Source :- ZEE NEWS

Why Do Doctors Wear Green or Blue in the Operation Theatre? : एखादा व्यक्ती असेल, जी कधीच रुग्णालयाचे फेरे मारले नाहीत. सगळ्यात आधी बाळ जन्माला येताच ते लगेच डॉक्टरांच्या संपर्कात येतं. लहान असो वा मोठी, कोणतीही तब्येतीची अडचण आली की आपल्याला डॉक्टरांची गरज भासते. त्यामुळेच डॉक्टरांना देवाचं स्थान दिलं जातं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणारे सगळे डॉक्टर नेहमी हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडेच का घालतात? हे फक्त एक ट्रेंड आहे का? की त्यामागे काही वैज्ञानिक कारण आहेत? त्या मागचं नेमकं कारण काय ते जाणून घेऊया…

ऑपरेशन थिएटरमध्ये हिरव्या-निळ्या रंगाचे कपडे का?

जेव्हा एखादा माणूस अंधाऱ्या खोलीतून उजेडात येतो आणि त्याला हिरवा किंवा निळा रंग दिसतो, तेव्हा त्याला डोळ्यांना थोडा आराम वाटतो. डॉक्टरही ऑपरेशन थिएटरमध्ये असंच अनुभवतात. हिरवा आणि निळा रंग हा प्रकाशाच्या स्पेक्ट्रममध्ये लाल रंगाच्या विरुद्ध असतो. ऑपरेशन करताना डॉक्टरांचं लक्ष खूप वेळ रक्तावर असतं आणि रक्ताचा रंग तर आपल्या सगळ्यांना माहित आहे. सतत लाल रंग पाहिल्यामुळे डोळ्यांना थकवा येऊ शकतो. अशावेळी आसपास हिरवा किंवा निळा रंग असला, तर डोळ्यांना आराम मिळतो आणि लाल रंग अधिक स्पष्टपणे दिसू लागतो.

त्याचबरोबर, हिरव्या रंगावर रक्ताचे डाग तपकिरी दिसतात, त्यामुळे ते लगेच लक्षात येतात आणि साफ करणं सोपं जातं. 1998 मध्ये प्रसिद्ध झालेल्या टुडेज सर्जिकल नर्स या मासिकात सांगितलं होतं की, सर्जरी दरम्यान हिरव्या रंगाचे कपडे डोळ्यांना रिलॅक्स वाटतात.

हिरव्या कपड्यांची सुरुवात कधी झाली?

पूर्वी डॉक्टर पांढरे कपडे घालून सर्जरी करत असत. पण 1914 साली एका प्रसिद्ध डॉक्टरनं ऑपरेशनसाठी हिरवा रंग वापरला आणि त्यानंतर हा ट्रेंड सुरू झाला. हळूहळू सगळ्यांनी ऑपरेशन थिएटरसाठी हिरवा आणि निळा रंग स्वीकारला. 

आणखी काय आहेत कारणं? 

डोळ्यांना आराम: सूर्यप्रकाश किंवा झगमगाट पाहिल्यानंतर हिरवा किंवा निळा रंग दिसला की डोळ्यांना शांतता वाटते.

झोंबत नाही: लाल आणि पिवळा रंग डोळ्यांना जास्त झोंबतो, पण हिरवा व निळा रंग सौम्य वाटतो.

मानसिक आराम: सतत शरीरातील रक्त व अवयव पाहिल्यामुळे डॉक्टर तणावात येऊ शकतात. हिरवा व निळा रंग त्यांना मानसिक शांतता देतो.

ऑपरेशन थिएटरमध्ये हिरवा आणि निळा रंग फक्त चांगला वाटतो म्हणून नाही, तर त्यामागे विज्ञान, अनुभव आणि डोळ्यांची काळजी ही विचारसरणी आहे.

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.)

SOURCE : ZEE NEWS