Source :- BBC INDIA NEWS

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. प्रत्येकजण त्याचा अविभाज्य भाग झालाय. अन्न, वस्त्र, निवारासह तंत्रज्ञान आज आपल्या जीवनाचा आमूलाग्र भाग बनलंय.

प्रगत तंत्रज्ञानानं मनुष्य घरबसल्या जगातील कोणत्याही कोपऱ्यातील माहिती काही क्षणात मिळवू शकतो. तंत्रज्ञान एकप्रकारे वरदान असल्यासारखं असलं, तरी हेच तंत्रज्ञान एखाद्या भयंकर शापासारखंही काम करू शकतं.

टीव्ही, इंटरनेट, मोबाईलचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. याचा मनुष्याच्या जीवनावर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आहे. त्यात लहान मुलांच्या बाबतीत तर हे प्रमाण अनेक पटीनं जास्त आहे.

लहान मुलांना विविध गेम्स, शो, कार्टूनचं जणू व्यसन लागल्याचं दिसून येतं. अनेकदा काही काँटेट लहान मुलांसाठीचा असल्याचा दावा केला जातो, पण तो खरंच त्यांच्या वयानुरुप असतो का, असा प्रश्न उपस्थित होतो.

सोशल मीडिया जगतात ‘एन्फ्लुएन्सर्स’ची प्रचंड चलती आहे. युट्यूब चॅनेल, इन्स्टाग्राम रील्सच्या माध्यमातून त्यांना एक व्यासपीठ प्राप्त झाले आहे.

लहान मुलांचे युट्यूब चॅनल्स, सोशल मीडिया अकाउंट्सही मोठ्या प्रमाणात दिसून येतात. पण, यात त्यांचं बालपण मात्र हरवत चाललं आहे.

या फोटोत एका लहान मुलीचा मोबाईलमध्ये फोटो काढताना दिसत आहे.

फोटो स्रोत, Getty Images

एकमेकांशी स्पर्धा, पुढे जाण्याची चढाओढ, कामाचा ताण, त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता आणि नैराश्य यातून त्यांचं खच्चीकरण होतंय का?

टीव्हीवरील विविध रिॲलिटी शो, इंटरनेटवरील गेम्स, युट्यूबवर लहान मुलांसाठी उपलब्ध असलेले कार्यक्रम यातील काँटेट हा खरंच लहान मुलांच्या वयाच्या अनुषंगानं असतो का?

या शोजचा, व्हिडिओंचा, गेम्सचा त्यांच्या मनावर काय परिणाम होतो? याबाबत जाणून घेऊयात.

रिॲलिटी शो, ऑनलाईन काँटेंटचा मुलांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो?

रिॲलिटी शोजची सुरुवात झाल्यानंतर एक मोठी लाटच आल्याचं पाहायला मिळालं. गाणे, नृत्य, कॉमेडी, कुकिंग शो सारख्या विविध कार्यक्रमांची चलती सुरू झाली. यात मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांसाठीचे शो येऊ लागले.

असं असलं तरी यातून निर्माण होणारं दडपण देखील लपून राहिलेलं नाही. मुलांच्या बाबतीत तर हे आणखी गंभीर आहे.

याबाबत बोलताना सायबर व समाजमाध्यम विषयाच्या अभ्यासक तथा ‘सायबर मैत्र’च्या संस्थापक मुक्ता चैतन्य म्हणतात, “रिॲलिटी शोच्या माध्यमातून पैसा आणि प्रसिद्धी मिळते, असा समज तयार होत जातो आणि मुलांपेक्षा पालकांमध्ये अशाप्रकारची समज असण्याची दाट शक्यता असते.”

सोशल मीडिया आणि रील्सचा मुलांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images

“दुसरं म्हणजे इन्स्टाग्राम, युट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर जो ट्रेंड असेल त्यानुसार काँटेंट तयार केला जातो. त्या-त्या प्लॅटफॉर्मच्या गरजेनुसार पटकन यश मिळविण्यासाठी जे काही करावं लागतं त्यादृष्टीनं विचार केला जातो आणि जास्तीत जास्त लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी ट्रेंडमध्ये असलेला काँटेंट तयार केला जातो.

“ऑनलाईन जगात मुलांसाठीचा काँटेट अशी काही संकल्पना नसते. त्यामुळे क्रिएटर कशाप्रकारचा काँटेट तयार करतो आहे आणि त्याचा व्ह्युअर्स किंवा फॉलोअर्स यांच्यावर काय परिणाम होऊ शकतो याचाही विचार व्हायला हवा,” असं मुक्ता चैतन्य यांनी नमूद केलं.

लहान मुलांच्या वयाला साजेसा काँटेट आपल्याकडे तयार होतो, पण तो हवा तसा प्रमोट होत नाही.

फोटो स्रोत, Getty Images

याबाबत बोलताना सायकोलॉजिस्ट आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम संस्थेचे समुपदेशन विभागप्रमुख डॉ. स्वप्निल पांगे म्हणाले, “टीव्ही, सोशल मीडिया, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील काँटेंटमध्ये शिविगाळ, फुटकळ विनोद, हिंसा आणि नकारात्मकता दाखवली जाते. हे सामान्य आहे, हे चालतंच असं समजून सर्रासपणे त्याचा वापर केला जातो.”

“मोठ्यांपासून लहानापर्यंत प्रत्येकाच्या नजरेतून अशाप्रकारचा काँटेट जातो, याचा परिणाम मुलांच्या मनावर होतो, यामुळे मुलं असंवेदनशील होऊ शकतात. असं केल्यास, असं बोलल्यास, असं वागल्यास ते कूल वाटेल, अशी मुलांची स्वत:ची अवास्तव कल्पनाही यातून तयार होऊ शकते.

“आजकाल रील्समध्येही बरीच मुलं दिसून येतात. मोठ्यांप्रमाणे हावभाव, कपडे, मेकप, डान्स आदि करताना ही मुलं दिसतात. त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही हजारोंत असते. मात्र, अशाप्रकारच्या रील्समुळे मुलांमध्ये बॉडी इमेजवरून न्यूनगंड तयार होऊ शकतो. त्यांच्यातील सामाजिक संवाद कमी होऊन ते एकाकी पडण्याची शक्यताही असते,” डॉ. पांगे सांगतात.

लहान मुलांना मनोरंजनासारखं वापरणं हा गंभीर प्रकार

प्रत्येकानं आपल्या वयानुरूप काँटेट बघणं अपेक्षित असतं. मात्र, ‘एज अप्रोप्रिएटनेस’च्या मुद्द्याकडे गंभीरतेनं लक्ष दिलं जात नाही. लहान मुलांच्या वयाला साजेसा काँटेट आपल्याकडे तयार होतो, पण तो हवा तसा प्रमोट होत नाही.

विविध कार्यक्रमात, रिॲलिटी शोमध्ये लहान मुलं स्पर्धकांच्या रूपात वावरताना त्यांचे हावभाव, शैली, मेकअप आणि कपडेदेखील त्यांच्या वयाला अनुसरुन दिसत नाहीत.

मुलांकडून कशा प्रकारच्या काँटेटची अपेक्षा केली जाते, त्यांना काय करायला भाग पाडलं जातंय, त्याचा काय परिणाम होईल याबाबत गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे मात्र तसं होताना दिसून येत नाही.

प्रतिकात्मक चित्र

फोटो स्रोत, Getty Images

याबाबत बोलताना मुक्ता म्हणाल्या, “मुलांच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा अतिशय गंभीर आहे. आपण विविध वाहिन्यांवर लहान मुलांचे अनेक शोज पाहतो. मात्र, ते लहानांसाठी नव्हे तर मोठ्या वयोगटातील प्रेक्षकाचं टार्गेट समोर ठेवून तयार केले जातात. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास ‘मोठ्या वयोगटातील प्रेक्षकांसाठी बनवलेला लहान मुलांचा शो’. या सगळ्या गोष्टी खूप धोकादायक आहेत.

“सोशल मीडियावर रोमँटिक गाण्यांवर किंवा आयटम साँग्सवर मुलांचे मादक हावभाव असणारी गाणी प्रचंड व्हायरल होत आहेत आणि बघणारे कसलाही विचार न करता ते ‘एन्जॉय’ करतात. पालकदेखील अशाप्रकारचे व्हिडीओ तयार करून अपलोड करत असतात.”

“यातून लाईक्स आणि व्ह्यूजचा पाऊस पडतो. पैसा आणि प्रसिद्धी मिळते मात्र मुलांचं बालपण त्याखाली चिरडलं जातं. यावर वेळीच आवर न घातल्यास बालमनावर याचे खोल परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही,” मुक्ता म्हणाल्या.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

“पालकांच्या हातात मोबाईल आहे, ते इंटरनेटचा वापर करत आहे म्हटल्यावर मुलांनाही त्याचा सहज अ‍ॅक्सेस मिळतो. मात्र, सोशल मीडियाचा प्रभाव वेगवेगळ्या प्रकारे पडत असतो. त्यामुळे सेल्फ इमेज, सेल्फ डाऊट, पिअर प्रेशर, पिअर अ‍ॅक्सेप्टन्ससारखे अनेक मुद्दे उपस्थित होतात.

“रिॲलिटी शो, सोशल मीडियाचा नकारात्मक प्रभाव आपल्याला वाटतो त्यापेक्षा जास्त गंभीर आहे. त्यामुळे सिनेमे, मालिका, नाटकं, ओटीटी काँटेंट आदि तयार करताना त्याचा मुलांच्या दृष्टीकोनातून विचार करणं महत्त्वाचं आहे,” असं मुक्ता म्हणाल्या.

मुलांसाठीचा काँटेंट कसा असायला हवा?

इंटरनेटवर असलेला डेटा अ‍ॅक्सेस करणं हे सहजसोपं आणि सर्वांसाठी उपलब्ध आहे. मात्र, मुलांच्या वयाला अनुरूप असा काँटेट त्यांच्यापर्यंत पोहोचणंही गरजेचं आहे.

दरवेळी प्रबोधनात्मक काँटेटच असायला हवा असं नाही. परंतु, जो त्यांच्यापर्यंत पोहोचतोय त्यात निखळ मनोरंजन असणं महत्त्वाचं आहे. मुलांसाठी असा काँटेंट असावा जो त्यांच्या वयाच्या अनुरुप असायला हवा, असं स्वप्नील पांगे सांगतात.

मुलांना सायबर सेफ्टीचं शिक्षण देणं गरजेच आहे, यात पालकांची भूमिका महत्वाची असते.

फोटो स्रोत, Getty Images

“लहान मुलांसाठीच्या काँटेंटमध्ये हेट स्पीच, हिंसा आणि बुली करण्यासारख्या गोष्टी नसाव्यात, तसेच तो मुलांची प्रायव्हेसी जपणारा असावा. मुलांमध्ये शैक्षणिक, कलात्मक आणि कुतूहल वाढवणारा काँटेंटही उपलब्ध आहे, परंतु तो हवा तसा प्रमोट केल्या जात नाही, त्याला जास्त व्ह्यूज नसतात त्यामुळे कदाचित तो लोकांच्या नजरेत जास्त येत नाही.

“लहान मुलांच्या काँटेंटच्या दृष्टीनं सरकारनं एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. सरकारने डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट (DPDPA) नुसार लहान मुलांच्या काँटेंटबाबत मसुदा नियम जारी केला आहे. त्यानुसार, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडियावर अकाउंट तयार करताना पालकांची संमती घेणे बंधनकारक आहे. यामुळे मुलांची प्रायव्हेसी जपल्या जाईल आणि सुरक्षितताही सुधारेल,” असं स्वप्नील पांगे म्हणाले.

इंटरनेट, सोशल मीडियापासून मुलांना लांब ठेवणं योग्य राहील का?

याबाबत बोलताना स्वप्नील पांगे म्हणाले, “आज विविध गोष्टी, कामकाज इंटरनेटवर अवलंबून असून भविष्यात याचा वापर वाढतच राहणार आहे. त्यामुळे मुलांना इंटरनेट-सोशल मीडियापासून लांब ठेवणं योग्य राहणार नाही. त्यापेक्षा त्यांना लहानवयापासूनच इंटरनेटचे फायदे-नुकसान याबाबतचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे.

“शाळेत गुड टच बॅड टच शिकविताना गुड क्लिक आणि बॅड क्लिक सारख्या डिजिटल स्वच्छतेचे धडेही गिरवले गेले पाहिजेत,” असं स्वप्नील पांगे म्हणाले.

पालकांनी मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी मोकळा संवाद साधणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञ सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

पुढे बोलताना डॉ. पांगे सांगतात, “सोशल मीडियावर अकाउंट सुरू करण्यापासून तर अनोळखी लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारु नये, फॉलो करू नये. अनोळखी व्यक्तीशी डीएममध्ये (मॅसेजबॉक्स) बोलू नये किंवा एखादी व्यक्ती डीएममध्ये येऊन वारंवार तुमच्याशी फ्लर्ट करत असेल, बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर लगेच पालकांना कळवावं, रिपोर्ट करावं.

“यासह कुठल्याही गोष्टीवर क्लिक करू नये, यामुळे आपण अडचणीत येऊ शकतो. तसंच, तुमच्या मित्राचा मित्र हा तुमचाही मित्र असेलच असं नाही. या सर्वांबाबतच सायबर सेफ्टीचं शिक्षणही मुलांना दिलं जाणं गरजेच आहे, यात पालकांची भूमिका महत्वाची असते.”

मुलांची ‘प्रायव्हसी’ जपण्यासाठी पालकांची काय भूमिका असावी?

सायबर गुन्हे, स्कॅमसारख्या गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे मुले ऑनलाईन जगतात वावरत असताना पालकांनी त्याबाबत काळजी घ्यायला हवी.

मुलांना जपताना जसं आपण त्यांना अनोळख्या ठिकाणी एकटं सोडत नाही. किंवा रस्ता ओलांडताना त्यांचा हात धरतो, त्यांना गुड टच बॅड टच शिकवितो. त्याचप्रमाणे इंटरनेटवरील धोक्यापासून त्यांना सावध करणं, त्यांचा बचाव करणं महत्त्वाचं आहे.

पण, ते कसं करता येईल? या प्रश्नावर बोलताना मुक्ता म्हणाल्या, “मुलांना सजग करण्यासाठी ज्या गोष्टी पालक मुलांना शिकवतात, त्याचप्रकारे इंटरनेटबाबतही त्यांना सांगण्याची गरज आहे.”

“इंटरनेटवर गुड टच बॅड टच नाहीये, पण ऑनलाइन अब्युजच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असतात, हे देखील तितकच भयंकर आहे. त्यामुळे जसा दैनंदिन जीवनात आपण मुलांना सावध करतो तसंच ऑनलाईन जगतात वावरतानाही मुलांचा हात धरुन ठेवणं महत्त्वाचं आहे.

“आता हात धरून ठेवणे म्हणजे काय, तर मुलांशी संवाद साधणं, त्यातील धोक्यांपासून त्यांना सावध करणं, अति स्क्रीनटाईमचा त्यांच्या मनावर, शरीरावर काय दुष्परिणाम होऊ शकतो याबाबत सांगणं तसंच, ऑनलाईन गेमिंगच्या दुष्परिणामाबाबत अवगत करून देण्याची गरज आहे,” असं मुक्ता सांगतात.

पालक आणि पाल्य

फोटो स्रोत, Getty Images

याबाबत बोलताना मुक्ता चैतन्य यांनी ‘शॅरेंटिंग’ची व्याख्या सांगितली. शॅरेंटिंग म्हणजे ‘शेअरिंग आणि पॅरेंटिंग’.

मुक्ता म्हणाल्या, “पालक ऑनलाईन जगात सतत आपल्या पाल्यांची फोटो शेअर करत असतात, किंवा सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्याचा सर्वात मोठा धोका असा आहे की, असे फोटो चुकीच्या साईट्सवर चुकीच्या पद्धतीने वापरल्या जाण्याच्या शक्यता अधिक असतात. अशाप्रकारचे अपडेट्स फॉलो करत गुन्हेगार संधीच्या शोधात असतात, आणि त्यातून अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सायबर गुन्हेगारीच्या विविध घटना आजकाल समोर येऊ लागल्या आहेत, त्यामुळे खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.

पालक मुलांबाबतची अगदी साधी वाटणारी माहिती उदा. आपल्या मुलाचं नाव, त्याचा स्वभाव, आवडीनिवडी इ. ऑनलाईन शेअर करत असतात मात्र यातून त्याचं एक डिजिटल फुटप्रिंट तयार होत जातं. जे नंतर ऑनलाईन जगातून काढता येत नाही. त्यामुळे पालकांनी काय शेअर करावं आणि काय करू नये याबाबत काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे.

डिजिटल फुटप्रिंट तयार करणं हा ज्या त्या व्यक्तीचा अधिकार आहे आणि तो त्या व्यक्तिनंच करणं अपेक्षित आहे. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचे फुटप्रिंट आपण त्याच्या परवानगीशिवाय तयार करत आहोत, असा विचार जर पालकांनी केला तर प्रायव्हसीबाबतच्या सर्व मुद्द्यांना गांभीर्य येऊ शकेल. कारण मुलां हा त्यांचाही अधिकार आहे.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC