Source :- BBC INDIA NEWS

रोलेक्स घड्याळ घालणारा आणि पीएचडी करणारा सीरियल रेपिस्ट, अमली पदार्थ पाजून केला 50 हून अधिक महिलांवर बलात्कार

(इशारा: या लेखात लैंगिक अत्याचाराची वर्णनं आहेत)

युकेमध्ये एकाच व्यक्तीनं अनेक महिलांवर बलात्कार केल्याचं धक्कादायक प्रकरण घडलं. हा गुन्हेगार, एक चिनी नागरिक असून तो महिला किंवा तरुणींना पेयांमधून अमली पदार्थ देऊन त्यांच्यावर बलात्कार करायचा.

सुरुवातीला त्याच्याविरोधात पोलिसांकडे जाण्यास पीडिता टाळत होत्या, मात्र नंतर अनेकजणी समोर आल्यानंतर या आरोपीला न्यायालयानं दोषी ठरवलं.

हे हादरवून टाकणारं प्रकरण काय आहे, आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत काय होती, पोलिसांनी यात तपास कसा केला, याबद्दल जाणून घेऊया.

सीरियल रेपिस्ट झेनहाओ झो याच्याविरोधात आणखी 23 महिलांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.

झेनहाओ झो हा एक पीएचडी करणारा चिनी विद्यार्थी आहे. गेल्या महिन्यात लंडनमध्ये दोन खंडांमधील 10 महिलांना पेयांमधून अमली पदार्थ देऊन त्यांच्यावर बलात्कार करण्याच्या गुन्ह्यात तो दोषी आढळला.

या खटल्याच्या शेवटी पोलिसांनी सांगितलं की, त्यांच्याकडे व्हीडिओचा पुरावा आहे. स्वत: झेनहाओ झो यानं 50 पीडित महिलांचे ते व्हीडिओ चित्रित केले होते.

पोलिसांनी सांगितलं की, ते या पीडित महिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. झोची गँग बरीच मोठी असावी, असंही पोलिसांना वाटतं.

गेल्या महिन्यात दोन महिलांनी नवीन आरोपांसह पोलिसांशी संपर्क साधला. त्या महिला बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसशी बोलल्या. त्यातल्या एकीनं सांगितलं की, चीनमधील तिच्या शहरातच झेनहाओ झोनं तिच्यावर बलात्कार केला.

तिच्या पेयात त्यानं अमली पदार्थ मिसळला, त्यामुळे ती बेशुद्द झाली नाही, मात्र ती बोलू शकली नाही किंवा काहीही हालचाल करू शकली नाही.

तर दुसऱ्या महिलेनं सांगितलं की, झेनहाओ झोनं लंडनमध्ये तिलाही अमली पदार्थ पाजला. तिला जेव्हा जाग आली, तेव्हा झो तिच्यावर लैंगिक अत्याचार करतानाचं चित्रीकरण करत असल्याचं तिला दिसलं.

ज्या दोन महिलांच्या साक्षीमुळे झेनहाओ झोला दोषी ठरवण्यास मदत झाली, त्यांच्याशीदेखील आम्ही बोललो. झोला जून महिन्यात शिक्षा सुनावली जाणार आहे.

“मी जर आधीच याबाबत बोलले असते, तर कदाचित माझ्यानंतर इतक्या महिला बळी पडल्या नसत्या,” असं त्यापैकी एका महिलेनं आम्हाला सांगितलं.

बलात्कारासाठी वापरला जाणारा जीएचबी हा अंमली पदार्थ काळजीपूर्वक मोजण्यासाठी झोकडे एक पिपेट (रसायन मोजण्याची नळी) होती.

फोटो स्रोत, Metropolitan Police

ती आणि इतर महिलांचं म्हणणं आहे की, झेनहाओ झोनं इतक्या महिलांवर अत्याचार केले हे माहीत झाल्यानं त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना आहे.

टेबलावरील दोन बाटल्या आणि झोचा डाव

एका महिलेनं नवीन आरोप केले, तिला आम्ही अॅलिस म्हणत आहोत. तिनं बीबीसीला सांगितलं की, झेनहाओ झोनं 2021 मध्ये लंडनमध्ये तिच्यावर अत्याचार केले होते. मात्र गेल्या महिन्यात त्याच्यावर खटला चालल्यानंतरच तिला पोलिसांकडे जावसं वाटलं.

“मला माहित नव्हतं की, त्या गोष्टीची तक्रार करता येईल,” असं त्या चिनी महिलेनं आम्हाला सांगितलं.

त्या म्हणाल्या की, त्या लंडनमध्ये इतर चिनी विद्यार्थी मित्रमैत्रिणींबरोबर क्लबमध्ये असताना त्यांची झोबरोबर पहिल्यांदा भेट झाली होती. ते ग्रुप वीचॅट या एका लोकप्रिय सोशल मेसेजिंग अॅपवर एकमेकांशी जोडले गेले.

त्यानंतर काही वेळातच, अॅलिस आणि झो या दोघांच्या संयुक्त मैत्रिणीनं अॅलिस यांना ब्लूम्सबरीमध्ये असणाऱ्या झोच्या विद्यार्थ्यांसाठीच्या उच्चभ्रू निवासस्थानी मद्यपान करण्यासाठी आमंत्रित केलं.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

त्या म्हणतात की, टेबलावर स्पिरिटच्या दोन बाटल्या होत्या. दोन्ही बाटल्या आधीच उघडलेल्या होत्या आणि अर्ध्या रिकाम्या होत्या. अॅलिस मैत्रिणीबरोबर त्यातील एका बाटलीतून पेय घेऊ लागल्या. त्या सांगतात की, झो मात्र फक्त दुसऱ्या बाटलीतील पेयच प्याला.

अॅलिस म्हणतात की, त्यांची मैत्रीण एरवी मद्य व्यवस्थित पचवत असे. मात्र यावेळेस तिला फार लवकर दारू चढली आणि ती फरशीवरच झोपी गेली. अॅलिसवर देखील दारूचा अचानक परिणाम झाला.

“सर्वसाधारणपणे तुम्ही जेव्हा जास्त मद्यपान करता, तेव्हा तुम्हाला थोडा वेळ बरं वाटतं. मात्र त्या रात्री मला खूपच चक्कर आली आणि लगेच झोपदेखील लागली,” असं अॅलिस म्हणाल्या.

अॅलिस आम्हाला म्हणाल्या की झेनहाओ झोनं त्यांना सांगितलं की, या स्थितीत टॅक्सीनं घरी जाणं सुरक्षित ठरणार नाही. त्यानं त्यांना त्याच्या बेडरुममध्येच झोपण्यास सांगितलं.

त्या म्हणतात की, त्या तयार झाल्या, कारण त्यांची मैत्रीण अजूनही त्या फ्लॅटमध्ये आहे हे त्यांना माहीत होतं.

अॅलिस यांना जाग आली तेव्हा…

त्यानंतर अॅलिस यांना आठवतं की, झो त्यांची पँट काढत असतानाच त्यांना जाग आली.

“मी त्याला लगेच थांबवलं,” असं त्या म्हणाल्या. त्यानंतर त्यांना त्यांच्या डोक्यावर मोबाईल फोनमधील टॉर्च लाईट दिसला आणि त्यांना जाणीव झाली की त्यांचा व्हिडिओ बनवला जातो आहे. ते पाहून त्या घाबरल्या.

अॅलिस म्हणाल्या की त्यांनी झो च्या बेडरुममधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानं त्यांना “दारातून जोरात मागं ढकललं.” त्यांना बेडरुममध्येच रोखण्यासाठी झोनं इतकी ताकद लावली की त्यांना “दाराच्या चौकटीला दोन्ही हातांनी घट्ट धरून उभं राहावं लागलं.”

अॅलिस यांनी आम्हाला सांगितलं की, त्यावेळेस त्यांनी मदतीसाठी ओरडण्याची धमकी दिल्यानंतरच झोनं त्यांना जाऊ दिलं. त्यानंतर झोनं त्यांना या गोष्टीचा “गवगवा करू” नको किंवा पोलिसांकडे जाऊ नकोस असं सांगितलं.

अॅलिस पुढे म्हणाल्या की, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी झेनहाओ झोनं वीचॅटवर त्यांच्याशी संपर्क केला. मात्र त्यानं आदल्या रात्रीच्या प्रसंगाचा उल्लेख केला नाही. त्यानं त्यांना रात्रीच्या जेवणाबद्दल (डिनर) विचारणा केली.

मात्र अॅलिस यांनी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं आणि त्या झेनहाओ झोच्या संपर्कात पुन्हा कधीही आल्या नाहीत.

त्या प्रसंगाबद्दल अॅलिस यांनी त्यांच्या काही जवळच्या मित्रांना सांगितलं. मात्र त्यापुढं काहीही केलं नाही.

झो युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये शिकत होता आणि तो दरमहा 4,000 पौंडाहून अधिक घरभाडं देत होता

“पहिली गोष्ट म्हणजे, मला वाटलं की, तक्रार करण्यासाठी पुराव्याची आवश्यकता आहे. दुसरं म्हणजे, पोलिसांकडे तक्रार करण्यापूर्वी काहीतरी गंभीर गोष्ट घडलेली असली पाहिजे.”

अॅलिस म्हणतात की, त्यानंतर जवळपास चार वर्षांनी पोलिसांनी झोवर खटला दाखल केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये त्याचा चेहरा पाहिला.

युकेमधील लैंगिक गुन्ह्यांची तक्रार करणं परदेशी नागरिकांसाठी आव्हानात्मक बाब आहे, असं साराह येह म्हणतात. त्या लंडनमधील साऊथईस्ट अँड ईस्ट एशियन वीमेन्स असोसिएशनच्या ट्रस्टी आहेत.

“परदेशातून आलेल्या कोणासाठीही बलात्कारामुळे मानसिक धक्का बसणं आणि नंतर ब्रिटिश कायदा व्यवस्था आणि नॅशनल हेल्थ सर्व्हिस किंवा अगदी पीडितांसाठीच्या सेवांचा लाभ घेणं ही खूपच त्रासदायक बाब आहे,” असं त्यांनी आम्हाला सांगितलं.

पीडितांना त्यांचे काय अधिकार आहेत किंवा त्यांच्यासाठी कोणती संसाधनं उपलब्ध आहेत, हे कदाचित माहीत नसेल. तसंच त्याच्या परिणामांबद्दल, या गोष्टीचा त्यांच्या अभ्यासावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांबद्दल, यामुळे त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची बदनामी होण्याचा आणि संभाव्य कायदेशीर आव्हानांबद्दल काळजी वाटत असेल.

झोच्या मित्रमंडळींना त्याच्या गुन्हेगारी कृत्याची होती कल्पना

अॅलिस म्हणतात की त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर, त्यांना माहित झालं की लंडनमधील त्यांचा एक मित्रदेखील झेनहाओ झोला ओळखत होता. मात्र झो महिलांच्या पेयात मद्य किंवा अमली पदार्थ मिसळत असल्याचं माहीत झाल्यानं त्यानं सर्व संपर्क तोडला होता.

अॅलिस यांच्या मित्रानं आम्हाला सांगितलं की त्यांनी झोला दोषी ठरवण्यात आल्याचं ऐकलं, तेव्हा त्यांना “अजिबात आश्चर्य वाटलं नाही.” बीबीसीनं त्यांचं नाव जी ठेवलं आहे.

“झो काय करतो आहे हे त्यावेळेस बऱ्याच मित्रांना कदाचित माहीत असावं. मला वाटतं की, आमच्या काही मैत्रिणींनादेखील त्याची माहिती होती.”

जी यांनी आम्हाला सांगितलं की, 2022 मध्ये एका पार्टीत ते चुकून दुसऱ्याच्या ग्लासातील पेय प्यायले. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि खूपच गुंगी आल्यासारखं किंवा झोप आल्यासारखं वाटलं.

जी पुढे म्हणाले की, झोनं त्यांना सांगितलं की, त्यानं त्या पेयात अमली पदार्थ मिसळला होता. त्या पार्टीतील एखाद्या महिलेनं ते पेय प्यावं असा झोचा हेतू होता.

जी म्हणतात की, झोनं नंतर त्यांना अमली पदार्थांची एक छोटी पिशवी दाखवली आणि याप्रकारात “त्याच्याबरोबर सहभागी” होण्याची इच्छा आहे का असं विचारलं.

ते म्हणतात की, त्यावरून त्यांच्या लक्षात आलं की झोला मुली शोधण्यात त्यांची मदत हवी आहे. जेणेकरून त्या मुलींच्या पेयात त्याला अमली पदार्थ मिसळता येतील.

जी म्हणतात की, त्यांनी झो ला नकार दिला.

लोक झोच्या संपत्तीची माहिती देणाऱ्या पोस्ट चिनी सोशल मीडियावर शेअर करत आहेत

बीबीसीनं जी यांना विचारलं की सुरुवातीला ते झोला का भेटत राहिले आणि त्यांनी पोलिसांकडे तक्रार का केली नाही. त्यावर जी यांनी आम्हाला सांगितलं की, झो आणि त्यांचे अनेक सामाईक मित्र आहेत. त्यामुळे त्याला टाळणं कठीण होतं.

ते म्हणतात की, त्यांनी झोबद्दल त्यांच्या मित्रांना इशारा दिला होता. त्यांनी मित्रांना झोबरोबर फिरायला न जाण्यास सांगितलं होतं. “कारण तो लोकांच्या पेयात अमली पदार्थ मिसळत होता.”

जी म्हणतात की, त्या आठवणींबद्दल विचार करायला त्यांना आवडत नाही. म्हणूनच ते पोलिसांकडे गेले नाहीत. ते पुढे म्हणतात की, झोला दोषी ठरवण्यासाठी महिलांची साक्ष पुरेशी आहे असं त्यांना वाटत होतं.

जी म्हणतात, शेवटी, त्यांनी झो बरोबरचे सर्व संबंध तोडले.

रॅचेलवरील अत्याचार आणि त्यानंतरच्या अडचणी

झोवर खटला चालल्यापासून, लंडन आणि चीनमधील पोलिसांच्या संपर्कात आणखी एक तरुण महिला आहे. त्यांचं नाव “रॅचेल”. त्या म्हणतात की, 2022 मध्ये झोनं ग्वांगडोंग प्रांतातील डोगंगुआन या त्याच्या शहरात त्यांना अमली पदार्थ देऊन त्यांच्यावर बलात्कार केला होता.

रॅचेल यांनी बीबीसीला सांगितलं की, झोबरोबर ऑनलाईन परिचय झाल्यानंतर त्या झो बरोबर डेटवर गेल्या होत्या.

त्या म्हणतात की, त्यांना वाटलं होतं की ते दोघे बारमध्ये जात आहेत. मात्र शेवटी ते दोघे झोच्या घरी पोहोचले. तो एक मोठा व्हिला होता. झोनं तो त्याच्या कुटुंबाच्या अनेक मालमत्तांपैकी एक असल्याचं सांगितलं होतं.

घरी नेल्यानंतर झोनं रॅचेल यांच्याकडे पाठ फिरवून त्यांच्या हिरव्या रंगाच्या कॉकटेलमध्ये अमली पदार्थ मिसळला.

त्या म्हणतात की, त्या दोघांनी मद्यपान करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना खूप “चक्कर येऊ” लागली.

रॅचेल यांनी युके पोलिसांना सांगितलं की, झोनं त्यांना बेडरुममध्ये नेलं. तिथे त्यांची अवस्था आणखीच वाईट झाली होती. त्यांना बोलता येत नव्हतं किंवा शरीराची हालचाल देखील करता येत नव्हती. त्यानंतर झोनं त्यांच्यावर बलात्कार केला.

दुसऱ्या दिवशी त्यांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचा विचार केला. मात्र नंतर तो रद्द केला. त्यांना भीती वाटली की, हा प्रकार सिद्ध करणं त्यांना खूप कठीण जाईल.

“मी त्याच्या घरी मद्यपानासाठी जाण्यास तयार होती आणि त्याचा अर्थ माझी सेक्सला संमती होती असा नाही, हे सिद्ध करणं माझ्यासाठी कठीण होतं,” असं त्यांनी आम्हाला सांगितलं.

त्या पुढे म्हणाल्या की, डोंगगुआन हे एक छोटं शहर आहे. तिथे या गोष्टीचा धोका होता की त्यांचे आईवडील, नातेवाईक आणि सहकाऱ्यांना याबद्दल कळेल आणि ते त्यांना “अविवेकी” किंवा “अविचारी” समजतील.

रॅचेल यांनी युके पोलिसांना दिलेला जबाब आम्ही पाहिला आहे.

त्या म्हणतात की, त्यांची कहाणी लोकांपर्यंत पोहोचावी असं त्यांना आता वाटतं. जेणेकरून आणखी पीडितांना तक्रार करण्यासाठी पुढे येण्यास प्रोत्साहन मिळेल. तसंच झोवर चीन आणि युकेमध्ये खटला चालवून शिक्षा व्हावी असं त्यांना वाटतं.

कमांडर केविन साऊथवर्थ मेट्रोपोलिटन पोलिसांचे सार्वजनिक सुरक्षा प्रमुख आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, पोलीस अधिकारी अजूनही 23 संभाव्य नवीन प्रकरणांवर काम करत आहेत आणि काहीजण झोच्या जप्त करण्यात आलेल्या व्हीडिओमधील किंवा तक्रारींमधील लोकांशी “निश्चितपणे मिळतेजुळते नाहीत.”

“याचा अर्थ झोचा गुन्हेगारी ग्रुप हा प्रत्यक्षात आम्हाला वाटला होता, त्यापेक्षा खूप मोठा आहे,” असं केविन साऊथवर्थ म्हणाले.

दोषी ठरलेल्या बलात्काऱ्यावर दुसरा खटला चालण्याची शक्यता नाकारता येत नाही. तक्रार करण्यासाठी पुढे येणाऱ्या पीडित महिलांची संख्या लक्षात घेता क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसशी “निश्चितपणे चर्चा करता” येईल, असं ते पुढे म्हणाले.

‘तो रोलेक्स सबमरिनर घड्याळ घालतो’

झोवरील खटल्याच्या आधी पोलिसांनी ओळख पटवलेल्या दोन पीडितांचं म्हणणं बीबीसीनं जाणून घेतलं. या दोन्ही पीडिता चिनी नागरिक आहेत आणि त्या लंडनमध्ये शिक्षण घेत होत्या. त्यातील एकीला आम्हाला बेथ असं नाव दिलं आहे.

बेथनं जेव्हा त्यांचा अनुभव सोशल मीडियावर पोस्ट केला, तेव्हा या दोघींची सोशल मीडियावर एकमेकांशी ओळख झाली.

2023 मध्ये बेथवर झोनं बलात्कार केला होता. त्यानंतर लगेचच त्यांनी मेट्रोपोलिटन पोलिसांकडे तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र युकेमधील कायद्याबद्दल खात्री वाटत नसल्यानं त्यांनी हे प्रकरण पुढे न नेण्याचा निर्णय घेतला.

पोलिसांबरोबर झालेल्या सुरुवातीच्या संभाषणानंतर त्या निराश झाल्या होत्या. त्यात त्यांच्या 999 कॉलच्या खराब भाषांतराचा देखील समावेश होता.

“त्यावेळेस मला झोचं नाव माहीत नव्हतं. मला त्याचा पत्ता माहीत नव्हता. मी फक्त साधारण स्वरुपाची माहिती देऊ शकत होते,” असं त्या म्हणतात.

निराश होत, बेथ यांनी सोशल मीडियावर त्यांच्याबाबतीत घडलेल्या घटनेबद्दल एक इशारा देणारी पोस्ट केली.

“क्लारा” या आणखी एक चिनी विद्यार्थिनी म्हणतात की, ती पोस्ट वाचल्यानंतर तात्काळ त्यांच्या लक्षात आलं की हा तोच माणूस आहे, ज्यानं दोन वर्षांपूर्वी लंडनमधील चायनाटाऊनमधील त्या रात्री त्यांच्या पेयात अमली पदार्थ मिसळला होता आणि त्यांच्यावर बलात्कार केला होता.

बेथ यांच्या पोस्टमधील प्रत्येक गोष्ट त्याच माणसाकडे इशारा करत होती, असं क्लारा म्हणतात.

त्या म्हणाल्या, “त्याची उच्चाराची शैली ग्वांगडोंगसारखी आहे, तो प्रामाणिक दिसतो आणि तो हातात रोलेक्स सबमरिनर घड्याळ घालतो.”

पीडितांना पोलिसांकडून सकारात्मक अनुभव

त्यानंतर बेथ आणि क्लारा एकमेकींशी ऑनलाईन बोलू लागल्या. बेथनं क्लाराला अत्याचाराची पोलिसाकंडे तक्रार करण्यास प्रोत्साहन दिलं.

काही महिन्यांनी पोलिसांनी बेथ यांच्याशी संपर्क केला आणि सांगितलं की, ते या प्रकरणाचा पुन्हा तपास करत आहेत. कारण क्लारानं तक्रार दाखल केली होती.

झोकडून जप्त करण्यात आलेल्या उपकरणांमध्ये पोलिसांना बेथचा व्हीडिओदेखील सापडला होता. त्यानंतर मेट्रोपोलिटन पोलिसांनी, त्यांनी सुरुवातीला ज्याप्रकारे बेथ यांची तक्रार हाताळली त्याबद्दल खेद व्यक्त केला.

“पीडितांना वाटेल की, त्यांच्या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेतली जाणार नाही किंवा तक्रारीबाबत काहीही होणार नाही किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवला जाणार नाही, अशी परिस्थिती आम्हाला टाळायची आहे,” असं कमांडर साऊथवर्थ म्हणतात.

सर्व तपास अधिकाऱ्यांना आता अतिरिक्त प्रशिक्षण दिलं जात आहे, असं ते म्हणाले.

क्लारा यांनी ब्रिटिश पोलिसांबद्दल आलेल्या सकारात्मक अनुभवाबद्दल सांगितलं. त्या म्हणतात की, तिच्या पालकांना याबाबत कळू नये यासाठी त्यांना या खटल्यासाठी लंडनला जायचं नव्हतं.

त्यामुळे मग मेट्रोपोलिटन पोलिसांनी क्लारा यांना मदत करण्यासाठी आणि त्यांनी स्वत: हजर राहण्याऐवजी व्हीडिओद्वारे दिलेला पुरावा घेण्यासाठी दोन अधिकाऱ्यांना चीनला पाठवलं.

या पोलीस अधिकाऱ्यांना चिनी अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं. ते चिनी अधिकारी मेट्रोपोलिटन पोलिसांबरोबर या प्रकरणात काम करत आहेत आणि “खूपच सहकार्यशील” आहेत, असं कमांडर साऊथवर्थ म्हणतात.

“यामुळे पीडितांना, मग त्या जगात कुठेही असल्या तरी, पुढे येऊन तक्रार करणं सुरक्षित आहे, असं प्रोत्साहन मिळेल अशी मला आशा आहे,” असं कमांडर साऊथवर्थ पुढे म्हणतात.

बेथ यांनी लंडनमधील न्यायालयात त्यांची साक्ष दिली. त्या म्हणाल्या की, त्यांना नंतरच ही गोष्ट कळाली की त्या आणि क्लारा या दोनच महिला होत्या ज्यांनी झोला दोषी ठरवण्यास मदत केली होती.

“मला बरेच दिवस असं वाटत होतं की झो विरुद्धच्या खटल्यात मी महत्त्वाचा भाग नाही,” असं त्या म्हणाल्या.

त्यांना आता या गोष्टीचा आनंद आहे की, त्यांनी साक्ष दिली. इतर पीडित महिलांना पुढे येण्यासाठी त्या प्रोत्साहन देत आहेत.

जर या प्रकरणाबद्दल तुमच्याकडे काही माहिती असेल आणि ती माहिती तुम्हाला आम्हाला द्यायची असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC