Source :- ZEE NEWS

33588 Crore INR Gold Mine: तुम्हाला कधी रस्त्यावर एखादी नोट सापडली आहे का? तुम्हाला असं अचानक असं काहीतरी सापडल्याचा अनुभव असेल तर ही बातमी वाचून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. फ्रान्समधील एका व्यक्तीला एक जॅकपॉट लागला. या व्यक्तीला त्याच्या मालकीच्या जमिनीखाली चक्क एक सोन्याची खान सापडली. आपल्या मालकीच्या जमीनीवरुन फेर फटका मारत असताना अचानक त्याला मातीखाली काहीतरी चमकल्यासारखं वाटलं. त्याने हाताने ही वस्तू उचलून पाहिली असता ते सोनं होतं. मात्र फ्रान्समधील एका कायद्यामुळे या व्यक्तीच्या हाती लागलेला जॅकपॉट थेट सरकारी तिजोरीत जमा झाला. 

कोणासोबत आणि कुठे घडला हा प्रकार?

फ्रान्समधील ऑव्हर्गेन येथे राहणाऱ्या 52 वर्षीय शेतकऱ्यासोबत हा सारा प्रकार घडला. या शेतकऱ्याचं नाव मिचेल ड्युपोंट असं आहे. मिचेलला त्याच्या मालकीच्या जमिनीखाली सोनं असल्याचा शोध लागला. पाहता पाहता ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. एका सामान्य शेतकऱ्याला घरामागील बगिचामध्ये सोनं सापडल्याचं सरकारी अधिकाऱ्यांच्या कानावर पडल्यानंतर हे अधिकारीही या शेतकऱ्याच्या घरामागील बगीचामध्ये दाखल झाले. खरोखरच हे सोनं असल्याचं निश्चित झालं. पण जमीन या व्यक्तीच्या मालकीची असली तरी सोन्यावर त्याला हक्क सांगता आला नाही. 

33588 कोटी रुपयांचं सोनं

या साऱ्यामध्ये थक्क करणारी बाब म्हणजे या व्यक्तीच्या घरामागील अंगणात असलेल्या बगीचात सापडलेल्या सोन्याची किंमत 4 बिलियन अमिरेकी डॉलर्स इतकी आहे. ही रक्कम भारतीय चलनानुसार 33588 कोटी रुपये इतकी होती. मात्र या एवढ्या रक्कमेपैकी एक पैसाही मिचेलला मिळणार नाही. यामागील कारण म्हणजे फ्रान्समधील कायदा! येथील खाणकामासंदर्भातील कायद्यानुसार, जमिनीची मालक असली तरी सब सॉइल म्हणजेच जमिनीखालील संपत्ती ही सरकारच्या मालकीची असते. त्यामुळेच जमिनीखाली सापडलेली कोणतीही गोष्ट येथील व्यक्तींना विकता येत नाही, परस्पर तिचा व्यवहार करता येत नाही किंवा त्यावर मालकी हक्क सांगता येत नाही. 

भारतातही असाच नियम; अमेरिकेत मात्र वेगळा नियम

आता माचेल नावाच्या शेतकऱ्याने सोनं सापडल्याचं त्याने जाहीर केलं नसतं, सरकारला कळवलं नसतं तरी याचा भोभाटा झाला असता आणि तो लपून छपून हे सोनं विकताना सापडला असता तरी अधिक कठोर कारवाई झाली असती. भारतामध्येही असाच नियम आहे. जमिनीखाली सापडलेली संपत्तीवर सरकारची मालकी असते. अमेरिकेत मात्र मालकीच्या जमिनीखाली सापडलेल्या संपत्तीवर जमिनीच्या मालकाला हक्क सांगता येतो. म्हणूनच मिचेल अमेरिकेत असता तर तो अब्जाधीश झाला असता.

दोन गट पडले

विशेष म्हणजे हे सोनं जमिनीमधून बाहेर काढताना त्याचा पर्यावरणावर परिणाम होणार नाही यासंदर्भात सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे. त्यामुळे याला जास्त कालावधी लागेल असंही सांगितलं जात आहे. ही बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. या ठिकाणी खाणकाम केलं तर पर्यावरणावर परिणाम होईल असं अनेकांचं म्हणणं आहे. तर काहींनी हे सोनं मिळवल्यास हा भाग अधिक संपन्न होईल असं म्हटलं आहे. 

SOURCE : ZEE NEWS