Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
अलीकडेच माझ्या नाकावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर, माझ्या ॲलर्जीपासून ते माझ्या मानसिक आरोग्यापर्यंतच्या माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत सुधारणा झाल्यासारखं वाटतं.
हा योगायोग असू शकत नाही. नाकाद्वारे श्वासोच्छवास करणं ही तुमच्या चेहऱ्यावर लपवलेली एक महाशक्तीच आहे, असं मी म्हणतो.
मला आठवतंय, मला प्रत्येक श्वास घेणं म्हणजे पाण्याखाली पोहण्याची तयारी करण्यासारखं वाटायचं. एक तीव्र दाबाची हवा, जी माझ्या फुफ्फुसांमध्ये कधीच भरून येत नव्हती.
बऱ्याचवेळा मी नाकात एक हलकीशी शिट्टी घेऊन फिरायचो. त्या शिट्टीचा आवाज कोणीही ऐकू नये अशीच प्रार्थना मी करायचो. यातील सर्वात वाईट समस्या ही होती की ती एक किरकोळ समस्या किंवा अपंगत्व होतं, हे लोकांना खरंच वाटायचं नाही.
माझ्या नाकाच्या क्रूर रचनेमुळे माझं नाक साफ करणं शारीरिकदृष्ट्या अशक्य होतं. श्वास घेताना हवा सतत जोरात ओढावी लागायची आणि त्याचा आवाज व्हायचा.
माझ्या सुस्थितीत नसलेल्या सेप्टममुळे (नाकाला दोन भागात विभाजित करणारा भाग) माझं आयुष्य एकप्रकारे शाप ठरलं होतं. माझी उजवी नाकपुडी बंद पडायची. त्यामुळे अॅलर्जीचा थोडासाही धोका जाणवल्यावर माझं तोंडावाटे श्वास घेणं बंद व्हायचं.
नाकाच्या समस्येमुळे मला स्लीप ॲप्नियाचा त्रास होऊ लागला होता. यात रात्री झोपेत श्वसनक्रियेत अडथळा निर्माण होतो.
यामुळे श्वासोच्छवासात अडथळा निर्माण झाल्यामुळे तुम्ही रात्री झोपेतून अनेकवेळा जागं होता. त्यामुळे कोणत्याही कारणामुळे तुमचा मृत्यू होण्याची शक्यता असते. मात्र कित्येक दशकं असा त्रास सहन केल्यानंतर डॉक्टरांनी मला शस्त्रक्रिया करण्यास सांगितलं.
शस्त्रक्रियेद्वारे माझ्या नाकाचं सेप्टम जे सुस्थित नव्हतं म्हणजे सरळ नव्हतं, त्याला सरळ केलं जाणार होतं आणि माझे टर्बिनेट्स (हाडांची रचना जी त्वचेनं झाकलेली असते आणि तुम्ही श्वास घेताना हवेला नियंत्रित करत असते) म्हणजे नाकातील ऊती कमी केल्या जाणार होत्या, ज्या असल्याचं मला माहितही नव्हतं.
मी काहीही करण्यास तयार होतो. 3 जानेवारी 2025 ला माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

एक महिन्यानं बरा झाल्यानंतर, माझ्याकडे एक नव्यानं काम करणारं नाक होतं. पहिल्यांदाच मी दोन्ही नाकपुड्यांद्वारे स्वच्छ आणि खोलवर श्वास घेऊ शकलो. माझ्या लक्षात आलं की नाकानं श्वास घेणं ही प्रचंड आनंददायी बाब आहे.
ज्याचा अनुभव मी आता शक्य असेल तेव्हा घेऊ शकतो. शस्त्रक्रियेमुळे माझा स्लीप अॅप्नियाचा त्रास बरा झाला नाही, मात्र त्यात सुधारणा झाली. शस्त्रक्रियेमुळे इतरही विविध चांगल्या गोष्टी घडल्या. नाकातून श्वास बाहेर सोडण्याचे काही आश्चर्यकारक फायदे असल्याचंही लक्षात आलं.
ज्याचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही. किंबहुना नाकाद्वारे श्वसन केल्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यात देखील सुधारणा होऊ शकते.
तुमचा स्वत:चा एअर फिल्टर
जॅकलिन कॅलँडर, सॅन फ्रान्सिस्कोमधील कॅलिफोर्निया विद्यापीठातील कान, नाक आणि घशाच्या डॉक्टर आहेत. त्यांच्या मते, नाकाद्वारे श्वास घेण्याचा सर्वात स्पष्ट फायदा टर्बिनेट्सपासून होतो.
त्या म्हणतात, “हवेत उबदारपणा आणि आर्द्रता आणण्यासाठीच्या क्रियेचे ते प्राथमिक मध्यस्थ आहेत. ही बाब खूपच महत्त्वाची आहे. त्याचबरोबर ते फिल्ट्रेशन सिस्टम म्हणूनदेखील काम करतात.”
तुम्या नाकावरील केसांसह, खूप परिश्रम करणारे टर्बिनेट्स धूळ, जिवाणू, विषाणू आणि इतर बऱ्याच गोष्टींची गाळणी करतात. मात्र तोंडाद्वारे श्वास घेतल्यामुळे हा फायदा मिळणार नाही. म्हणजेच तोंडानं श्वास घेणं तितकं आरोग्यदायी नसतं.
जॅकलिन कॅलँडर म्हणतात, “ते तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी संरक्षणाची पहिली फळी असू शकतात.”
मात्र फक्त तुमच्या नाकाद्वारे श्वास घेण्याचं महत्त्व लक्षात घेणं पुरेसं नाही. तोंडाद्वारे श्वास घेण्याचे काही परिणाम होतात.

फोटो स्रोत, Serenity Strull/ BBC
अॅन केर्नी, स्टॅनफोर्ड विद्यापीठातील वैद्यकीय केंद्रात स्पीच-लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आहेत. अॅन झोपेशी संबंधित आणि गिळण्याशी संबंधित समस्यांचा अभ्यास करतात. त्या म्हणतात, “तोंडाद्वारे श्वास घेण्याचा तोंडाच्या आरोग्याच्या समस्यांशी संबंध असल्याचं दाखवणारं बरंच संशोधन आहे.”

तोंडावाटे श्वास घेतल्यानं तोंडातील अॅसिडिटी आणि कोरडेपणा वाढतो. त्याचा संबंध दातांमधील खनिजांचं प्रमाण कमी होणं आणि हिरड्यांच्या आजाराशी असतो.
वाढत्या संशोधनातून असं दिसून आलं आहे की लहानपणी तोंडावाटे श्वास घेतल्यामुळे तुमच्या दातांच्या आणि जबड्याच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दात वाकडे होतात आणि अगदी तुमच्या चेहऱ्याचा आकारदेखील वाढतो.
केर्नी म्हणतात, “ही सोपी गोष्ट आहे. तुमचं नाक श्वसनासाठी आहे आणि तुमचं तोंड खाण्यासाठी.”
ज्यांना सेप्टमची गंभीर समस्या आहे किंवा नाकातून श्वास घेण्यास अडथळा येतो, त्यांच्यासाठी नाकावाटे श्वास घेणं हा पर्याय नाही. मात्र केर्नी म्हणतात की तोंडानं श्वास घेणारे अनेक परिस्थितीत नाकाद्वारे श्वास घेऊ शकतात.
केर्नी म्हणतात, “पहिल्या वेळेस ते सोयीचं नसेल. तोंडावाटे श्वास घेण्याऐवजी नाकावाटे श्वास घेणं हा एक जळवून घेण्याचा बदल असू शकतो.” त्या पुढे म्हणतात की नाकावाटे श्वास घेतल्यानं प्रत्येक श्वासाबरोबर फायदे दिसून येतात.
रात्रीच्या वेळचा श्वासोच्छवास आणि त्याचे परिणाम
केर्नी म्हणतात, “बहुतांश निरोगी लोक जेव्हा झोपतात, तेव्हा नाकावाटे श्वास घेतात. मात्र काहीजण रात्रीच्या वेळी हवेसाठी तोंड उघडतात. ही चांगली गोष्ट नाही. हे जिभेच्या स्थितीशी निगडीत आहे.”
केर्नी म्हणतात की, तुम्ही स्वत:देखील हे अनुभवू शकतो. जेव्हा तुमचे तोंड बंद होतं, तेव्हा तुमच्या जिभेचे टोक तुमच्या तोंडाच्या वरच्या भागावर दाबून ठेवलं जाण्याची आणि जिभेचा मागचा भाग शिथिल असण्याची जास्त शक्यता असते.
त्यामुळे तुमची श्वासनलिका उघडली जाते. मात्र आता एका सेकंदासाठी वाचणं थांबवा, तुमचं तोंड उघडं राहू द्या आणि तुमच्या चेहऱ्यावरील स्नायू शिथिल करा. तुमच्या लक्षात येईल की तुमची जीभ तुमच्या घशाकडे वळते आहे. विशेषकरून जर तुम्ही तुमचं डोकं मागच्या बाजूला झुकवलं तर.
“त्यामुळे हवेचा प्रवाह मर्यादित होऊ शकतो आणि त्यातून अडथळा येऊ शकतो,” असं केर्नी म्हणतात. तुम्ही हे करून पाहिल्यावर तुम्ही श्वास घेतल्यास तुम्हाला घोरण्यासारखा आवाज ऐकू येईल.
ज्या लोकांच्या नाकात अडथळा किंवा समस्या असते ते झोपल्यावर तोंडावाटे श्वास घेतात. ही गोष्ट स्लीप अॅप्नियासारखी समस्या निर्माण होण्यास कारणीभूत ठरते. ही समस्या अंदाजे एक अब्ज लोकांना होते. काही देशांमधील 50 टक्के लोकांना ही समस्या असते.

फोटो स्रोत, Getty Images
स्लीप अॅप्नियामुळे तुमच्या आयुष्याची गुणवत्ता घसरते. परिस्थिती खूपच वाईट झाली तर त्यामुळे अकाली मृत्यू देखील होऊ शकतो.
जरी तुम्हाला स्लीप अॅप्नियाची समस्या नसेल तरी रात्रीच्या वेळेस तोंडावाटे श्वास घेतल्यानं घोरण्याची समस्या उद्भवू शकते आणि वर सांगितलेले सर्व तोटे होऊ शकतात.
मात्र इंटरनेटवर आरोग्य आणि वेलनेस इन्फ्लुएन्सर्स यासाठी एक वादग्रस्त उपाय सांगत आहेत. तो म्हणजे माऊथ टेप. ते ऐकल्यावर जसं वाटतं तसंच असतं. त्यात तुमचं तोंड बंद राहण्यासाठी तुम्ही टेपचा एक तुकडा वापरता.
या सिद्धातांत, झोपल्यावर तुम्ही स्वत:ला नाकावाटे जबरदस्तीनं श्वास घ्यायला भाग पाडता. मात्र काही तज्ज्ञ यासंदर्भात इशारा देतात की त्याचे काही गंभीर धोके आहेत.
केर्नी यांना तोंडावर टेप लावणं योग्य वाटतं मात्र त्या म्हणतात की त्यामुळे काहीजणांसाठी श्वास घेणं अधिक कठीण होऊ शकतं. तुम्हालादेखील तीच समस्या आहे की नाही हे जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणं. डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय ही गोष्ट घरी करून पाहू नका.
“जर तुम्ही घोरत असाल, नाकावाटे श्वास घेण्यास तुम्हाला त्रास होत असेल किंवा तुम्हाल स्लीप अॅप्निया आहे असं वाटत असेल तर तुम्ही कान, नाक आणि घशाच्या डॉक्टरचं मार्गदर्शन घेण्याची आवश्यकता आहे,” असं त्या म्हणतात.
माऊथ टेपचे धोके काय आहेत?
काहीजण झोपल्यावर तोंडावाटे श्वास घेतात. ते ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्नियासारख्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. तोंडाला टेप लावून नाकावाटे श्वास घेण्यास भाग पाडल्यानं काहीजणांना त्याचा उपयोग होऊ शकतो. मात्र आतापर्यंत यावर पुरेसं संशोधन झालेलं नाही. काही वेळा यामुळे ती समस्या आणखी गंभीर होऊ शकते.
“जर तुम्हाला मध्यम स्वरुपाचा किंवा गंभीर स्लीप अॅप्निया असेल, तर रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही श्वास घेण्यासाठी जेव्हा तोंड उघडता ते तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सामान्य करण्यासाठी महत्त्वाचं आहे. अशा लोकांना मी सहसा माऊथ टेप न वापरण्याचा सल्ला देते,” असं जॅकलिन कॅलँडर म्हणतात. त्या सॅन फ्रान्सिस्कोमधील कॅलिफोर्निया विद्यापीठातील कान, नाक आणि घशाच्या डॉक्टर आहेत.
“असे बरेच रुग्ण आहेत ज्यांना ही समस्या असल्याची कल्पना नसते,” असं त्या म्हणतात. त्यामुळे माऊथ टेप वापरण्याआधी डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणं महत्त्वाच ठरतं.
माऊथ टेप वापरण्याची पद्धत अजूनही बाल्यावस्थेतच आहे. कान, नाक आणि घशाचे अनेक डॉक्टर म्हणतात की त्याच्या प्रभावीपणाबद्दल किंवा सुरक्षिततेबद्दल अद्याप पुरेसं संशोधन झालेलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
सुरुवातीच्या काही अभ्यासातून असं दिसून येतं की ती पद्धत कदाचित उपयुक्त ठरू शकतं. मात्र यापैकी कोणतंही निश्चित नाही.
उदाहरणार्थ, तैवानमध्ये 20 जणांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासातून असं आढळलं आहे की माऊथ टेपमुळे स्लीप अॅप्निया आणि घोरण्यामध्ये लक्षणीयरित्या सुधारणा होते.
मात्र संशोधकांनी म्हटलं आहे की अभ्यासासाठी वापरण्यात आलेल्या सॅम्पलचा छोटा आकार आणि नियंत्रण गटाचा अभाव यामुळे त्यांचे निष्कर्ष मर्यादित स्वरुपाचे आहेत.
कॅलँडर म्हणतात, “आतापर्यंत आपल्याला असा कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही की माऊथ टेप वापरल्यामुळे स्लीप अॅप्निया कमी होतो किंवा रात्रीच्या वेळेस श्वसनाची क्रिया सुधारते. मात्र हे कमी खर्चाचं आहे आणि कदाचित उपयुक्त ठरू शकतं.”
त्यांना वाटतं की माऊथ टेप वापरल्यामुळे खरोखरच फायदा होऊ शकतो. मात्र त्यासाठी वैद्यकीय मार्गदर्शन घेतलं पाहिजे हे त्यांना मान्य आहे. जर तुम्ही तसं करण्याचा विचार करत असाल तर त्यातील पहिलं पाऊल म्हणजे झोपेचे तज्ज्ञ किंवा कान, नाक आणि घशाच्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणं.
मात्र तुम्ही एक प्रयत्न करू शकता, तो म्हणजे, नोज स्ट्रीप्स म्हणजे नाकाच्या पट्ट्यांचा वापर करणं. ज्या तुमच्या नाकपुड्या बाहेरून खुल्या ठेवतात.
कॅलँडर म्हणतात, “काहीजणांना ‘नेझल वॉल्व कोलॅप्स’ची समस्या असते. यात श्वास घेतल्यामुळे तुमच्या नाकाच्या पोकळीवर नकारात्मक दबाव येतो. अशा लोकांसाठी नेझल स्ट्रिप्स उपयोगी ठरू शकतात.”
काहीजण अगदी व्यायाम करतानाही त्याचा वापर करतात. मात्र जर तुमचं सेप्टम सुस्थितीत नसेल किंवा टर्बिनेट्स वाढलेले असतील तर नोज स्ट्रिप्स कदाचित उपयुक्त ठरणार नाहीत, असं त्या म्हणतात.
नाक म्हणजे मनासाठीचं विंड चाइम
कालांतरानं, आपल्याला नाकावाटे श्वास घेतल्यामुळे शरीराला होणाऱ्या फायद्यांचं अधिक आकलन झालं आहे. मात्र नाक आणि मेंदूमधील संबंधाकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं.
माझ्या बाबतीत, फक्त नाकावाटे श्वास घेतल्यामुळे माझ्या शरीराला विविध अंगानं आराम मिळाला. मात्र ज्याप्रकारे आपण श्वास घेतो, विशेषकरून नाकानं ज्याप्रकारे श्वास घेतो, त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर आश्चर्यकारक परिणाम होऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
तुम्ही नाकाकडे, मनासाठीचं ‘विंड चाइम’प्रमाणे पाहू शकता. ‘विंड चाइम’ म्हणजे दोऱ्यांना धातूचे किंवा लाकडी तुकडे अडकलेली वस्तू. ज्यातून मंद आवाज येत राहतो.
जेव्हा हवा तुमच्या नाकातून जाते, तेव्हा त्याचा तुमच्या संज्ञात्मक प्रक्रियांवर महत्त्वाचा प्रभाव पडतो. नाकानं श्वास घेतल्यामुळे लिंबिक सिस्टमवर (म्हणजे मेंदूचे भाग जे भावना आणि वर्तणूकवर नियंत्रण ठेवतात) अशा प्रकारे सकारात्मक परिणाम होतो, जो तोंडावाटे श्वास घेतल्यामुळे होत नाही.

फोटो स्रोत, Serenity Strull/ BBC
उदाहरणार्थ, 2023 च्या एका अभ्यासातून असं आढळलं आहे की नाकावाटे श्वास घेतल्यानं रक्तदाब कमी होतो तसंच ह्रदयाच्या ठोक्यांची वारंवारिता कमी होते आणि त्यात होणारे बदल कमी होतात. त्यातून शरीराची विश्रांतीची स्थिती दिसून येते.
“यामुळे उच्च रक्तदाब बरा होणार नाही,” असं जो वॅट्सो म्हणतात. ते फ्लोरिडा स्टेट विद्यापीठात अप्लाईड फिजिऑलॉजिस्ट आहेत. त्यांनी एका अभ्यासाचं नेतृत्व केलं आहे.
“तुमच्या नाकावाटे श्वास घेणं आणि सोडणं हे तुमच्या मज्जासंस्थेला शांत करतं,” असं ते म्हणतात.
अभ्यासातून असंही दिसून आलं आहे की नाकावाटे श्वास घेतल्यानं स्पेशिअल टास्कमधील (विविध वस्तूंमधील अंतर, परस्पर संबंध) कार्यक्षमता सुधारते, स्मरणशक्ती सुधारते आणि प्रतिक्रिया देण्याचा कालावधी सुधारतो.
हे नेमकं का आहे हे तज्ज्ञांना माहित नाही. आपल्याला फक्त एवढंच माहित आहे की नाकावाटे श्वास घेतल्यामुळे ओलफॅक्टरी नर्व्ह म्हणजे घाणेंद्रियाच्या मज्जातंतूला ( वास घेण्यासाठी जबाबदार असलेल्या नसा) आहे.
यामागे कारण काहीही असो, मात्र नाकावाटे श्वास घेतल्यामुळे पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम सक्रिय होते. हीच मज्जासंस्था शरीराची ऊर्जा वाचवण्यास मदत करते आणि तुम्ही निवांत स्थितीत असता किंवा आरामात असता तेव्हा तुमच्या शरीराची कार्य मंदावते.

हजारो वर्षांपासून ध्यान करणारे आणि योगाभ्यास करणारे जे सांगत आले आहेत तेच विज्ञान आपल्याला सांगतं आहे. नाकावाटे श्वास घेतल्यामुळे मानसिक आरोग्य चांगलं राहू शकतं.
काही संशोधनातून दिसून येतं की लयबद्ध, नाकावाटे दीर्घ श्वास घेतल्यामुळे संपूर्ण सेरेब्रल कॉर्टेक्समधील मेंदूच्या लाटा मंदावतात. यातून तुमच्या मनाची शांत स्थिती दिसून येते.
वॅट्सो आणि इतर सुचवतात की नाकानं उत्तेजित होणं हे ध्यानाच्या फायद्यांचे शारीरिक स्पष्टीकरण देखील देऊ शकतं.
माझं नाक दुरुस्त झाल्यापासून गेल्या काही महिन्यांमध्ये माझ्या आयुष्यातील जवळपास प्रत्येक गोष्टीत सुधारणा झाली आहे. यात माझ्या मानसिक आरोग्याचाही समावेश आहे. माझी चिंता कमी झाली आहे.
मी आता अधिक लक्ष केंद्रीत करू शकतो. माझा मूड किंवा एकंदरित मन:स्थिती छान आहे. या काही निव्वळ योगायोग असू शकत नाही.
कॅलँडर म्हणतात की नाकावाटे श्वास घेतल्यामुळे मी खरोखरंच शांत होऊ शकते.
कॅलँडर पुढे म्हणतात, “हे शक्य आहे. जर तुम्हाला चांगली झोप मिळत असेल, तर ते तुमच्या आयुष्याच्या गुणवत्तेशी आणि आरोग्याशी जोडलेलं आहे. मात्र मला वाटतं की यामुळे तुमची पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम किंवा मज्जासंस्था पूर्वीपेक्षा अधिक वेळा सक्रिय होत असेल.”
माझ्या अनुभवानुसार हा सल्ला अगदी योग्य आहे. जेव्हा तुम्हाला चिंता वाटत असते किंवा तुम्ही अस्वस्थ असता, तेव्हा खोल श्वास घ्या. मात्र तो तुम्हाला नक्कीच नाकावाटेच घ्यावासा वाटेल.

फोटो स्रोत, Getty Images
(सूचना: या लेखातील सर्व माहिती ही फक्त सर्वसामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. याला वैद्यकीय सल्ला किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याला पर्याय म्हणून मानता कामा नये. या वेबासाईटवरील माहितीच्या आधारे वाचकानं केलेल्या कोणत्याही निदानासाठी बीबीसी जबाबदार असणार नाही. इंटरनेटवरील कोणत्याही बाह्य वेबसाईट ज्या या वेबसाईटवर दिसत आहेत त्यावरील माहितीसाठी बीबीसी जबाबदार नाही. तसंच बीबीसी यातील कोणत्याही वेबसाईटवर देण्यात आलेल्या किंवा सुचवण्यात आलेल्या कोणत्याही व्यावसायिक उत्पादन किंवा सेवेचं समर्थन करत नाही. तुमच्या आरोग्याविषयी कोणत्याही समस्या असल्यास, नेहमीच तुमच्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या.)
(थॉमस जर्मेन बीबीसीचे वरिष्ठ तंत्रज्ञान पत्रकार आहेत. गेल्या दशकातील बहुतांश काळ त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, प्रायव्हसी आणि इंटरनेट संस्कृतीचा दुर्गम भागापर्यंतचा विस्तार या विषयांवर काम केलं आहे. तुम्हाला ते एक्स आणि टिकटॉकवर @thomasgermain दिसतील.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC