Source :- ZEE NEWS

Universal Health Coverage Day 2025: आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण त्यांच्या आरोग्याबाबत फारच जागरूक झाले आहेत. बदलते वातावरण आणि होणारे संसर्ग यापासून वाचण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने आरोग्याची काळजी घेत असतो. जगभरात सामान्य जनतेला आरोग्याचे महत्त्व समजावून देण्यासाठी अनेक सेमिनार तसेच आरोग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाच्या सभा आयोजित केले जातात. दरम्यान उद्या दरवर्षीप्रमाणे 12 डिसेंबर रोजी युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज दिन साजरा केला जाणार आहे. सरकार, विविध संघटना, नागरी समाज आणि आरोग्य समर्थकांना एकत्रित करून सर्वांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाला चालना देणे हे या दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Add Zee News as a Preferred Source

 

 

यावर्षीच्या हेल्थ कव्हरेज दिनाचे महत्त्वाचे धोरण कोणते आहे?

भारतात बऱ्याच लहान-मोठ्या आजारांवर आरोग्यसेवा उपलब्ध आहेत. पण काहीवेळा या सेवांचा खर्च सर्वांनाच परवडणारा नसतो. यामुळे बऱ्याचदा अनेकजण उपचारांपासून वंचित राहतात, परिणामी काही रूग्ण त्यांचा जीवही गमावतात. जेव्हा एखादे कुटुंब मूलभूत सेवांचा लाभ घेऊ शकत नाहीत, तेव्हा ते उपचार घेण्यास उशीर करतात किंवा टाळतात. यांसारख्या गंभीर समस्या लक्षात घेता या वर्षीच्या आरोग्य कव्हरेज दिनानिमित्त आरोग्य सेवांचा परवडणारा खर्च या विषयावर सर्वाधिक भर दिला जाणार आहे. प्रत्येकाला आर्थिक अडचणींशिवाय दर्जेदार आरोग्यसेवा मिळवून देणे आणि त्याचे महत्त्व समजावणे हे या दिनाचे महत्त्वाचे धोरण आहे.

 

 

आरोग्य कव्हरेज दिन साजरा करण्याचे काय फायदे आहेत?

आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज दिन साजरा करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि अर्थव्यवस्थेला बळकटी येते. ओरोग्यसेवेच्या उपलब्धतेतील अडथळे दूर करून लवकर निदानाला प्रोत्साहन मिळते. मजबूत प्राथमिक काळजीद्वारे रोग प्रतिबंधकता मजबूत करण्यास चालना मिळते. तसेच एकूण लोकसंख्येच्या आरोग्याचे परिणाम सुधारते. देखरेख आणि आपात्कालीन प्रतिसाद वाढतो. समुदायातील असमानता देखील कमी होते. या आरोग्य फायद्याशिवाय काही आर्थिक फायदेही मिळतात. न परवडणाऱ्या वैद्यकीय खर्चापासून सामान्य कुटुंबाचे संरक्षण होते. तसेच राष्ट्रिय पातळीवर आरोग्याशी संबंधित आर्थिक संकंटांना प्रतिबंधित करण्यास मदत मिळते.

 

 

हेल्थ कव्हरेज दिनानिमित्त जगभरात राबवले जाणारे उपक्रम कोणते आहेत?

दरवर्षीप्रमाणे 2025 मध्ये देखील आरोग्य कव्हरेज दिनानिमित्ताने जगभरात जागतिक आरोग्य संघटना (WHO) द्वारे आरोग्य जागरूकता वाढवणारे आणि वैज्ञानिक माहिती प्रसारित करणारे कार्यक्रम, सार्वजनिक आरोग्य सेमिनार, आरोग्य जागरूकता रॅली आणि मोफत तपासणी शिबिरे आयोजित केले जातात. तसेच या कार्यक्रमांमध्ये आरोग्य धोरणांवर चर्चा आणि सर्वांसाठी आरोग्यसेवा सुनिश्चित करण्याच्या उपायांवर लक्ष केंद्रित केले जाते. यासह भारतात देखील यादिवशी दरवर्षीप्रमाणे आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांसारख्या योजनांद्वारे परवडणारी आरोग्यासेवा पुरवली जाते. तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत मातृ आणि बाल आरोग्य यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या मोहीमा राबवल्या जातात.

 

 

तुम्ही या उपक्रमांना कशाप्रकारे पाठिंबा देऊ शकता?

हेल्थ कव्हरेज दिन साजरा करण्याच्या धोरणांना पाठिंबा देणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. जेणेकरून प्रत्येकाला योग्य वेळी योग्य उपचार घेता येतील आणि उपचारांपासून वंचित राहणाऱ्या प्रत्येक रूग्णाला जीवनदान मिळेल. यासाठी तुम्ही तुमच्या समुदायात किंवा प्रदेशात मजबूत आरोग्य धोरणांसाठी समर्थन करू शकता. आरोग्य समतेसाठी काम करणाऱ्या संस्थांना पाठिंबा देऊ शकता. तसेच सोशल मीडिया द्वारे किंवा तुमच्या समुहाद्वारे आरोग्यसेवा उपलब्धता समस्यांबद्दल जागरुकता वाढवू शकता.

SOURCE : ZEE NEWS