Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, San Diego Museum of art
जानेवारी 1739 चा काळ. तेव्हा मुघल साम्राज्य जगातील सर्वात श्रीमंत साम्राज्यांपैकी एक होतं. त्यावेळेस जवळपास संपूर्ण उत्तर भारत, आजचा पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या मोठ्या भूभागावर मुघल बादशाहचा अंमल होता. या एवढ्या प्रचंड साम्राज्यावर राज्य करणारा मुघल बादशाह तख्त-ए-ताऊसवर बसायचा.
तख्त-ए-ताऊस म्हणजे जगप्रसिद्ध मयूर सिंहासन किंवा पीकॉक थ्रोन. याच तख्त-ए-ताऊसच्या वरच्या भागात जगातील सर्वात प्रसिद्ध कोहिनूर हिरा लावण्यात आला. या हिऱ्यामुळे तख्त-ए-ताऊसचा दिमाख आणखीच वाढायचा.
औरंगजेबाच्या निधनानंतर मुघल साम्राज्याचा दिमाखात आणि वैभवात सातत्यात घसरण होत होती. मुघल साम्राज्याचा प्रभाव कमी होत चालला होता.
मात्र, तरीदेखील काबूलपासून कर्नाटकापर्यंतचा भूप्रदेश मुघल साम्राज्यात येत होता. भारतीय उपखंडातील बरीचशी सुपीक जमीन मुघल साम्राज्याचा भाग होती.
विल्यम डॅलरिंपल आणि अनिता आनंद यांनी ‘कोहिनूर द स्टोरी ऑफ द वर्ल्ड्स मोस्ट इनफेमस डायमंड’ हे पुस्तक लिहिलं आहे.
त्यात ते लिहितात, “त्या काळात मुघलांची राजधानी दिल्लीत होती. दिल्ली शहराची लोकसंख्या जवळपास 20 लाख होती. लंडन आणि पॅरिसच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही ती अधिक होती.”
दिल्ली हे इस्तानबुल ते टोकियो यांच्या दरम्यानचं सर्वात समृद्ध आणि भव्य शहर मानलं जायचं. यावरून त्याकाळचा दिल्लीचा विस्तार आणि दिमाख लक्षात येतो.
त्यावेळचा मुघल बादशाह होता, मोहम्मद शाह. त्याच्या नावासोबत नेहमीच ‘रंगीला’ शब्द जोडला जायचा.
जहीरउद्दीन मलिक यांनी ‘द रेन ऑफ मोहम्मद शाह’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे.
त्यात ते लिहितात, “1719 साली मोहम्मद शाह दिल्ली तख्तावर बसला. त्यावेळेस त्याचं वय फक्त 18 वर्षे होतं. मोहम्मद शाहचं खरं नाव होतं रोशन अख्तर. तो जहानशाहचा मुलगा आणि औरंगजेबाचा नातू होता.”

फोटो स्रोत, Getty Images
“त्याची शरीरयष्टी मजबूत होती. दरबारातील कामकाज आटोपल्यावर तो तिरंदाजीचा सराव करायचा, तसंच अनेकदा शिकार करण्यासाठी जायचा.”
जहीरउद्दीन मलिक लिहितात की, काही काळानंतर मोहम्मद शाहला अफूचं व्यसन जडलं. त्यामुळे त्याला पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्याची तब्येत घसरू लागली होती. त्यामुळे तो सहजपणे घोडा चालवू शकत नव्हता.
त्याला घोड्यावर चढता यावं यासाठी त्याच्यासाठी खास काठी बनवण्यात आली होती. लखनौच्या अजफरी या कारागिरानं ती बनवली होती.
मोहम्मद शाह कधी कधी त्याच्या मदतीनं घोड्यावर बसायचा. एरवी तो फिरण्यासाठी पालखी किंवा हत्तीवर ‘तख्ते-ए-रवां’चा आधार घ्यायचा.
मुघल दरबारात संगीत, चित्रकला, साहित्याला प्रोत्साहन
मोहम्मद शाहची ख्याती होती की, तो सौंदर्याचा दर्दी होता. त्याला ‘पेशवाज’ हे महिलांचं बाह्य वस्त्र आणि मोती जडवण्यात आलेले बूट घालण्याची आवड होती.
त्याच्या दरबारात संगीत आणि चित्रकलेला खूप प्रोत्साहन दिलं जायचं. सितार आणि तबल्याला लोकसंगीताच्या परंपरेतून बाहेर काढून दरबारापर्यंत पोहोचण्याचं श्रेय मोहम्मद शाह ‘रंगीला’ यालाच दिलं जातं.

फोटो स्रोत, Asia Publishing House
मुघल मिनिएचर पेंटिंग कलेचं त्यानं पुनरुज्जीवन केलं. त्याच्या दरबारात निधामल आणि चितरमन सारखे प्रसिद्ध कलाकार होते. त्यांना मुघल दरबारातील जीवन आणि होळी साजरा करण्याचं चित्रण करण्यात नैपुण्य होतं.
त्यात बादशाहला यमुनेच्या काठी होळी खेळताना आणि लाल किल्ल्यातील बागेत त्याच्या दरबारी लोकांबरोबर चर्चा करताना दाखवण्यात आलं होतं.
औरंगजेबच्या ‘कट्टर’ आणि ‘नैतिकतावादी’ राजवटीनंतर मोहम्मद शाहच्या राजवटीत दिल्लीत कला, नृत्य, संगीत आणि साहित्य यासाठी जे अनुकुल वातावरण तयार झालं, तसं त्यापूर्वी कधीही दिसलं नव्हतं.
मुघल साम्राज्याची सत्ता सरदारांच्या हातात
मात्र मोहम्मद शाह ‘रंगीला’ युद्धकलेत तरबेज नव्हता. तो रणांगण गाजवणारा योद्धा नव्हता.
तो तख्तावर निव्वळ याच कारणामुळे टिकून राहिला की, त्यानं वारंवार असा आभास निर्माण केला की त्याला राज्यकारभार करण्यात विशेष रस नाही.
विल्यम डेलरिंपल आणि अनिता आनंद लिहितात की, “त्याचा सकाळचा वेळ तीतर आणि हत्तींची झुंज पाहण्यात जायचा. दुपारनंतर नकला करून दाखवणारे लोक त्याचं मनोरंजन करायचे. राज्यकारभार चालवण्याची जबाबादीर मोहम्मद शाहनं त्याच्या दरबारातील सल्लागारांवर सोपवली होती.”

फोटो स्रोत, Juggernaut
मोहम्मद शाह ‘रंगीला’च्या राजवटीत सत्ता, बादशाह आणि दिल्ली दरबाराच्या हातून निसटून वेगवेगळ्या प्रांतातील नवाब, सरदारांच्या ताब्यात गेली. राजकारण, अर्थव्यवस्था, अंतर्गत सुरक्षा सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर हे सरदार स्वत:च निर्णय घेऊ लागले होते.
नादिर शाहचं दिल्लीवरील आक्रमण
उत्तरेत अवधचा नवाब सआदत खॉं आणि दक्षिणेत निजाम-उल-मुल्क हे दोन मातब्बर सरदार स्वतंत्र राज्यकर्त्ये म्हणून हातपाय पसरवू लागले होते.
मोहम्मद शाह ‘रंगीला’च्या दुर्दैवानं पश्चिमेला मुघल साम्राज्याची सीमा फारसी बोलणाऱ्या आणि आक्रमक अशा तुर्क, नादिर शाहच्या राज्याला लागून होती.
नादिर शाहचं वर्णन करताना फ्रेंच लेखक पेरे लुई बाजानं त्याच्या आत्मचरित्रात लिहिलं होतं, “नादिर शाहच्या डोक्यावरचे केस पूर्णपणे पांढरे झाले होते. त्यानं दाढी मात्र काळी ठेवली होती. त्याचा आवाज कर्कश आणि जड होता. मात्र जेव्हा त्याला त्याचा मतलब काढून घ्यायचा असायचा तेव्हा तो अतिशय मृदू आवाजात बोलायचा.”
“त्याचं वास्तव्य निश्चित अशा एखाद्या ठिकाणी नसायचं. तो सैन्याच्या छावणीत दरबार भरवायचा. त्याचा महाल तंबूंमध्येच असायचा.”

फोटो स्रोत, Getty Images
कंदहारवर हल्ला करण्याआधीच अशा अफवा पसरल्या होत्या की नादिर शाह मुघलांचा खजिना लुटण्यासाठी दिल्लीवर हल्ला करण्याची योजना गुप्तपणे बनवतो आहे. हा हल्ला करण्यासाठी नादिर शाहनं आधीच दोन कारणं देखील शोधून ठेवली होती.
विल्यम डेलरिंपल आणि अनिता आनंद लिहितात की, “नादिर शाहच्या राजवटीतून पळालेल्या काही इराणी बंडखोरांना मुघलांनी आश्रय दिला होता. त्याशिवाय सीमेवरील मुघलांच्या कर अधिकाऱ्यांनी इराणी राजदूताचं काही सामान जप्त केलं होतं.”
“त्यानंतर नादिर शाहनं दिल्लीत दूत पाठवून तक्रार केली होती की, मुघलांचं वागणं मैत्रीपूर्ण नाही. मात्र या गोष्टीचा मोहम्मद शाह ‘रंगीला’वर कोणताही परिणाम झाला नव्हता.”
तीन महिन्यानंतर नादिर शाहनं दिल्लीपासून 100 मैल उत्तरेला करनालमध्ये मुघलांच्या तीन फौजांचा पराभव केला. यातील एक फौज दिल्लीतील होती तर उर्वरित दोन फौजा अवध आणि दख्खनच्या (दक्षिणेतील) होत्या.
नादिर शाह आणि मोहम्मद शाह ‘रंगीला’ मध्ये तह
मुघल फौजांना नादिर शाहनं कोंडीत पकडलं आणि त्यांची रसद संपू लागली. तेव्हा नादिर शाहनं मोहम्मद शाह ‘रंगीला’ ला तह करण्यासाठी बोलावलं.
मायकल एक्सवर्दी यांनी ‘सोर्ड ऑफ पर्सिया’ हे पुस्तक लिहिलं आहे.
या पुस्तकात ते लिहितात, “नादिर शाहनं रंगीलाचा चांगला पाहुणचार केला. मात्र त्याला परत जाऊ दिलं नाही. मोहम्मद शाहच्या अंगरक्षकांची शस्त्र काढून घेण्यात आली आणि त्याच्या चारी बाजूंना नादिर शाहनं त्याचे सैनिक तैनात केले.”
“दुसऱ्याच दिवशी नादिर शाहचे सैनिक मुघलांच्या छावणीत गेले. तिथून त्यांनी मोहम्मद शाह ‘रंगीला’चा संपूर्ण जनानखान आणि नोकरांना ताब्यात घेतलं. त्यानंतर मोहम्मद शाहच्या दरबारातील लोकांना ताब्यात घेण्यात आलं.”
“दुसऱ्या दिवशी नेतृत्व नसलेल्या आणि उपासमारीनं त्रस्त झालेल्या मुघल सैन्याला सांगण्यात आलं की, ते पुन्हा घरू परतू शकतात.”
अशा प्रकारे मुघल सैन्याची सर्व साधनसंपत्ती नादिर शाहच्या ताब्यात आली.

फोटो स्रोत, Musee Guimet Paris
मेहदी अशराबादी यांनी ‘तारीख-ए-जहाँ कुशा-ए-नादरी’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते लिहितात, “एक आठवड्यानं जेव्हा मोहम्मद शाह ‘रंगीला’ दिल्लीत आला, तेव्हा संपूर्ण शहरात शांतता पसरली होती. दुसऱ्या दिवशी 20 मार्चला नादिर शाह 100 हत्तींसह मिरवणूक काढत दिल्लीत शिरला.”
“आल्याबरोबर त्यानं लाल किल्ल्यातील दिवाण-ए-खास जवळ शहाजहानच्या शयनकक्षात मुक्काम ठोकला. तर मोहम्मद शाहनं असद बुर्ज जवळच्या इमारतीत वास्तव्यं केलं.”
मोहम्मद शाहनं मुघलांचा सर्व शाही खजिना नादिर शाहच्या ताब्यात दिला. नादिर शाहनं खोट्या संकोचानं त्याचा स्वीकार केला.
21 मार्चला बकरी ईदच्या दिवशी दिल्लीतील सर्व मशिदींमध्ये नादिर शाहच्या नावाचा खुतबा पढण्यात आला. त्या दिवशी दिल्लीच्या टाकसाळेत नादिर शाहच्या नावाची नाणी पाडण्यात आली.
नादिर शाहनं दिल्लीत केली भयानक कत्तल
दुसरा दिवस हा मुघलांची राजधानी असलेल्या दिल्लीच्या इतिहासातील सर्वात वाईट, दु:खद दिवस होता. नादिर शाहची फौज दिल्लीत शिरताच, अन्नधान्याच्या किंमती अचानक वाढल्या.
नादिर शाहच्या सैनिकांनी जेव्हा दिल्लीतील पहाडगंज परिसरात व्यापाऱ्यांशी घासाघीस करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा व्यापाऱ्यांनी अजिबात ऐकलं नाही. दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये चकमक उडाली.
विल्यम डेलरिंपल आणि अनिता आनंद लिहितात की, “लवकरच दिल्लीत अफवा पसरली की, नादिर शाहला किल्ल्यातील एका सैनिकानं ठार केलं आहे. त्यानंतर जमावाला जिथे कुठे संधी मिळाली तिथे त्यांनी नादिर शाहच्या सैनिकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली.”

फोटो स्रोत, B Tauris
“दुपारपर्यंत नादिर शाहच्या फौजेतील 900 सैनिक मारले गेले होते. त्यानंतर नादिर शाहनं याला प्रत्युत्तर देण्यासाठी कत्ल-ए-आम म्हणजे लोकांची सरसकट कत्तल करण्याचा हुकूम दिला.”
त्याच्या दुसऱ्या दिवशी तो स्वत: या कत्तलीवर देखरेख करण्यासाठी लाल किल्ल्यातून बाहेर पडला. त्यानं चांदणी चौकाजवळच्या कोतवाली चबूतऱ्यावर ठाण मांडलं.
बरोबर नऊ वाजता कत्तलीची सुरुवात झाली. लाल किल्ल्याजवळ चांदणी चौक, दरीबा आणि जामा मशीदजवळ सर्वाधिक लोक मारले गेले.
अनेक घरं पेटवून देण्यात आली. संपूर्ण शहरात मृतदेहांची दुर्गंधी पसरली. त्या एकाच दिवसात दिल्लीत जवळपास 30 हजार लोकांची कत्तल करण्यात आली.
दिल्लीची अभूतपूर्व लूट
विल्यम फ्लोर यांनी ‘न्यू फॅक्ट्स ऑन नादिर शाहाज इंडिया कॅम्पेन’ या पुस्तकात, मॅथ्यूज वॅन लॅपसाई या एका डच प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीच्या आधारे लिहिलं की, “सआदत खाँ यानं विष खाऊन आत्महत्या केली. निजाम डोक्यावर पगडी किंवा साफा न घालता स्वत:चे बांधून घेत नादिर शाहसमोर गुडघ्यांवर बसला.”
“त्यानं नादिर शाहला, दिल्लीतील लोकांवर दया दाखवण्याची विनंती केली. त्यांच्याऐवजी त्याला (निजामाला) शिक्षा देण्यात यावी. त्यानंतर नादिर शाहनं ही कत्तल थांबवण्याचा हुकुम दिला. मात्र, एक अटदेखील ठेवली. ती अशी की दिल्ली सोडण्याआधी त्याला 100 कोटी रुपयांची रक्कम दंडाच्या स्वरुपात देण्यात यावी.”

फोटो स्रोत, Getty Images
अर्थात तरीदेखील दिल्लीतील लोकांना लूटणं आणि त्यांच्यावर अत्याचार करणं सुरूच राहिलं. फक्त त्यांनी कत्तल करणं, त्यांना जिवानिशी मारणं थांबवण्यात आलं.
पुढील काही दिवसात मोहम्मद शाह ‘रंगीला’ची अशी अवस्था झाली की, नादिर शाहला द्यायच्या खंडणीच्या रकमेसाठी त्याला त्याच्याच राजधानीतील लोकांवर सक्ती करावी लागली.
आनंद राम मुखलिस यांनी ‘तजकिरा’मध्ये लिहिलं आहे की, “संपूर्ण दिल्लीची विभागणी पाच भागांमध्ये करण्यात आली. प्रत्येक भागाकडून एका मोठ्या रकमेची खंडणी मागण्यात आली. जबरदस्तीनं फक्त पैसा, सोनं नाणंच घेण्यात आलं नाही, तर संपूर्ण कुटुंबच्या कुटुंबच उदध्वस्त झाली.”
“अनेकांनी तर विष खात आत्महत्या केली. तर काही जणांनी चाकूचा वापर करत आयुष्य संपवलं. 348 वर्षांमध्ये मुघल साम्राज्यानं उभं केलेलं वैभव, जमा केलेली संपत्ती एका क्षणात दुसऱ्याची झाली होती.”
मोहम्मद शाह ‘रंगीला’ पुन्हा झाला दिल्लीचा बादशाह
हे सर्व घडत असताना नादिर शाह, मोहम्मद शाह ‘रंगीला’शी मात्र बाहेरून अतिशय दयाळूपणे आणि शिष्टाचारानं वागत होता. मात्र, प्रत्यक्षात मोहम्मद शाहला नादिर शाहच्या शेजारी अशा प्रकारे उभं केलं जायचं की, जणू काही नादिर शाह हा त्याचा बादशाह आहे.
एका महिन्यानंतर 12 मे ला नादिर शाहनं दरबार भरवला. त्यानंतर मोहम्मद शाह ‘रंगीला’ला पुन्हा एकदा दिल्लीच्या बादशाहपदी बसवण्यात आलं.
प्रसिद्ध इतिहासकार आर. व्ही. स्मिथ यांनी द हिंदू या वृत्तपत्रात ‘ऑफ नूर अँड कोहिनूर’ हा लेख लिहिला होता.

फोटो स्रोत, Getty Images
त्यात त्यांनी लिहिलं, “त्या प्रसंगी नादिर शाहला नर्तकी नूर बाईकडून माहिती मिळाली की, मोहम्मद शाह ‘रंगीला’नं कोहिनूर हिरा त्याच्या मुकुटात किंवा टोपात लपवला आहे. नादिर शाहनं मोहम्मद शाहला सांगितलं की, आपण दोघं भावांसारखे आहोत. त्यामुळे आपण एकमेकांचा मुकुट बदलला पाहिजे.”
डेलरिंपल लिहितात, “ही कहाणी लोकांना कदाचित रंजक वाटेल. मात्र, त्याकाळच्या कोणत्याही साधनात याचा उल्लेख नाही. 19 व्या शतकानंतरचा या गोष्टीचा उल्लेख इतिहासाच्या पुस्तकात होऊ लागला.”
“जुगल किशोर या मुघलांच्या दरबारातील एका व्यक्तीनं या गोष्टीचा उल्लेख केला की नादिर शाहनं मोहम्मद शाह ‘रंगीला’ला त्याचा मुकूट किंवा टोप दिला होता.”
तख्त-ए-ताऊस आणि कोहिनूर पोहोचला इराणला
दिल्लीत 57 दिवस तळ ठोकल्यानंतर 14 मे ला नादिर शाहनं इराणकडे कूच केलं. परत जाताना त्यानं मुघलांनी आठ पिढ्यांपासून जमा केलेली सर्व संपत्ती, खजिनाही इराणला नेला.
इराणचे इतिहासकार मोहम्मद काजेम मारवी यांनी ‘आलमआरा-ये नादेरी’ हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते लिहितात, “नादिर शाहनं दिल्लीत केलेल्या लुटीतील सर्वात मौल्यवान वस्तू होती तख्त-ए-ताऊस म्हणजे मुघलांचं मयूर सिंहासन.”

फोटो स्रोत, Getty Images
“दिल्लीतील लुटीतून आणि मुघल बादशाहाकडून मिळवलेल्या खजिन्यात सोनं, चांदी आणि मौल्यवान रत्नं होती. ही लूट तब्बल 700 हत्ती, चार हजार उंट आणि 12 हजार घोड्यांवर लादून इराणला नेण्यात आली.”
नादिर शाहच्या फौजेनं चिनाब नदीवरील पूल ओलांडताच, त्याच्या प्रत्येक सैनिकाची झडती घेण्यात आली. जवळ असलेले सोनं-नाणं जप्त होण्याच्या भीतीनं सैनिकांनी लुटलेलं सोनं आणि मौल्यवानं रत्नं नदीत फेकून दिले.
त्यांना आशा होती की एक दिवस परत येऊन ते या मौल्यवान गोष्टी पुन्हा नदीच्या तळातून बाहेर काढतील.
31 वर्षे राज्य केल्यानंतर मोहम्मद शाह ‘रंगीला’चा मृत्यू
नादिर शाहनं दिल्ली लुटल्यानंतर नऊ वर्षे मोहम्मद शाह रंगीला दिल्लीच्या तख्तावर होता.
त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात त्याला अर्धांगवायू झाला. शेख अहमद हुसैन मजाक यांनी ‘तारीख-ए-अहमदी’ हे पुस्तक लिहिलं आहे.
त्यात ते लिहितात, “अखेरच्या दिवसांमध्ये मोहम्मद शाहला वारंवार ताप यायचा. त्यामुळे तो अशक्त झाला होता. मृत्यूच्या एक दिवस अगोदर मोहम्मद शाह रंगीलाला किल्ल्यातील मशिदीत नेण्यात आलं.”
“तिथे त्याचे सर्व दरबारी आणि सहकारी उपस्थित होते. तिथे बोलता बोलता तो अचानक बेशुद्ध झाला आणि मग पुन्हा कधीच शुद्धीत आला नाही.”

फोटो स्रोत, Getty Images
दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 एप्रिल 1748 च्या सकाळी, 31 वर्षे मुघल साम्राज्याचा राज्यकारभार करून मोहम्मद शाहनं शेवटचा श्वास घेतला.
मृत्यूनंतर त्याच्या इच्छेनुसार, निजामुद्दीन औलिया यांच्या मकबऱ्याच्या परिसरात त्याला दफन करण्यात आलं.
मोहम्मद शाह ‘रंगीला’चे चरित्रकार जहीरउद्दीन मलिक यांनी लिहिलं आहे, “अनेक दोष, उणीवा असूनदेखील मोहम्मद शाहनं त्याच्या दरबारात नेहमीच शिष्टाचार आणि योग्य वर्तणूक राखण्याचं भान ठेवलं.”
“जहाँदार शाहप्रमाणे त्यानं दरबाराला दारू आणि व्यभिचाराचा अड्डा होऊ दिला नाही. कठीण परिस्थितीत त्यानं दिल्लीचं तख्त तीस वर्षांहून अधिक काळ सांभाळलं. “
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC