Source :- BBC INDIA NEWS
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी न्यूज
-
18 जानेवारी 2025
अपडेटेड 19 मिनिटांपूर्वी
विधानसभेच्या निकालानंतर जवळपास दोन महिन्यांनी सर्व जिल्ह्यांची पालकमंत्रिपदं जाहीर झाली. मात्र, पालकमंत्रिपदांच्या घोषणेच्या 48 तासात दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आलीय. यात रायगड आणि नाशिक जिल्ह्यांचा समावेश आहे.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं पत्रक काढून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदी करण्यात आलेल्या नियुक्त्या स्थगित करण्याचे आदेश जारी केले आहेत.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती, तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी भाजपच्या गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती.
रायगडमध्ये कॅबिनेट मंत्री भरत गोगावले आणि शिवसेनेच्या इतर आमदारांनी आदिती तटकरे यांच्या नियुक्तीस विरोध दर्शवला होता, तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या नियुक्तीलाही महायुतीत वाद असल्याचं स्पष्ट झालंय.
आधीच बीडमध्ये धनंजय मुंडेंऐवजी अजित पवारांना पालकमंत्रिपदाची जबाबदारी घेण्याची वेळ ओढवली असताना, आता इतरत्रही पालकमंत्रिपदावरून नाराजी दिसू लागलीय.
गोगावलेंनी केलेली नाराजी व्यक्त
पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच, पालकमंत्रिपदाची यादी धक्कादायक असल्याचं म्हटलं होतं.
गोगावले म्हणाले होते, “मी वरिष्ठांना फोन केला होता. मात्र, याबाबत माझी त्यांच्याशी काही चर्चा झालेली नाही. हा निर्णय मला धक्कादायक वाटतो. आम्हाला ही अपेक्षा नव्हती. पालकमंत्री म्हणून माझी निवड व्हावी असं संपूर्ण रायगड जिल्ह्यात वातावरण झालेलं होतं.”
“परंतु, ठीक आहे. आता आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य करावा लागेल,” असंही गोगावलेंनी नमूद केलं होतं.
18 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील नव्या सरकारमधील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीची जबाबदारी स्वतःकडं ठेवली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं पुण्यासह सध्या चर्चेत असलेल्या बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्याकडं मुंबई शहरासह ठाण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पालकमंत्रिपदावरून महायुतीतल्या तिन्ही मुख्य पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून आलं होतं. आपल्यालाच पालकमंत्रिपद मिळावं म्हणून शर्यत आणि त्यातून मग मतभेद असं नाट्यही पाहायला मिळालं.
पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी (जिल्हानिहाय)
- गडचिरोली – देवेंद्र फडणवीस (सह-पालकमंत्री – आशिष जयस्वाल)
- ठाणे – एकनाथ शिंदे
- मुंबई शहर – एकनाथ शिंदे
- पुणे – अजित पवार
- बीड – अजित पवार
- नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
- अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
- अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे-पाटील
- वाशिम – हसन मुश्रीफ
- सांगली – चंद्रकांत पाटील
- नाशिक – गिरीश महाजन (नियुक्ती स्थगित)
- पालघर – गणेश नाईक
- जळगाव – गुलाबराव पाटील
- यवतमाळ – संजय राठोड
- मुंबई उपनगर – ॲड. आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा (सह-पालकमंत्री)
- रत्नागिरी – उदय सामंत
- धुळे – जयकुमार रावल
- जालना – पंकजा मुंडे
- नांदेड – अतुल सावे
- चंद्रपूर – अशोक उईके
- सातारा – शंभूराज देसाई
- रायगड – आदिती तटकरे (नियुक्ती स्थगित)
- लातूर – शिवेंद्रसिंह भोसले
- नंदुरबार – माणिकराव कोकाटे
- सोलापूर – जयकुमार गोरे
- हिंगोली – नरहरी झिरवाळ
- भंडारा – संजय सावकारे
- छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
- धाराशिव – प्रताप सरनाईक
- बुलढाणा – मकरंद जाधव (पाटील)
- सिंधुदुर्ग – नितेश राणे
- अकोला – आकाश फुंडकर
- गोंदिया – बाबासाहेब पाटील
- कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ (सह-पालकमंत्री)
- वर्धा – डॉ. पंकज भोयर
- परभणी – मेघना बोर्डीकर
अशी सुरू होती रस्सीखेच
42 मंत्र्यांपैकी 34 मंत्र्यांनाच पालकमंत्री पद मिळाली आहेत. यामध्ये धनंजय मुंडे, भरत गोगावले, योगेश कदम आणि ईतर मंत्र्यांना एकाही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद नाही.
पुण्याच्या पालकमंत्रिपदावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत होती. मात्र, ते अजित पवारांकडं गेलं.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर मंत्री भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यात रस्सीखेच होती. त्यात आदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद देण्यात आलं
बीडमध्ये धनंजय मुंडे की पंकजा मुंडे पालकमंत्री होणार याकडं सर्वांचंच लक्ष लागलं होतं. मात्र दोघांचाही पत्ता कट होऊन अजित पवारांकडे बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट की अतुल सावे यापैकी कोणाच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडणार अशी चर्चा होती. त्यात छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पद संजय शिरसाट यांना मिळालं आहे. तर सावे यांना नांदेडचं पालकमंत्रिपद देण्यात आलं.
मुंबईच्या पालकमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये स्पर्धा पाहायला मिळत होती. कारण आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यात मुंबई शहराचे पालकमंत्रिपद हे एकनाथ शिंदे यांना दिले गेले.
तर मुंबई उपनगराचे पालकमंत्रिपद हे आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा यांना देण्यात आले
पालकमंत्रिपद इतके महत्त्वाचे का?
राज्य सरकारमधील मंत्र्यांकडे एखाद्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद दिलं जातं. नावातच ‘पालक’ शब्द असलेल्या या मंत्रिपदाची जबाबदारीही त्यातून बरीचशी स्पष्ट होते.
एखाद्या विशिष्ट जिल्ह्याचं जणू पालकत्वच या मंत्र्याकडे असते. मग त्या जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती असो किंवा कुठलीही योजना असो किंवा लोकोपयोगी कोणतेही काम असो, किंवा अगदी शासकीय समारंभ असोत, पालकमंत्री या सगळ्यांच्या केंद्रस्थानी असतो.
या पदामागील व्यवस्थेचा म्हणून हेतू सांगायचा झाल्यास, असं सांगता येईल की, जबाबदारी दिलेल्या जिल्ह्याच्या विकासावर देखरेख ठेवण्याचं काम पालकमंत्रिपदावरील व्यक्तीची असते.
जिल्ह्याचं प्रशासन नीट आणि कार्यक्षमतेनं कार्यरत आहे ना, हे पालकमंत्री पाहत असतात.
लोकनियुक्त सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील महत्त्वाचं धागा म्हणूनही पालकमंत्रिपदाकडे पाहिलं जातं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC