Source :- ZEE NEWS
Donald Trump Inauguration : महासत्ता देश अशी जगभरात ओळख असणाऱ्या अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. देशोदेशीच्या मान्यवरांच्या उपस्थितीत अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ते शपथ ग्रहण करतील. अतिशय महत्त्वाच्या अशा या पदावर विराजमान होण्याची ट्रम्प यांची ही दुसरी वेळ आहे. हा शपथग्रहण सोहळा त्यांच्यासाठी खास असणार आहे. कारण, यावेळी ते शपथ घेतेवेळी आईनं दिलेलं बायबल आणि लिंकन बायबल सोबत बाळगणार आहेत.
1955 मध्ये न्यूयॉर्कच्या जमैकामध्ये फर्स्ट प्रेस्बिटेरियन चर्च इथं प्राथमिक शिक्षणादरम्यान हे बायबल ट्रम्प यांच्या आईनं त्यांना दिलं होतं. या बायबलच्या आतील भागात डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव लिहिलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आईविषयी या गोष्टी माहितीयेत?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आई मेरी अने मक्लाउड हब्रिडिएन या आयलंड ऑफ लुईस इथं लहानाच्या मोठ्या झाल्या. पण, नंतर मात्र त्यांनी न्यूयॉर्क गाठलं. मेरी या त्या हजारो लोकांपैकी एक होत्या ज्या स्कॉटीश नागरिकांनी आर्थिक संकटाची झळ न सोसण्याच्या हेतूनं अमेरिका आणि कॅनडा गाठले होते. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी न्यूयॉर्क गाठत तिथं घरगुती मदतीसाचं काम पाहिलं. मेरी जेव्हा न्यूयॉर्कमध्ये आल्या, तेव्हा त्यांच्याकडे अवघे तीन हजार रुपयेच होते. या संकटावर मात करण्यासाठी त्यांनी जवळपास चार वर्षे मदतनीस, नॅनी अशी कामं केली.
सहा वर्षांनंतर त्यांचं लग्न एका यशस्वी विकासकाशी अर्थात फ्रेडरिक ट्रम्प यांच्याशी झालं.
फ्रेडरिक आणि मेरी यांच्या पाच मुलांपैकी चौथं मुल म्हणजे डोनाल्ड ट्रम्प. मेरी यांची बहीण कॅथरिन कॅनडाहून न्यूयॉर्कला पोहोचली होती. 1930 मध्ये मेरीनंही बहिणीसोबत कामाच्या शोधात लुईस प्रदेश सोडला. न्यूयॉर्कमध्ये एका धनाढ्य कुटुंबाकडे मेरी यांना काम मिळालं. 1929 मध्ये मात्र स्ट्रीट क्रॅशमध्ये अमेरिकेत आर्थिक मंदीचं संकट आलं आणि मेरी यांनी नोकरी गमावली. 1934 मध्ये त्या स्कॉटलंडला गेल्या जिथं त्यांची आणि फ्रेडरिक यांची ओळख होऊन त्या पुन्हा न्यूयॉर्कला परतल्या.
नशीब पालटलं, मेरी आणि फ्रेडरिक ही जोडी क्वीन्स या उच्चभ्रू वस्तीत राहू लागली. घरात धुणीभांडी करणारी एक महिला आता समाजातील एक उच्चभ्रू महिला ठरली होती. मेरी यांच्या दारी महागड्या कार उभ्या होत्या. एक पत्नी असण्यासोबतच त्या पतीच्या व्यवसायामध्येही हातभार लावू लागल्य़ा होत्या. 1991 मध्ये मेरी यांचा एक भीषण अपघात झाला आणि त्यानंतर त्या आजारीच होत्या. पुढे 1999 मध्ये पतीच्या निधनानंतर वर्षभरातच त्यांनीही जगाचा निरोप घेतला.
कधी एकेकाळी जीवनातील कठीण प्रसंगांचा सामना करत आयुष्याला कलाटणी देण्यासाठी प्रचंड मेहनत घेणाऱ्या याच मेरी यांचा मुलगा, अर्थात डोनाल्ड ट्रम्प आजच्या घडीला जगातील एका महासत्ता राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा विराजमान होत आहेत.
SOURCE : ZEE NEWS