Source :- BBC INDIA NEWS
अपडेटेड 9 मिनिटांपूर्वी
हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून अटक केलीय. ठाण्यातील हिरानंदानी लेबर कॅम्पमधून या आरोपीला अटक करण्यात आलं आहे.
या लेबरकॅम्पच्या झुडूपात आरोपी लपून बसला होता. तिथून पोलिसांनी त्याला अटक केली.
मोहम्मद आलियान उर्फ बीजे असं आरोपीचं नाव असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. पकडलं जाण्याच्या भीतीने आरोपीने सुरुवातील आपलं नाव ‘विजय दास’ असं सांगितलं होतं.
आरोपी ठाण्याच्या ‘रिकीज बार’मध्ये हाऊस कीपिंगचं काम करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसंच, तो मूळचा पश्चिम बंगालचा आहे.
आरोपीला मध्यरात्री 3.30 वाजता वांद्रे पोलीस ठाण्यात पोलीस चौकशीसाठी आणण्यात आलं. आज वांद्रे हॉलिडे कोर्टात सकाळी 11 वाजेपर्यंत हजर केलं जाईल.
हल्ल्याच्या दोन दिवसांनंतरही आरोपी सापडत नव्हता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेने आता 20 पथके तयार केली होती.
परवा (17 जानेवारी) च्या रात्री मुंबईतल्या अनेक भगातून संशयित लोकांना पोलिसांनी चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात आणलं होतं. रात्रीत 15 हून अधिक जणांची पौलिसांनी चौकशी केली होती. चौकशीदरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या आरोपीचे छायाचित्र दाखवत पोलिसांनी संशयितांची चौकशी केली होती.
आरोपीला लवकर अटक व्हावी, यासाठी पोलिसांनी रात्री विनाकारण फिरणाऱ्या लोकांची आणि रेकॉर्डवर असलेल्या आरोपींची ही चौकशी केली होती.
सैफ अली खान याच्यावर झालेल्या चाकूहल्ला झाल्यानंतर मुंबईच्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहिती दिली होती की, सैफ अली खानच्या घराची इमारत आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी पोलिसांना अनेक पुरावे मिळाले असल्याचं सांगितलं होतं. तसंच, पोलीस लवकरच हे प्रकरण सोडवण्यात यश मिळवतील, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला होता.
चोरी करण्याच्या प्रयत्नातून ही घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, आता आरोपीला पकडल्यानं खरं कारण समोर येईल.
दरम्यान, सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या स्टाफ नर्सनं पोलिसांना दिलेला जबाब सूत्रांच्या हवाल्यानं मिळाला आहे. या संपूर्ण जबाबात त्या रात्री नेमकं काय घडलं याचा सविस्तर घटनाक्रम सांगण्यात आला आहे.
पोलिसांनी काय सांगितलं होतं?
पोलीस तपासात एक व्यक्ती सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. इमारतीच्या फायर एक्झिटचा वापर करून त्यानं सैफ अली खानच्या घरात प्रवेश केल्याची माहिती आहे.
आरोपीला पकडण्यासाठी आणि तपास करण्यासाठी पोलिसांची 10 पथके तयार केली आहेत.
पोलीस उपायुक्त दिक्षित गेडाम यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, “रात्री दीड ते अडीच वाजताच्या सुमारास घटना घडली. एका आरोपीची ओळख पटली आहे. कोणतेही शस्त्र ताब्यात घेतलेले नाही. 25-30 सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. सैफच्या घरातील मदतनीसचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तिच्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल केला आहे.”
“आरोपी फायर एस्केपच्या शिड्यांनी घरापर्यंत पोहचला. घरातील दरवाजा कसा उघडला किंवा आत कसा शिरला याबाबत अद्याप चौकशी सुरू आहे. चौरीच्या उद्देशानंच आरोपी गेला होता असा प्राथमिक अंदाज आहे,” अशी माहिती गेडाम यांनी दिली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
Twitter पोस्ट समाप्त
मजकूर उपलब्ध नाही
Twitterवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.
स्टाफ नर्सच्या जबाबात काय म्हटलं आहे?
सैफ अली खानच्या घरी स्टाफ नर्स म्हणून काम करणाऱ्या एलीयामा फिलिप यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 16 जानेवारीच्या मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास त्यांना घरातील एका बाथरूमच्या दरवाजाजवळ टोपी घातलेल्या व्यक्तीची सावली दिसली. एलीयामा या सैफ अली खानचा छोटा मुलगा जहांगीरची देखभाल करण्याचं काम करतात.
पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांनी असं म्हटलं आहे की, रात्री 11 वाजता त्यांनी जहांगीरला जेवण करवून झोपवलं आणि त्यानंतर 2च्या सुमारास हा प्रकार घडला. एलीयामा यांनी घरात घुसलेल्या व्यक्तीला बघितलं आणि त्यानं नर्सला आवाज न करण्याचा इशारा केला. हे सगळं घडत असताना जहांगीरची आया म्हणून काम करणाऱ्या जुनू या देखील तिथे होत्या. हल्लेखोरानं या दोघींना धमकावलं.
हल्लेखोराच्या एका हातात लाकडासारखी वस्तू होती आणि दुसऱ्या हातात ‘हेक्सा ब्लेड’ सारखं हत्यार होतं. त्यावेळी झालेल्या झटापटीत हल्लेखोरानं एलीयामा यांच्यावर वार केला. त्यात त्यांच्या डाव्या हाताला जखम झाल्याची माहिती आहे. हल्लेखोरानं त्याला एक कोटी रुपये हवे असल्याचंही सांगितलं.
याचदरम्यान संधी साधून जुनु त्या खोलीच्या बाहेर पळाल्या. त्यांचा आवाज ऐकून सैफ अली खान आणि करीना कपूर धावत मुलगा जहांगीरच्या रूममध्ये आले. सैफ अली खाननं हल्लेखोराला ‘तू कोण आहेस आणि तुला काय पाहिजे?’ असं विचारलं. त्यानंतर चोरानं सैफ अली खानवर हातातल्या हेक्सा ब्लेडनं हल्ला केला.
यानंतर सैफ अली खान आणि इतर सर्वजण रुमच्या बाहेर पळाले. घरातील इतर मदतनीस जागे झाल्यानंतर त्यांनी हल्लेखोराचा शोध घेतला. मात्र तिथे कुणीही आढळून आलं नाही.
या हल्ल्यात सैफ अली खानच्या मानेच्या पाठीमागे, उजव्या खांद्याजवळ, डाव्या हाताच्या मनगटाजवळ आणि कोपऱ्याजवळ दुखापत झाली.
सैफ अली खानवर सध्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मणक्यात चाकू अडकला होता, पण जीवाचा धोका टळला
लिलावती हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नीरज उत्तमानी यांनी सांगितलं, “सध्या सैफ अली खानवर न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे, प्लास्टिक सर्जन डॉ. लीना जैन यांच्या पथकाकडून उपचार सुरू आहेत. सैफ अली खान यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. ते आता बरे होत आहेत.”
डॉ. उत्तमानी म्हणाले, “शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खानला आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे. एक-दोन दिवसात त्याला सामान्य वॉर्डात नेण्यात येईल. या हल्ल्यात त्याला अनेक खोल जखमा झाल्या होत्या मात्र, आमच्या डॉक्टरांनी त्यावर योग्य उपचार केले.”
सैफ अली खानवर उपचार करणारे न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे म्हणाले, “अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्यानंतर सैफ अली खानला 16 तारखेच्या पहाटे तीन वाजता आमच्या रुग्णालयात आणलं गेलं. सैफ यांच्या मणक्यातून द्रव स्रवत होता. त्यांच्या मणक्यात एक चाकूचा तुकडा अडकला होता.”
“सैफ अली खान यांच्या शरीरावर सहा जखमा होत्या. शस्त्रक्रिया करून चाकूचा तुकडा काढण्यात आला आहे. तसेच तिथून स्रवणारा द्रव देखील थांबवण्यात आला आहे. वेळीच उपचार केले नसते, तर मणक्याला गंभीर दुखापत होऊन, हालचालींवर परिणाम झाला असता.”
डॉ. डांगे पुढे म्हणाले, “सैफ अली खान यांच्या डाव्या हातावर आणि मानेच्या उजव्या बाजूला खोल जखमा झाल्या होत्या. या जखमांवर प्लास्टिक सर्जन डॉ. लीना जैन आणि त्यांच्या टीमने उपचार केले आहेत.”
“सैफला हृदयविकाराचा त्रास असल्यानं हृदयविकारतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास कुडवा हेदेखील तिथे उपस्थित होते. आता ते पूर्णपणे सुरक्षित असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. एक-दोन दिवसात त्यांना घरी सोडण्यात येईल,” अशी माहिती त्यांनी दिली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC