Source :- BBC INDIA NEWS

अभिनंदन लोढा, मंगलप्रभात लोढा आणि अभिषेक लोढा

फोटो स्रोत, Getty Images/Facebook/HoABL

‘गावानं लोढा आला…’ हे आगरी-कोळी भाषिक गाणं आपण ऐकलंच असेल. यातील ‘लोढा’ हे भारतातील बांधकाम क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या कंपनीचं नाव आहे. हे नाव महाराष्ट्रात गावागावापासून शहराशहरापर्यंत पोहोचलं आहे.

बांधकाम क्षेत्रातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांपैकी एक आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळातील श्रीमंत आमदारांच्या यादीत असणारे एक नाव म्हणजे मंगल प्रभात लोढा. हजारो कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या लोढा कुटुंबीयांमध्ये आता व्यावसायिक कारणास्तव वाद निर्माण झाला आहे.

मंगल प्रभात लोढा यांच्या प्रतिथयश कुटुंबाला तडा गेला असून त्यांचे दोन्ही सुपुत्र अभिषेक लोढा आणि अभिनंदन लोढा या बंधूंमध्ये ‘लोढा’ हे नाव वापरण्यावरून सुरू झाला आहे. किंबहुना, या वादानं कोर्टाची पायरी चढलीय.

धाकट्या भावाला (अभिनंदन) ‘लोढा’ हे नाव वापरण्यापासून रोखण्याच्या मागणीसाठी अभिषेक लोढांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. अभिषेक लोढा यांच्या कंपनीने अभिनंदन लोढा यांच्या कंपनीविरोधात याचिका दाखल केलीय.

नक्की वाद कशावरून आहे?

सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील मुंबईतील आमदार मंगल प्रभात लोढा यांना दोन सुपुत्र आहेत. थोरल्या मुलाचं नाव अभिषेक, तर धाकट्या मुलाचं नाव अभिनंदन आहे.

मंगलप्रभात लोढा हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात सक्रीय आहेत. कॅबिनेट मंत्रिपदही त्यांच्याकडे आहे. त्यांच्या राजकारणातील सक्रियतेमुळे व्यवसायाची संपूर्ण धुरा लोढांचे हे दोन्ही मुलं सांभाळतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून लोढांच्या दोन्ही मुलांमध्ये व्यावसायिक कारणावरून वाद आहे.

त्यातच अभिषेक लोढा यांच्या ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड’ने गेल्या आठवड्यांत अभिनंदन यांच्या ‘हाऊस ऑफ अभिनंदन’ लोढा या कंपनी विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका केली आहे.

या याचिकेत अभिषेक लोढांनी दावा केलाय की, ‘लोढा’ या व्यापारचिन्हाचे स्वामित्वहक्क आपल्याकडे असून इतर कोणीही ते वापरू शकत नाही. त्यामुळे लोढा हे व्यापारचिन्ह वापरण्यापासून अभिनंदन आणि त्यांच्या कंपनीला कायमची मनाई करावी.

अभिषेक लोढा यांनी याचिकेत काय म्हटलं ?

अभिषेक लोढा यांनी केलेल्या याचिकेत म्हटलं आहे की, आपल्या कंपनीकडे लोढा व्यापारचिन्हाचे नोंदणीकृत मालकीहक्क आहेत. तसेच, याआधी किंवा आजपर्यंत अभिनंदन यांच्या कंपनीला हाऊस ऑफ अभिनंदन लोढा हे नाव वापरण्यास आपण ना हरकत दिली नाही. लोढा हे नाव सर्वदूर करण्यासाठी गेल्या चार दशकांपासून आमच्या कंपनीने प्रयत्न केले आहेत. तसेच, त्यासाठी कंपनीने एकाच दशकात 1700 कोटी रुपये खर्च केले आहेत.

‘लोढा समूहाचे नाव प्रतिष्ठित मानले जाते आणि कंपनीने गेल्या दशकात देशांतर्गत मालमत्ता विक्रीतून 91 हजार कोटी रुपये कमावले आहेत. लोढा समूहाने जाहिरातीवर कोट्यवधी खर्च केले आहे,’ असा दावाही अभिषेक यांनी केला आहे. त्यामुळे अभिनंदन लोढा यांनी हे नाव वापरू नये, अशी मागणी करत, ‘वापरल्यास पाच हजार कोटी रुपयांच्या नुकसान भरपाई’च्या दाव्याची मागणी त्यांनी केलीय.

तसेच, याचिकेत अभिषेक लोढा यांनी म्हटले आहे की, मॅक्रोटेक डेव्हलपर्स लोढा समूहाची प्रमुख कंपनी आहे. लोढा समूहातील कंपन्या व्यापारचिन्हाचा वापर करू शकतील, असा करार 2015 पर्यंत होता. 2015 मध्ये अभिनंदन लोढा हे लोढा समूहापासून वेगळे होतील आणि स्वत:चा व्यवसाय सुरू करतील, असा निर्णय घेण्यात आला होता.

अभिषेक लोढा

फोटो स्रोत, Getty Images

मार्च 2017 मध्ये आणि नंतर 2023 मध्ये वेगळे होण्याच्या अटी निश्चित करण्यात आल्या. त्यानुसार, अभिनंदन यांची कंपनी ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ नावाने काम करेल, असा निर्णय घेण्यात आला.

2023 मध्ये झालेल्या करारात आपण सहभागी नव्हतो. त्यामुळे, त्यातील अटींना बांधील नसल्याचा दावाही अभिषेक यांच्या मॅक्रोटेक डेव्हेलपर्सने केला आहे.

याबाबत कोर्टात काय घडलं?

न्या. मनीष पितळे यांच्या एकलपीठासमोर मंगळवारी (21 जानेवारी) सकाळच्या सत्रात अभिषेक यांची याचिका सर्वप्रथम सुनावणीसाठी आली.

अभिषेक लोढा यांनी पाच हजार कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईच्या दाव्याची मागणी केली असल्याने त्यांच्या याचिकेवर आपण सुनावणी घेऊ शकत नाही, असे न्या. पितळे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर, शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान भरपाईची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेणाऱ्या न्या. आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठापुढे दुपारच्या सत्रात अभिषेक यांची याचिका सादर करण्यात आली.

पुढील सुनावणी 27 जानेवारीला

सुनावणीच्या वेळी एकलपीठाने हा वाद दोन भावांमधील भांडणाशी संबंधित आहे का? अशी विचारणा अभिषेक यांच्या वकिलांकडे केली.

त्याला सकारात्मक उत्तर देऊन अभिषेक आणि अभिनंदन यांच्या लोढा या व्यापारचिन्हावरून वाद सुरू असल्याचे अभिषेक यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

त्यानंतर, एकलपीठाने प्रकरणाची सुनावणी 27 जानेवारी रोजी ठेवताना त्यावेळी अंतरिम दिलासा देण्याच्या मागणीवर युक्तिवाद ऐकण्याचे स्पष्ट केले.

अभिनंदन लोढा

फोटो स्रोत, HoABL.com

लोढा कुटुंबीयांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा

मुंबई हायकोर्टात केलेल्या याचिके संदर्भात लोढा कुटुंबीयांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकलेला नाही.

या याचिका संदर्भात लोढा यांच्या वकिलाशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीच्या वतीने करण्यात येत आहे.

कोर्टात याप्रकरणी याचिका आल्यानंतर याबाबत माध्यमात वेगवेगळे वृत्त आलेले आहे. त्यामुळे लोढा कुटुंबीयांच्या वतीने काय प्रतिक्रिया देण्यात येते, हे पाहणं पुढे महत्त्वाचं असेल. यासंदर्भात लोढा कुटुंबीयांची आणि त्यांच्या वकिलांची काही प्रतिक्रिया आल्यास यात अपडेट करण्यात येईल.

मात्र, झी बिझनेसला दिलेल्या मुलाखतीत अभिनंदन लोढा यांनी सांगितलं की, “मला माझ्या वाट्याला लोढा फिनसर्व आणि लोढा वेंचर्स आल्या होत्या, त्यानुसार मी गेल्या अनेक वर्षांपासून काम करतोय. गेल्या पाच वर्षापासून हाऊस ऑफ अभिनंदन लोढा हा आमचा रजिस्टर ब्रँड देशभर काम करतोय. त्यावेळेला त्यांना आक्षेप नव्हता, मग आता का आहे? तर मला वाटतं लोकांना आमचं यश पटत नसावं.”

लोढा ते मॅक्रोटेक डेव्हलपर्स

पूर्वीचं नाव ‘लोढा डेव्हलपर्स’ ही एक भारतीय बांधकाम व्यावसायिक कंपनी आहे. तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. या कंपनीची स्थापना 1980 मध्ये मंगल प्रभात लोढा यांनी केली होती.

मुंबई, ठाणे, हैदराबाद, पुणे आणि लंडन येथे त्यांनी निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता विकसित केल्या आहेत. लोढा अल्टामाउंट, द वर्ल्ड टॉवर्स, लोढा बेलिसिमो, ट्रम्प टॉवर मुंबई आणि लोढा पार्क हे त्यांचे काही उल्लेखनीय प्रकल्प आहेत.

मुंबईजवळील पलावा ही स्मार्ट सिटी विकसित करण्याचे श्रेयही कंपनीला जाते.

लोढा बिल्डर्स

फोटो स्रोत, Getty Images

19 एप्रिल 2021 रोजी कंपनी मॅक्रोटेक डेव्हलपर म्हणून नव्या नावाने बनवण्यात आली. या कंपनीचे आता सीईओ हे अभिषेक लोढा आहेत.

तर 2015 साली मंगल प्रभात लोढा यांच्याकडून मुलांना व्यवसाय आणि कंपन्यांचे वाटप करण्यात आले.

त्यात बांधकाम व्यावसायिक क्षेत्र अभिषेक लोढा यांना देण्यात आले, तर अभिनंदन लोढा यांना वडिलांकडून लोढा फिनसर्व आणि लोढा वेंचर्स या कंपन्या देण्यात आल्या होत्या. मात्र, पाच वर्षांपूर्वी अभिनंदन लोढा यांनी ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ हा एक ब्रँड बनवून बांधकाम व्यवसायात भरारी घेतली.

मंगल प्रभात लोढा- वकील ते व्यावसायिक आणि आता मंत्री

स्वातंत्र्य सैनिक आणि निवृत्त न्यायाधीश गुमानमल लोढा यांचे मंगलप्रभा लोढा हे सुपुत्र आहेत. मंगलप्रभात लोढा यांचा जन्म जोधपूरमध्ये 18 डिसेंबर 1955 रोजी झाला.

त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून काम करायला सुरुवात केली.

मंगल प्रभात लोढा

फोटो स्रोत, Facebook

लोढा यांनी राजस्थानात येथे त्यांचे एलएलबी पूर्ण केले. वकिली करण्यासाठी त्यांनी सनद घेतली. मात्र, त्यांचे वडील हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाल्याने त्यांनी त्या ठिकाणी वकिली करणे योग्य समजले नाही.

वकिलीला राम राम करत थेट मुंबई गाठली. मुंबईत आल्यावर त्यांनी वकिली न करता एका रिअल इस्टेट काम करण्यास सुरुवात केली. चार वर्ष काम केल्यावर त्यांनी इमारती बांधण्यासाठी लागणारे समान पुरवण्यास सुरुवात केली.

त्यानंतर 1982 मध्ये एका मित्राच्या साह्याने नालासोपारा येथे जमीन खरेदीविक्रीचा व्यवसाय सुरू केला. यात त्यांनी चांगले यश मिळवले.

बघता बघता महाराष्ट्रातील उभरत्या शहरांमध्ये त्यांनी आपले प्रकल्प सुरू केले आणि यशस्वी राबवले. त्यातूनच लोढा ही बांधकाम क्षेत्रातील एक अग्रेसर कंपनी निर्माण झाली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC