Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
डास जगातील सर्वात घातक कीटक मानले जातात. कारण ते मलेरिया, डेंग्यू यांसारखे प्राणघातक आजार पसरवतात.
मलेरिया हा त्यातला एक जीवघेणा आजार आहे, जो दरवर्षी लाखो लोकांचे प्राण घेतो. त्यात बहुसंख्य लहान मुलं असतात. त्यामुळे डासांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
मलेरिया रोखण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक नवा दृष्टिकोन स्वीकारला आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीने मच्छरांमध्ये मलेरिया परजीवी नष्ट करण्यासाठी दोन प्रभावी औषधांचा शोध लावला आहे.
या शोधामुळे मलेरिया नियंत्रणात आणण्याची आशा निर्माण झाली आहे.
अमेरिकन संशोधकांचं म्हणणं आहे की, डासांमध्ये संसर्ग संपवण्यासाठी त्यांना मलेरियाची औषधं द्यायला हवीत. असं केल्यानं ते या रोगाचा प्रसार करू शकणार नाहीत.
मादी डास चावल्याने मलेरियाचे परजीवी म्हणजेच पॅरासाइट्स माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. या आजारामुळे दरवर्षी जगभरात सुमारे 6 लाख लोकांचा मृत्यू होतो. यात बहुसंख्य लहान मुलांचा समावेश असतो.
डासांमधील मलेरियाचे परजीवी नष्ट करण्याऐवजी कीटकनाशकांचा म्हणजेच पेस्टिसाइड्सचा वापर केला जातो.
परंतु, हार्वर्ड युनिव्हर्सिटीने अशा दोन औषधांचा शोध लावला आहे जे डासांनाच मलेरियाच्या परजीवींपासून मुक्त करू शकतात. तसेच, या दोन्ही औषधांच्या मिश्रणाचा थर मच्छरदाण्यांवर चढवण्याचे एक दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
रासायनिक औषधांचा प्रतिकार करणाऱ्या डासांवर उपचार
मलेरियापासून बचावाचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे मच्छरदाणीचा वापर. हे मलेरिया पसरवणाऱ्या डासांपासून रात्री संरक्षण करते.
उच्च धोका असलेल्या मलेरियाग्रस्त भागांमध्ये राहणाऱ्या मुलांना वाचवण्यासाठी लसीकरणाचा सल्लाही दिला जातो.
काही मच्छरदाण्यांवर कीटकनाशकही लावले जातात. त्यामुळे डास मरतात.

फोटो स्रोत, Getty Images
पण अनेक देशांमध्ये या कीटकनाशकांचा डास प्रतिकार करतात. म्हणजे त्यांच्यावर याचा काही परिणाम होत नाही आणि हे रसायन आता पूर्वीइतके प्रभावी राहत नाही.
हार्वर्डच्या संशोधक डॉ. अलेक्झांड्रा प्रॉब्स्ट म्हणतात, “यापूर्वी आम्ही डासांमधील परजीवींना थेट मारण्याचा प्रयत्न केला नव्हता. कारण आम्ही फक्त डासांना मारत होतो.”
तथापि, त्या म्हणतात की, हा दृष्टिकोन ‘आता काम करत नाही’.
डासांवर औषधांचा वापर करण्यापूर्वी, संशोधक मलेरियाच्या डीएनएमध्ये संभाव्य कमकुवत बिंदू काय असू शकतात याचा अभ्यास करत आहेत.
चाचणी पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल?
योग्य औषध शोधण्यासाठी, संशोधकांनी संभाव्य औषधांची एक मोठी यादी तयार केली आणि त्यापैकी 22 औषधांची निवड केली. यानंतर, मलेरियाचे परजीवी असलेल्या मादी डासांवर त्यांची चाचणी केली.
‘नेचर’ या विज्ञान मासिकात प्रकाशित झालेल्या या संशोधनात शास्त्रज्ञांनी परजीवींना 100 टक्के नष्ट करणाऱ्या दोन सर्वात प्रभावी औषधांचा उल्लेख केला आहे.
या औषधांचा मच्छरदाणीसारख्या वस्तूंवर प्रयोग करण्यात आला.
डॉ. प्रॉब्स्ट म्हणाले, “मच्छरदाणीच्या संपर्कात आल्यानंतर डास जगले, मात्र त्यांच्यातील परजीवी मेले आणि त्यामुळे हे डास मलेरियाचा पुढे प्रसार करू शकले नाहीत.”
त्यांनी या दृष्टिकोनाला अद्वितीय मानलं आहे. यामध्ये डासांना मारण्याऐवजी परजीवींना लक्ष्य करण्यात येतं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांचं म्हणणं आहे की, मलेरियाच्या परजीवींमध्ये औषधांचा प्रतिकार करण्याची शक्यता कमी आहे. कारण प्रत्येक संक्रमित व्यक्तीत हे अब्जावधींच्या संख्येत असू शकतात, तर प्रत्येक डासात त्यांची संख्या पाचपेक्षा कमी असते.
संशोधकांचं म्हणणं आहे की, मच्छरदाणीवर या औषधाचा प्रभाव किमान एक वर्षापर्यंत राहतो. यामुळे हे रसायन औषधांच्या तुलनेत स्वस्त आणि दीर्घकालीन कार्यक्षम पर्याय बनतो.
समस्या सोडवण्याचा हा दृष्टिकोन प्रयोगशाळेत प्रभावी ठरलेला आहे. मलेरियाविरोधी जाळ्या खरोखर प्रभावी आहेत की नाही हे शोधण्यासाठी इथिओपियामध्ये प्रयोगाचा पुढचा टप्पा नियोजित आहे.
ते किती प्रभावी आहे, याचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी किमान 6 वर्षे लागतील.
परंतु मच्छरदाणीवर मलेरियाविरोधी औषधं आणि कीटकनाशकं वापरण्याचा दृष्टिकोन स्वीकारला जाईल, जेणेकरून दोन्हीपैकी एक पद्धत काम करेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC