Source :- BBC INDIA NEWS
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
-
19 जानेवारी 2025, 12:44 IST
अपडेटेड 8 तासांपूर्वी
अभिनेता सैफ अली खान याच्या आरोपीला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. आरोपी मोहम्मद शहजादला आज पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सैफ अली खानच्या घरात घुसून जबरी चोरी आणि हल्ला केल्याची धक्कादायक घटना मुंबईत 16 जानेवारीला घडली होती.
यानंतर आरोपी कोण आहे? त्याची आधीची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? तो भारतीय आहे की बांगलादेशी, त्याने सैफ अली खानच्याच घराला लक्ष्य का केलं? त्याचा हेतू चोरीचा होता की इतर? असे अनेक प्रश्न चर्चेत आहेत. या सर्वच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात.
कोर्टात काय घडले?
पोलिसांनी कोर्टात गुन्ह्याची माहिती दिली. ओळख लपवण्यासाठी आरोपीने केस कापल्याचं सांगण्यात आलं. हे प्रकरण आंतराष्ट्रीय पातळीवरचे आहे.
आरोपी चोरट्या मार्गाने भारतात येऊन इथं बेकायदेशीरीत्या राहिल्याचंही सांगण्यात आलं. तो बांगलादेशी असल्याचं अटकेनंतर स्पष्ट झालं असं न्यायालयात सांगण्यात आलं.
आरोपीने केलेले घातक वार पाहता फक्त चोरीचाच हेतू होता का? हे पाहणं महत्त्वाचं असल्याचं सरकारी वकील म्हणाले.
एवढी सुरक्षा असताना तो चाकू घेऊन आत कसा शिरला? त्याला कोणी मदत केली का? हे शोधायचं असल्याचं सांगत पोलिसांनी 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली.
दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी तो सराईत गुन्हेगार नसल्याचं म्हटलं. अभिनेत्याच्या घरी घटना घडल्यानं मीडियाने प्रकरण उचलून धरलं आहे, असंही ते म्हणाले.
पोलिसांना या प्रकरणात आंतरराष्ट्रीय लिंक बद्दल संशय असल्यामुळे त्यांनी तो तपास करावा, असंही कोर्टानं म्हटलं.
तर आरोपीचे वकील संदीप शेखाने यांनी म्हटलं की, सैफ अली खानला बांगलादेशींकडून धोका असण्यासारखं काहीही प्रकरण नाही. त्यामुळं या प्रकरणात आंतरराष्ट्रीय लिंक नाही. फक्त आरोपी बांगलादेशी आहे समजल्यामुळं ही लिंक जोडली जात असल्याचं शेखाने यांनी म्हटलं.
दरम्यान, कोर्टात दोन वकील आरोपीतर्फे युक्तिवाद करण्यास उभे झाले होते. दोघांमध्ये केस घेण्यावरून रस्सीखेच पाहता कोर्टाने दोघांनाही बाजू मांडण्यास परवानगी दिली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
Twitter पोस्ट समाप्त
मजकूर उपलब्ध नाही
Twitterवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.
पोलिसांनी आतापर्यंत काय सांगितलं?
मुंबई पोलिसांनी 19 जानेवारीला अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ला आणि जबरी चोरीप्रकरणी प्रेस नोट जारी करत माहिती दिली.
यात पोलिसांनी सांगितलं, “सैफ अली खान यांच्या घरातील स्टाफ नर्स एलीयामा फिलीप (56 वर्षे) यांनी पोलिसांकडे तक्रार केली. यानुसार, 16 जानेवारीला तक्रारदार महिला या सैफ अली खान व करीना कपुर यांचा लहान मुलगा जहागीर (4 वर्षे) व आया जुनु (30) वर्षे यांच्यासह बेडरूममध्ये झोपलेल्या होत्या.”
“पहाटे 2 वाजताच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती जबरी चोरी करण्याच्या इराद्याने घरात आला. त्याच्या हातात लाकडासारखी वस्तू व हेक्सा ब्लेडसारखी हत्यारं होती.”
“त्या व्यक्तीने नर्सकडे पैशाची मागणी केली. तसेच हातातील हत्यांरांनी नर्स एलीयामा, आया जुनु आणि मदतीसाठी आलेल्या सैफ अली खान यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात हे सर्व गंभीर जखमी झाले,” अशी माहिती पोलिसांनी दिली.
नर्सच्या तक्रारीवरून सविस्तर जबाब नोंदवण्यात आला आहे. वांद्रे पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 311, 312, 331 (4), 331 (6), 331 (7) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक 85/2025 दाखल केला आहे
या गुन्ह्याच्या तपासासाठी विविध तपास पथके तयार करण्यात आली आहेत. तांत्रिक तपास करून आरोपीचा शोध घेण्यात आला. आरोपी त्याच्या मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ठाणे येथील हिरानंदाणी इस्टेट (घोडबंदर रोड) ताब्यात घेतले.
आरोपी भारतीय की बांगलादेशी?
पोलिसांनी जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटलं आहे की, आरोपीची अधिक चौकशी केल्यावर तो मुळचा बांगलादेशमधील झलोकाठी जिल्ह्यातील ग्राम राजाबरीया (नॉलसिटी) येथील रहिवासी असल्याचं समजलं.
त्याने चोरी करण्याच्या उद्देशाने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार या गुन्ह्यात भारतात प्रवेशास प्रतिबंध अधिनियम 1948 कलम 3 (ए), 6 (ए), कलम 3 (1), 14, परकीय नागरीक आदेश 1946 इत्यादी कलमे वाढवण्यात आली आहेत.
मुंबई पोलीस आयुक्त दिक्षित गेडाम यांनी आरोपीच्या बांगलादेशी असण्याबाबत पत्रकार परिषदेत म्हटलं की, “आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली. प्रथमदर्शी हा आरोपी बांगलादेशी असल्याचं निष्पन्न होत आहे. आम्ही आरोपीला न्यायालयासमोर हजर करून त्याची पोलीस कोठडी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर पुढील तपास केला जाईल.”
मुंबई पोलीस उपायुक्त दिक्षित गेडाम यांनी काय सांगितलं?
मुंबई पोलीस उपायुक्त दिक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषद घेऊन सैफ अली खानवरील चाकूहल्ल्यातील आरोपीबाबत माहिती दिली.
दिक्षित गेडाम म्हणाले, “16 जानेवारीला बांद्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी चोरीचा आणि हल्ल्याचा प्रयत्न झाला त्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीचं नाव मोहम्मद शरिफूल इस्लाम शहजाद (30 वर्षे) असं आहे.”
अटक करण्यात आलेल्या आरोपीची आधीची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का या प्रश्नावर गेडाम म्हणाले की, त्याची आधीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आलेली नाही.
आरोपीने गुन्ह्यासाठी सैफ अली खानच्या घराचीच निवड का केली? यावर ते म्हणाले, “अनेक गोष्टींचा तपास सुरू आहे. तपासात काही निष्पन्न झाल्यावर याबाबत माहिती दिली जाईल.”
‘मणक्यात चाकू अडकला होता, पण जीवाचा धोका टळला’
लिलावती हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नीरज उत्तमानी यांनी सांगितलं, “सध्या सैफ अली खानवर न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे, प्लास्टिक सर्जन डॉ. लीना जैन यांच्या पथकाकडून उपचार सुरू आहेत. सैफ अली खान यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. ते आता बरे होत आहेत.”
डॉ. उत्तमानी म्हणाले, “शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खानला आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे. एक-दोन दिवसात त्याला सामान्य वॉर्डात नेण्यात येईल. या हल्ल्यात त्याला अनेक खोल जखमा झाल्या होत्या मात्र, आमच्या डॉक्टरांनी त्यावर योग्य उपचार केले.”
सैफ अली खानवर उपचार करणारे न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे म्हणाले, “अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्यानंतर सैफ अली खानला 16 तारखेच्या पहाटे तीन वाजता आमच्या रुग्णालयात आणलं गेलं. सैफ यांच्या मणक्यातून द्रव स्रवत होता. त्यांच्या मणक्यात एक चाकूचा तुकडा अडकला होता.”
“सैफ अली खान यांच्या शरीरावर सहा जखमा होत्या. शस्त्रक्रिया करून चाकूचा तुकडा काढण्यात आला आहे. तसेच तिथून स्रवणारा द्रव देखील थांबवण्यात आला आहे. वेळीच उपचार केले नसते, तर मणक्याला गंभीर दुखापत होऊन, हालचालींवर परिणाम झाला असता.”
डॉ. डांगे पुढे म्हणाले, “सैफ अली खान यांच्या डाव्या हातावर आणि मानेच्या उजव्या बाजूला खोल जखमा झाल्या होत्या. या जखमांवर प्लास्टिक सर्जन डॉ. लीना जैन आणि त्यांच्या टीमने उपचार केले आहेत.”
“सैफला हृदयविकाराचा त्रास असल्यानं हृदयविकारतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास कुडवा हेदेखील तिथे उपस्थित होते. आता ते पूर्णपणे सुरक्षित असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. एक-दोन दिवसात त्यांना घरी सोडण्यात येईल,” अशी माहिती त्यांनी दिली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC