Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Screengrab/Bar Council of Maharashtra & Goa
1 तासापूर्वी
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बनल्यानंतर भूषण गवई आज (18 मे) पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले होते. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल राज्यस्तरीय वकील परिषदेच्यावतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी झालेल्या सत्कारानं भूषण गवई भारावून गेले. भाषणात अनेकदा ते भावनिक झाले. त्याचवेळी भाषणाच्या शेवटी त्यांनी प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित करत नाराजीही व्यक्त केली.
महाराष्ट्र प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचे प्रमुख उपस्थित राहिले नसल्याचा मुद्दा यावेळी त्यांनी बोलून दाखवला.
या कार्यक्रमाला न्या. भूषण गवई यांच्या आईसह त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. तसंच राज्यभरातून त्यांच्या सन्मानासाठी वकील बांधव उपस्थित होते. यावेळी भाषणातून गवई यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळाही दिल्याचं पाहायला मिळालं.
संविधानच सर्वोच्च-सरन्यायाधीश
भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्ष पूर्ण केल्यानंतर वाटचाल करत असताना, न्यायपालिकेतील सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी मिळणं याचा आनंद आहे, अशा शब्दांत भूषण गवई यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
या 75 वर्षांच्या जडणघडणीत खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाली याचा आनंद असल्याचंही सरन्यायाधीश म्हणाले.
न्या. गवई यावेळी म्हणाले की, भारताचं संविधान हेच सर्वोच्च असून, लोकशाहीच्या तिन्ही स्तंभांनी त्यानुसार काम करणं अपेक्षित आहे.

फोटो स्रोत, ANI
संविधानाच्या 75 वर्षांच्या कार्यकाळात लोकशाहीच्या तिन्ही स्तंभांनी घटनेला अभिप्रेत असलेला आर्थिक आणि सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असंही न्या. गवई म्हणाले.
सरन्यायाधीशांची नाराजी
भाषणाच्या शेवटी बोलताना सरन्यायाधीशांनी एका मुद्द्यावर नाराजीही व्यक्त केली.
ते म्हणाले की, “आपण म्हणतो लोकशाहीचे तीन स्तंभ म्हणजे न्यायपालिका, विधीपालिका आणि कार्यपालिका हे समान आहेत. अशावेळी सर्वांनी एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे.”
“महाराष्ट्राचा एक व्यक्ती सरन्यायाधीश बनून पहिल्यांदा महाराष्ट्रात येत असताना महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक किंवा मुंबईच्या पोलीस आयुक्तांना तिथं येण्याची गरज वाटत नसेल, त्यांनीच त्याचा विचार करावा,” अशा शब्दांत गवई यांनी नाराजी व्यक्त केली.

फोटो स्रोत, ANI
“मला प्रोटोकॉलचा बिल्कुल विचार नाही. मी अमरावतीला, नागपूरला जातो तेव्हा पायलट एस्कॉर्ट घेऊन जात नाही. सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला मी मित्रांच्या मोटारसायकलवरुन फिरायचो. परंतु हा इतर पालिकांकडून न्यायपालिकेला आदराचा प्रश्न आहे,” अशा शब्दांत न्या. गवई यांनी त्यांच्या भावना मांडल्या.
राज्यघटनेच्या एका संस्थेचा प्रमुख याठिकाणी येत असताना त्यांनी दिलेली वागणूक योग्य आहे की नाही, याचा विचार त्यांनीच करायला हवा असंही सरन्यायाधीश यावेळी म्हणाले. पण मला या लहान सहान गोष्टीत रस नाही, पण लोकांना समजावं म्हणून मी याचा उल्लेख केला, असं त्यांनी सांगितलं.
वडिलांच्या आठवणींनी गहिवरले
सरन्यायाधीश भूषण गवई यावेळी भाषण करताना वडिलांच्या आठवणीने गहिवरले.
“आज वडील असते तर त्यांना सर्वाधिक आनंद झाला असता. 2003 मध्ये उच्च न्यायालयाचा न्यायधीश म्हणून शपथ घेतली होती, तेव्हा ते नातेवाईकांना म्हणाले होते की, भूषण एकदिवस नक्कीच सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश होईल. ते जिथे कुठे असतील त्यांचे आशीर्वाद मला आहेत,” असं त्यांनी म्हटलं.
आई हा दिवस पाहायला असल्याचा आनंद आहे, असं म्हणत सरन्यायाधीश भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं.

फोटो स्रोत, ANI
या कार्यक्रमानंतर सरन्यायाधीश भूषण गवई दादर येथील चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गेले होते. यावेळी मात्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC