Source :- BBC INDIA NEWS

ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचे वडील शंभूदयाल शुक्ला आणि आई आशा शुक्ला

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील सीतापूर रोडवर त्रिवेणी नगर आहे. इथे राहणारे शंभूदयाल शुक्ला सध्या खूप आनंदी आहेत. त्यांनी कधीही असा विचार केला नव्हता की त्यांच्या मुलामुळे त्यांचं नाव संपूर्ण देशात होईल.

शंभूदयाल शुक्ला त्यांच्या मुलाच्या कामगिरीबाबत आनंदी होत होते तेव्हा त्यांच्या बाजूला बसलेल्या त्यांच्या पत्नी आशा शुक्ला यांना देखील त्यांच्या मुलाच्या अंतराळ प्रवासाबाबत अभिमान वाटत होता.

भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला लवकरच देशाचे दुसरे अंतराळवीर बनणार आहेत. ते 10 जून रोजी अमेरिकेतील अंतराळ केंद्रातून 14 दिवसांच्या मोहिमेवर जाणार आहेत.

त्यांचे वडील शंभूदयाल शुक्ला यांनी बीबीसीला सांगितलं की, जेव्हा त्यांचा मुलगा सैन्यात भरती होण्याची तयारी करत होता, तेव्हा त्यांना त्यांच्या मुलाच्या स्वप्नाची माहिती नव्हती. खरंतर, शंभूदयाल यांना शुभांशु यांनी नागरी सेवेत सामील व्हावं असं वाटत होतं आणि त्याने आयएएस अधिकारी व्हावं अशी त्यांची इच्छा होती.

शुभांशु शुक्लांचं बालपण कसं होतं?

ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे उत्तर प्रदेशातील लखनौचे रहिवासी आहेत. त्यांच्या घरी त्यांचे पालक आणि दोन मोठ्या बहिणी राहतात. त्यांची एक बहीण लखनौमध्ये शिक्षिका आहे आणि दुसरी दिल्लीमध्ये राहते.

शुभांशु शुक्ला यांनी लखनौमधील सिटी मॉन्टेसरी स्कूलच्या अलीगंज शाखेतून 12वी पर्यंत शिक्षण घेतले आहे.

शुभांशु शुक्लांचे वडील बीबीसीला म्हणाले, “त्याने एनडीएचा फॉर्म भरल्याचं आम्हाला माहिती नव्हतं. एके दिवशी त्याच्या मित्राने फोन केला, त्यावेळी आमच्या घरी लँडलाइन फोन होता. मी फोन उचलला तेव्हा त्याच्या मित्राला कळले नाही की नेमका फोन कोणी उचलला आहे. त्यानंतर तो मित्र म्हणाला की अभिनंदन तुझी एनडीएमध्ये निवड झाली आहे.”

शुभांशु शुक्ला यांचा एनडीएमधला प्रवास सांगताना ते भावुक झाले होते.

ते म्हणाले, “त्यानंतर एसएसबी आणि प्रशिक्षण झालं. मी त्याच्यासोबत कुठेही गेलो नाही. जेव्हा तो प्रशिक्षणासाठी जात होता, तेव्हा मी त्याला चारबाग स्टेशनवरून ट्रेनमध्ये बसवलं.”

शुची मिश्रा

शुभांशु अशा अंतराळ मोहिमेवर जातील असं त्यांच्या कुटुंबातील कुणालाही वाटलं नव्हतं.

त्यांची मोठी बहीण शुची मिश्रा म्हणतात, “आम्हाला फक्त असं वाटलं होतं की तो एअर चीफ मार्शल होईल.”

शुभांशुचे वडील म्हणतात की, “त्याने कधीही आम्हाला त्याच्या मनात काय आहे ते सांगितलेलं नाही. या मोहिमेसाठी निवड झाल्यानंतर चार दिवसांनी त्याने आम्हाला सांगितलं.”

शंभूदयाल शुक्ला यांना त्यांच्या मुलाचा अभिमान आहे आणि आता त्यांना त्यांचा मुलगा नागरी सेवेत सामील न झाल्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही.

ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला 39 वर्षांचे असून उत्तर प्रदेशातील लखनौचे रहिवासी आहेत.

शुभांशु शुक्ला हे भारतीय वायुसेनेत फायटर पायलट आहेत. 2006 मध्ये ते भारतीय वायुसेनेत कार्यरत झाले होते. त्यांना 2000 तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे.

भारतीय वायुसेनेत असणाऱ्या सुखोई-30 एमकेआय, मिग-21एस, मिग-29एस, जॅग्वार, हॉक्स डोर्नियर्स आणि एन-32 सारखी लढाऊ विमानं चालवण्याचा अनुभव शुक्लांच्या गाठीशी आहे.

ग्रुप कॅप्टन शुक्ला यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि अमेरिकन अंतराळ संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (नासा) यांच्या संयुक्त मोहिमेसाठी निवड झाली आहे.

शुभांशु यांच्या आई आशा शुक्ला म्हणाल्या, ” तो लहानपणापासूनच खूप मेहनती होता. त्याने कधीही काहीही मागितले नाही. घरी जे बनवलं जायचं ते तो खायचा आणि त्याला जे मिळेल त्यात समाधानी असायचा.”

राकेश शर्मा यांच्यानंतरचे दुसरे अंतराळवीर

ग्रुप कॅप्टन शुक्ला या मोहिमेअंतर्गत अंतराळात गेले तर गेल्या 40 वर्षांत ही कामगिरी करणारे ते दुसरे भारतीय अंतराळवीर ठरतील.

याआधी 1984 मध्ये राकेश शर्मा सोव्हिएत युनियनच्या अंतराळ मोहिमेअंतर्गत अंतराळात गेले होते.

एक्सिओम या अंतराळ कंपनीची ही चौथी अंतराळ मोहीम आहेत. तिचं नाव ‘एक्सिओम-4’ असं आहे.

2016 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी अमेरिकन आहे. ही कंपनी व्यावसायिकदृष्ट्या अंतराळ प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी काम करते. ही कंपनी सरकारी आणि खाजगी अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्याचे काम करते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, ANI

शुभांशु शुक्ला यांच्या बहीण शुची मिश्रा म्हणतात, “आम्हाला या मोहिमेची भीती वाटत नाही. ती वेळेवर सुरू होईल आणि यशस्वीरीत्या पूर्ण होईल असा आमचा विश्वास आहे.”

शुभांशु शुक्ला यां अवकाशात घेऊन जाणारे अंतराळयान स्पेसएक्स रॉकेटद्वारे प्रक्षेपित केले जाईल. स्पेसएक्स ही इलॉन मस्क यांच्या मालकीची कंपनी आहे.

हे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचणार आहे आणि शुभांशु शुक्ला यांच्यासोबत पोलंड, हंगेरी आणि अमेरिकेचे अंतराळवीरही असतील.

2023 साली झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यात या मोहिमेबाबत चर्चा करण्यात आली होती.

इस्रो आणि नासाची भूमिका

या मोहिमेसाठी इस्रोने 2024 साली ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि ग्रुप कॅप्टन बालकृष्णन नायर यांची निवड केलेली होती. शुक्ला यासाठी निवडलेले प्रमुख (प्राईम) अंतराळवीर होते आणि त्यांना बॅकअप म्हणून नायर यांची निवड करण्यात आली होती.

शुभांशु काही कारणांमुळे या मोहिमेवर जाऊ शकले नाहीत तर त्यांच्या जागी नायर यांना पाठवण्यात येणार होतं.

ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला

फोटो स्रोत, AXIOM SPACE

भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (ISRO) जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये असं म्हटलं आहे की, “इस्रो आणि नासाच्या संयुक्त कार्यक्रमाला पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. इस्रोच्या मानवी अंतराळ उड्डाण केंद्राने (एचएसएफसी) त्यांच्या पुढील कार्यक्रमासाठी नासाची मान्यता असलेल्या एक्सिओम-4 सोबत अंतराळ उड्डाण करार केला आहे. या अभियानाचं नाव एक्सिओम-4 असं असेल.”

शुभांशु शुक्ला यांच्या प्रदीर्घ प्रशिक्षण आणि कठोर परिश्रमानंतर अखेर 10 जून रोजी ते अंतराळ प्रवासाला सुरुवात करतील.

या उड्डाणाची शेवटची तयारी सुरू आहे आणि शुभांशु शुक्ला यांच्या कुटुंबातील प्रत्येकजण त्याबद्दल उत्सुक आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC