Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Valeria Marquez/Instagram
मेक्सिकोमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक 23 वर्षीय मेक्सिकन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर टिकटॉकवर लाईव्हस्ट्रीम करत असतानाच तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात तिचा मृत्यू झाला आहे.
व्हॅलेरिया मार्केझ असं मृत्यू झालेल्या इन्फ्लुएन्सरचं नाव आहे. तिच्यावर गोळीबार झाला तेव्हा ती ग्वाडालाजारा शहरातील तिच्या ब्यूटी सलूनमध्ये होती. ती टिकटॉकवर लाईव्ह करत होती.
एका व्यक्ती अचानक तिच्या ब्यूटी सलूनमध्ये आला आणि त्याने व्हॅलेरियावर सर्वांसमक्ष गोळीबार केला, असं जॅलिस्कोमधील अधिकाऱ्यांनी सांगितलं.
अचानक आला अन् गोळीबार केला
या हल्ल्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु, या प्रकरणाची चौकशी फेमिसाइड (स्त्रीहत्या) अँगलने केली जात आहे.
फेमिसाइड म्हणजेच महिला आणि मुलींना त्या स्त्रीलिंगी असल्यामुळं ठार मारण्याचा गुन्हा, असं अधिकारी म्हणाले.
मेक्सिकोमध्ये अशाप्रकारे लिंग आधारित हिंसाचार अत्यंत सामान्य आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार इथे दररोज 10 महिला किंवा मुलींची त्यांच्या जोडीदारांकडून किंवा कुटुंबातील सदस्यांकडून हत्या केली जाते.
हत्येच्या काही क्षण आधी, व्हॅलेरिया ही झापोपन उपनगरातील तिच्या ब्युटी सलूनमधील एक टेबलवर बसली होती. त्यावेळी ती हातात एक सॉफ्ट टॉय घेऊन लाइव्ह स्ट्रीमिंग करत होती.
काही सेकंदांनंतर तिच्यावर गोळी झाडली गेली आणि तिचा मृत्यू झाला. एका व्यक्तीने लगेचच तिचा फोन उचलून रेकॉर्डिंग थांबवलं.
व्हॅलेरियाला भेटवस्तू देण्याचा बहाण्यानं आलेल्या एका व्यक्तीनं गोळी घालून ठार केलं आहे, असं स्थानिक प्रसारमाध्यमांनी वृत्तात म्हटलं आहे.
राज्याच्या वकिलांनुसार, स्थानिक वेळेनुसार पोलीस सायंकाळी 6.30 वाजता (12:30 जीएमटी) घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी व्हॅलेरियाचा मृत्यू झाल्याचं म्हटलं.
राज्याच्या सरकारी वकिलांनी कोणत्याही संशयिताचं नाव घेतलेलं नाही.
दोन लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स
व्हॅलेरिया मार्क्केझच्या चाहत्यांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर तिचे 200,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
व्हॅलेरिया मार्क्वेझने तिला मिळालेल्या धमक्यांसाठी अधिकाऱ्यांकडे मदतीची विनंती केल्याची कार्यालयात कोणतीही नोंद नसल्याचे झापोपनचे महापौर जुआन जोसे फ्रँजी यांनी सांगितलं.
त्याचबरोबर “फेमिसाइड हे सर्वात वाईट आहे” असंही ते म्हणाल्याचे एएफपी या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
फॉरेन्सिक तज्ज्ञ गोळीबाराची तपासणी करत आहेत, अशी माहिती राज्य अभियोजकांनी दिली आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC