Source :- BBC INDIA NEWS

53 मिनिटांपूर्वी

भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. त्याचवेळी नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू आहे. त्यापासून वाचण्यासाठी सीमेलगत असलेल्या भारताच्या बाजूचे लोक आपली घरं सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करत आहेत.

यामुळं नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या नागरिकांसाठी संघर्षाच्या दिवसांतील नेहमीची कठीण परिस्थिती पुन्हा आली आहे, जसं जखमी होणं, मालमत्ता आणि जनावरांचं नुकसान, संचारबंदी, शाळा, रुग्णालयं आणि बाजारपेठा बंद होणं.

पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर पाकिस्तान सातत्यानं सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे, असं भारतानं म्हटलं आहे. या दरम्यान पाकिस्तान 740 किलोमीटर लांब नियंत्रण रेषेवरील अनेक ठिकाणांना लक्ष्य करत आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, बुधवारी (7 मे) पहाटे पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर, एलओसीवर झालेल्या गोळीबारात 16 लोक ठार आणि 59 जण जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये महिला, मुलं आणि भारतीय लष्कराचे एक जवान लान्स नायक दिनेश कुमार यांचाही समावेश आहे.

पूंछमधील अनेक लोक आपली घरं सोडून स्थलांतर करत आहेत. परंतु, महताब दीन हे कुठंही जाणार नसल्याचं सांगतात.

फोटो स्रोत, Aamir Peerzada/BBC

पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये क्षेपणास्त्रं आणि ड्रोनचे अवशेष सापडल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

भारताने म्हटलं आहे की, 7 आणि 8 मेच्या रात्री पाकिस्तानकडून झालेल्या अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना रोखण्यात यश मिळाले आहे.

त्यानंतर गुरुवारी (8 मे) भारताने लाहोरमधील एक एअर डिफेन्स सिस्टिम नष्ट केल्याचे सांगितले. परंतु, पाकिस्तानने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही.

बुधवारी रात्री ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले

जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ आणि राजौरी येथे मोठ्याप्रमाणात तोफखान्याचा वापर केला जात असल्याचे, परराष्ट्र मंत्रालयाच्या गुरुवारच्या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितले.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथील गुरुद्वाराला लक्ष्य केलं. यात शीख समुदायाचे तीन लोक मारले गेले.

परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं की, बुधवारी आणि गुरुवारी रात्री पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी तळांना ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

मंत्रालयानुसार अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज येथे ड्रोन हल्ले करण्यात आले.

पूंछमध्ये गोळीबारामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झालेलं घर

फोटो स्रोत, Aamir Peerzada/BBC

भारताच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं की, “या हल्ल्यांना इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टिमने निष्प्रभ केले. या हल्ल्यांचे अवशेष अनेक ठिकाणांहून जप्त करण्यात आले आहेत. यामुळं पाकिस्तानी हल्ल्यांची पुष्टी होते.”

संरक्षण मंत्रालयानुसार, “पाकिस्तानने जम्मू-कश्मीरच्या कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पुंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये मोर्टार आणि हेवी कॅलिबर आर्टिलरीचा वापर करून नियंत्रण रेषेच्या पलीकडे अनावश्यक गोळीबाराची तीव्रता वाढवली आहे. भारताने मोर्टार आणि आर्टिलरीच्या गोळीबाराला योग्य प्रत्युत्तर दिले आहे.”

दुसरीकडे, पाकिस्तानने बुधवारी रात्री 25 भारतीय ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे, ज्यामध्ये काही ठिकाणी नुकसानही झाले आहे.

एलओसीवर परिस्थिती कशी आहे?

जम्मू आणि काश्मीरमधील सुरनकोट येथून बीबीसीसाठी वार्तांकन करणाऱ्या डेविना गुप्ता यांच्यानुसार, भारतीय हवाई हल्ल्यानंतर गोळीबार तीव्र झाला असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितलं आहे.

स्थानिक रहिवासी सोबिया यांनी सांगितलं की, “मी स्फोटाचा एक मोठा आवाज ऐकला आणि एक महिन्याच्या बाळाला घेऊन मी तेथून पळाले. मी खूप घाबरले होते.”

आणखी एक स्थानिक रहिवासी सफरीन अख्तर यांनी सांगितलं की, त्यांच्या घरासमोर एक शेल पडल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबासह घर सोडलं.

“मला एकही कार मिळाली नाही आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी मला अनेक मैल चालावं लागलं. सगळीकडे गोळीबाराचे आवाज येत होते,” असं त्या म्हणाल्या.

 एलओसीजवळ पूंछमध्ये राहणाऱ्या सफरीन यांना त्यांचं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं आहे.

फोटो स्रोत, Aamir Peerzada/BBC

पुंछमध्ये गेल्या 48 तासांमध्ये परिस्थिती बिघडल्यानंतर सुरनकोटमध्ये आपल्या मित्र आणि नातेवाईकांकडून आश्रय मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे सीमेपासून थोड्या अंतरावर आहे, त्यामुळं इथं गोळीबाराच्या घटना फारशा घडत नाहीत.

सुरनकोटचे रहिवासी मोहम्मद आलम मलिक म्हणाले, “माझ्या घरात 25 लोक थांबले आहेत. काही लोक पायी चालत इथं आले आहेत. घाईघाईत काही लोक त्यांच्या घराला कुलूपही लावू शकले नाहीत.”

येथून 80 लोक आपली घरं सोडून गेले आहेत, असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे.

बीबीसीचे प्रतिनिधी सौतिक बिस्वास यांच्या मते, पूर्वीच्या तुलनेत लोकांचे स्थलांतर इतके व्यापक नाही. 2016 मध्ये सीमेजवळ राहणाऱ्या जवळपास 27,000 पेक्षा जास्त लोकांना स्थानांतर करावं लागलं होतं. पण सध्याच्या परिस्थितीमुळे सीमेजवळ राहणाऱ्या लोकांसाठी धोका वाढला आहे.

 एलओसीवर मोठ्याप्रमाणात गोळीबार झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

फोटो स्रोत, AFP

पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्ला, पुंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर येथे छोट्या शस्त्रांनी गोळीबार केला, ज्याला भारतीय लष्करानं योग्य प्रत्युत्तर दिले, असं भारताचं म्हणणं आहे.

पंजाबच्या गावांमध्ये सापडली रॉकेटसदृश वस्तू

गुरुदासपूरमधील पंधेर गावातील रहिवासी रचपाल सिंग यांनी सांगितलं की, त्यांना काही अवशेष सापडले आणि त्यावेळी त्यांच्या शेताला आग लागली होती.

बुधवारी रात्री अमृतसर, भटिंडा, गुरुदासपूर येथे काही संशयास्पद वस्तू सापडल्या आणि स्फोटांचे आवाज ऐकू आले. हा पाकिस्तानकडून करण्यात आलेला गोळीबार असल्याचे ग्रामस्थ मानत आहेत.

अमृतसरच्या जेठुवाल गावातील रहिवासी दिलदार सिंग यांनी सांगितलं की, रात्री त्यांना स्फोटाचे आवाज ऐकू आले आणि सकाळी शेतात क्षेपणास्त्राचे अवशेष आढळले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.

अमृतसरच्या जेठुवालमध्ये रॉकेटसारख्या वस्तूचे अवशेष सापडले.

फोटो स्रोत, Ravinder Robin

शेतात 6-7 फूट लांब रॉकेटसारखी वस्तू सापडल्याचे गावातील आणखी एक व्यक्ती लवप्रीत सिंग यांनी सांगितले.

बीबीसीचे प्रतिनिधी सुरिंदर मान यांनी सांगितलं की, मोगा जिल्ह्यातील संधुआनवाला गावात एका जनावरांच्या शेडवर लोखंडी वस्तू पडली होती. तळवंडीच्या भांगेरिया गावातही अशीच एक लोखंडी वस्तू आढळून आली आहे.

प्रशासनाने या वस्तू ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या वस्तूंबाबत अधिक माहिती दिलेली नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC