Source :- BBC INDIA NEWS
51 मिनिटांपूर्वी
हिंडनबर्ग ही अमेरिकन रिसर्च कंपनी बंद होते आहे. या कंपनीचे संस्थापक नेट अँडरसन यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
हिंडनबर्ग रिसर्चच्या वेबसाईटवर नेट अँडरसन यांनी त्यांची भूमिका मांडणारी पर्सनल नोट दिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “गेल्या वर्षाच्या शेवटीच मी माझं कुटुंब, मित्र परिवार आणि माझ्या टीमला सांगितलं होतं, त्यानुसार मी हिंडनबर्ग रिसर्च बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.”
अँडरसन यांनी 2017 मध्ये हिंडनबर्ग रिसर्चची स्थापना केली होती. अँडरसन यांनी त्यांच्या पर्सनल नोटमध्ये म्हटलं आहे की, हा निर्णय खूप विचारपूर्वक करण्यात घेण्यात आला आहे.
ते म्हणाले की, या निर्णयामागे कोणतंही एक कारण नाही.
यावेळेस कंपनी बंद करण्याचा निर्णय घेण्याबाबत अँडरसन यांनी लिहिलं, “कंपनी बंद करण्यामागे कोणत्याही प्रकारची भीती, आरोग्याची समस्या नाही आणि कोणतंही खासगी कारण देखील नाही.”
अँडसरन असंही म्हणाले की, हिंडनबर्ग त्यांच्या जीवनाचं फक्त एक अंग आहे. हिंडनबर्ग कंपनी ही काही त्यांच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी नाही.
अदानी समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO)जुगेशिंदर सिंह यांनी हिंडनबर्ग रिसर्च बंद होत असल्याबद्दल एक्स या सोशल मीडिया व्यासपीठावर लिहिलं, “किती शूरवीर आले आणि किती गेले.”
20 जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्याच्या आधीच अँडरसन यांचा हा निर्णय समोर आला आहे.
त्याशिवाय अलीकडेच अमेरिकेच्या संसदेतील न्यायालयीन समितीचे सदस्य आणि रिपब्लिकन पक्षाचे सदस्य लांस गूडेन यांनी न्याय विभागाला अदानी प्रकरणाशी संबंधित सर्व दस्तावेज सुरक्षित ठेवण्यास सांगितलं होतं.
हिंडनबर्ग ही एक शॉर्ट सेलिंग कंपनी आहे. भारतात शेअर बाजारातील व्यवहारांचं नियमन सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी करतं. जून 2024 ला सेबीनं हिंडनबर्गला कारणे दाखवा नोटिस देखील बजावली होती.
याबाबतीत सेबीचं म्हणणं होतं की हिंडनबर्गनं रिसर्च एनालिस्टसाठी निश्चित करण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन केलं आहे.
अदानी समूहानं मात्र हिंडनबर्गचे आरोप फेटाळले होते. त्यानंतर गेल्या वर्षी हिंडनबर्गनं त्यांच्या अहवालात सेबीच्या चेअरपर्सन माधबी बुच आणि त्यांचे पती यांच्यावर आर्थिक अनियमिततेचे आरोप केले होते.
माधबी बुच आणि त्यांच्या पतीनं हे आरोप फेटाळले होते. तसंच सेबीनं देखील या प्रकरणात वक्तव्यं दिलं होतं.
अदानी समूहावरील हिंडनबर्गचा अहवाल
24 जानेवारी 2023 ला हिंडनबर्ग रिसर्चनं अदानी समूह हा देशातील आघाडीच्या उद्योगसमूहाच्या विरोधात एक अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर भारतात याची मोठी चर्चा झाली होती.
या अहवालात म्हटलं होतं की अदानी समूहाचे मालक, गौतम अदानी यांनी 2020 पासूनच त्यांच्या शेअर बाजारातील सात नोंदणीकृत कंपन्यांच्या शेअरमध्ये गैरप्रकार करून 100 अब्ज डॉलरची कमाई केली.
या अहवालात गौतम अदानी यांचे भाऊ विनोद अदानी यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यात म्हटलं होतं की, विनोद अदानी 37 शेल म्हणजे बनावट कंपन्या चालवतात. या कंपन्यांचा वापर मनी लॉंडरिंगमध्ये झाला आहे.
अदानी समूहानं हे आरोप निराधार असल्याचं म्हटलं होतं.
या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांना 150 अब्ज डॉलरचं नुकसान झालं होतं.
हिंडनबर्गचा अहवाल आल्यानंतर एक महिन्याच्या आतच गौतम अदानी यांच्या संपत्तीत 80 अब्ज डॉलर म्हणजे 6.63 लाख कोटी रुपयांहून अधिकची घसरण झाली होती.
हिंडनबर्गचा अहवाल आल्यानंतर जगातील टॉप 20 श्रीमंतांच्या यादीतून गौतम अदानी बाहेर फेकले गेले होते.
याशिवाय गौतम अदानी यांना कंपनीचा 20 हजार कोटी रुपयांचा एफपीओ देखील रद्द करावा लागला होता. कंपनीचं खूप मोठं आर्थिक नुकसान झालं होतं.
या अहवालामुळे भारतातील राजकारण मोठं वादळ निर्माण झालं होतं. अदानी समूहाच्या कथित आर्थिक अनियमिततेसंदर्भात संसदेत प्रश्न विचारले गेले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं.
3 जानेवारी 2024 ला भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमुर्तींच्या खंडपीठानं अदानी समूहाविरोधात हिंडनबर्गनं केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी टीम (एसआयटी) नेमण्याची किंवा हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी फेटाळली होती.
या प्रकरणाच्या चौकशी संदर्भात न्यायालयानं सेबीवर विश्वास दाखवला होता.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी एक्सवर लिहिलं होतं, “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून दिसून येतं की सत्याचा विजय झाला आहे. जे लोक आमच्या पाठिशी उभे राहिले, मी त्यांचा आभारी आहे. भारताच्या विकासात आमचं विनम्र योगदान सुरूच राहिल.”
माधवी बुच यांच्यावर आर्थिक अनियमिततेचे आरोप
यानंतर हिंडनबर्गनं गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एक अहवाल जाहीर केला होता. त्यात त्यांनी सेबीच्या विद्यमान चेअरपर्सन माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर आर्थिक अनियमिततेचे आरोप केले होते.
हिंडनबर्गनं व्हिसलब्लोअरकडून मिळालेल्या कागदपत्रांचा आधार देत आरोप केला होता की अदानी समूहातील ज्या कंपन्यांमध्ये आर्थिक अनियमितता झाली होती त्या कंपन्यांमध्ये सेबीच्या चेअरपर्सन माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांची हिस्सेदारी आहे.
त्यानंतर सेबीच्या चेअरपर्सन माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी दोन पानांचं एक वक्तव्यं जारी केलं होतं. त्यात त्यांनी हिंडनबर्गच्या आरोपांबाबत त्यांची प्रतिक्रिया दिली होती.
त्यांनी सांगितलं होतं की हिंडनबर्गच्या अहवालात ज्या फंडाचा उल्लेख आहे, त्यामध्ये 2015
मध्ये गुंतवणूक करण्यात आली होती आणि माधबी पुरी बुच सेबीच्या सदस्य होण्याच्या दोन वर्षे आधीची ही बाब आहे.
सेबीनं देखील या प्रकरणाबाबत म्हटलं होतं की, अशा प्रकारच्या अहवालांवर प्रतिक्रिया देण्याआधी त्याच्यातील माहितीची सत्यता पडताळली पाहिजे.
त्यावेळेस सेबीनं म्हटलं होतं की, “हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालात एक डिस्क्लेमर किंवा टीप देण्यात आली आहे, त्याबद्दल गुंतवणुकदारांना माहित असायला हवं. त्यात म्हटलं आहे की कंपनी ज्या बॉंड्सची चर्चा करते आहे, त्यामध्ये कंपनीची शॉर्ट पोझिशन असू शकते.”
हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालात म्हटलं होतं की, ज्या ऑफशोअर म्हणजे परदेशी कंपन्यांचा वापर अदानी समूहाच्या कथित आर्थिक अनियमिततेसाठी झाला होता, त्या कंपन्यांमध्ये सेबीच्या चेअरपर्सनची हिस्सेदारी होती.
त्यामध्ये म्हटलं होतं की सेबीनं अदानी समूहाच्या अशा संशयास्पद शेअरहोल्डिंग कंपन्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही, ज्या कंपन्या इंडिया इन्फोलाईनच्या ईएम रिसर्जंट फंड आणि इंडिया फोकस फंडाकडून चालवल्या जातात.
हिंडनबर्गच्या अहवालात माधबी पुरी बुच यांचे खासगी हितसंबंध आणि सेबीच्या प्रमुख म्हणून त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. हिंडनबर्ग रिसर्चचं म्हणणं होतं की अदानी समूहाबाबत सेबीनं जी चौकशी केली आहे, त्याचा सखोल तपास झाला पाहिजे.
हिंडनबर्ग रिसर्चनं म्हटलं होतं. व्हिसलब्लोअरकडून त्यांना जी कागदपत्रं मिळाली आहेत, त्यानुसार, सेबीमध्ये नियुक्ती होण्याच्या काही आठवडे आधी माधबी पुरी बुच यांचे पती धवल बुच यांनी ट्रायडंट ट्रस्ट या मॉरिशसमधील फंड व्यवस्थापकाला ईमेल केला होता.
त्यामध्ये धवल बुच आणि माधुरी पुरी बुच यांच्या ग्लोबल डायनॅमिक ऑपर्च्युनिटीज फंडमधील गुंतवणुकीचा उल्लेख करण्यात आला होता.
हिंडनबर्गच्या अहवालात म्हटलं होतं की माधबी बुच सेबीच्या प्रमुख होण्याआधी त्यांच्या पतीनं विनंती केली होती की त्यांचं संयुक्त खातं तेच हाताळतील. याचा अर्थ होता की माधबी पुरी बुच सेबीच्या प्रमुख होण्याआधीच त्यांना पत्नीच्या खात्यातून सर्व मालमत्ता किंवा अॅसेट हटवायचे होते.
माधबी पुरी बुच आणि अदानी समूहाच्या प्रतिक्रिया
नंतर सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी हिंडनबर्गचे आरोप फेटाळले होते.
हिंडनबर्गचे आरोप वाईट हेतूनं प्रेरित असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
त्यांनी दिलेल्या वक्तव्यात म्हटलं होतं की, “हिंडनबर्गच्या अहवालात ज्या फंडाचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय 2015 मध्ये घेण्यात आला होता. ते दोघेही तेव्हा सर्वसामान्य नागरिक होते आणि सिंगापूरमध्ये राहत होते. माधबी पुरी बुच यांनी सेबीमधील काम सुरू करण्याच्या जवळपास दोन वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे.”
“या फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी अनिल आहूजा, धवल बुच यांचे बालपणीचे मित्र आहेत आणि ते एकमेकांना शालेय जीवन आणि आयआयटी दिल्लीत असल्यापासून ओळखतात.”
“त्यामुळेच या फंडात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 2018 मध्ये आहूजा जेव्हा या फंड हाऊसमधून बाहेर पडले, तेव्हा आम्ही देखील आमची गुंतवणूक काढून घेतली होती.”
त्या वक्तव्यात पुढे म्हटलं होतं की, “अनिल आहूजा यांनी ही बाब स्पष्ट केली की या फंड हाऊस कधीही अदानी समूहाच्या कोणत्याही कंपनीच्या बॉंड्स, इक्विटी (शेअर्स) किंवा डेरिव्हेटिव्हमध्ये गुंतवणूक केली नव्हती.”
सेबीनं पुढे सांगितलं होतं की, अदानी समूहाच्या प्रकरणात सेबीनं 24 पैकी 23 तपास पूर्ण केले आहेत आणि शेवटचा तपास देखील पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
सेबीनुसार, त्यांनी अदानी समूहाला 100 हून अधिक समन्स, जवळपास 1,100 पत्र आणि ईमेल पाठवले आहेत. याशिवाय सेबी, देशांतर्गत आणि परदेशी नियामक संस्थांशी 300 हून अधिक वेळा बोललं आहे. सोबत 12,000 पानांच्या कागदपत्रांची देखील पडताळणी करण्यात आली आहे.
माधबी पुरी बुच यांना अडचणीत आणणाऱ्या हिंडनबर्गच्या अहवालावर अदानी समूहानं देखील प्रतिक्रिया दिली होती.
अदानी समूहानं एक वक्तव्यं जारी करत म्हटलं होतं की हिंडनबर्गकडून करण्यात आलेल्या आरोपांमध्ये वाईट हेतूनं आणि खोडसाळपणानं सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करण्यात आला आहे. जेणेकरून वैयक्तिक फायद्यासाठी आधीच ठरवलेलं उद्दिष्टं गाठता यावं. हे पुरावे आणि कायद्याचं उल्लंघन आहे.
अदानी समूहाच्या वक्तव्यात म्हटलं होतं की, अदानी समूहावर करण्यात आलेले सर्व आरोप आम्ही फेटाळतो. ज्या आरोपांची पूर्ण चौकशी झाली आहे, अशा निराधार आरोपांची ही री-सायकलिंग आहे. जानेवारी 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं हे आरोप आधीच फेटाळले आहेत.
हिंडनबर्ग रिसर्चचं काम
अमेरिकन कंपनी हिंडनबर्ग रिसर्च आता बंद होणार आहे. मात्र या कंपनीचं एक मुख्य काम शॉर्ट सेलिंग देखील होतं. हिंडनबर्ग रिसर्च वेगवेगळ्या कंपन्यांवर त्यांचा अहवाल जाहीर करून त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये स्वत:ची पोझिशन तयार करते. म्हणजे शेअर्सच्या खरेदी-विक्री व्यवहाराची आधीच तयारी करून ठेवते.
या अहवालातून हे माहित होऊ शकायचं की काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये, त्यांच्या बाजारमूल्यामध्ये घसरण होऊ शकते का.
कंपनीचे संस्थापक नेट अॅंडरसन स्वत:ला एक अॅक्टिविस्ट (कार्यकर्ता) शॉर्ट सेलर म्हणवतात.
2017 पासून हिंडनबर्ग रिसर्च काम करते आहे. कंपनीचा दावा आहे की त्यांनी आतापर्यंत असे अनेक अहवाल जाहीर केले आहेत.
या अहवालांमधून त्यांनी अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंड कमिशन व्यतिरिक्त अमेरिका आणि परदेशातील कंपन्यांमधील बेकायदेशीर व्यवहार आणि आर्थिक अनियमितता उघड केली आहे.
अफिरिया, परशिंग गोल्ड, निकोला आणि इतर काही प्रसिद्ध कंपन्यांमधील आर्थिक अनियमितता उघड केल्याचा दावा हिंडनबर्ग रिसर्च करते.
हिंडनबर्गचा दावा आहे की कंपनी त्यांचे अहवाल जाहीर करण्याआधी आणि इतर प्रकारच्या कारवाया करण्याआधी अनेक कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती पाडल्या आहेत.
अदानी समूहाआधी हिंडनबर्गचं नाव ज्या मोठ्या कंपनीशी जोडलं गेलं होतं, ती म्हणजे निकोला ही ट्रक कंपनी. हे प्रकरण जेव्हा न्यायालयात गेलं होतं, तेव्हा निकोला कंपनीचे संस्थापक दोषी असल्याचं आढळून आलं होतं.
हिंडनबर्गच्या मागे कोण?
हिंडनबर्ग रिसर्च प्रमुख नेथन उर्फ नेट अँडरसन आहेत.
2017 मध्ये नेट अँडरसन यांनी हिंडनबर्ग रिसर्चची स्थापना केली होती. नेट अँडरसन यांनी अमेरिकेतील कनेक्टिकट विद्यापीठात शिक्षण घेतलं आहे.
अॅंडरसन यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचं शिक्षण घेतलं होतं. तसंच त्यांनी करियरची सुरूवात फॅक्ट-सेट रिसर्च सिस्टम नावाच्या एका डेटा कंपनीतून केली होती. या कंपनीमध्ये अँडरसन यांनी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कंपन्यांबरोबर काम केलं होतं.
2020 मध्ये अँडरसन यांनी वॉल स्ट्रीट जर्नलला एक मुलाखत दिली होती. त्यात ते म्हणाले होते की, “हे लोक खूपच साधारण स्वरुपाचं विश्लेषण करत असल्याचं मला जाणवलं होतं.”
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, अँडरसन यांनी काही काळ इस्रायलमध्ये रुग्णवाहिकादेखील चालवली होती.
अँडरसन यांनी त्यांच्या लिंक्डइन प्रोफाईलमध्ये लिहिलं आहे, “रुग्णवाहिका चालक म्हणून काम करताना, अत्यंत तणावात काम कसं करतात ते मला शिकायला मिळालं.”
अँडरसन यांनी याच प्रोफाईलमध्ये लिहिलं आहे की त्यांच्याकडे 400 तासांचा मेडिकल अनुभवदेखील आहे.
अनेक मुलाखतींमध्ये अॅंडरसन यांनी अमेरिकन अकाऊंटंट हॅरी मॉर्कोपोलोस हे आपले आदर्श असल्याचं सांगितलं आहे.
अँडरसन यांचे आदर्श असलेल्या हॅरी यांनी देखील 2008 मध्ये बेनॉर्ड मॅडॉफ या पॉन्झी म्हणजे बनावट स्कीमशी संबंधित भ्रष्टाचार लोकांसमोर आणला होता.
याच मॅडॉफ यांच्यावर अलीकडेच नेटफ्लिक्समध्ये वेबसेरीज देखील प्रदर्शित झाली होती. या वेबसेरीज नाव होतं – द मॉन्स्टर ऑफ वॉल स्ट्रीट.
हिंडनबर्ग हे नाव कुठून आलं?
ते 1937 साल होतं. जर्मनीत हिटलरची सत्ता होती. त्या काळात एक एअरशिप होत. त्याचं नाव होतं – हिंडनबर्ग एअरशिप.
त्यावरून हिंडनबर्ग हे नाव कंपनीला देण्यात आलं.
हे एअरशिप म्हणजे विमानासारखंच आकाशात उडणारं एकप्रकारचं वाहन होतं. त्यावेळेस त्याची चाचणी घेतली जात होती.
या एअरशिपवर नाझी राजवटीचं चिन्हं असलेलं स्वस्तिक होतं. अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये या एअरशिपला जमिनीवरून जे लोक पाहत होते, त्यांना एक अद्भूत दृश्य पाहायला मिळालं.
एक मोठा स्फोट झाला आणि आकाशात असणाऱ्या हिंडनबर्ग एअरशिपला आग लागली. लोकांच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. एअरशिप जमिनीवर कोसळलं. 30 सेकंदांपेक्षा कमी वेळात सर्वकाही नष्ट झालं होतं.
त्या एअरशिपमध्ये असलेल्या लोकांना वाचवण्यासाठी काहीजण पुढे सरसावले होते. काही जणांना वाचवता आलं. तर काहींचा मात्र जीव गेला.
पेटलेल्या एअरशिपमधून निघणाऱ्या धुराच्या काळ्या लोटांमुळे आकाश व्यापलं होतं. त्यानंतर एअरशिपचे फक्त अवशेष शिल्लक राहिले.
या एअरशिपमध्ये हायड्रोजन गॅसचे 16 मोठे फुगे होते. एअरशिपमध्ये जवळपास 100 लोकांना जबरदस्तीनं बसवण्यात आलं होतं. या अपघातात 35 जणांचा मृत्यू झाला होता.
असं म्हटलं जातं की हायड्रोजनच्या फुग्यांमध्ये आधीदेखील अपघात झाले होते. त्यामुळे त्यातून धडा घेत एअरशिपचा अपघात टाळता आला असता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC