Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Facebook/Kavita Gadgil
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानबाबत कठोर निर्णय घेतले. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने देखील काही निर्णय जाहीर केले. मात्र, हे एवढ्यावर थांबलं नाही. सोशल मीडियावर वेगवेगळ्या मागण्याही होऊ लागल्या.
या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलातील दिवंगत फ्लाईट लेफ्टनंट अभिजीत गाडगीळ यांच्या आई कविता गाडगीळ यांनी देशवासीयांसाठी एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र सध्या चर्चेत आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही काही आवाहन करण्यात आलं आहे.
अभिजीत गाडगीळ कोण आहेत? त्यांच्या आई कविता गाडगीळ यांना हे पत्र का लिहावं लागलं? या पत्रात त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे? जाणून घेऊयात.
हे का पत्र लिहावं वाटलं?
पहलगाम हल्ल्यानंतर असं काय घडलं, की हे पत्र लिहावं वाटलं, यावर बीबीसी मराठीशी बोलताना कविता गाडगीळ यांनी भाष्य केलं.
कविता गाडगीळ म्हणाल्या, “राष्ट्रप्रेम आमच्या घरात नसानसात भरलं आहे. आमच्या कुटुंबातील दोन सदस्य ज्यांनी देशसेवा केलीय ते आज हयात नाहीत. माझ्या पतीनं आणि धाकट्या मुलानं काय अनुभवलं, काय सोसलं आहे हे माहिती आहे.
“त्यामुळे सध्या मला वर्तमानपत्रांमधील मथळे आणि व्हॉट्सअॅपवरील मेसेज वाचून खूप त्रास झाला. अस्वस्थ झाले. त्यामुळे आपण कुठंतरी व्यक्त झालं पाहिजे असा विचार करून मी हे पत्र लिहिलं. या पत्राला अंतिम रुप माझा मोठा मुलगा केदारनं दिलं.”

फोटो स्रोत, Facebook/Kavita Gadgil
“लोक न्युक्लियर वॉरच्या गोष्टी करत आहेत. सुज्ञ लोकही वेड्यासारखी बोलत आहेत. म्हणून माझ्या भावना लोकांपर्यंत पोहचण्यासाठी मी हे पत्र लिहिले,” असं कविता गाडगीळ यांनी नमूद केलं.
कविता गाडगीळ यांचे पती अनिल गाडगीळ 20 वर्षे भारतीय वायूदलात होते. नंतर त्यांनी एअर इंडियात काम केले.
पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?
कविता गाडगीळ यांनी भारतीयांना आवाहन करत पत्रात म्हटलं, “आज (26 एप्रिल) माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. फ्लाइट लेफ्टनंट अभिजीत गाडगीळ आज 51 वर्षाचा झाला असता, पण तो कायमस्वरुपी 27 वर्षांचा राहिला. मूल मोठं झालं, तरी प्रत्येक आईला वाटते, त्याप्रमाणे तो माझ्यासाठी नेहमीच लहानगा राहील म्हणून तो कायमस्वरुपी 27 वर्षांचा राहिला नाही. तर तो काळाच्या प्रवाहात गोठून गेला.”
“2001 मधील सप्टेंबरच्या एका रात्री, जेव्हा त्याचे मिग-21 विमान उड्डाणानंतर फक्त 33 सेकंदात कोसळले. ना रेडिओ कॉल, ना इजेक्शन, ना दुसरी संधी. फक्त शांतता आणि एक रिकामं आकाश.”

फोटो स्रोत, Facebook/Kavita Gadgil
“ती शांतता मागील अनेक वर्षे हृदयात साठवलेल्या अवस्थेत आज मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे. हिंसेनंतर एक स्तब्धता असते, जी दगडांमध्ये भिनते आणि हाडांमध्येही भिनते. एक अशी स्तब्धता जी अशांत असते. एक अशी जखम जिथं एकेकाळी हास्य, श्वास आणि जीवन नांदत होतं. आज माझ्या आजूबाजूला युद्धाच्या आरोळ्या वाढत असल्या तरी तीच स्तब्धता मला जाणवत आहे.”
“मी 12 वर्षांची होते, जेव्हा 1962 च्या भारत-चीन युद्धाने आमची निरागसता चिरडली आणि डोंगर रक्तबंबाळ झाले. मी मोठी झाले तेव्हा मी दुःखाने तुटलेल्या त्या आई आणि विधवांना पाहिलं, ज्यांची तरुण मुलं घरी परतलीच नाहीत.”
“मी स्वतः वर्दीतील व्यक्तीशी लग्न केले. मी एक तरुण वधू म्हणून एका अभिमानी भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याच्या जीवनात प्रवेश केला आणि आम्ही मिळून त्या युद्धांच्या वेदना अनुभवल्या. या वेदना आपल्या मातीत खोलवर कोरल्या गेल्या आणि त्यांनी आपल्या राष्ट्राला घडवलं,” अशी भावना कविता गाडगीळ यांनी व्यक्त केली.

फोटो स्रोत, Facebook/Kavita Gadgil
कविता गाडगीळ यांनी या पत्रात 1971 च्या युद्धाच्या आठवणीही सांगितल्या. त्या म्हणाल्या, “मी 1971 चा हिवाळा केवळ वृत्तपत्रांच्या मथळ्यांमधून वाचला नाही, तर जोरहाटहून सीमेवर अन्न आणि साहित्य पोहचवण्यासाठी, पूर्व पाकिस्तानमधून जखमी आणि मृत सैनिकांना परत आणण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमांवर जाणाऱ्या पतीच्या उड्डाणांमधून अनुभवला.”
“मी एकटीच धावपट्ट्यांवर उभी राहिले आहे, जिथून विमानं संकटाकडे झेप घेत होती आणि मी देवाला प्रार्थना केली की ज्यांच्यावर प्रेम करते ते परत यावेत. मी अशी शांतताही अनुभवली आहे जी युद्धासारखी वाटली आणि असे युद्धही पाहिले जे शांततेचा मुखवटा घालून सुरू होते.”
“ज्यांनी आपल्या प्रियजनांची वाट पाहिली आहे, अश्रु ढाळले आहेत त्यांना जसे माहिती असते तसे मलाही ठाऊक आहे की युद्ध कधीच उपाय नसतो. युद्ध म्हणजे विध्वंस असतो. युद्ध म्हणजे कुटुंबांचे उद्ध्वस्त होणे असते. युद्ध बलिदान मागतं जे प्रामुख्यानं गरिबांकडून घेतलं जातं.”
“शेतकऱ्यांची मुलं, फॅक्टरी कामगारांची मुलं, सरकारी कारकुन आणि शिक्षकांची मुलं, दुकानदार आणि कोळ्यांची मुलं यांनाच सर्वात आधी लढायला बोलावलं जातं आणि तेच सर्वात आधी कोसळतात. श्रीमंतांची मुलं चिखलात, वणव्यात बंदुका घेऊन जात नाहीत. त्यांच्या आयांना मुलांच्या बदल्यात घडी घातलेला राष्ट्रध्वज मिळत नाही.”

फोटो स्रोत, Facebook/Kavita Gadgil
“पहलगामच्या हल्ल्यानंतर मी देशातील रोष ऐकते आहे. मला तो रोष जाणवतो आहे. माझ्या हृदयालाही त्यांच्याप्रमाणे वेदना होत आहेत. पण माझ्या प्रिय भारतमातेच्या लेकरांनो मी तुम्हाला विनंती करते, थोडा वेळ थांबा आणि आपल्या या तरुण पिढीला पुन्हा अभिमान आणि सूडाच्या वेदीवर अर्पण करण्याआधी विचार करा.
“कारण जे लोक मंचांवर, टीव्ही स्टुडिओंमध्ये, व्हॉट्सअॅप गटांमध्ये आणि सोशल मीडियावर युद्धाची मागणी करतात, ते त्याची किंमत चुकवणार नाहीत. ती किंमत आपली मुलं, आपले विद्यार्थी, आपले शेजारी, आपले प्रियजन चुकवणार आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं.

फोटो स्रोत, Facebook/Kavita Gadgil
कविता गाडगीळ यांनी अण्वस्रसज्ज देशांमध्ये युद्ध झाल्यास गंभीर परिणाम होतील, असं म्हटलं. तसेच देशातील गरिबी, बेरोजगारी, सुरक्षा दलातील सैनिकांची, लढाऊ विमानांची आणि पाणबुड्यांची आवश्यकतेपेक्षा कमी संख्या हेही मुद्दे उपस्थित केले.
‘तर चीन अरुणाचल प्रदेश, लडाख, सिक्कीमवर दावा ठोकेल’
भारताचं पाकिस्तानशी युद्ध झालं, तर चीन भारताच्या भूभागावर दावा करेल, अशी भीती कविता गाडगीळ यांनी व्यक्त केली.
त्या म्हणाल्या, “तुम्हाला हे कळतं आहे का की, ज्यावेळी आपण युद्ध करून रक्त सांडू, त्या वेळी चीन शांतपणे पाहत बसेल आणि अरुणाचल प्रदेश, लडाख, सिक्कीम आणि आपण ज्या जमिनीचे रक्षण करू शकत नाही त्या सर्व भूभागांवर दावा ठोकण्याची संधी साधेल. अमेरिका आपल्याला फक्त भाषणं, सहानुभूती आणि महागडी शस्त्रास्त्रं, दारुगोळा व उपकरणं पुरवेल, पण अमेरिकन मुला-बाळांचे प्राण देणार नाही.”
“मी कोणतेही चुकीचे कृत्य माफ करण्याची मागणी करत नाही. पहलगाममधील हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे. जे या हल्ल्याला जबाबदार आहेत त्यांना शोधून काढले पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे. आपली गुप्तचर यंत्रणा अधिक धारदार केली पाहिजे. आपले संरक्षण बळकट केले पाहिजे. आपल्या अपयशांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यात सुधारणा झाली पाहिजे. अगदी सर्वोच्च पातळीवरील दोषींचीही जबाबदारी निश्चित झाली पाहिजे.”
“सूडाच्या भावनेने आपल्या शहाणपणाला अंधळं करायला नको. प्रतिकाराने आपल्याला उध्वस्त होण्याकडे नेऊ नये. म्हणूनच आज मी एक धोरणकार म्हणून नव्हे, एक राजकारणी म्हणून नव्हे, अगदी एक दुःखी आई म्हणूनही नव्हे, तर एक ज्या राष्ट्रावर अतोनात प्रेम करते त्या राष्ट्राची नागरिक म्हणून तुम्हाला साद घालते आहे,” असं त्यांनी नमूद केलं.
‘आपल्या जिवंत लोकांचे भविष्य पणाला लावू नका’, मोदींना साद
कविता गाडगीळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही पत्रात उल्लेख केला. तसेच मोदींना साद घातली.
त्या म्हणाल्या, “ज्या आईनं आपल्या मुलाला देशसेवेसाठी पाठवले आणि त्याला परत पाहिलेच नाही अशी आई म्हणून मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना साद घालते. मी तुम्हाला विनंती करते की, या क्षणी भारताला ज्या नेतृत्वाची गरज आहे, ते तुम्ही पुरवा.”
“आम्हाला दाखवा की खरी ताकद म्हणजे सर्वात मोठ्याने किंचाळणे नव्हे, तर प्रचंड वादळातही अडथळा न आणता उभे राहणे असते. आम्हाला दाखवा की खरा नेतृत्वगुण म्हणजे मुत्सद्देगिरी आणि संयम असतो.”

फोटो स्रोत, Getty Images
“हल्ल्यात जीव गमावलेल्या भारतीय नागरिकांना न्याय द्या, पण आपल्या जिवंत लोकांचे भविष्य पणाला लावू नका. क्रोधाने नव्हे, तर करुणेने नेतृत्व करा. लक्षात ठेवा की, तुमच्या हातात ज्यांचे जीव आहेत ती फक्त आकडेवारी नाही, तर ती स्वप्नं आहेत, कुटुंबं आहेत, अख्खं जिवंत जग आहे.”
“जग आपल्याकडे पाहत आहे. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे देशातील आपली मुलं आपल्याकडं पाहत आहेत. त्यांना दाखवा की खरा नेता कसा असतो,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.
‘काश्मिरी व्यवसायांवर बहिष्कार म्हणजे दहशतवाद्यांना बळकट करणं’
पहलगाम हल्ल्यानंतर सोशल मीडियावर जम्मू काश्मीरमधील नागरिकांवर बहिष्कार टाकण्याची भाषाही केली जात आहे. यावर कविता गाडगीळ यांनी आपल्या पत्रात भाष्य केलं.
गाडगीळ म्हणाल्या, “माझ्या प्रिय भारतीयांनो, हो, हे खरं आहे की काश्मीरमध्ये काही स्थानिकांनी दहशतवाद्यांना पाठिंबा दिला आहे, त्यांना आश्रय दिला आहे किंवा त्यांना मदत केली आहे. पण याचे उत्तर आपण काश्मीरकडे पाठ फिरवणे नाही.”
“याचं उत्तर म्हणजे आपण तिकडे चालत जाणं आहे, शांततेची, प्रतिष्ठेची आणि उज्ज्वल भविष्यातील आकांक्षा बाळगून असलेल्या तेथील बहुसंख्य लोकांसोबत उभं राहणं आहे.”
“दहशतवाद निराशेवर पोसतो. दहशतवाद मोडकळीस आलेल्या, सोडून दिलेल्या, तुटलेल्या माणसांच्या कानांमध्ये द्वेष फुंकरतो. जेव्हा आपण काश्मीरला भेट देणे थांबवतो, जेव्हा आपण काश्मिरी व्यवसायांना बहिष्कृत करतो, जेव्हा आपण त्या लोकांना आपले मानायला नकार देतो, तेव्हा आपण दहशतवाद्यांना शिक्षा करत नाही, तर आपण त्यांना बळकट करतो.”

फोटो स्रोत, Getty Images
“आपण त्यांच्या हाती असे बेरोजगार, हताश, रागाने पेटलेले तरुण सोपवतो, जे शेतकरी, कारागीर, शिक्षक, मार्गदर्शक होऊ शकले असते. मात्र आता ते हिंसेच्या मार्गाकडे वळू शकतात. जर तुम्ही खरोखर जम्मू काश्मीरवर प्रेम करत असाल, खरोखर त्याला भारताचा अविभाज्य भाग मानत असाल, तर तुम्हाला तिथल्या लोकांवरही प्रेम करावे लागेल. तुम्ही केवळ भूमीवर दावा करून तेथील मुलांना नाकारू शकत नाही.”
“हो, नक्कीच काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करा. त्यांना न्याय द्या. ऐतिहासिक चुकीची दुरुस्ती करा. लोकसंख्येतील असमतोल सुधारा. पण हे सर्व स्थानिक लोकांचा विश्वास जिंकून करा. त्यांना या प्रक्रियेत भागीदार बनवा. हे सर्व त्यांना अडथळे समजून करू नका,” असं आवाहन त्यांनी केलं.
‘…तर कोणताही दहशतवादी तिथे पाय रोवू शकणार नाही’
कविता गाडगीळ यांनी इतिहासातील काही घटनांचा उल्लेख करत जम्मू काश्मीरमधील नागरिकांनी दाखवलेली सतर्कता धोरेखित केली.
पत्रात त्यांनी म्हटलं “जर सामान्य काश्मिरी तुमच्या सोबत असेल, तर कोणताही दहशतवादी तिथे मूळ रोवू शकणार नाही. जर सामान्य काश्मिरीचा भारतावर विश्वास असेल, तर तो पहिला इशारा देणारा,आपली ढाल आणि अंधारात आपला आवाज बनेल.”
“आपण लक्षात ठेऊया की, 1947 च्या कबायली आक्रमणांमध्ये जम्मू काश्मीरमधील गुराखी, गुज्जर, बकरवाल, गाईड आणि गावकरी यांनीच प्रथम धोका ओळखून भारतीय सैनिकांना इशारा दिला होता.”
“कारगिल युद्धादरम्यानही, त्यांनी प्राणांची पर्वा न करता आपल्या सैनिकांना सतर्क केले. आजही, पहलगामच्या हल्ल्यात या सामान्य काश्मिरी लोकांनीच पर्यटकांना वाचवले, त्यांना लपवले, खाऊ घातले, त्यांचे रक्षण केले आणि त्यांच्यासोबत शोक व्यक्त केला. आपण त्यांचा विश्वास गमावू नये. आपण त्या विश्वासाचा मान राखला पाहिजे, तो विश्वास अधिक मजबूत करायला हवा.”
“खरं तर, जर आपल्याला खरंच दहशतवादाचा पराभव करायचा असेल, पाकिस्तानवर मात करायची असेल, संपूर्ण जम्मू काश्मीरला पुन्हा अखंड भारतात सामील करायचं असेल, तर माझ्याकडे एक योजना आहे. ही अशी योजना आहे जी शस्त्रांचा वापर न करता पूर्ण होऊ शकते.”
‘अण्वस्त्र हल्ला आणि हत्याकांडापेक्षा चांगला उपाय’
जम्मू काश्मीरमधील सध्याच्या प्रश्नावर उपाययोजना सुचवताना कविता गाडगीळ म्हणाल्या, “माझं ऐका, शांतपणे ऐका आणि मग सांगा हे युद्धापेक्षा चांगलं नाही का, हे अण्वस्र हल्ला आणि हत्याकांडापेक्षा चांगलं नाही का, हे मृत्यूपेक्षा चांगलं नाही का, हे विनाशापेक्षा चांगलं नाही का?”
“काश्मीरला भेट द्या. त्यांची सफरचंदे, गालिचे, जर्दाळू, केशर खरेदी करा. त्यांची हॉटेलं, बाजारपेठा, बागा, दऱ्या आपल्या उपस्थितीने, आपल्या आदराने, आपल्या आनंदाने भरून टाका. तिथे व्यवसाय सुरू करा. दुकानं उघडा.”
“धरणं आणि पूल उद्घाटन करा. रेल्वे आणि विमानतळांचे पायाभरणी समारंभ करा. काश्मीरशी आणि काश्मिरी लोकांशी मनाने आणि आर्थिक व्यवहारानं जोडले जा. काश्मीरला टाकसाळं टाकून नव्हे, तर विश्वासाने भारताचा अविभाज्य आणि तेजस्वी भाग बनवा.”
“पण त्याहून अधिक काश्मिरींना आपल्या हृदयाचा अविभाज्य भाग बनवा. जगाला दाखवा की, पुढचं पान आपण द्वेषाने नव्हे, तर प्रेमाने लिहिणार आहोत. जर आपण हे केलंत, तर एलओसीच्या पलीकडचे लोकसुद्धा बघतील की त्यांच्या भारतीय भावंडांची किती भरभराट झाली आहे. ते शिक्षित झाले आहेत, त्यांना नोकऱ्या आहेत, त्यांचे जीवन समृद्ध झाले आहे.”
“ते पाकिस्तानला नकार देतील आणि मग आपण पीओकेसह संपूर्ण जम्मू काश्मीर एकही गोळी न झाडता मिळवू शकू. फक्त काश्मीरला आणि काश्मिरी लोकांना प्रेमाने कवेत घेऊन.”

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC
“पहलगामच्या भयानक हल्ल्यातून वाचलेले पर्यटक आपल्याला सांगत आहेत की, त्यांना वाचवणारे, त्यांना लपवणारे, त्यांना अन्न देणारे आणि त्यांच्यासाठी रडणारे काश्मिरी लोक होते. ते सांगत आहेत की, सामान्य काश्मिरी हा परिश्रमी आहे, साधा आहे, कुटुंबावर प्रेम करणारा आहे आणि आपल्या मुलांसाठी स्वप्न पाहणारा आहे. बिलकुल तुमच्यासारखा, माझ्यासारखा, आपल्यासारखा.”
“जे लोक पहलगाममध्ये होते आणि जेथे रक्तपात झाला, ते जर अजूनही मानवतेवर विश्वास ठेवू शकतात, तर आपणही ठेवायला हवा. तुम्हीही ठेवायला हवा. कारण युद्ध पेटवणं सोपं आहे, पण विझवणं जवळजवळ अशक्य. द्वेष केवळ त्याच्या लक्ष्यालाच नव्हे, तर स्वतःला देखील भस्मसात करतो. भारताची खरी महानता फक्त आपल्या सैन्यात नाही, तर देशाच्या आत्म्यात आहे. भारताची खरी महानता दु:ख सहन करूनही टिकून राहणाऱ्या करुणेत आहे, आपल्याला जोडणाऱ्या स्वप्नांमध्ये आहे. हे कधीही मरत नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.
पत्राच्या शेवटी कविता गाडगीळ यांनी प्रेम निवडा, धैर्य निवडा, शहाणपण निवडा आणि भारत निवडा, असंही आवाहन केलं.
अभिजीत गाडगीळ कोण होते?
अभिजीत गाडगीळ यांचं लहानपणापासून फायटर पायलटच होण्याचं स्वप्न होतं. याविषयी सांगताना त्यांच्या आई कविता गाडगीळ सांगतात, “अभिजीत लहानपणापासून वडिलांना आणि इतर अधिकाऱ्यांना वर्दीत बघायचा. त्यामुळे त्यानं लहानपणापासून फायटर पायलट बनण्याचं स्वप्न पाहिलं.”
“विशेष म्हणजे त्याला पोलंडची प्रचंड अॅलर्जी होती. तो दोनदा त्याच्या आयुष्यात गंभीर आजारी पडला आणि ऑक्सिजनवर होता. मात्र त्यानं योगा आणि इतर उपचार करून यावर मात केली आणि फायटर पायलट बनला,” असंही कविता गाडगीळ यांनी नमूद केलं.
अभिजीत गाडगीळ यांनी 11 वी आणि 12 वी पुण्यातील फुर्गसन कॉलेजमधून केली. त्यावेळी त्यांनी ग्लायडिंगही केलं. नंतर त्यांनी एनडीएत 89 व्या तुकडीत प्रशिक्षण पूर्ण केलं. त्यांना घोडेस्वारीची प्रचंड आवड होती. घोडेस्वारीसाठी थोरले बाजीराव पेशवे मेडल मिळणारे ते त्यांच्या तुकडीतील एकमेव व्यक्ती होते.

फोटो स्रोत, Facebook/kavita.gadgil.1
अभिजीत गाडगीळ यांच्या या आवडीविषयी त्यांच्या आई कविता गाडगीळ सांगतात, “अभिजीतला घोडेस्वारीची आवड होती. तेव्हा मी त्याला म्हणाले होते की, आपण इतके श्रीमंत नाही की घोडा पाळू शकू. तुला स्वतःचा घोडा हवा असेल तर तुला सुरक्षा दलात जावं लागेल. पुढे त्याच्या उत्कृष्ट घोडेस्वारीसाठी त्याला एनडीएमध्ये थोरले बाजीराव पदक मिळालं.”
एनडीएतून प्रशिक्षण घेतल्यानंतर अभिजीत गाडगीळ दोन वर्षे आसाममधील छबुवा येथे होते. नंतर ते राजस्थानमधील सुरतगडला होते. सुरतगड पाकिस्तानपासून खूपच जवळ होतं. तेथे त्यांचा ऑपरेशनल रेडिनेस प्लॅटफॉर्मचा (ओआरपी) सराव चालायचा. त्यासाठी अभिजीत गाडगीळ यांची निवड झाली होती.
येथे घडलेल्या प्रसंगाविषयी कविता गाडगीळ सांगतात, “एकदा अभिजीत कामावरून परत आला. मात्र, ऐनवेळी इतर पायलट उपलब्ध न झाल्यानं एव्हररेडी पायलट अशी ख्याती असलेल्या अभिजीतला बोलावण्यात आलं. तेव्हा 17 सप्टेंबरला राजस्थानमध्ये त्याचा अपघात झाला.”
या अपघातामुळं अभिजीत गाडगीळ यांची हवाई दलातील कारकीर्द केवळ पाच वर्षांचीच ठरली.

फोटो स्रोत, Facebook/Kavita Gadgil
अभिजीत गाडगीळ यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी जीत एअरस्पेस इन्स्टिट्युट सुरू केली. ही जगातील एकमेव अशी संस्था होती ज्यांच्याकडे मोबाईल फ्लाईट सिमीलेटर होता.
सिमीलेटर म्हणजे जमिनीवर बांधलेले विमानाचे कॉकपिट असते. प्रत्यक्ष विमानात असताना ज्या आपत्कालीन स्थिती उद्भवल्यानं विमान अपघात होतात ती स्थिती सिमीलेटरमध्ये तयार करता येते.
त्यामुळे विमान किंवा मनुष्यहानी न होता वैमानिकांना ते प्रशिक्षण घेता येतं. या संस्थेने 2 कोटी रुपये खर्च करू हे सिमीलेटर ट्रकवर बसवले होते. डीजीसीईची मान्यता असलेला हा सिमीलेटर होता.
या संस्थेनं फ्लाईंगबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी या मोबाईल सिमीलेटरचा वापर केला. येथे 12 वर्षात 650 पायलट तयार झाले. या कामासाठी 2018 मध्ये अनिल गाडगीळ यांना लंडन येथील रॉयल एरॉनॉटीकल सोसायटीकडून पुरस्कार मिळाला. असा पुरस्कार मिळणारे ते पहिले भारतीय होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC