Source :- BBC INDIA NEWS
आम्ही प्राचीन भारतीय लिपीचं कोडं सोडवलं आहे, हडप्पा काळात वापरात असलेली भाषा आम्ही ज्ञात केली आहे, अशा आशयाचे शेकडो मेल राजेश पी एन राव यांना गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. विशेष म्हणजे या लिपिचा अर्थ लावण्यासाठी अनेक भाषातज्ज्ञ व इतिहासकार शेकडो वर्षांपासून प्रयत्न करत आहेत.
पण अद्याप त्यांना यात यश आलेलं नाही. राजेश यांच्या मेलबॉक्समध्ये मात्र रोज शेकडो लोक ही अज्ञात लिपी आपल्याला ज्ञात झाल्याचा दावा घेऊन येताना दिसतात.
हडप्पा काळातील सिंधू संस्कृतीच्या या अज्ञात लिपीचं कोडं सोडवल्याचा दावा करणारे हे बहुतांश लोक एक तर भारतातील आहेत अथवा भारतीय वंशाचे परदेशी नागरिक आहेत.
यातले काही अभियंते आहेत तर काही आयटी तज्ज्ञ, काही सरकारी नोकरदार आहेत तर काही निवृत्त अधिकारी.
“या सगळ्यांचं म्हणणं खरं मानलं तर सिंधू संस्कृतीची भाषा आपल्याला आता अवगत झालेली आहे. त्यामुळे यावर आता संशोधन करत बसण्याची गरजच उरलेली नाही,” असं पी एन राव मिश्किलपणे आणि काहीशा उपरोधिक सुरात म्हणाले.
राजेश पी एन राव हे युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये भाषा आणि संगणक तज्ज्ञ आणि प्राध्यापक आहेत. प्राचीन सिंधू संस्कृतीच्या लिपिचा उलगडा करण्यासाठी अनेक वैज्ञानिक शोधनिबंध त्यांनी सादर केलेले आहेत.
सिंधू लिपिचा उलगडा करण्याच्या या चढाओढीत आता तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनीही उडी घेतली आहे. या लिपिचा उलगडा करणाऱ्याला 10 लाख डॉलर्स म्हणजे 8 कोटी 65 लाख 81 हजार रुपयांचं बक्षिस देणार असल्याची घोषणा त्यांनी नुकतीच केली आहे.
अर्थात या घोषणेत शास्त्रीय / ऐतिहासिक चिकित्सेपेक्षा राजकीय हितसंबंधच अधिक जडलेले असले तरी राजकीय रंग चढल्यामुळे या प्राचीन भारतीय लिपीचं कोडं सोडवण्याची चुरस आणखी रंगतदार झाली आहे, हे नक्की.
साधरणत: आजच्या उत्तर भारत आणि पाकिस्तानात ही 5300 वर्ष जुनी सिंधू / हडप्पा संस्कृती अस्तित्वात होती. हडप्पा ही जगातील सर्वात जुन्या आणि प्रगत संस्कृतींपैकी एक मानली जाती. विशेषत: या संस्कृतीची नगररचना, स्थापत्य आणि कला काळाच्या तुलनेत अत्यंत विकसित असल्याचं आढळून आलेलं आहे.
एक शतकापूर्वी उत्खननात या संस्कृतीचा उलगडा झाला तेव्हा इथे घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, प्रशस्त इमारती, स्नानगृहे, धान्याची कोठारे, जहाजाच्या गोदी इत्यादींचे अवशेष आढळून आले होते.
या पुरातत्व नोंदींमुळे हडप्पा कालीन संस्कृती किती विकसित होती, याचा उलगडा झाला आणि या प्रगत आणि तितक्यात जुन्या संस्कृतीविषयी आणखी माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू झाले.
आत्तापर्यंत या प्रदेशात 2000 पेक्षा जास्त ठिकाणी केलेल्या उत्खननात या संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.
मात्र ही इतकी प्राचीन आणि प्रगत संस्कृती अचानक कशी विलुप्त झाली, हा प्रश्न अजुनही अनुत्तरितच आहे. कारण या काळात कुठलं मोठं युद्ध, दुष्काळ आणि इतर कुठली मोठी नैसर्गिक आपत्ती या भागावर ओढवल्याची नोंद इतिहासात नाही.
त्यामुळे सिंधू संस्कृती नामशेष होण्याचं हे कोडं अजून सुटलेलं नाही. पण याहूनही आणखी अवघड कोडं आहे ते म्हणजे इथल्या लिपीचं. विविध पुरातत्व पुराव्यांमध्ये आढळून आलेली ही लिपी आणि भाषेचा अर्थ अजूनही शास्त्रज्ञांना लावता आलेला नाही.
तो अर्थ जर लावता आला तर सिंधू संस्कृतीतील लोकांचं राहणीमान, जगण्याची पद्धत आणि एकूणच त्या काळातील राजकीय व सामाजिक व्यवस्थेचा उलगडा अगदी सहज करता येईल.
मागच्या 100 वर्षांपासून भाषातज्ज्ञ, वैज्ञानिक आणि पुरातत्वशास्त्रज्ञ या लिपिचा उलगडा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या लिपीबाबत अनेक वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले आहेत. पण तिचा ठोस अर्थ आजतागायत लागलेला नाही.
एक सिद्धांत असं मानतो की, ही सिंधू लिपी ब्राह्मी लिपीशी निगडीत आहे. तर काही जण तिचा संबंध आर्यन आणि सुमेरियन लिपीशी जोडायला बघतात. सिंधू लिपी फक्त काही राजकीय आणि धार्मिक चिन्हांमधून आकाराला आलेली आहे, असाही एक अंदाज बांधला जातो.
पण या लिपिच्या गुपिताचा भांडाफोड कोणालाही करता आलेला नाही. “ही लिपी मानवजातीच्या इतिहासातील सर्वात महत्वाची अज्ञात लिपी आहे,” असं सिंधू संस्कृतीचे अभ्यासक आस्को पार्पोला म्हणतात.
ही सिंधू लिपी हिंदू धर्मग्रंथातील चिन्ह आणि प्रतिकांपासून बनली असल्याचा एक मतप्रवाह मागच्या काही काळापासून लोकप्रिय होत आहे. पण हा सिद्धांत ही लिपी उलगडण्याऐवजी तिला आणखी गूढ आणि अनाकलनीय बनवतो.
पण हे सगळे सिद्धांत म्हणजे लोकांचे अंदाज आहेत. त्यात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वस्तूनिष्ठपणा नाही, असं राव मानतात. “ही सिंधू लिपी मुख्यत: ज्या खडकांवर कोरलेली आढळून येते ते खडक व्यापार आणि उद्योगातील देवाणघेवाणीसाठी वापरले जायचे.
त्यामुळे ही लिपी व्यापारी देवाणघेवाणीशीच निगडित असण्याची शक्यता जास्त आहे. त्यात काही धार्मिक अथवा आध्यात्मिक मजकूर दडलेला असण्याची शक्यता फार कमी आहे,” असं सांगत राव यांनी हे सगळे दावे खोडून काढले.
या लिपीचा उलगडा करणं इतकं कठीण का आहे?
पहिली अडचण म्हणजे या लिपिचा उलगडा करण्यासाठी सापडलेला मजकूर अतिशय तोकडा आहे. 4000 वेगवेगळ्या वस्तूंवर कोरलेला मजकूर उत्खननात सापडलेला असला तरी ज्या वस्तूंवर या लिपीतील मजकूर कोरला गेलाय त्या अतिशय लहान आकाराच्या आहेत.
उदाहरणार्थ छोटे खडक, मातीची भांडी इत्यादी. मोठ्या भिंतीवर अथवा मोठ्या खडकावर एकसलग जास्त मजकूर लिहिलेला आढळत नाही. एका वस्तूवर या लिपीची जास्तीत जास्त 5 – 6 चिन्हं आहेत.
उदाहरणादाखल सर्वात जास्त मजकूर कोरली गेलेली वस्तू म्हणजे चौकोनी आकाराचा लहान दगड. यातल्या या एका दगडाच्या वरच्या बाजूला काही रेषांची चिन्ह आहेत.
मध्यभागी एका घोड्यासदृश प्राण्याचं चित्र रेखाटलेलं आहे. त्याच्या बाजूला एका अज्ञात भांड्यासारखी वस्तू कोरलेली आहे. आता फक्त या तीन गोष्टींवरून ही चिन्हं नेमका काय अर्थ प्रतिपादन करतात, हे सांगता येणं अशक्यच आहे.
रोसेट्टा स्टोन या खडकावरील मजकूरामुळे प्राचीन इजिप्शियन चित्रलिपीचा उलगडा झाला होता. या रोसेट्टा खडकावर एकच मजकूर तीन भाषांमध्ये लिहिलेला होता.
यातली एक भाषा ही ग्रीक होती जी आधुनिक मानवाला ज्ञात आहे. त्यामुळे भाषांतर करून या प्राचीन इजिप्तच्या चित्रलिपीचं कोडं तज्ज्ञांना लगेच सोडवता आलं.
पण हडप्पा संस्कृतीतील या खडकांवरील मजकूर फक्त एकाच भाषेत आहे. त्यामुळे इथे तशी कुठली सोय उपलब्ध नाही. म्हणून या लिपीचा अर्थ लावणं आणखी कठीण आहे.
मागच्या काही काळात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे संगणकाचा वापर करून या लिपीचा उलगडा करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
या लिपीत काही आकृतीबंध, वारंवारता किंवा विशिष्ट रचनेतील समानता आढळून येते का? हे मशिन लर्निंगच्या तंत्रज्ञानाने शोधून काढण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांनी केला. पण त्याचाही काही फारसा उपयोग झाला नाही.
निशा यादव या मुंबई स्थित टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत संशोधिका आहेत. पी एन राव यांच्यासह इतर संगणक तज्ज्ञांना सोबत घेऊन त्या या सिंधू लिपीचा उलगडा आधुनिक संगणक तंत्रज्ञानाच्या मदतीने करू पाहत आहेत.
त्यांना संगणकाच्या मदतीने या लिपीतील मजकूरात एक वारंवारताही आढळून आली. पण ते ही शेवटी एक मृगजळच निघालं.
“मूळात ही जी चिन्हं आहेत ती एक पूर्ण शब्द आहेत, की शब्दाचा एक भाग आहे की वाक्याचा एक भाग आहेत, हेच कळायला मार्ग नाही,” अशा शब्दात निशा यादव यांनी आपली हतबलता व्यक्त केली.
यादव आणि त्यांच्या सहकारी शास्त्रज्ञांनी या सगळ्या मजकुराचा खोलात जाऊन अभ्यास केला. यातल्या 80 टक्के मजकुरात 67 समान चिन्हं वारंवार वापरली गेलेली आहेत.
खासकरून एक जार आणि त्याला जोडलेली दोन हॅन्डल्स हे चिन्ह तर अनेक वेळा वारंवार दिसून आलं. तसेच कुठल्याही मजकुराची सुरूवात भरमसाठ चिन्हांनी होते.
शेवट होता होता चिन्हांची संख्या व वारंवारता कमी होत जाते, असंही निरीक्षण त्यांनी आपल्या अभ्यासात नोंदवलं आहे.
या मजकुरातील जी अक्षरे अथवा चिन्ह काळाच्या ओघात पुसली गेली आहेत त्यांना पुन्हा जोडायचं कामही हा शास्त्रज्ञांचा चमू मशिन लर्निंगच्या सहाय्याने करत आहे. जेणेकरून भविष्यात हे संशोधन चालू ठेवणं सोपं होईल.
“मला पूर्ण विश्वास आहे की इतर कुठल्याही लिपीप्रमाणंच या लिपीचं स्वतःचं एक शास्त्र, गणित आणि ठरावीक रचना आहे. जी या मजकुराचा अभ्यास करताना जाणवते. आता ती रचना आणि त्यामागचं तर्कशास्त्र शोधून काढणं हे आमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे,” हे निशा यादव प्रांजळपणे कबूल करतात.
या हडप्पा सभ्यतेतील लिपीप्रमाणेच इतरही अनेक प्राचीन लिपिंचा उलगडा अजून व्हायचा आहे. प्राध्यापक राव सांगतात की, इराणमधील प्रोटो – एलामाईट, क्रेटमधली लिनिअर ए आणि इटलीतील इट्रुस्कन या प्राचीन लिपी देखील अद्याप अज्ञात आहे. त्यांचाही उलगडा करण्यासाठी जगभरातील तज्ञ झगडत आहेत.
इस्टर आयलॅन्डमधील रोंगोरोंगो आणि मेक्सिकोतील झेपोटेक या प्राचीन संस्कृतीतील भाषा आपल्याला आता ज्ञात झाल्या असल्या तरी या भाषांमधील चिन्हांचा उलगडा अजूनही पूर्णपणे झालेला नाही.
ग्रीसमधील क्रेट बेटावर चिकणमातीच्या गोलाकार फेस्टोओस डिस्कवर एक मजकूर उत्खननात सापडला होता. कांस्य युगातील मिनोअन संस्कृतीचा हा अवशेष असावा, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.
सिंधू लिपीशी या मजकुरातील लिपीसोबत बरंच साधर्म्य आढळून आलं. पण मुळात मिनोअन संस्कृतीची भाषा अथवा लिपी बद्दल सुद्धा आपल्याला कुठली माहिती नसल्यामुळे या साधर्म्यावर पुढे काही विशेष करता येत नाही.
भारतात ते ही दक्षिणेतील तमिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये अचानक या उत्तर भारतातील प्राचीन हडप्पा संस्कृतीच्या लिपीबद्दल इतकी उत्सुकता का चाळवली आहे, हा मात्र चर्चेचा विषय बनला आहे.
सिंधू संस्कृतीचे काही अवशेष तमिळनाडूमध्ये सुद्धा दडले असल्याचा नवा खुलासा नुकताच एका संशोधनातून समोर आला होता. त्यामुळेच स्टॅलिन यांनी तातडीने ही लिपी समजावून सांगणाऱ्याला 10 लाख डॉलर्सचं इनाम जाहीर केलं आहे.
के राजन आणि आर शिवानंदन हे तमिळनाडूतील पुरातत्व विभागात संशोधक आहेत. तमिळनाडूत 140 ठिकाणी केलेल्या उत्खननातून 14000 मातीच्या भांड्यांच्या अवशेषावर मजकूर कोरलेला आढळून आलाय. त्यात 2000 पेक्षा जास्त चिन्हं दडलेली आहे.
या सगळ्यांचा या दोन पुरातत्वशास्त्रज्ञांनी अभ्यास केला. या मजकुरातील चिन्हं सिंधू लिपीशी साधर्म्य साधणारे आहेत, असा या दोघांचा दावा आहे. कारण यातली 60 चिन्हं ही जशास तशी उत्तरेत हडप्पा उत्खननात सापडलेल्या मजकुराशी मेळ खातात.
तर या मातीच्या भांड्यांवरील 90 टक्के कोरीव काम सिंधू संस्कृतीच्या कलात्मक अवशेषांप्रमाणेच असल्याचंही या दोन्ही शास्त्रज्ञांचं मत आहे. त्यामुळे प्राचीन काळात उत्तरेतील हडप्पा संस्कृती आणि दक्षिणेचा एकमेकांशी संपर्क होता. त्यांच्यामध्ये सातत्यानं सांस्कृतिक देवाणघेवाण देखील होत असावी, असा दावा के राजन आणि आर शिवानंदन करतात.
स्टॅलिन यांनी ही लिपी उलगडण्यात दाखवलेल्या रसामागे त्यांचं स्वतःचं राजकारण आहे. उत्तरेकडील मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला आव्हान देताना तमिळ अस्मिता व तमिळ संस्कृतीचा डंका आणखी जोरात वाजवण्यासाठी चालून आलेली आयती संधी म्हणून स्टॅलिन या सगळ्या प्रकारणाकडे पाहत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
पण स्टॅलिन यांनी जाहीर केलेली बक्षिसाची रक्कम हा फक्त एक राजकीय स्टंटच ठरेल, असं शास्त्रज्ञ मानतात. कारण मागच्या सुमारे शंभर वर्षांपासून हजारो शास्त्रज्ञ अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्री वापरूनही या लिपीचं रहस्य आजतागायत शोधू शकले नाहीत.
स्टॅलिन यांनी बक्षिस जाहीर केल्यानं कोणी वेगळीच व्यक्ती अचानक समोर येऊन हे रहस्य शोधून काढेल, अशी अपेक्षा करणं फारच अवाजवी ठरेल.
“हडप्पा संस्कृतीतील लोकांनी हे काय लिहून ठेवलंय? यातून त्यांना काय सांगायचं आहे? हे आम्हीसुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करतच आहोत. पण नजीकच्या भविष्यात याचा उलगडा होईल असं वाटत नाही,” असं म्हणत संशोधिका निशा यादव यांनी राजकीय चढाओढीमुळे हवेत उडत असलेला हा पोकळ आशावादाचा फुगा फोडत वास्तवाची जाणीव करून दिली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC