Source :- BBC INDIA NEWS

राखलदास बॅनर्जी यांना जगाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या शोधांपैकी एकाचा शोध लावल्याचे श्रेय दिले जाते.

फोटो स्रोत, Alamy

भारतीय पुरातत्त्वशास्त्राच्या इतिहासात राखलदास बॅनर्जी हे एक असे व्यक्तिमत्त्व होते, ज्यांनी त्यांच्या धाडसी संशोधनातून जगाला सिंधू संस्कृतीचं दार उघडून दिले.

मोहंजोदडोच्या शोधामुळे इतिहासाचा दृष्टिकोन बदलला, पण यामागचा खरा शिल्पकार अनेक वर्षं दुर्लक्षित राहिला.

त्यांच्या बंडखोर स्वभावामुळे आणि व्यवस्थेतील अंतर्गत राजकारणामुळं त्यांच्या महत्त्वपूर्ण कामगिरीला स्थान मिळालं नाही. विस्मरणात गेलेल्या राखलदास बॅनर्जी यांच्याविषयीचा हा लेख.

एक असे भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ, ज्यांच्या कारकिर्दीला बुद्धिमत्ता आणि वादविवाद यांची संमिश्र किनार लाभली होती. त्यांनी जगातील सर्वात महान ऐतिहासिक शोध लावला होता.

या देशात छोटीशी गोष्ट केली तरी त्याचा खूप मोठा गवगवा केला जातो. परंतु, इतका मोठा शोध लावूनही हे व्यक्तिमत्व आज विस्मृतीत गेले आहे.

1900 च्या सुरुवातीला राखलदास बॅनर्जी यांनी सध्याच्या पाकिस्तानमध्ये सिंधी भाषेत ‘मृतांचा डोंगर’ किंवा ‘मृतांची माती’ असा अर्थ असलेल्या मोहंजो-दारोचा (मोहंजोदडो) शोध लावला होता.

हे शहर सिंधू खोरे (हडप्पा) संस्कृतीचा सर्वात मोठा भाग होता, जे कांस्य युगात (ब्राँझ एज) ईशान्य अफगाणिस्तानपासून ते वायव्य भारतापर्यंत पसरलेले होते.

सध्याच्या पाकिस्तानमधील सिंध प्रांतात असलेल्या मोहंजोदडोचे अवशेष.

फोटो स्रोत, Getty Images

धाडसी संशोधक, पण वादग्रस्त कारकीर्द

बॅनर्जी हे एक धाडसी संशोधक आणि कुशल शिलालेख तज्ज्ञ (एपिग्राफिस्ट) होते. ब्रिटिश कालीन भारतात ते भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागात (एएसआय) काम करत होते. त्यांनी उपखंडाच्या दूरदूरच्या भागांत प्रवास करत, प्राचीन वस्तू, भग्नावशेष आणि लिपी शोधण्यासाठी अनेक महिने घालवले.

मोहंजोदडोचा शोध हा क्रांतिकारी ठरला असला, तरी बॅनर्जींची कारकीर्द वादग्रस्त राहिली. त्यांच्या स्वभावामुळं आणि वसाहतवादी नियमांची वारंवार पायमल्ली केल्यामुळे त्यांना अनेकदा अडचणींना सामोरं जावं लागलं.

त्यांची प्रतिष्ठा डागाळली आणि कदाचित यामुळं त्यांच्या योगदानाचे काही पैलू जागतिक स्मरणातूनही पुसले गेले.

सध्याच्या पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील हडप्पा येथील उत्खनन स्थळ

फोटो स्रोत, Getty Images

विशेष म्हणजे, राखलदास बॅनर्जी यांनी मोहंजोदडोविषयी लिहिलेले अहवाल पुरातत्त्व विभागाने (एएसआय) कधीच प्रकाशित केले नाहीत. नंतर पुरातत्त्व तज्ज्ञ पी.के. मिश्रा यांनी एएसआयचे तत्कालीन प्रमुख जॉन मार्शल यांच्यावर बॅनर्जींचे निष्कर्ष दडपल्याचा आणि त्यांच्या शोधाचे श्रेय स्वतःकडे घेतल्याचा आरोप केला होता.

“जगाला माहिती आहे की, मार्शल यांनी या संस्कृतीचे अवशेष शोधले आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ते शिकवलंही जातं. बॅनर्जी यांच्या नावाचा वापर केवळ तळटीपासारखा केला गेला आहे,” असं प्रा. मिश्रा यांनी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.

