची ही अर्पणपत्रिका त्यांच्या आयुष्याचंही वर्णन करणारी ठरते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC