Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
“काही दिवसांपूर्वी, पाच महिला प्रसूतीसाठी क्लिनिकमध्ये आल्या होत्या. मी एकामागून एक पाचही महिलांना प्रसूतीवेळी मदत केली. प्रसूती झाल्यानंतर एक महिला बेडवरून खाली उतरायची आणि दुसरी बेडवर जायची.
मी फक्त माझे हात लवकरात लवकर धुवून दुसरीची प्रसूती करण्यासाठी वळायचे, एवढंच काय ते मी त्यावेळेत करू शकत होते.”
नैऋत्य अफगाणिस्तानातील निमरोझच्या चाघनसूर जिल्ह्यामध्ये 16,000 लोकसंख्येतील सर्व गर्भवती महिला आणि नवजात बालकांची काळजी घेणाऱ्या ‘आरजू’ या एकमेव सुईण आहेत.
“मला मदत करण्यासाठी जर आणखी एखादी सुईण असती तर बरं झालं असतं, असा विचार त्या दिवशी माझ्या मनात तेव्हा येत होता.” असं आरजू सांगत होत्या.
त्या काम करतात त्या जिल्ह्यात फक्त एकच छोटं क्लिनिक आहे. तिथं लोक अनेकदा लांब रांगेत उभे असतात.
रुग्णांची संख्या खूप जास्त असते, असं आरजू सांगतात. त्यामुळं तिथले कर्मचारी लोकांना हवी असलेली सेवा देऊ शकत नाहीत.
प्रसूती वॉर्डमध्ये फक्त एकच बेड आहे.
अशात जर एकाच वेळी दोन महिला प्रसूतीसाठी आल्या तर त्यातल्या एकीला वॉर्डच्या बाहेर सुईण उपलब्ध होईपर्यंत वाट पहावी लागते.
रांगेत असलेल्यांना कधी बेड मिळतो तर कधी वॉर्डच्या बाहेरच बाळंतपण करायची वेळ त्यांच्यावर येते.
सहा वर्षांपासून जिल्ह्याची एकमेव सुईण
सहा वर्षांपासून जिल्ह्याची एकमेव सुईण असलेल्या 32 वर्षीय आरजू क्लिनिकपासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावरच राहतात.
आधी त्या एकट्याच कामावर चालत जायच्या. परंतु आता तालिबान सरकार महिलांना सार्वजनिक ठिकाणी कुटुंबातील पुरुषांसोबतच जाण्याचा आग्रह करतं.
त्यामुळे आता त्यांचे पती त्यांना क्लिनिकमध्ये सोडायलाही येतात आणि घरी घेऊन जायलाही येतात.
त्यांच्या कामाची वेळ सकाळी 8:30 ते दुपारी 3:30 अशी असते. पण तरीही त्या कायमच कामावर असतात.
“कामाचा ताण खूप थकवणारा आहे. मी रात्रंदिवस काम करते. एखाद्या महिलेची संध्याकाळी प्रसूती होणार असेल, तर अंत्यसंस्कार असो वा लग्न मी कुठेही गेलेले असले तरी मला पुन्हा दवाखान्यात जावं लागतं,” असं आरजू सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
पण जर त्या खूप दूर असतील किंवा क्लिनिकमध्ये पोहोचू शकत नसतील तर काय होईल?
“जर मी तिथं नसेन, तर प्रसूतीमध्ये मदत करण्यासाठी एकतर माझ्याजागी काम करणारी दुसरी सुईण असेल किंवा कोणीही नसेल. प्रसूतीसाठी आलेल्या महिला क्लिनिकच्या बंद दारातून परत माघारी फिरतात,” असं त्या सांगतात.
कारण, माझ्या जागी काम करणारी सुईण दुसऱ्या जिल्ह्यातील दुसऱ्या क्लिनिकमध्ये काम करते आणि अनेकदा ती उपलब्ध नसते.
अमेरिकेच्या मदत कपातीनंतर, अफगाणिस्तानमधील आरोग्य क्षेत्राला सर्वात जास्त फटका बसला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या मदत प्रमुख टॉम फ्लेचर यांच्या मते, काही महिन्यांतच अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडील प्रांतांमधील सुमारे 400 वैद्यकीय केंद्रं बंद करण्यात आली आहेत.
परंतु, तालिबाननं अद्याप बंद केलेल्या एकूण आरोग्य सुविधा आणि दवाखान्यांची अचूक आकडेवारी जाहीर केलेली नाही.
अफगाणिस्तानमधे 421 जिल्हे आहेत. त्यामध्ये जवळपास चार जिल्ह्यांमध्ये फक्त एक रुग्णालय आहे.
मोटारसायकलनं रुग्णालयात
फातिमा (सुरक्षिततेसाठी नाव बदलण्यात आलं आहे) आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या, तेव्हा त्यांचा रक्तदाब अचानक वाढला. त्यांना तातडीनं वैद्यकीय उपचारांची आवश्यकता होती.
मध्य अफगाणिस्तानातील घोर प्रांतातील डोंगराळ भागात असलेल्या अल्लाह यार या जिल्ह्यातील त्या रहिवासी होत्या. त्यामुळं जिल्ह्यातील दोन लहान आरोग्य सुविधांपैकी एका ठिकाणी पोहचण्यासाठी त्यांना खूपच लांबचा प्रवास करावा लागला.
“वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी मला मोटारसायकलवरून पाच ते सहा तास प्रवास करावा लागला. मी क्लिनिकमध्ये पोहोचेपर्यंत पोटातील बाळाचा मृत्यू झाला होता,” असं त्या सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
खराब रस्ते आणि इतरही अनेक कठीण परिस्थितींमुळे घोर प्रांतातील लोकांचं जीवन आधीच आव्हानात्मक बनलं आहे.
त्यात बाळंतपणासाठी सुईणी आणि आरोग्य सुविधांच्या कमतरतेमुळे गरोदर स्त्रियांची परिस्थिती आणखी धोकादायक बनली आहे.
अल्लाह यार जिल्ह्यातील एका रहिवाशानं बीबीसीला सांगितलं की, तेथील 90% महिलांची प्रसूती घरीच होते.
आरजू सांगतात की, त्यांच्या जिल्ह्यातही असं अनेकदा घडतं.
“गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचण्यासाठी अनेकदा गाडीनं दोन ते तीन तास प्रवास करावा लागतो. अनेकांना ते परवडणारं नसतं म्हणून त्या घरीच बाळंतपण करण्याचा पर्याय निवडतात.”
सुईणींची कमतरता
जागतिक आरोग्य संघटनेनं दर 10,000 लोकसंख्येमागे 10 सुईणींची शिफारस केली आहे. त्यामुळे अंदाजे 4 कोटी लोकसंख्येसह अफगाणिस्तानला 40,000 सुईणींची आवश्यकता आहे.
अलिकडेच अफगाणिस्तान सोडलेल्या एका माजी आरोग्य अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की, देशात फक्त 5,000 सुईणी आहेत, म्हणजेच शिफारस केलेल्या संख्येच्या फक्त 20 टक्के.
परंतु तालिबानच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयातील सध्याच्या एका अधिकाऱ्यानं बीबीसीला सांगितलं की, संपूर्ण अफगाणिस्तानात सुमारे 10,000 सुईणी काम करत आहेत.
बीबीसीनं तालिबानकडून अधिकृत आकडेवारी मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी स्पष्ट आकडेवारी दिली नाही.
आधीच्या सरकारमधील अधिकाऱ्यांनी आरोग्य सेवा देणाऱ्या व्यवस्थेत स्त्री आणि पुरूषांच्या सहभागाबाबत असमतोल असल्याचं मान्य केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
माजी सार्वजनिक आरोग्य उपमंत्री डॉ. बशीर नॉर्मल म्हणतात की, तालिबान सत्तेत येण्यापूर्वी केवळ 32% महिला आरोग्य कर्मचारी होत्या.
तालिबानच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयातील एका माजी अधिकाऱ्यानं बीबीसीला सांगितलं की, 20 दुर्गम जिल्ह्यांमध्ये महिला आरोग्य कर्मचारीच नाहीत.
काही रहिवाशांनी बीबीसीला सांगितलं की, आरोग्य कर्मचारी नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचं वैद्यकीय शिक्षण नसलेल्या पण प्रसूतीवेळी मदत करणाऱ्या स्थानिक महिलांना “सुईणी” म्हटलं जातं.
दरम्यान, माता मृत्युदराची अंदाजे आकडेवारी धक्कादायक आहे.
2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं अंदाज लावला होता की, अफगाणिस्तानमध्ये दररोज 24 महिला बाळंतपणातील गुंतागुंतीमुळे मरतात.
तर 2024 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी अहवाल दिला होता की, दर 100,000 जन्मांमागे 620 मातांचा मृत्यू होतो. हा आकडा जगातील सर्वात जास्त माता मृत्युदरांपैकी एक आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पण हे आकडे कसे सुधारतील हे पाहणं महत्त्वाचं आहे.
2021 मध्ये सत्ता काबीज केल्यानंतर तालिबाननं महिलांना वैद्यकीय शाळांमध्ये प्रवेश बंदी घातली. त्यामुळे सुईणींसाठी असलेली प्रशिक्षण केंद्रंही बंद झाली आहेत.
आरजू यांना एका परदेशी स्वयंसेवी संस्थेनं प्रशिक्षण दिलं होतं. ती संस्था आता अफगाणिस्तानात कार्यरत नाही.
सध्याच्या परिस्थितीत जोपर्यंत काही बदल होत नाहीत तोपर्यंत सुईणींची संख्या हळूहळू कमी होत जाईल. आरजू यांच्यासाठी हा एक त्रासदायक विचार आहे.
त्या म्हणतात,”मी निवृत्त झाल्यानंतर काय होईल याची मला काळजी वाटते. प्रसूती करण्यासाठी कोण असेल? ती एक कठिण परिस्थिती असेल.”
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC