Source :- ZEE NEWS

Japan Medical Helicpoter Crash : जपानमध्ये अतिशय भीषण अपघात घडला असून, याची माहिती मिळताच संपूर्ण जगातून या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. उपलब्ध माहितीनुसार एका रुग्णाला रुग्णालयाच्या दिशेनं हवाई मार्गानं नेलं जात होतं. त्याचवेळी रुग्णाला नेणारं हेलिकॉप्टर क्रॅश होऊन ते थेट समुद्रात कोसळलं आणि एक मोठी दुर्घटना घडली. 

अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये 6 जण प्रवास करत होते. यापैकी तिघांचा मृत्यू ओढावला असून तिघांना तटरक्षत दलानं मोठ्या प्रयत्नांनंतर सुखरुप वाचवलं. देशातील दक्षिणपश्चिम क्षेत्राकडे ही दुर्घटना घडली असून, रविवाकी 6 एप्रिल 2025 रोजी त्यासंदर्भातील माहिती जपानच्या तटरक्षक दलाच्या वतीनं देण्यात आली. नागासाकीच्या विमानतळापासून काही अंतरावर असणाऱ्या फुकुओका  येथील रुग्णालयाच्या दिशेनं हेलिकॉप्टर निघालं असतानाच हा अपघात झाला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. 

‘यूरो न्यूज’च्या वृत्तानुसार या हेलिकॉप्टरमध्ये पायलट, रुग्ण, त्याच्यासमवेत एक नर्स, हेलिकॉप्टर मॅकेनिक, रुग्णाची काळजी घेणारी एक व्यक्ती आणि एक डॉक्टर प्रवास करत होते. अपघातानंतर पायलट, नस्ल आणि मॅकेनिक यांना वाचवण्यात तटरक्षक दल यशस्वी ठरलं. ज्यावेळी या तिघांनाही वाचवण्यात आलं तेव्हा ते हायपोथर्मियाचे शिकार झाले होते. त्यांच्या शरीराच्या तापमानात असामान्य घट झाली होती, असं असलं तरीही हे तिघं शुद्धीत असल्याची बाब त्यावेळी लक्षात आली. 

 

सदर अपघातानंतर 86 वर्षीय रुग्ण मित्सुकी मोतोइशी, 34 वर्षीय डॉक्टर केई अरकावा आणि 68 वर्षीय काजुओशी मोतोइशी या काळजी घेणाऱ्या व्यक्तीचे मृतदेह घटनास्थळावरून बाहेर आणण्यात आले. 3 शोधक विमान आणि 3 जहाजांच्या मदतीनं ही बचावमोहिम हाती घेण्यात आली, जिथं तटरक्षक दलाच्या समयसूचकतेमुळं तिघांचे प्राण वाचवण्यात आले आणि त्यांना तातडीनं पुढील उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात पाठवण्यात आलं. 

SOURCE : ZEE NEWS