Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
1 तासापूर्वी
लिओनेल मेस्सीच्या भारतातील टूरची सुरुवात शनिवारी (13 डिसेंबर) कोलकात्यातून झाली.
मात्र इथल्या सॉल्ट लेक स्टेडियममधून जे व्हीडिओ समोर येत आहेत, त्यात प्रेक्षक स्टेडियममध्ये बाटल्या आणि खुर्च्या फेकताना दिसत आहेत.
मेस्सी कार्यक्रमातून लवकर निघून गेल्यामुळं चाहते नाराज झाले आणि त्यामुळंच स्टेडियममध्ये प्रचंड गोंधळ उडाला असल्याचं म्हटलं जात आहे. या गोंधळाबाबत पश्चिम बंगालचे डीजीपी राजीव कुमार म्हणाले,”आम्ही मुख्य आयोजकाला आधीच ताब्यात घेतले आहे. या गैरव्यवस्थापनाची शिक्षा मिळालीच पाहिजे यासाठी आम्ही कारवाई करत आहोत…” या गोंधळामुळे पश्चिम बंगालमधील मुख्य विरोधी पक्ष भाजपने तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. राज्याचे क्रीडामंत्री अरुप बिस्वास यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपानं केली आहे.
यासर्व प्रकारामुळे त्याला पाहायला आलेल्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना एका चाहत्यानं तर आज माझं लग्न होतं तरीही मी ते सोडून इथं आलो. पण मेस्सीला नीट पाहाता आलं नाही असं सांगितलं.
इतरही अनेक चाहत्यांनी कोलकात्यातील व्यवस्था आवडली नाही असं सांगितलं आहे.
मेस्सीच्या आजूबाजूला लोकांचा गराडा होता त्यामुळे आपण त्याची एक झलकही पाहू शकलो नाही अशी खंत चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
हजारो रुपये खर्च करुन इथं आलो पण मेस्सीला नीट पाहाताही आलं नाही असं या चाहत्यांनी सांगितलं.
फोटो स्रोत, ANI
मेस्सीला पाहण्यासाठी आलेल्या एका चाहत्यानं त्याची निराशा व्यक्त करत म्हटलं की, “तिकिटाचा किमान दर 5 हजार रुपये होते. व्हीव्हीआयपी लोक मेस्सीच्या अवतीभोवती का होते?
आम्ही त्याला (मेसी) पाहूसुद्धा शकलो नाही. पोलीस का कारवाई करत नव्हते? मला काहीही माहिती नाही. लोक खूप संतापलेले होते, आम्हाला पैसे परत हवे आहेत.”
आणखी एका चाहत्यानं म्हटलं, “हे खूपच निराशाजनक आहे. आम्ही दार्जिलिंगहून इथं आलो होतो. आम्ही त्याला पाहूसुद्धा शकलो नाही.”
हजारो लोकांची गर्दी
24 वर्षांचा हितेश कॉर्पोरेट वकील आहे. तो लिओनेल मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी बंगळुरूतून जवळपास 1,900 किलोमीटरचा प्रवास करून कोलकात्यात आला होता. अर्जेंटिनातील हा महान फुटबॉलपटू भारतात तीन दिवसांच्या ‘गोट टूर’साठी आला आहे.
हितेश बीबीसीला म्हणाला, “माझ्यासाठी ही वैयक्तिक स्वरूपाची बाब आहे. तुम्ही पाहू शकता की माझी उंची कमी आहे. मला माझ्या मित्रांबरोबर फुटबॉल खेळायलं आवडतं. मेस्सी हा एक असा खेळाडू आहे, ज्याच्याशी मी स्वत:ला सर्वात जास्त जोडतो. त्याच्या प्रतिभेची कोणीही बरोबरी करू शकत नाही. जर तुमच्यामध्ये गुणवत्ता असेल तर तुम्ही काहीही करू शकता, अशी आशा मेस्सीमुळे मला मिळते.”
फिफाच्या क्रमवारीत सध्या भारत 142 व्या स्थानावर आहे. मात्र भारतात फुटबॉलच्या चाहत्यांची आणि त्याच्या स्टार्सची कमतरता नाही. किमान कोलकात्यात तरी नाही. स्थानिक क्लबच्या डर्बी सामन्यांना लाखो चाहते स्टेडियममध्ये गर्दी असल्याचं दृश्य कोलकात्यात नेहमीचच आहे.
फोटो स्रोत, ANI
शनिवारी (13 डिसेंबर) पहाटे मेस्सी कोलकात्यात उतरला. त्यावेळेस कोलकात्यात हजारो लोकांनी रस्त्यांवर आणि मेस्सी थांबलेल्या हॉटेलबाहेर गर्दी केली होती. त्यावेळेस आठ वेळा बॅलन डी’ओर विजेता असलेल्या मेस्सीनं कोलकात्यातील या फुटबॉल वेडाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
23 वर्षांचा रुशील चेन्नईतील एक सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. तोदेखील मेस्सीचं आगमन होण्याच्या काही तास आधीच कोलकात्यात पोहोचला. तो म्हणतो की मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी तो आधी विमानतळावर गेला. मग तो मेस्सी ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे तिथे गेला.
“मेस्सी ज्या हॉटेलमध्ये उतरला आहे, त्या हॉटेलबाहेर मी रात्रभर उभा होतो. मी क्षणभरदेखील झोपलो नाही. मेस्सी अद्भूत फुटबॉलपटू आहे. तो माझा देव आहे. जर मेस्सी मला एका सेंकद जरी दिसला तरीदेखील हे सर्व सार्थक होईल,” असं रुशील म्हणाला.
रुशील आणि त्याच्या मित्रांनी त्या हॉटेलमध्ये शिरण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळेस त्यांनी अर्जेटिनाच्या फुटबॉलपटूंची प्रसिद्ध निळी आणि पांढरी जर्सी आणि त्यावर जॅकेट घातलं होतं.
फुटबॉलशी भावनिक नातं
27 वर्षांच्या देबाद्रिता बिस्वाससाठी हा प्रसंग फक्त चाहत्या असण्यापलीकडे बराच मोठा आहे. तिच्यासाठी ही मोठी भावनिक गोष्ट आहे. मेस्सीनं शनिवारी (13 डिसेंबर) सकाळी कोलकात्यातील ज्या सॉल्ट लेक स्टेडियमला भेट दिली होती, तिथे ती तिच्या आईबरोबर आली होती. या दोघींनीही मेस्सीची जर्सी घातली होती. त्या देबाद्रिताच्या जुळ्या भावाच्या होत्या. गेल्या वर्षीच त्याचं निधन झालं.
देबाद्रिता बिस्वास म्हणाली, “हे खरंतर मी माझ्यासाठी करत नाहिये. आम्ही इथे माझ्या जुळ्या भावासाठी आलो आहोत. गेल्या वर्षी 15 डिसेंबरला मस्क्युलर डिस्ट्रॉफीमुळे त्याचं निधन झालं. आज 13 डिसेंबर आहे. मेस्सी हेच त्याचं विश्व होतं. त्याच्या आयुष्याची शेवटची तीन-चार वर्षे तो अंधरुणालाच खिळलेला होता. तो फुटबॉलच्या माध्यमातूनच जगत होता.”
मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा एक जनुकीय आजार असतो ज्यात स्नायू कमकुवत होतात.
शनिवारी (13 डिसेंबर) सकाळी, मेस्सीचे हजारो चाहते स्टेडियमवर गेले होते. ते घोषणा देत होते, जर्सी विकत घेत होते. त्यांनी ‘आय लव्ह मेस्सी’ असं लिहिलेलं हेडबँड घातले होते. मात्र त्यातील अनेकांच्या हाती निराशा आली.
फोटो स्रोत, ANI
त्यांना हे माहित होतं की सुरक्षेच्या कारणास्तव मेस्सीच्या पुतळ्याचं अनावरण व्हर्च्युअल पद्धतीनं होणार आहे. मात्र तरीदेखील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये मेस्सीला पाहण्याची संधी मिळेल अशी आशा त्यांना होती. मेस्सीच्या या पुतळ्यापासून हे स्टेडियम जवळपास पाच किलोमीटर अंतरावर आहे.
मात्र चाहत्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की त्यांना या महान फुटबॉसपटूची एक झलकदेखील दिसली नाही. कारण मेस्सी स्टेडियममध्ये थोडा वेळ आला होता. त्यावेळेस त्याच्या अवतीभोवती अधिकारी होते.
मेस्सी स्टेडियममधून गेल्यानंतर चाहत्यांनी बाटल्या आणि खुर्च्या फेकल्याची दृश्यं समोर आल्यानं, स्टेडियममध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.
ममता बॅनर्जी यांनी मागितली माफी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्टेडियममधील ‘अव्यवस्थे’बद्दल दुःख व्यक्त केले आणि माफी मागितली आहे.
फोटो स्रोत, ANI
त्यांनी एक्सवर लिहिले, “सॉल्ट लेक स्टेडियममधील अव्यवस्था पाहून मी हैराण झाले आहे. मी हजारो क्रीडाप्रेमी आणि चाहत्यांसोबत त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी स्टेडियमकडे जात होते, जिथे सर्वजण आपल्या आवडत्या फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी जमले होते.”
त्यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती तयार करणार असल्याचं सांगितले आहे, त्या समितीत मुख्य सचिवही असतील.
फोटो स्रोत, AFP via Getty Images
मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी लिहिले, “समिती या घटनेची सविस्तर चौकशी करेल, जबाबदारी निश्चित करेल आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सूचना देईल.”
पश्चिम बंगालमधील मुख्य विरोधी पक्ष भाजपने ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे आणि त्यांचं विधान म्हणजे ‘मगरीचे अश्रू’ आहेत असे म्हटले आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
मजकूर उपलब्ध नाही
Xवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.
भाजप प्रवक्ते अमित मालवीय यांनी एक्सवर लिहिले, “मगरीचेअश्रू ढाळणे थांबवा. हे कुशासन आणि भ्रष्टाचार तुमच्या सरकारच्या प्रत्येक कामात पसरलेले आहे. तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालच्या लोकांच्या भावनांवर थेट हल्ला केला आहे आणि प्रत्येक फुटबॉलप्रेमीचा अपमान केला आहे.”
“तुम्ही लवकरात लवकर जबाबदारी निश्चित करा आणि यासाठी जबाबदार असलेल्या लोकांचा राजीनामा सुनिश्चित करा.”
मेस्सीचा दौरा देशातील चार मोठ्या शहरांपुरता मर्यादित असेल. कोलकाता, मुंबई, नवी दिल्ली आणि हैदराबाद.
2022 फिफा वर्ल्ड कप विजेता मेस्सी दीड दशकाहून अधिक काळानंतर भारतात परतला आहे. यापूर्वी तो 2009 मध्ये कोलकात्यात एक मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना खेळण्यासाठी भारतात आला होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC







