Source :- BBC INDIA NEWS

यून सुक योल यांना अटक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांशी त्यांच्या समर्थकांची झटापट झाली

फोटो स्रोत, Reuters

दक्षिण कोरियाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांना अटक झाल्यानंतर तिथल्या जनतेत त्यांचे समर्थक आणि विरोधक अशी विभागणी झाली आहे.

या संघर्षातून दक्षिण कोरियातील स्थैर्य आणि लोकशाही याबाबत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण कोरियातील ताज्या परिस्थितीचं वास्तव मांडणारा हा लेख.

अश्रू, निराशेतून रडणं आणि धक्का बसलेले चेहरे. दक्षिण कोरियाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या त्यांच्या समर्थकांना जेव्हा हे कळालं की यून यांना अटक करण्यात आली आहे, त्यावेळेस ही त्यांची प्रतिक्रिया होती.

या घटनेची बीजं गेल्या काही आठवड्यांपासून रोवली गेली होती. राष्ट्राध्यक्ष यून यांच्या अटकेसाठी दक्षिण कोरियातील पोलीस अधिकारी प्रयत्न करत होते. पोलीस अधिकाऱ्यांचा आणि तपास अधिकाऱ्यांचा यून यांना अटक करण्याचा शेवटचा प्रयत्न 3 जानेवारीला अपयशी ठरला होता.

पोलीस कर्मचारी आणि राष्ट्राध्यक्षांचे सुरक्षा रक्षक एकमेकांसमोर उभे ठाकल्यानंतर यून यांना अटक करता आली होती.

तरीदेखील बुधवारी (15 जानेवारी) जेव्हा यून यांच्या अटकेची बातमी आली तेव्हा त्यातून दक्षिण कोरियात अधिक अनिश्चितता निर्माण होत असल्याचं दिसून आलं.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

यून यांनी लावलेल्या मार्शल लॉ मुळे आणि संसदेत त्यांच्यावर चालवण्यात आलेल्या महाभियोगामुळे आधीच खोलवर ध्रुवीकरण झालेल्या दक्षिण कोरियातील लोकांमधील फट यून यांच्या अटकेमुळे अधोरेखित झाली.

“हा देश संकटात आहे. काल रात्रीपासून मी स्थिर आणि शांतं दक्षिण कोरियासाठी प्रार्थना करते आहे,” असं यूनची यांची एक महिला समर्थक म्हणाली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

देश स्थिर असावा आणि देशात शांतता नांदावी असं दोन्ही बाजूचे लोक म्हणजे यून यांचे समर्थक आणि विरोधक म्हणत आहेत. मात्र हे नेमकं कसं घडायला हवं याबद्दल त्यांचं एकमत नाही.

सेऊलमध्ये यून समर्थक आणि विरोधक आमने-सामने

गेल्या महिन्याभरापासून, 64 वर्षांचे यून, दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सेऊलच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात लपून बसले होते.

कारण त्यांचे विरोधक आणि समर्थक त्यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं करत होते, मोर्चे काढत होते. सेऊलच्या मध्यवर्ती भागातील योंगसानला त्यांनी निदर्शनांचं क्रेंद्र बनवलं होतं. त्या भागातील तणाव सारखा वाढत होता.

मंगळवारी यून यांना अटक होण्याची चिन्हं दिसू लागल्यावर राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाबाहेर हजारो लोकांनी रात्रभर तळ ठोकला होता. त्यावेळेस तापमान उणे 8 अंश सेल्सियसपर्यंत (-8C) खाली आलेलं होतं.

त्यावेळेस त्या कडाक्याच्या थंडीत या लोकांनी एकमेकांना वाफाळणारी पेयं आणि चटकन बनणारे नूडल्स वाटून उबदार ठेवलं.

3 डिसेंबर 2024 ला मार्शल लॉ जाहीर करण्यासाठीचं भाषण करताना, यून सुक योल

फोटो स्रोत, Reuters

यून यांना अटक करण्यासाठी 3,000 पोलीस कर्मचारी आले होते. यून यांच्या समर्थकांनी या पोलीस कर्मचाऱ्यांशी झटापट केली.

“आम्हाला मूर्ख अती उजव्या विचारसरणीचे म्हणू नका”, असं यून यांच्या एका समर्थकानं ओरडून सांगितलं. त्यावरून यून यांच्या समर्थकांमध्ये किती निराशा आहे ते दिसून येतं.

तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणारं दृश्य पूर्णपणे वेगळं होतं. दीर्घ काळापासून यून यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या त्यांच्या विरोधकांनी यून यांना अटक होताच जल्लोष केला, घोषणा दिल्या.

यून यांच्या विरोधकांनी केलेल्या या जल्लोषामुळे यून यांचे समर्थक आणखी चिडले. त्यातील काहीजण ओरडले होते की, “आम्हाला टोमणे मारू नका. ही काही चेष्टेची बाब नाही.”

जनतेची विभागणी आणि देशात निराशेचं वातावरण

यून समर्थक आणि त्यांचे विरोधक यांच्याती ही दरी काही फक्त सेऊलमधील योंगसानपुरतीच मर्यादित नाही. गेल्या एका महिन्याहून अधिक काळापासून ती संपूर्ण दक्षिण कोरियाभर पसरली आहे.

3 डिसेंबर 2024 ला मार्शल लॉ लागू करण्याच्या यून यांच्या धक्कादायक घोषणेमुळे दक्षिण कोरियातील सर्वसामान्य नागरिक लगेचच दोन गटात विभागले गेले होते. एक भाग यून समर्थक होता तर दुसरा यून विरोधक.

निदर्शक यून यांच्यावर महाभियोग चालवण्याची मागणी करत आहेत

फोटो स्रोत, Reuters

मार्शल लॉ लागू करताना देश धोक्यात असल्याचा दावा यून यांनी केला होता. काहीजणांना यून यांचा हा दावा खरा वाटत होता. तर मोठ्या संख्येनं लोकांना हे पाऊल म्हणजे सत्तेचा गैरवापर करण्याचा संधीसाधूपणा वाटत होता.

खुद्द यून यांच्या पक्षातदेखील अशाच प्रकारची भावना दिसून आली. त्यामुळेच त्यांच्या स्वत:च्याच पक्षातील असंख्य खासदारांनी त्यांच्यावर महाभियोग चालवण्याच्या बाजूनं मतदान केलं.

यून यांच्या कारवायांना देशातून होत असलेल्या वाढत्या विरोधामुळे देशात एकच गोंधळ माजला आहे, निराशेचं वातावरण निर्माण झालं आहे.

मार्शल लॉ, महाभियोग आणि अस्थैर्य

वर्षाच्या अखेरच्या दिवसांमध्ये दक्षिण कोरियात सहसा उत्साहाचं वातावरण असतं. मात्र यंदाच्या वर्षी देशातील वातावरण लक्षणीयरित्या वेगळं होतं.

29 डिसेंबरला जेजु एअरच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. त्याची जगभरात मोठी चर्चा झाली होती. त्याच्याबरोबरच देशात सुरू असलेल्या राजकीय गोंधळामुळे दक्षिण कोरियात एक निराशेचं आणि उदास वातावरण तयार झालं आहे.

डिसेंबरच्या मध्यावर संसदेनं महाभियोग चालवल्यापासून यून स्वत:ला मोठ्या प्रमाणात जनतेपासून दूर ठेवत होते. ते लोकांना टाळत होते.

यून यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांचे समर्थक जमले होते. मात्र समर्थकांना भेटण्यासाठी यून कधीही त्यांच्या निवासस्थानाबाहेर पडले नाहीत.

निदर्शक यून यांच्यावर महाभियोग चालवण्याची मागणी करत आहेत

फोटो स्रोत, Getty Images

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी यून यांनी त्यांना एक संदेश पाठवला. त्यात त्यांनी म्हटलं होतं की “युट्यूब वरील लाईव्हस्ट्रीमद्वारे ते त्यांच्यावर (समर्थकांवर) बारकाईनं लक्ष ठेवून आहेत.”

14 जानेवारीला यून यांच्या महाभियोगासंदर्भातील खटल्याची पहिली सुनावणी होती. मात्र यून या सुनावणीला गैरहजर राहिले. परिणामी खटल्याचं कामकाज लांबलं.

त्याआधी त्यांच्या बंडखोरी केल्याचे आरोप लागून त्यांच्याविरोधात गुन्हेगारी तपास सुरू करण्यात आला होता. त्यासाठी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी अनेकवेळा समन्स बजावण्यात आले होते.

मात्र त्यांनी या समन्सकडे कानाडोळा केला होता. ते चौकशीसाठी हजर झाले नव्हते. परिणामी तपास अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं.

CIO आणि यून यांच्यातील संघर्ष

बुधवारी (15 जानेवारी) यून यांनी एक व्हिडिओ जारी करत लोकांना संदेश दिला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं की ‘रक्तपात’ टाळण्यासाठी ते करप्शन इन्व्हेस्टिगेशन ऑफिस (CIO) बरोबर सहकार्य करणार आहेत. त्याचबरोबर यून यांनी त्यांच्यावरील अटक वॉरंट बेकायदेशीर असल्याचंही म्हटलं होतं.

करप्शन इन्व्हेस्टिगेशन ऑफिस (CIO) ही यंत्रणा यून यांच्यावरील आरोपांचा तपास करते आहे. देशातील भ्रष्ट किंवा देशाविरोधाक कृत्य करणाऱ्या उच्चपदस्थांवर कारवाई करण्याचं काम हा विभाग करतो.

बुधवारी (15 जानेवारी) सकाळी यून यांच्याबरोबर राष्ट्राध्यक्ष निवासस्थानातून बाहेर पडताना पोलीस अधिकारी आणि तपास अधिकारी

फोटो स्रोत, Reuters

यून यांना अटक करण्यासाठी करप्शन इन्व्हेस्टिगेशन ऑफिस म्हणजे सीआयओनं मोठी कारवाई केली होती. त्यात त्यांनी राष्ट्राध्यक्ष यून यांच्या सुरक्षा रक्षकांना देखील इशारा दिला होता की जर त्यांनी यून यांच्या अटकेमध्ये पुन्हा अडथळा निर्माण केला तर त्यांना देखील अटक केली जाईल.

कारण याआधी जेव्ही सीआयओ आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी यून यांना अटक करण्याचे प्रयत्न केले होते, तेव्हा यून यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यात अडथळे आणले होते आणि पोलिसांना यून यांच्यापर्यंत पोहोचू दिलं नव्हतं.

अर्थात मागच्या वेळेसारखं यावेळेस मात्र सीआयओ आणि पोलीस अपयशी ठरले नाहीत. त्यांना यून यांना अटक करण्यात यश आलं. अर्थात या खेपेसदेखील वाटाघाटी करण्यासाठी त्यांना कित्येक तास लागले.

यून यांच्या अटकेवरून वाद-विवाद

यून यांना अटक होत ते राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानातून बाहेर पडताच, त्याच्या आजूबाजूचे रस्ते मोकळे होण्यास सुरूवात झाली. निदर्शक तिथून पांगले आणि पोलिसांनी तिथे लावलेले बॅरिकेड्स काढण्यात आले.

अटक केल्यानंतर यून यांना सीआयओच्या कार्यालयात नेण्यात आलं. तिथे त्यांची चौकशी सुरू आहे. यून यांचे काही समर्थक सीआयओ कार्यालयाजवळ पोहोचले. यून यांना 48 तासांहून अधिक काळ ताब्यात ठेवण्यासाठी सीआयओला आणखी एका वॉरंटची आवश्यकता आहे.

यून यांच्या अटकेनंतर पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक यांच्यातील संघर्ष आणि रस्सीखेच थांबली असली तरी त्यापलीकडे दक्षिण कोरियातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली दरी मात्र त्यामुळे दूर झालेली नाही.

यून सुक योल

फोटो स्रोत, Getty Images

अलीकडच्या काही दशकांमध्ये दक्षिण कोरिया हा देश जगातील एक आघाडीची अर्थव्यवस्था आणि आशियातील लोकशाहीचा एक दीपस्तंभ, प्रेरणास्थान म्हणून उदयाला आला आहे.

“देशाच्या राष्ट्राध्यक्षाला अटक करण्यात कोणताही अर्थ नाही,” असं राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाबाहेर उभ्या असणाऱ्या एका निदर्शकानं म्हटलं.

त्याच्या या मताला लगेचच एका विरोधकानं उत्तर दिलं. “अटक वॉरंटची अंमलबजावणी करणं हे एक आवश्यक पाऊल आहे. यून यांनी देशाच्या लोकशाहीला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला होता.”

यून स्वत:देखील या अटकेबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना अटक करण्याचा अधिकार सीआयओला आहे का?

यून यांचे वकील म्हणतात की असा अधिकार सीआयओला नाही. कारण बंडखोरी म्हणजे भ्रष्टाचार नाही. मात्र सीआयओचं म्हणणं आहे की बंड करणं हे सत्तेचा गैरवापर करण्याचाच एक प्रकार आहे. त्यामुळे या आरोपाची चौकशी करणं त्यांच्या अधिकार कक्षेत येतं.

राजकीय ध्रुवीकरण

वरकरणी जो एक कायदेशीर वाद असल्याचं दिसतं आहे, तो आता राजकीय पातळीवर खोलवर गेला आहे. दोन्ही बाजू आता यासंदर्भातील जनमतावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

यून यांच्यावर संसदेत महाभियोग चालवून त्यांना राष्ट्राध्यक्षपदारून पदच्युत करण्यात आलं होतं. त्यानंतर दक्षिण कोरियाचे पंतप्रधान हान डक-सू यांना काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं.

मात्र हान डक-सू यांच्यावर देखील तातडीनं महाभियोग चालवण्यात येऊन त्यांनाही पदावरून दूर सारण्यात आलं होतं. यामुळे महाभियोगाचा वापर एक राजकीय हत्यार म्हणून यून यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात केला जात असल्याचा आरोप आधीच होतो आहे.

त्यातच आता यून यांच्यावरील महाभियोगाच्या खटल्याच्या सुनावणीला या आठवड्यात सुरूवात होणार असल्यानं दक्षिण कोरियातील अनिश्चितता वाढली आहे.

राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाबाहेर जमलेले यून सुक योल यांचे समर्थक

फोटो स्रोत, EPA

यून सीआयओच्या ताब्यात असताना किंवा त्यांच्यावर महाभियोगाचा खटला सुरू असताना जर त्यांनी काही वक्तव्ये केली तर त्याकडे दक्षिण कोरियातील जनतेचं लक्ष असणार आहे.

दक्षिण कोरियातील सद्य परिस्थितीबाबत भीती अशी आहे की, यून यांचं पुढे काहीही झालं, दक्षिण कोरियात सत्तेत कोणीही आलं, तरी या देशातील राजकारणाची दिशा ठरवणारं जे ध्रुवीकरण झालं आहे, ते तसंच राहणार आहे.

आशियातील एक समृद्ध, प्रगतीशील आणि लोकशाहीचा पुरस्कर्ता असलेल्या देशातील राजकीय अस्थैर्य ही नक्कीच चिंतेची बाब असणार आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC