Source :- ZEE NEWS

Ancient Ancestors Found On Sea Floor: मानवी उत्क्रांती, पृथ्वीची उत्पत्ती आणि त्यानंतर झालेला जीवसृष्टीचा विकास या सर्व गोष्टींच्या मुळाशी पोहोचण्यासाठी जेव्हाजेव्हा प्रयत्न केले जातात तेव्हातेव्हा संशोधनातून इतकी अनपेक्षित माहिती समोर येते की जाणकारांनाही हादराच बसतो. असंच एक संशोधन आणि प्रचंड महत्त्वाची माहिती 2014-15 मध्ये एका निरीक्षणपर उत्खननातून समोर आली असून, इंडोनेशियातील जावा बेटापाशी समुद्रतळाशी असणारं एक मोठं गुपित समोर आलं होतं. 

सुरबाया येथील बंदरानजीक एक कृत्रिम बेट तयार करण्यासाठी समुद्रतळातून 50 लाख घन मीटर वाळू आणि बलुआ खडकाचं उत्खनन केलं असता अनेक जीवाश्मांचे अवशेष सापडल्याचं म्हटलं गेलं. 

इंडोनेशियात सागरी तळाशी संशोधकांना 6000 हून अधिक जीवाश्म सापडले असून, त्यामध्ये लुप्त झालेल्या होमो इरेक्टस या मानवी प्रजातातील पूर्वजांचे अवशेषही सापडले आहेत. या संशोधनातून दक्षिण पूर्व आशियाई क्षेत्रामध्ये होमो इरेक्टस प्रजातीच्या मानवाची अनभिज्ञ उपस्थिती अधोरेखित होत आहे. इंडोनेशियातील बेट समुहामध्ये अशा संशोधनाची ही पहिलीच वेळ असल्या कारणानं सध्या संपूर्ण जगाचं लक्ष इथं वेधलं गेलं आहे. 

सुंडालँड… एक लुप्त जग 

जवळपास 1,40,000 वर्षांपूर्वी जेव्हा सागरी जलपातळी अतिशय कमी होती तेव्हा जावा आणि तत्सम बेटं आशियाई उपखंडाशी जोडले गेले होते. सुंडालँड या नावानं हे संपूर्ण क्षेत्र ओळखलं जात होतं, जिथं मोठाली मैदानं आणि नद्याचं अस्तित्वं होतं. या संशोधनातून समोर आलेल्या अवशेषांमुळं येथील नद्यांमध्ये मासे, कासव, पाणघोडे आणि इतरही अनेक सागरी जीव होते. याशिवाय येथील मैदानी भागांमध्ये स्टेगोडन (हत्तीप्रमाणं दिसणारा प्राणी), रेडा आणि इतर मोठे प्रामी अस्तित्वात असल्याचे संकेत मिळतात. होमोर इरेक्टस येथील सुपीक जमिनीवर शिकार करत होता आणि याचेच सर्व अवशेष सागरी तळाशी सापडल्यानं मानवी उत्क्रांतीचा एक नवा अध्याय या कारणानं समोर आला आहे. समुद्रतळातून सापडलेल्या काही जीवाश्मांमध्ये असणारे व्रण पाहचता त्या काळात वावरणारा मानव कासव आणि काही मोठ्या प्राण्यांचा शिकार करत असे असं स्पष्ट होत आहे. 

हेसुद्धा वाचा : हिंद महासागराखाली सापडलं हडप्पाहून प्राचीन समाधीस्त शहर; जादुई ठिकाण पाहून संशोधकही झाले होते अवाक्

 

होमो इरेक्टस आणि आधुनिक मानव 

मानवी उत्क्रांतीमध्ये होमो इरेक्टस अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात असं म्हटलं जातं. साधारण 20 लाख वर्षांपूर्वी या प्रजातीची उत्पत्ती झाली आणि मानवी शरीराची बनावट असणारी ही पहिली प्रजाती ठरली. आफ्रिकेपासून सुरू झालेली ही प्रजाती पुढं दक्षिण पूर्व आशियापर्यंत पोहोचली. डेनिसोवन्स आणि निएंडरथल अशा प्रजातीसुद्धा त्या काळात अस्तित्वात आल्या. मात्र त्यांच्यामध्ये नेमका किती ताळमेळ होता हे मात्र लक्षात येऊ शकलेलं नाही. जावामध्ये होमो इरेक्टस 1,17,000 ते 1,08,000 दरम्यानच्या काळात अस्तित्वात असून, पुढे ही मानवी प्रजाती नामशेष होत गेली आणि साधारण 77000 वर्षांपूर्वी इथं होमो सेपियन्स अस्तित्वात आले असं म्हटलं जातं. 

SOURCE : ZEE NEWS