Source :- ZEE NEWS

yellowstone national park and wolf: 14 लांडग्यामुळं आटलेली नदी पुन्हा एकदा दुधडी भरून वाहू लागली. हे ऐकून तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना. पण हे खरं आहे. अमेरिकेतील एका नॅशनल पार्कमध्ये हा प्रयोग राबवण्यात आला आणि त्याचे परिणामही सकारात्मक दिसू लागले. जगभरात या नदीच्या प्रयोगाची चांगलीच चर्चादेखील रंगली. १४ लांडग्यांमुळं नदी कशी काय पुन्हा जिवंत होऊ शकते. हे आज जाणून घेऊयात. 

अमेरिकेतील येलो स्टोन नॅशनल पार्कमधील ही नदी शंभर वर्षात हळूहळू आटत गेली. कालांतराने ती फक्त पावसाळ्यातच वाहू लागली.  पावसाळ्यानंतर काहीच दिवसांतच नदी कोरडी पडू लागली.  शतकाभरापूर्वी बारामाही वाहत असलेली नदी फक्त पावसाळ्यातच वाहू लागली. नदी हळूहळू आटत गेल्याने त्याचा परिणाम वन्यजीवांवर आणि निसर्गावरही होऊ लागला. यासाठीच एक प्रयोग राबवण्यात आला आणि हा प्रयोग यशस्वीदेखील झाला. 

यलोस्टोन नॅशनल पार्क व्योमिंग, मोंटाना आणि इडाहो या तीन राज्यात विभागलेले आहे. या राष्टीय उद्यानाची स्थापना 1 मार्च 1872 साली झाली होती. त्यानंतर हे जगातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून नावारुपास आले. येलोस्टेन नॅशनल पार्क जवळपास २,२१९,७८९ एकरात पसरलेले आहे. भूऔष्णिक वैशिष्ट्यांसाठी हे उद्यान ओळखले जाते. गेल्या शंभरवर्षापू्वी १९०० पेक्षा अधिक लांडगे या जंगलात होते. मात्र तेथील स्थानिकांनी  शिकार करुन त्यांना संपवले. लांडग्यांची बेसुमार शिकार झाली त्यातूनच लांडग्यांचे अस्तित्वच संपवून टाकले आणि त्यामुळंच नदी आटली. 

लांडग्यांची शिकार झाल्यामुळं जंगलातील हरणांची संख्या वाढली. अनेक वर्ष जंगलात फक्त हरणेच होते. हरणांची संख्या वाढत गेल्यामुळं ते नदीच्या पाणलोट क्षेत्रातील झाडे गवत फस्त करत गेले. पाणलोट क्षेत्रातील सगळं जंगलं त्यांनी बोडखं केले आणि यामुळंच नदी आटत गेली. कारण झाडे व गवत नसल्यामुळं पावसाचे पाणी जमिनीत व पुढे खडकात मुरण्याचे प्रमाण नाहीसेच झाले. नदी आटण्याचा हा क्रम अन्नसाखळीशी असल्याचे समोर आले. 

हरणांची वाढलेली संख्या यावर उपाय म्हणून १९९५ मध्ये येलो स्टोन पार्कच्या जंगलात फक्त १४ लांडगे सोडण्यात आले. पुढच्या पंचवीस वर्षात परिस्थिती बदलली. २०१९मध्ये नदी वाहू लागली इतकेच नव्हे तर नदीत असंख्य जीवदेखील आश्रयाला आले. 

SOURCE : ZEE NEWS