Source :- ZEE NEWS

World Longest Highway: असं म्हणतात की कोणत्याही ठिकाणी पोहोचायचं असेल तर त्या ठिकाणापेक्षाही तिथं पोहोचण्यापर्यंतचा प्रवासच अतिशय खास असतो. अशाच अविस्मरणीय प्रवासावर नेणाऱ्या एका कमाल रस्त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. हा रस्ता एखाद्या आश्चर्याहून कमी नाही. त्यामागे एक ना अनेक कारणं आहेत. त्यापैकीच एक म्हणजे हा आहे जगातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग. 

पॅन अमेरिकन हायवे  (Pan-American Highway) या रस्त्याची नोंद जगातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून करण्यात आली आहे. सर्वाधिक लांबीमुळं या रस्त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली आहे. उत्तर अमेरिकेतून सुरू होणारा हा रस्ता चक्क 14 देश ओलांडून दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटीनापर्यंत पोहोचतो. घनदाट वनक्षेत्र, वाळवंटीय प्रदेश, बर्फाळ प्रदेश तर कुठे पर्वतीय क्षेत्र ओलांडत हा रस्ता पुढे जातो. 

उत्तर, मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील राज्य जोडणं हा या महामार्गाच्या बांधणीमागील सर्वात मुख्य हेतू असून तो 1923 मध्ये साध्य करण्यात आला. पॅन अमेरिकन हायवे मेक्सिको, ग्वाटेमाला, एल साल्वाडोर, होंडुरस, निकारागुआ, कोस्टा रिका उत्तर अमेरिकेतील पनामा, कोलंबिया, इक्वेडोर, पेरू, चिली आणि अर्जेंटीनाहून दक्षिण अमेरिकेपर्यंत पोहोचतो. 30 हजार किमी अंतराच्या या महामार्गावर वाहन चालवणं सोपी गोष्ट नाही. 

जाणून आश्चर्य वाटेल, पण 30000 किमी पर्यंत या रस्त्यावर कुठेच युटर्न किंवा कोणताही जोडरस्ता नाही. थोडक्यात या महामार्गावर प्रवास सुरू केला तर, महिनोनमहिने इथूनच प्रवास करावा लागणार. हे अंतर ओलांडण्यासाठी जवळपास 60 दिवस अर्थात दोन महिन्यांचा कालावधी लागतो, त्यामुळं मोठ्या रोडट्रीपवर निघणाऱ्यांसाठी हा रस्ता एक उत्तम निवड ठरतो. 

फक्त विविध देशच नव्हे, तर या प्रवासादरम्यान विविध ऋतूही अनुभवता येतात. या रस्त्यानं प्रवास करण्यासाठी वाहनचालकाचं वाहनावर सराईताप्रमाणं नियंत्रण असणं अपेक्षित आहे. कालोरस सांतामारिया नावाच्या एका व्यक्तिनं या महामार्गावरील प्रवास 117 दिवसांमध्ये पूर्ण केला होता. 

 

रोड ट्रीप करण्यासाठी इच्छुकांनी या महामार्गावर प्रवासाला निघताना सोबत मॅकेनिकल सपोर्ट घेऊनच निघावा असा सल्ला दिला जातो. इतकंच नव्हे, तर खाण्यापिण्याच्या सोयीपासून अगदी काहीच पर्याय नाबही मिळाले तर, तंबूत राहण्याच्या सोयीपर्यंतची व्यवस्था करण्याचाही सल्ला इथं येणाऱ्यांना दिला जातो. याच रस्त्यावर डेरियन गॅप नावाचा एक धडकी भरवणारा टप्पाही येतो. 

भारतातही आहे असाच एक रस्ता… 

ज्याप्रमाणं जगभरात या लांबलचक रस्त्याची चर्चा असते, त्याचप्रमाणं भारतातही असाच एक रस्ता/ महामार्ग आहे. देशातील सर्वात मोठा महामार्ग आहे NH 44. तब्बल 3745 किमी अंतराच्या या महामार्गानं देशाची दोन टोकं एकमेकांशी जोडली जातात, ती म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी. 

SOURCE : ZEE NEWS