Source :- ZEE NEWS

Business Success Story: भारत आणि पाकिस्तान (India Pakistan) या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारं नातं सुरुवातीपासूनच प्रचंड तणावाचं पाहायला मिळालं. सध्याही चित्र वेगळं नाही. भारतावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ला, त्यानंतरच्या सततच्या कुरापती आणि आता भारतानं केलेली कारवाई पाहता, या दोन्ही देशांतील तणावानं संपूर्ण जगाच्या चिंतेत भर टाकली आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. पण, याच तणावाच्या स्थितीत सोशल मीडियावर काही वेगळ्या मुद्द्यांवरही चर्चा सुरू आहे. जिथं एका व्यक्तीनं सर्वांच्याच नजरा वळवल्या आहेत. 

आजारपणावर मात करत आणि प्रचंड महत्त्वाकांक्षा आणि जिद्दीच्या बळावर या व्यक्तीनं व्यवसाय क्षेत्रात इतकी उल्लेखनीय कामगिरी केली, की अनेकांसाठीच ते प्रेरणा ठरले. या व्यक्तीचं नाव आहे रोमेश वाधवानी. 1947 मध्ये म्हणजेच पाकिस्तानची निर्मिती झाली, त्याच वर्षी जन्मलेल्या वाधवानी यांच्या कुटुंबानं कालांतरानं भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. अवघ्या दोन वर्षांच्या वयात त्यांना पोलिओ झाल्याचं निदान झालं आणि जीवनातील खऱ्या आव्हानांचा सामना त्यांनी तिथपासूनच केला. 

आजारपणाला कोण घाबरतं? 

आजारपणामुळं वाधवानी यांनी अनेक शारीरिक अडचणींचा सामना केला. मात्र त्यांनी शैक्षणिक कारकिर्दीत अजिबात माघार घेतली नाही. दैनंदिन जीवनातील आव्हानांवर त्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या बळावर मात केली आणि  Indian Institute of Technology (IIT) मध्ये प्रवेश मिळवला. 

1969 मध्ये वाधवानी यांनी अमेरिका गाठत तिथं त्यांनी पिटर्सबर्ग येथील Carnegie Mellon University मधून शिक्षण पूर्ण केलं. इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग क्षेत्रात त्यांनी मास्टर्स आणि पीएचडीपर्यंतचं शिक्षण घेतलं. जिथं त्यांना या क्षेत्रातील भक्कम पाया रचण्याची संधी आणि मदतही मिळाली. शिक्षणानंतर त्यांनी इंडस्ट्रीअल ऑटोमेशन कंपनी सुरू केली. पुढे एका डेव्हलपमेंट फर्मनं त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी दिली. त्यांच्या फर्मची विक्री तब्बल 9.3 बिलियन डॉलर इतक्या किमतीत झाली. 

सध्याच्या घडीला रोमेश सिंफनी टेक्नोलॉजी ग्रुपचं नेतृत्वं करत असून त्यांच्याअंतर्गत 18 टेक आणि अॅनालिसिस कंपन्या काम करतात. सॉफ्टवेअर, डेटा आणि एआय क्षेत्रात या कंपन्या सक्रिय आहेत. वाधवानी यांचा हा उद्योगसमूह 2.8 बिलियन डॉलर इतकी वार्षिक उलाढाल करतो. सध्याच्या घडीला अमेरिकेचं नागरिकत्वं असणाऱ्या वाधवानी यांनी कायमच नवउद्यमी विचारसरणीला वाव दिला आहे. स्टार्टअप आणि शैक्षणिक उपक्रमांना त्यांनी कायम पाठिंबा दर्शवला आहे. कमाईच्या बाबतीत आघाडीवर असणारे रोमेश वाधवानी फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजोपयोगी कामांमध्येही हातभार लावतात. जिथं उद्योगनिर्मिती आणि नव्या कल्पनांना सातत्यानं वाव दिला जातो. 

SOURCE : ZEE NEWS