Source :- BBC INDIA NEWS

विराट कोहली

फोटो स्रोत, ANI

12 मे 2025, 12:04 IST

अपडेटेड 1 तासापूर्वी

क्रिकेटर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत विराटनं ही माहिती दिली.

विराटनं 20 जून 2011 मध्ये कसोटीत पदार्पण केलं होतं आणि गेल्या चौदा वर्षांत 123 सामन्यांमध्ये त्यानं 9,230 धावा केल्या आहेत आणि तीस शतकं ठोकली.

आता मात्र त्यानं क्रिकेटच्या या फॉरमॅटमधून आपली बॅट म्यान केली आहे. गेल्या वर्षीच विराटनं जवळपास 14 वर्षे टी-20 खेळल्यानंतर 29 जून 2024 रोजी निवृत्ती जाहीर केली.

विराटनं बीसीसीआयला त्याविषयी कळवल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. अखेर आता स्वतः विराटनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे.

निवृत्ती घेताना विराटनं काय म्हटलं?

“मी पहिल्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये बॅगी ब्लू रंगाची टोपी परिधान केली, त्याला आता 14 वर्षे झाली आहेत. खरं सांगायचं तर, या फॉरमॅटमध्ये मी इथवर प्रवास करू शकेन याची मी कधीच कल्पनाही केली नव्हती.

“कसोटी क्रिकेटनं माझा कस पाहिला, मला घडवले आणि मला असे धडे दिले जे मी आयुष्यभर सोबत राहतील.

“पांढऱ्या वेशात क्रिकेट खेळणं अतिशय खास असतं. शांतपणे करावी लागणारी मेहनत, दिवसभर चालणारा खेळ, काही लहानसे क्षण जे इतर कुणी पाहातही नाहीत पण तुमच्या मनात कायमचे कोरले जातात.

“आता या फॉरमॅटपासून वेगळं होतो आहे, निर्णय सोपा नाही – पण योग्य वाटतो आहे. मी या खेळाला माझं सर्वस्व दिलं आहे आणि त्यानं मला इतकं काही दिलं आहे ज्याची मी अपेक्षाही करू शकलो नसतो.

“कसोटी क्रिकेटपासून दूर जाताना माझ्या मनात कृतज्ञता भरली आहे – खेळाविषयी, ज्यांच्यासोबत मैदानावर एकत्र खेळलो त्यांच्याविषयी आणि यात माझे साक्षीदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीविषयी मला कृतज्ञता वाटते. मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसतमुखाने पाहिन

#269, सायनिंग ऑफ”

विराट हा भारताचा 269 वा कसोटी खेळाडू आहे. हा नंबरही कायम विराटचाच राहणार आहे.

Virat Kohli performance

एकेकाळी ‘बिगडा हुआ बेटा’ म्हणून हिणवला गेलेला विराट, भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातला ताईत आहेच, पण जगभरातही त्याचे चाहते विखुरले आहेत.

पण गेलं वर्षभर तो फॉर्मसाठी झगडतही होता.

विराटनं का घेतली निवृत्ती?

राजालाही पायउतार व्हावं लागतं. विराटचं कसोटीतून निवृत्त होणंही तसं अनपेक्षित नव्हतं. पण तरीही त्यानं आत्ता का निवृत्ती जाहीर केली, असा प्रश्न विचारला जातो आहे.

प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहितात, “मला विराट कोहलीनं एका भरलेल्या स्टेडियममध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेताना पाहायला आवडलं असतं. पण ते होणार नसल्यामुळे आता आपण जिथे कुठे असू, तिथून टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करुयात. ट्वेन्टी20 क्रिकेटवर पोसून वाढलेल्या एका पिढीला त्यानं कसोटी क्रिकेट ‘कूल’ आहे असं दाखवलं, त्याविषयी आकांक्षा वाढवल्या. आणि त्यासाठी खेळ त्याचा आभारी राहील. “

विराट कोहली

फोटो स्रोत, Getty Images

“क्रिकेट हा एक निर्दयी खेळ आहे. क्रिकेटचा इतिहास माहिती असणाऱ्यांना हे पक्कं ठाऊक आहे की एकेकाळी क्रिकेटवर अधिराज्य गाजवलेल्या महान खेळाडूंच्या कारकिर्दीचा शेवट हा त्रासदायकच असतो.” असं वरिष्ठ क्रीडा पत्रकार विमल कुमार यांनी विराट आणि रोहितच्या कामगिरीचं विश्लेषण करताना म्हटलं होतं.

विराट आता 36 वर्षांचाही झाला आहे. त्यामुळे निवृत्तीचा निर्णय अचानक जाहीर झाल्यानं चाहत्यांना वाईट वाटत असलं तरी या निर्णयाचं आश्चर्य वाटत नाही.

विराट तसा आजही फिट आहे आणि धावा काढण्यासाठी धावताना त्याची चपळाई युवा खेळाडूंनाही लाजवेल अशी असते. पण कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं मोठी खेळी करणं अलीकडे दुर्मिळ होऊ लागलं होतं.

विराटसाठी त्याच्या सवयीच्या ‘विराट’ धावसंख्या दुरापास्त झाल्यासारखं गेल्या वर्षी दिसलं.

नोव्हेंबर 2024 मध्ये कोहलीनं पर्थ कसोटीत शतक ठोकलं होतं. पण बाकी वर्षभरातील त्याची कामगिरी साहजिकच विराटच्या लौकिकाला साजेशी नव्हती.

जानेवारी 2024 पासून विराटनं 11 कसोटी सामन्यांमध्ये 23.15 च्या सरासरीनं केवळ 440 धावा केल्या होत्या.

भारतीय संघ आता जूनमध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे आणि तिथे पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. विराट त्या मालिकेत खेळून निवृत्ती घेईल असं काही जाणकारांना वाटत होतं. पण त्यानं आधीच आपला निर्णय जाहीर केला आहे, कुठलाही गाजावाजा न करता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC