Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
10 मिनिटांपूर्वी
सध्या अवकाशात एक भलंमोठं सौरवादळ निर्माण झालं आहे. यावर्षी निर्माण झालेलं हे सर्वांत मोठं सौरवादळ आहे.
नासाच्या सोलर डायनामिक्स ऑब्झर्व्हेटरीनं म्हणजेच सूर्यावरील घडामोडींचं निरीक्षण करणाऱ्या वेधशाळेनं या सौरवादळाची काही छायाचित्रंही घेतलेली आहेत.
सूर्यावरील घडामोडी अधिक सक्रियतेने घडू लागतात तेव्हा या काळात, सूर्याकडून लहान लहान भारित (चार्ज्ड) कण बाहेर फेकले जातात. उर्जेने भारित असलेल्या अशा कणांच्या प्रवाहालाच ‘सौर वारा’ म्हणून ओळखलं जातं.
हा सौर वारा सातत्याने पृथ्वीच्या दिशेने धडका मारु लागतो, तेव्हा या घटनेला ‘स्पेस वेदर’ किंवा ‘सौरवादळ’ असं म्हणतात.
या सौरवादळामुळे पृथ्वीवरील काही तांत्रिक यंत्रणा विस्कळीत होऊ शकतात.
त्याचा सर्वांत मोठा परिणाम होतो तो वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेवर. थोडक्यात, या सौर वादळामुळे पृथ्वीवरील ‘बत्ती गुल्ल’ होऊ शकते.
फक्त एवढंच नाही, तर अंतराळात असलेल्या अंतरळवीरांसाठीही हे सौर वादळ अनेक अर्थांनी धोकादायक ठरू शकतं. मात्र, पृथ्वीवर राहणाऱ्या सामान्य लोकांवर या सौर वादळाचा थेट कोणताही धोकादायक परिणाम होत नाही.
सौर ज्वाला म्हणजे काय?
अशा प्रकारची सौर वादळं निर्माण होणं हा सूर्याच्या ‘सोलर सायकल’चा नियमित भाग आहे. नियमित अंतराने ते घडतच असतात. या सौर वादळांच्या दरम्यान सूर्यावर मोठे स्फोट होतात.
या स्फोटांनाच सौर ज्वाला आणि कोरोनल मास इजेक्शन (Coronal Mass Ejections – CMEs) असं म्हटलं जातं. त्यातून अवकाशात प्रकाश, ऊर्जा आणि सौर पदार्थ बाहेर फेकले जातात.
सौर ज्वाला या एक प्रकारच्या विद्युत चुंबकीय विकिरणे (इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स) असतात. सूर्याकडून फेकल्या गेलेल्या या रेडिएशन्स प्रकाशवेगाने अंतर कापतात. हे रेडिएशन्स अवघ्या आठ मिनिटांत पृथ्वीवर पोहोचतात.

फोटो स्रोत, Getty Images
या सौरज्वाला बहुतेक वेळा कोरोनल मास इजेक्शन (CMEs) सोबतच बाहेर फेकल्या जातात. सीएमई म्हणजे सूर्यापासून येणारे ऊर्जेचे मोठे स्फोट असतात. मात्र, ते सौर ज्वालांइतके गतीमान नसतात. ते लाखो मैल किंवा किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करतात.
ही सौर वादळं वेगवेगळ्या पातळीवरच्या ताकदीनं पृथ्वीवर पोहोचू शकतात. या सौर वादळादरम्यान सूर्यातून अधिक ऊर्जा बाहेर पडते. या उर्जेमुळे अवकाशामध्ये तेजस्वी प्रकाश दिसू शकतो.
या प्रकाशाला ‘अरोरा’ (aurora) म्हणजेच ‘ध्रुवीय प्रकाश’ असं म्हणतात. त्यांना ‘नॉर्दर्न लाईट्स’ किंवा ‘सदर्न लाईट्स’ असंही म्हणतात.
सौर वादळाचा पृथ्वीवर काय परिणाम होऊ शकतो?
‘नासा’नं दिलेल्या माहितीनुसार, सौर ज्वाला आणि सौर उद्रेकांचा पृथ्वीवर परिणाम होऊ शकतो. त्यामध्ये, पृथ्वीवरील रेडिओ कम्युनिकेशन, इलेक्ट्रिक पॉवर ग्रीड्स आणि नेव्हिगेशन सिग्नल्स या सर्व तांत्रिक यंत्रणा ठप्प होऊ शकतात.
2017 मध्ये, सूर्याच्या पृष्ठभागावरून निघालेल्या दोन प्रचंड सौर ज्वालांमुळे GPS नेव्हिगेशन सिस्टीमसारख्या तांत्रिक यंत्रणांमध्ये व्यत्यय आला होता.
फेब्रुवारी 2011 मध्ये, प्रचंड मोठ्या सौर ज्वाला निर्माण झाल्या होत्या. या सौर ज्वालांमुळे संपूर्ण चीनमधील रेडिओ सिग्नल्स विस्कळीत झाले होते.

फोटो स्रोत, Getty Images
त्याआधी, 1989 मध्ये, सौर ज्वालांसंदर्भातील अशीच एक घटना कॅनडामध्ये घडली होती. त्यावेळी तब्बल नऊ तासांसाठी संपूर्ण ब्लॅकआऊट म्हणजेच वीजपुरवठा पूर्णपणे खंडीत झाला होता. त्यामुळे, कॅनडातील क्युबेकमधील लाखो लोक प्रभावित झाले.
1959 साली, एक प्रचंड सौर उद्रेक झाला होता. या सौर उद्रेकामुळे पृथ्वीवर मोठं भूचुंबकीय (Geomagnetic) वादळ आलं होतं. व्हिक्टोरियन काळात या वादळामुळे रेल्वे सिग्नल आणि टेलिग्राफ लाईन्समध्ये अडथळा निर्माण झाला होता.
आजही, अशाप्रकारची वादळे धोका म्हणून उभी राहताना दिसतात. लँकेस्टर विद्यापीठाच्या एका अभ्यासात यूकेच्या रेल्वे नेटवर्कला इशारा देण्यात आला आहे.
या इशाऱ्यात असं म्हटलं आहे की, यूकेतील रेल्वे व्यवस्था ही सौर वादळांसाठी तयार असावी. ही वादळे दुर्मिळ आहेत, परंतु तरीही ती या नेटवर्कमध्ये व्यत्यय आणू शकतात.
सौर वादळं कधी येतात?
सूर्य हा विद्युतभारित (Electrically-Charged) गरम वायूंपासून बनलेला आहे. त्यामुळे, त्याभोवती एक शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. हे चुंबकीय क्षेत्र एका चक्रातून जातं, ज्याला सौरचक्र म्हणतात.
यामुळे, सूर्याचा पृष्ठभाग कधी शांत तर कधी वादळी अशा अवस्थांमधून ठराविक काळाने जात असतो. दर 11 वर्षांनी, सौरचक्राच्या शिखरावर, सूर्याच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवरील चुंबकीय क्षेत्र स्थान बदलते.
नासा आणि एनओएएच्या (National Oceanic and Atmospheric Administration – NOAA) तज्ज्ञांच्या एका गटाने सूर्याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, सध्याच्या सौरचक्राला ‘सोलार सायकल 25’ असं म्हणतात.
हे सौरचक्र डिसेंबर 2019 मध्ये सुरू झालंय. सौरचक्राच्या सुरुवातीच्या टप्प्याला ‘सोलर मिनिमम’ असं म्हणतात. या टप्प्यात, सूर्यावर खूप कमी ‘सनस्पॉट्स’ असतात. सूर्याच्या हालचालींचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञ याच सनस्पॉट्सचा वापर करतात.

फोटो स्रोत, Getty Images
जेव्हा सूर्य अधिक सक्रिय होतो तेव्हा सूर्यावरील या सनस्पॉट्सची अर्थात डागांची संख्या वाढते. सौर चक्राच्या मधल्या टप्प्याला ‘सोलर मॅक्झिमम’ असं म्हणतात. या काळात, सूर्यावर सर्वाधिक सनस्पॉट्स असतात.
सूर्याचे चुंबकीय ध्रुव या ठिकाणी आपले स्थान बदलतात. नासा आणि एनओएए म्हणतात की, सूर्याने गेल्याच वर्षी ही ‘सोलर मॅक्झीमम’ची पातळी गाठली आहे.
सूर्यावरील ‘सनस्पॉट्स’ हे अशा ठिकाणी असतात जिथे प्रकाश आणि उर्जेचे मोठे स्फोट होतात. सनस्पॉट्स हे इतर भागापेक्षा सूर्याच्या पृष्ठभागावर अधिक गडद दिसतात. कारण, हा भाग तुलनेनं थंड असतो.
बहुतांश सनस्पॉट्स पृथ्वीइतके किंवा त्याहूनही अधिक मोठे असतात. ही सौर वादळे ‘सन मॅक्झिमम’च्या दरम्यान होण्याची शक्यता जास्त असते. 11 वर्षांच्या चक्रादरम्यान सन मॅक्झिमम उष्णतेच्या शिखरावर असताना सौर वादळे येण्याची शक्यता जास्त असते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC