Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, SamirKhan
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये ब्रेन ट्यूमरने ग्रस्त असलेल्या एका तीन वर्षांच्या मुलीला तिच्या आई-वडिलांनी ‘संथारा’ करण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे. या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.
‘संथारा’चा संकल्प घेतलेली सगळ्यात लहान वयाची व्यक्ती म्हणून या मुलीची नोंद ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये करण्यात आली आहे. याबद्दलचं प्रमाणपत्र देखील या मुलीला देण्यात आलेलं होतं.
संथारा ही जैन धर्मातील एक प्रथा आहे. त्यात व्यक्ती मृत्यूची इच्छा बाळगतो. याला समाधी-मृत्यू, इच्छा-मृत्यू किंवा संन्यास-मृत्यू असंही म्हटलं जातं. हा एक धार्मिक स्वरूपाचा संकल्प असतो.
संथाराला ‘सल्लेखना’ असं देखील म्हटलं जातं. जैन धर्मातील काहीजण या परंपरेला मानतात. यात अन्नपाण्याच्या त्याग करून मृत्यूची निवड केली जाते.
पण या प्रकरणात साडेतीन वर्षांच्या या मुलीने स्वतःच्या मर्जीने संथाराची निवड केली का? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
मध्य प्रदेश बाल हक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि इंदूर जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.
मुलीच्या आईने काय सांगितलं?
मुलीचे वडील पीयूष जैन म्हणाले की, मुलीवर उपचार करण्यात आले होते आणि त्यानंतरही ती बरी झाली नाही तेव्हा जैन मुनिश्रींच्या सल्ल्यानुसार त्यांनी मुलीला संथारा करायला लावला.
या मुलीच्या आई वर्षा जैन यांनी त्यांची मुलगी वियाना जैनला संथारा देण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं.
वियानाचा जन्म 20 नोव्हेंबर 2021 रोजी झाला. तिची आई वर्षा जैन म्हणाल्या की, जानेवारी 2025 पासून वियानाला डोकेदुखीचा त्रास होऊ लागला आणि तिला उलट्या होऊ लागल्या. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर तिच्या मेंदूत ट्यूमर असल्याचं आढळून आलं. यानंतर, मुंबईत वियानावर शस्त्रक्रिया झाली आणि ती बरी झाली.
पण, 15 मार्चपासून तिला पुन्हा डोकेदुखीचा त्रास सुरू झाला आणि इंदूरमध्ये केलेल्या चाचण्यांनंतर असं आढळून आलं की, तो ट्यूमर पुन्हा तयार झाला आहे. वर्षा जैन यांनी सांगितले की, डॉक्टरांनी सांगितले की इतक्या लवकर पुन्हा शस्त्रक्रिया करता येणार नाही, म्हणून त्यांनी औषधे दिली.

फोटो स्रोत, SamirKhan
वर्षा जैन सांगतात की नंतर त्यांच्या मुलीची प्रकृती बिघडू लागली आणि तिने जवळजवळ खाणे-पिणे बंद केले. 21 मार्च रोजी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला फूड पाईपमधून अन्न दिलं जाऊ लागलं.
वर्ष जैन म्हणाल्या, “21 मार्च रोजी आम्ही आमच्या मुलीला गुरुदेव अभिग्रहधारी डॉक्टर राजेश मुनी महाराज यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांनी सांगितलं की मुलीच्या आयुष्याचा शेवट जवळ आला आहे आणि तिने आता संथाराचा उपवास करावा. त्यानंतर, रात्री 9.55 वाजता संथाराची प्रक्रिया सुरु करण्यात आली आणि रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी मुलीचा मृत्यू झाला.”
या मुलीला संथारा करण्याचा सल्ला देणारे मुनी काय म्हणाले?
आतापर्यंत 108 संथारा करवणारे आणि संथारा या विषयात पीएचडी केल्याचा दावा करणारे डॉ. राजेश मुनी महाराज यांना बीबीसी हिंदीने विचारले तेव्हा ते म्हणाले, “जेव्हा 3 वर्ष आणि 4 महिने वय असलेल्या वियानाला तिचे पालक माझ्याकडे घेऊन आले तेव्हा मला समजलं की आता तिच्याकडे जास्त वेळ उरलेला नाही. म्हणूनच मी वियानाच्या पालकांना सांगितले की तिला संथारा देण्यात यावा.”
ते पुढे म्हणाले, “जेव्हा मुलीच्या पालकांनी मला संथारामधील खाण्यापिण्याच्या कडक नियमांबद्दल विचारलं तेव्हा मी म्हणालो की, वियानाने काही खायला मागितलं किंवा तिला एखाद्या औषधाची गरज असेल तर तिला ते देण्यात येईल. यावर मुलीच्या पालकांनी सहमती दर्शवली.”

फोटो स्रोत, SamirKhan
मुलीचे वडील पीयूष जैन म्हणतात की जर त्यांनी त्यांच्या मुलीला रुग्णालयात नेले असते आणि तिथेच तिचा मृत्यू झाला असता, यापेक्षा जैन धर्मानुसार संथारा करून धार्मिक विधीने तिचा मृत्यू झाला हे बरं आहे.
रमेश भंडारी हे अखिल भारतीय जैन समाजाचे अध्यक्ष आहेत. या विषयावर ते म्हणतात की, ‘संथारासाठी कोणावरही दबाव आणला जात नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीसाठी सर्व दरवाजे बंद असतात आणि डॉक्टरांकडेही त्याच्यासाठी कोणताही उपचार नसतो तेव्हा असं घडतं.’
ते म्हणतात की आम्ही या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयातही लढलो आहोत.
‘संथारा’वरून याआधीही वाद झाले आहेत
जैन धर्मात संथारा हा श्रद्धेचा विषय आहे, पण काही लोक या प्रथेला विरोध करतात. काहींचा असा विश्वास आहे की, मानवतावादी दृष्टिकोनातून, ही प्रथा आत्महत्येचा एक प्रकार आहे.
2006 मध्ये, संथारा प्रथेविरुद्ध एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत असं म्हटलं होतं की, संथाराची प्रथा आत्महत्येसारखीच आहे आणि आधुनिक काळात तिला मान्यता असू नये.
या याचिकेत असेही म्हटले होते की, संथारा घेतलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाचा समाजात दर्जा वाढतो आणि त्यामुळे कुटुंबाकडूनही या प्रथेला प्रोत्साहन दिले जाते.
2015 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयानं संथारावर बंदी घातली होती. मात्र नंतर सर्वोच्च न्यायालयानं या निर्णयाला स्थगिती दिली होती.
राजस्थान उच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि 309 (आत्महत्येचा प्रयत्न) अंतर्गत या प्रथेला दंडनीय गुन्हा म्हटलं होतं.
मात्र, जैन समुदायाच्या विविध धार्मिक घटकांच्या याचिकांवर सुनावणी करताना, सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली होती.

फोटो स्रोत, Kunal Chhajer/BBC
सर्वोच्च न्यायालयाचे वकील तनुज दीक्षित म्हणतात, “जर आपण संथारा बद्दल बोललो तर जैन धर्माचे लोक ती एक पवित्र प्रक्रिया मानतात. यामध्ये अन्नाचा त्याग केला जातो. हे प्रकरण आधीच न्यायालयात गेले आहे आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर, सर्वोच्च न्यायालयाने 2015 मध्ये संथारा प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी दिली.”
ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयानेही आपल्या निर्णयात म्हटले होते की ही धार्मिक निवड आहे, त्यावर कायदेशीररित्या बंदी घालता येणार नाही.”
तनुज दीक्षित म्हणतात, “या प्रकरणात, आम्ही पाहिले की मुलगी ब्रेन ट्यूमरने ग्रस्त होती आणि तिच्याकडे वेळ नव्हता. संथारा नंतर दहाच मिनिटांनी मुलीचा मृत्यू झाला. मुलीवर ना अत्याचार करण्यात आला ना तिला उपाशी किंवा तहानलेली ठेवण्यात आलं.”
पोलिसांनी काय म्हटलं?
पोलिसांना या प्रकरणात अजूनपर्यंत कोणतीही तक्रार मिळालेली नाही.
इंदूर पोलिस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस उप आयुक्त राजेश दंडोटिया म्हणाले की, गांधीनगर पोलिस स्टेशन परिसर, अदोराम पोलीस स्टेशन परिसर, धोनी पोलीस स्टेशन परिसरातून माहिती घेण्यात आली आहे, अद्याप तेथे कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.

फोटो स्रोत, Samir Khan
मध्य प्रदेश बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य ओंकार सिंह यांनी या संदर्भात बीबीसीला सांगितले की, तीन वर्ष आणि चार महिन्यांच्या मुलीला संथारा दिल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला आहे.
या प्रकरणात प्रश्न असा निर्माण होतो की, संथारा ही प्रक्रिया त्या व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून असते. एखादी व्यक्ती स्वतःहून अन्न आणि पाण्याचा त्याग करते आणि संथारा करते. पण इथे साडेतीन वर्षे वयाच्या मुलीने स्वतःहून ही निवड केली का? ती तिची इच्छा असेल का?
ते म्हणाले की, मध्य प्रदेश बाल हक्क आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि इंदूर जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर, तपासाच्या आधारे, या प्रकरणात नेमकं काय घडलं आहे आणि काय कारवाई केली पाहिजे हे आम्ही बघणार आहोत.
संथारा म्हणजे काय?
संथाराला ‘सल्लेखना’ असं देखील म्हटलं जातं. जैन धर्मातील काहीजण या परंपरेला मानतात. यात अन्नपाण्याच्या त्याग करून मृत्यूची निवड केली जाते.
अर्थात जैन धर्मात ही प्रथा सक्तीची किंवा बंधनकारक नियम नाही. मात्र प्रसारमाध्यमांमधून आलेल्या बातम्यांनुसार दरवर्षी जैन धर्मातील 200 ते 500 जण मृत्यूसाठी हा मार्ग निवडतात.
जैन धर्माचे अनुयायी न्यायमूर्ती टी. के. तुकोल यांनी लिहिलेल्या ‘संलेखना इज नॉट सुसाइड’ या पुस्तकात संथाराचा उद्देश ‘आत्मशुद्धी’ आहे असं म्हटलं आहे. यामध्ये एक निश्चय केला जातो. कर्माच्या बंधनातून मुक्त होऊन मोक्ष मिळवणे हा मानवी जन्माचा उद्देश आहे. संथारा या उद्देशात मदत करते.

फोटो स्रोत, Surendra jain/BBC
दुसऱ्या शतकात आचार्य समंतभद्र यांनी लिहिलेल्या ‘रत्नकरंद श्रावकचर’ या ग्रंथात संथाराचा उल्लेख आढळतो. श्रावक किंवा साधकाने कसे वागावे हे या पुस्तकात स्पष्ट केले आहे. हा जैन धर्माचा एक प्रमुख ग्रंथ मानला जातो.
त्यात असं म्हटलं आहे की, एखादी व्यक्ती कठीण परिस्थितीत, दुष्काळात, वृद्धापकाळात किंवा दीर्घ आजारात संथारा घेऊ शकते.
ही प्रतिज्ञा घेणाऱ्या व्यक्तीने स्वच्छ मनाने आणि कोणत्याही वाईट भावना न ठेवता सर्वांच्या चुका माफ केल्या पाहिजेत आणि स्वतःच्या चुका स्वीकारल्या पाहिजेत.
धर्मानुसार, केवळ धार्मिक नेताच एखाद्या व्यक्तीला संथारासाठी परवानगी देऊ शकतो. त्यांच्या परवानगीनंतर ती व्यक्ती अन्न सोडते. त्या व्यक्तीभोवती धार्मिक ग्रंथांचे पठण केले जाते आणि प्रवचन दिले जाते.
त्या व्यक्तीला भेटण्यासाठी आणि त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी अनेक लोक येतात. संथारा घेतलेल्या व्यक्तीच्या मृत्यूला समाधी मृत्यू म्हणतात. त्यांचे पार्थिव पद्मासनात ठेवले जाते आणि नंतर त्याची मिरवणूक काढली जाते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन
SOURCE : BBC