Source :- ZEE NEWS

Turkey Ski Resort Fire: उत्तर-पश्चिम तुर्कीतील एका स्की रिसॉर्ट हॉटेलमध्ये मंगळवारी सकाळी झालेल्या अग्नीतांडवात जवळपास 76 जणांनी प्राण गमावले असून आत्तापर्यंत 51 जण गंभीर जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुर्कीचे गृहमंत्री अली येरलिकाया यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार, सकाळी 3.27 वाजता कार्तलकायाच्या डोंगरावर असलेल्या रिसॉर्टमध्ये 12 मजली ग्रँड कार्टल रेस्तराँला आग लागली होती. तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तैयप एर्दोगन यांनीदेखील या प्रकरणातील दोषींनी कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, असे आदेश दिले आहेत. 

स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये आग लागल्यानंतर अनेक नागरिक घाबरुन इमारतीवरुन उडी घेत होते. त्यातच अनेकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर, काही गेस्ट चादर आणि ब्लँकेटच्या सहाय्याने रूममधून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होते. व्हायरल फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, हॉटेलचे छत आणि वरच्या मजल्यावर आग लागलेली दिसत आहे. तसंच, आकाशात धुराचे मोठे मोठे लोट निघत असल्याचे दिसत आहे. 

शाळेला सुट्ट्या असल्याने हॉटेल 80 ते 90 टक्के भरलेले होते. यात 230 हून अधिक गेस्टने चेकइन केले होते. रिसॉर्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर साधारण 20 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र धुर इतक्या प्रमाणात पसरला होता की त्यातून वाट काढणे अवघड झालं होतं. त्यामुळं काही ग्राहकांपर्यंत पोहोचता आलं नाही. 

161 खोल्यांचे रिसॉर्ट

हॉटेलमध्ये 161 खोल्या होत्या. तसंच, या हॉटेलच्या बांधकामासाठी लाकडं आणि शैलेट-शैलीचा वापर केला होता. त्यामुळं आज वेगाने पसरत होती. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, घटनास्थळी 30 अग्नीशमन गाड्या आणि 28 रुग्णवाहिका बोलवल्या होत्या. मात्र हॉटेल डोंगरावर वसलेले असल्यामुळं आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाला अनेक संकटांचा सामना करावा लागला. 

आगीच्या घटनेनंतर त्या हॉटेलच्या जवळपास असलेल्या सर्व हॉटेलला खाली करण्यात आले आणि ग्राहकांना इतर ठिकाणी पाठवलं. कार्तलकाया कोरोग्लू डोंगररांगातील एक प्रसिद्ध स्की रिसॉर्ट आहे. जे इस्तांबुलपासून जवळपास 300 किमी लांब असलेल्या गावात वसलेले आहे. तुर्कीचे न्याय मंत्री यिलमाज टुनकने घटनेचा तपास करण्यात यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. 

SOURCE : ZEE NEWS