Source :- ZEE NEWS

Operation Sindoor Latest News in Marathi: भारताने पाकिस्तानवर हल्ला करत पहलगाम हल्ल्याचा सूड घेतला आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची हत्या करण्यात आल्यानंतर मागील काही दिवसांपासून भारत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देईल अशी शक्यता वारंवार व्यक्त केली जात होती. अखेर भारताने 7 मे च्या मध्यरात्री पाकिस्तानबरोबरच पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केलं आहे.

मोदींचा सल्ला

भारताने 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे. भारताने केलेल्या या हल्ल्यामध्ये 70 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताने पाकिस्तानमध्ये हल्ला केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी रात्रीच यासंदर्भातील पोस्ट केली आहे. दुसरीकडे भारताच्या संरक्षण मंत्रालयाने रात्री 1 वाजून 44 मिनिटांनी पत्रक जारी करत या हल्ल्याची माहिती दिली आहे. डझनभर दहशतवादी ठिकाणांची ओळख पटवून, त्यांचा मागोवा घेऊन पंतप्रधान मोदींच्या सूचनांनुसार कारवाई करण्यात आली. 

नेमका घटनाक्रम कसा?

मध्यरात्री 1.20 वाजता – पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर भारताकडून हल्ला करण्यात आला.

मध्यरात्री 1.50 वाजता – भारतीय सेनेनं घटनेची दिली माहिती. यासंदर्भात संरक्षण मंत्रालयानेही पत्रक जारी केलं.

मध्यरात्री 2.46 वाजता – केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या हल्ल्याला दुजोरा दिला.

नक्की वाचा >> मुंबई 26/11 ते पहलगाम… Operation Sindoor मधून 7 मोठ्या हल्ल्यांचा बदला; ‘ती’ 9 ठिकाणं का निवडली?

मध्यरात्री 3 वाजता – पाकिस्तानकडून प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर गोळीबाराला सुरुवात करण्यात आली.

पहाटे 3.03 वाजता – पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी भारताने हल्ला केल्याची माहिती ट्विट करत दिली.

पहाटे 3.10 वाजता – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंम्प यांनी घटनेवर प्रतिक्रीया नोंदवली.

पहाटे 3.15 वाजता – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अमेरीकीचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधत घटनाक्रम सांगितला.

पहाटे 3.20 वाजता – पाकिस्तानकडून लाहोर, सियालकोट विमानतळं बंद करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली.

पहाटे 4.54 वाजता – एअर इंडियाकडून काही भागात जाणारी विमान रद्द करण्याची घोषणा झाली.

विशेष प्रिसिजन शस्त्रास्त्रं वापरली

भारतीय सैन्याने यशस्वीरित्या लक्ष्य केलेल्या नऊ ठिकाणांपैकी चार पाकिस्तानमध्ये असून, पाच पाकिस्तान-अधिकृत काश्मीरमध्ये आहेत. पाकिस्तानमधील लक्ष्यांमध्ये बहावलपूर, मुरीदके आणि सियालकोट यांचा समावेश आहे. या दहशतवादी तळांवर अचूकतेने वार करणारी विशेष प्रिसिजन शस्त्रास्त्रं वापरण्यात आली. तीनही सैन्यदलांनी एकत्रितपणे ही कारवाई केली असून, यासाठी सैन्यसज्जता आणि संसाधनांची हालचाल एकत्रित रित्या करण्यात आली असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

आता पुढे काय?

सकाळी 10 वाजता : संरक्षण मंत्रालय (MoD) आणि परराष्ट्र मंत्रालय (MEA) यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.

सकाळी 11 वाजता : हल्ल्यानंतरची पहिली मंत्रिमंडळ सुरक्षा समिती (CCS) बैठक पार पडणार आहे.

सकाळी 11 नंतर : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.

SOURCE : ZEE NEWS