आपल्या ‘फाइंडिंग फॉरगॉटन सिटीज: हाऊ द इंडस सिव्हिलायझेशन वॉज डिस्कव्हर्ड’ या पुस्तकात इतिहासतज्ज्ञ नयनजोत लाहिरी लिहितात की, बॅनर्जी यांच्याकडे “राजकीय शहाणपणा किंवा मुत्सद्देगिरी आणि चातुर्याचा अभाव होता, आणि त्यांच्या उद्धट वर्तनामुळे अनेकजण नाराज व्हायचे.”

मोहंजोदडो येथे आढळून आलेले मोहरे

फोटो स्रोत, Getty Images

‘वरिष्ठांनाही जुमानत नसत’

लाहिरी यांच्या या पुस्तकात बॅनर्जींच्या आर्किओलॉजिकल ‘सर्व्हे ऑफ इंडिया’मधील काळात निर्माण झालेल्या वादांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे.

एकदा बॅनर्जी यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता ईशान्य भारतातील एका संग्रहालयातून शिलालेख आणि मूर्ती मिळवण्याचा प्रयत्न केला होता, असं लाहिरी यांनी नमूद केलं आहे.

दुसऱ्या वेळेस, बॅनर्जी यांनी बंगालमधील एका संग्रहालयातून काही दगडी शिल्पे त्यांच्या कार्यस्थळी असलेल्या संग्रहालयात हलवण्याचा प्रयत्न केला, ज्यासाठी आवश्यक परवानगीही त्यांनी घेतली नव्हती.

आणखी एका घटनेत, बॅनर्जी यांनी एक प्राचीन चित्र विकत घेतलं. परंतु, त्यासाठी त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना विचारलं नव्हतं. त्याचबरोबर या चित्रासाठी त्यांनी आवश्यकतेपेक्षा जास्त रक्कम खर्च केल्याचं वरिष्ठांचं मत होतं.

विद्वान इतिहासकारांमध्ये गणती

बॅनर्जी मोहंजोदडोशी संबंधित असल्याने बंगालमधील जागतिक इतिहासकार आणि विद्वानांमध्ये एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं.

त्यांचा जन्म 1885 मध्ये बंगालमधील एका श्रीमंत कुटुंबात झाला होता.

बहारामपूरमध्ये मध्ययुगीन स्मारक होते. त्यामुळं त्यांना इतिहासाविषयी आवड निर्माण झाली आणि त्यांनी कॉलेजमध्ये हाच विषय घेतला. त्यांच्यात नेहमीच एक साहसी वृत्ती होती.

एकदा जेव्हा त्यांना भारतीय इतिहासातील सिथियन कालखंडाबद्दल निबंध लिहिण्याची जबाबदारी देण्यात आली, तेव्हा त्यांनी त्या काळातील शिल्पे आणि लिपी, शास्त्रांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी शेजारील राज्यातील एका संग्रहालयाला भेट दिली.

हडप्पा

फोटो स्रोत, Getty Images

‘द लाइफ अँड वर्क्स ऑफ राखलदास बॅनर्जी’ या पुस्तकातलेखिका यमा पांडे यांनी उल्लेख केला आहे की, बॅनर्जी 1910 मध्ये एएसआयमध्ये उत्खनन सहाय्यक म्हणून सामील झाले आणि 1917 मध्ये पश्चिम भारतात अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ (सुपरिटेंडिंग आर्किओलॉजिस्ट) होण्यापर्यंत त्यांनी जलद प्रगती केली.

या पदावर असतानाच 1919 मध्ये त्यांनी पहिल्यांदा सिंधमधील मोहंजोदडोकडे लक्ष दिलं. त्यानंतरच्या काही वर्षांत त्यांनी या ठिकाणी उत्खननाची मालिकाच चालवली. ज्यातून काही अतिशय आकर्षक शोध उघड झाले: प्राचीन बौद्ध स्तूप, नाणी, शिक्के, भांडी आणि मायक्रोलिथ.

1922 आणि 1923 दरम्यान, त्यांनी अवशेषांच्या अनेक स्तरांचा शोध लावला. ज्यामध्ये या प्रदेशात उदयास आलेल्या विविध नागरी वसाहतींचे ते संकेत होते. पण सर्वात महत्वाचं म्हणजे, 5,300 वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेली सर्वात जुनी वसाहत – इंदुस व्हॅली सभ्यता, सिंधू संस्कृतीचा शोध लागला.

त्या वेळी, आज आपल्याला माहीत असलेल्या सिंधू संस्कृतीचा शोध इतिहासकारांना अद्याप लावता आला नव्हता. ती संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात अंदाजे 386,000 चौरस मैल (999,735 वर्ग किमी) परिसरात व्यापलेली होती.

बॅनर्जीच्या उत्खननातून तीन मोहरे सापडले, ज्यावर हडप्पा (जो सध्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आहे) येथील चित्र आणि लिपीत साम्य होते. यामुळं दोन्ही स्थळांमध्ये संबंध स्थापन होण्यास मदत झाली आणि सिंधू संस्कृतीच्या विशाल विस्तारावर प्रकाश पडला.

निवृत्तीलाही वादाची किनार

पण 1924 पर्यंत, बनर्जीच्या प्रकल्पासाठीचा निधी संपला होता आणि त्यांची पूर्व भारतात बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांनी त्या जागेशी कोणताही संपर्क ठेवला नाही. तसेच त्यांनी तिथे कोणत्याही उत्खननात भाग घेतला नाही, असं पांडे यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे.

पण नयनजोत लाहिरी यांनी म्हटलं आहे की, बॅनर्जी यांच्या विनंतीवरुनच त्यांची बदली करण्यात आली होती. कारण बॅनर्जी यांच्या खर्चावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या कामाशी संबंधित खर्चाचा हिशोब दिला नव्हता.

बॅनर्जी यांनी कार्यालयातील फर्निचर खरेदी करण्यासाठी उत्खनन अनुदान वापरले होते आणि त्यांचा प्रवास खर्चही जास्त असल्याचे समोर आले होते.

त्यांचं स्पष्टीकरण वरिष्ठांना पटलं नाही आणि त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करण्यात आली. त्यानंतर काही वाटाघाटी झाल्या आणि बॅनर्जी यांची बदलीची विनंती मान्य करण्यात आली.

बनर्जी यांनी पूर्व भारतात भारतीय पुरातत्त्व विभागात काम सुरू ठेवलं. त्यांनी आपला बहुतांश वेळ कलकत्ता (आताचे कोलकाता) येथे घालवला आणि अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंच्या जतन आणि पुनर्बांधणीच्या कामावर देखरेख केली.

हडप्पा

फोटो स्रोत, Getty Images

त्यांनी 1927 मध्ये एएसआयचा राजीनामा दिला. पण त्यांच्या निवृत्तीला वादाची किनार होती. राजीनाम्याच्या काही वर्षांपूर्वी ते एका मूर्ती चोरीच्या प्रकरणात मुख्य संशयित ठरले होते.

या सगळ्याची सुरुवात ऑक्टोबर 1925 मध्ये झाली. तेव्हा राखलदास बॅनर्जी यांनी मध्य प्रदेशातील एका हिंदू मंदिराला भेट दिली. या मंदिरात एका बौद्ध देवीची दगडी मूर्ती होती. यावेळी त्यांच्यासोबत दोन कनिष्ठ सहाय्यक आणि दोन मजूर होते, असं इतिहासतज्ज्ञ नयनज्योत लाहिरी आपल्या पुस्तकात नमूद करतात.

मात्र त्यांच्या भेटीनंतर काही दिवसातच ती मूर्ती गायब झाली आणि तिच्या चोरीच्या प्रकरणात राखलदास बॅनर्जी यांचं नाव समोर आलं. त्यांनी या चोरीत आपला सहभाग असल्याचं नाकारलं. नंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली.

ही मूर्ती नंतर कलकत्ता येथे सापडली. बॅनर्जी यांच्या विरोधातील खटला फेटाळण्यात आला. त्यांच्याविरुद्ध कोणतेही ठोस आरोप सिद्ध झाले नाहीत. तरीसुद्धा, जॉन मार्शल हे त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही राहिले.

भारतीय पुरातत्त्व विभाग सोडल्यानंतर बॅनर्जी यांनी प्राध्यापक म्हणून काम सुरू केलं. पण विलासी जीवनशैलीमुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

इतिहासतज्ज्ञ तापती गुहा-ठाकुरता यांनी द टेलिग्राफ या वृत्तपत्राला सांगितलं की, राखलदास बॅनर्जी यांना उत्तम अन्न, घोडागाड्या आणि मित्रमंडळींवर खर्च करायला आवडत असे.

1928 मध्ये ते बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) प्राध्यापक म्हणून रुजू झाले. फक्त दोन वर्षांनी म्हणजे 1930 मध्ये वयाच्या अवघ्या 45व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC