Source :- BBC INDIA NEWS

“माझं नेहमीच असं म्हणणं असतं की, साध्या माणसाची काय अपेक्षा असते, की त्याला ऐकणारे दोन कान हवे असतात. माझं कुणीतरी ऐकून घ्यावं, असं त्याला वाटत असतं. मी किमान ते कान होईन.”
“हे ऐकून घेण्यालाच खूप वेळ होतोय, म्हणून फ्रस्ट्रेशन येतंय. तर माझी रिस्पॉन्सिबिलीटी हीच असेल की, मी फर्स्ट रिस्पॉन्डन्ट बनेल. देवानं मला इतकी ताकद अन् बळ द्यावं, की मी त्या सामान्य माणसांचं भलं करु शकेन.”
चेहऱ्यावर आशावादी स्मितहास्य असलेला बिरदेव उत्साहाने सांगत होता. माझ्याआधी कित्येक युट्यूब चॅनेल्सनी आणि टीव्ही चॅनेल्सनी बिरदेवच्या मुलाखती घेतल्या होत्या.
त्या सगळ्यांनाच तो तितक्याच उत्साहाने मुलाखती देत होता. अगदी सदिच्छांसाठी आलेले सगळे फोन कॉल्स उचलण्याला तो प्राधान्य देत होता.
ही सगळी धावपळ सुरू होती बिरदेवच्या बहिणीच्या घर अन् अंगणात. आभाळातून आग ओकत सूर्य माळरानावरची ही धावपळ पाहत होता.
कर्नाटकातलं जोडकुर्ली नावाचं गाव. बिरदेवच्या बहिणीचं छोटंसं घर. या घरानं आणि आजूबाजूच्या परीसरानं एवढ्या चारचाकी गाड्यांची वर्दळ कदाचित कधीच पाहिली नव्हती.
बाहेरच झाडाखाली बांधलेल्या शेळ्या, कोंबड्यांची खुराडं आणि उन्हात एकही क्षण विसावा न घेता लोकांचे सत्कार-समारंभ स्वीकारणारा बिरदेव.
“यूपीएससीचा निकाल लागल्यावर मी ठरवलं होतं की, आधी बहिणीकडंच राहायला जाईन. म्हणून, मी दोन दिवस इथं राहून मगच माझ्या गावी जाणारे,” कित्येक तास बिझी लागल्यानंतर माझा कॉल रिसीव्ह केलेला बिरदेव मला बहिणीचा पत्ता सांगताना म्हणाला.

कागलमधील यमगे गावच्या बिरदेवनं यूपीएससी परीक्षेत 551 वा रँक मिळवला आहे. हा निकाल लागला तेव्हा बिरदेव आपल्या मावशीच्या नवऱ्यासोबत शेळ्या-मेंढ्या घेऊन फिरतीवर होता.
“बावीस तारखेला ज्यावेळी रिझल्ट आला, तेव्हा आमच्या मावशीच्या दीराची बकरी कातरायची चालू होती. मी आणि मावसभाऊ तिथं खणातच होतो. पाच वाजता निकाल लागंल असं वाटत होतं. अडीच वाजता रिझल्ट आला. मित्राने कल्पना दिली की रिझल्ट लागलाय. त्यानंतर मग काही मिनिटं आनंदाश्रू आले. खूप भारी वाटलं. त्यानंतर दादाला वगैरे कल्पना दिली,” बिरदेव सांगतो.

बिरदेव धनगर समाजातील अत्यंत गरीब कुटुंबातून आलेला होतकरु आणि हुशार पोरगा. ही त्याची ओळख अगदी शाळेपासूनची!
बिरदेवला जेव्हा दहावीला 96 टक्के मार्क्स मिळाले. तेव्हा अतिशय छोट्या गावच्या पालावरच्या या पोराला मिळालेल्या यशाचं कौतुक तत्कालीन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी त्याच्या शाळेला कौतुकाचं एक पत्र पाठवून केलं होतं.
बिरदेवनं आपला संघर्षमय प्रवास उलगडून सांगताना एका मुलाखतीत या किस्स्याचा उल्लेख केला.
राजेंद्र दर्डा यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून म्हटलंय की, “इतक्या वर्षांनी हा बिरदेव अचानक मला पुन्हा भेटला आहे, आणि तोही भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेला एक महत्वाकांक्षी तरुण म्हणून! यूपीएससी परीक्षेत 551 वी रँक मिळवून उत्तीर्ण झाल्याची बातमी बिरदेवच्या मित्राने त्याला फोनवर सांगितली तेंव्हा बिरदेव शेतातच मेंढ्या चारत होता. ‘मेंढपाळाच्या मुलाने यूपीएससी क्रॅक केल्या’ची यशोगाथा सांगणाऱ्या एका व्हायरल व्हिडिओत बिरदेवने माझी आठवण काढल्याचे मी पाहिले/ऐकले आणि खरं सांगतो, माझ्या डोळ्यात पाणी उभे राहिले. “

खरंतर हा निकाल कळताच त्याचा सर्वांत पहिला सत्कार पालावरच त्याच्या मामांनी फेटा बांधून केला. बिरदेवचा हाच व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि तो बघता बघता कष्टातून वर येऊन यूपीएससीत झळकलेल्या होतकरु चेहऱ्याचं प्रतीक बनला. त्यानं प्राप्त केलेल्या यशाविषयी बोलताना त्याच्या बहिणीला आनंदाश्रू आवरता आले नाहीत.
“हा पण लोकांच्या घरी ट्रॅक्टरवर खडी-दगडी भरण्यासाठी रोजगारीला जात होता. माझी आई रोजगार करायची दुसऱ्याच्या शेतामध्ये. त्यावेळी पगार होता फक्त 25 रुपये. तिथून शिकवलंय आणि हे यश संपादन केलंय. मला खूप अभिमान आहे माझ्या भावाबद्दल…” त्या हुंदक्यांना सावरत सावरत बोलत होत्या.
कॅमेऱ्यावर बोलताना आपलं बोलणं बाजूला ठेवून कदाचित शुद्ध भाषेतच बोलावं लागतं, असं काहीसं वाटून त्या थोड्या असहजतेनं बोलत होत्या.
पण, भावाचा अविरत सुरु असलेला सत्कार त्या दिवसभर दारात बसून अविरतपणे पाहत होत्या. इतक्या उन्हात सतत लोकांच्या वर्दळीतूनही त्याला अधून-मधून पाणी वा थंड काहीतरी आणून देत होत्या.
‘बुके नको, पुस्तकं आणा’, आलेल्यांना तसेच फोन करणाऱ्यांना बिरदेव आवर्जून सांगत होता.
बिरदेवचे आई-वडील या सगळ्या वर्दळीला कंटाळून त्यांच्या मूळ गावी यमग्याला गेलेले. निरक्षर असलेल्या आईवडिलांना हा निकाल ऐकून कसं वाटलं असावं? बिरदेवला हा प्रश्न मी विचारला.

तो म्हणाला की, “मला असं वाटत होतं की, आईला मीच प्रत्यक्षात जाऊन निकाल सांगावा. पण दादानं आगावपणा करुन आईला आणि वडिलांना सांगितलं होतं. मग आम्ही आणखी थोडावेळ बकरी कातरुन घरी गेलो. मग मला आलेलं बघून आई-वडिल रडू लागले. भावनिक झाले. चांगले आनंदाचे क्षण होते.”
“माझ्या आईचं काही शिक्षण वगैरे झालेलं नाहीये. तिला एवढं माहितीय की मी मोठा ऑफिसर झालोय, पण नेमकं काय झालोय, हे तिला अजून समजलेलं नाहीये,” बिरदेव सांगतो.
आपल्या संघर्षाच्या काळात अनेकांनी भावनिक-मानसिक आणि आर्थिक पातळीवरही मदत केल्यामुळेच आपण इथंवर पोहोचल्याचं बिरदेव सांगतो. आपल्याकडं कसलंही कल्चरल कॅपिटल नसताना आपण हे कसं साध्य केलं, या सगळ्याचं श्रेय बिरदेव त्याच्या मित्रांना देतो.
“कल्चरल कॅपिटल इन द सेन्स की, आता माझे वडीलच थोडेफार शिकलेले आहेत. त्यांना यूपीएससी वगैरेचा काही गंध नव्हता. मला सीईओपी भेटणं हाच टर्निंग पॉईंट होतो. चांगले मित्र भेटणे आणि व्यसनापासून लांब राहणं, या दोन गोष्टी चांगल्या ठरल्या. मला कल्चरल कॅपिटल नव्हतं. पण मित्रांच्या आधारे नेटवर्क तयार होत गेले. दुसऱ्या बाजूला, वेळोवेळी आर्थिक सपोर्टही मिळत गेला आणि मित्र हेच माझे कल्चरल कॅपिटल बनत गेले.”

फोटो स्रोत, Birdev Done
बिरदेव 2019 पासून तो या परिक्षेचा सिरियसली अभ्यास करु लागला. हा अभ्यास करण्यासाठी बिरदेवनं एक वर्ष दिल्लीत आणि काही वर्षं पुण्यात काढली. अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्याला हे यश मिळालं.
इंग्रजीमध्ये कच्चा आणि त्याबाबतीत कमी आत्मविश्वास असलेल्या बिरदेवने हा अभ्यास कसा केला, याबाबत बोलताना तो सांगतो की, “COEP (कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे) मध्ये एके वर्षी आमच्या सिव्हील सर्व्हीसेस क्लबमधले पंधरा जण सिलेक्ट झाले. तर ऍक्च्यूअली दॅट ईव्हेंट इग्नायटेड द फायर विदीन मी… मला असं वाटलं की, माझ्यासारखे सिमीलर सोशल-इकॉनॉमिक बॅकराऊंड असलेले सिलेक्ट होऊ शकतात, तर आपण का नाही? मग 2019-20 ला एनसीआरटी वाचायला सुरु केलं. इंग्रजी एवढं चांगलं नव्हतं. मग त्यावर काम केलं. त्यानंतर मी ठरवलं की यूपीएसीचं फूल टाईम प्रीपरेशन करायचं.”
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तो दररोज सहा ते आठ तास द्यायचा.
इतरांप्रमाणेच त्यालाही पुणे-दिल्लीतला संघर्ष करावा लागला. क्लासच्या फीसाठी जद्दोजहद करावी लागली. इतरांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे त्याला क्लास लावता आला. इतरांसोबतच्या स्पर्धेत तयारीनं उतरता आलं. पण, स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बिरदेव ‘ऑप्शन बी’ तयार ठेवण्याचाही सल्ला आवर्जून देतो.
तो म्हणतो की, “एक्स्टर्नल मोटीव्हेशन फार काळ टिकत नाही. तुमचं मोटीव्हेशन तुमच्या आतूनच यायला पाहिजे.”

तुला कधी नैराश्य आलं नाही का, असं विचारल्यावर तो म्हणाला की, “कसंय… यूपीएससी हा ऍट्रॅक्शनचा सागर आहे. पण त्यामधून पार कमी करुन जाणारे कमी विद्यार्थी आहेत. कारण, दहा लाख विद्यार्थी बसले तर त्यातून हजारभरच सिलेक्ट होतात. माझ्यासारख्या सक्सेस स्टोऱ्या भरपूर जणांना इन्स्पायर पण करतील. पण, मला वाटतंय की, विद्यार्थ्यांनी माझ्याकडून थोड्या गोष्टी घ्याव्यात पण माझं मिमीकींग करण्यापेक्षा तुमच्या पद्धतीनं त्याचं थोडं वैयक्तिकरणही करायला पाहिजे. एक-दोन अटेम्प्टनंतर पुन्हा विचार केला पाहिजे की, आपल्याला पुढे जायचंय की नाही.”
बिरदेव सध्या यशाचा चेहरा बनला आहे. केवळ डोणे कुटुंबचं नव्हे तर वंचित समूहातील सर्वांसाठीच तो प्रेरणेचा स्त्रोत झाला आहे.
त्याला भेटायला आलेले अनेक जण त्याला ‘आमच्याकडे मार्गदर्शनासाठी येण्याकरीता प्लीज वेळ द्या,’ असं म्हणत त्याची वेळ घेत होते.
आजूबाजूची लहान-लहान मुलं आणि शेजार-पाजारच्या बाया हे सगळं कौतुकानं पाहत होत्या.

बिरदेव हे लोकदैवत. महाराष्ट्रातील बहुजन समाजामध्ये वेगवेगळ्या जातीजमातींचे असे अनेक लोकदेव आहेत. धनगर समाजाच्या या लोकदेवावरुनच त्याचं नाव ‘बिरदेव’ ठेवण्यात आलेलं.
अगदी काल-परवापर्यंत बिरदेव या व्यवस्थेच्या दृष्टीनंही फार कुणी नव्हता. म्हणजे, काही दिवसांपूर्वीच त्याचा मोबाईल त्याच्या हातातून हिसकावून कुणतीरी चोरून नेला. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर त्याला कुणीच दाद दिली नाही की तक्रार लिहून घेतली नाही. हा सगळा किस्सा आता बिरदेव हसतमुखाने सांगत होता.
“माझं नेहमीच असं म्हणणं असतं की, साध्या माणसाची काय अपेक्षा असते, की त्याला ऐकण्याचे दोन कान हवे असतात. माझं कुणीतरी ऐकून घ्यावं, असं त्याला वाटत असतं, मी किमान ते कान होईन.”
सामान्य लोकांचा कान होण्यासाठी मीदेखील त्याला सदिच्छा दिल्या. निघतानाही तो सत्कार-शुभेच्छांच्या वर्दळीतच वेढलेला होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC