Source :- BBC INDIA NEWS

हैदर अली

फोटो स्रोत, Getty Images

ईस्ट इंडिया कंपनीनं 1757 मध्ये प्लासीची लढाई जिंकली. या लढाईनंतर एका दशकाच्या आत ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांच्या लक्षात आलं होतं की, भारतातील राजांची लष्करी ताकद झपाट्यानं वाढते आहे. त्यामुळे त्यांना प्लासीच्या लढाईसारखा विजय पुन्हा मिळवणं शक्य होणार नाही.

विशेष म्हणजे, भारतीय राजांना लष्करी तंत्रज्ञानात युरोपच्या कौशल्याची बरोबरी करण्यात फक्त एक दशकाचाच कालावधी लागला होता.

1760 च्या दशकाच्या मध्यापर्यंत हे स्पष्ट होऊ लागलं होतं की, भारतीय राजे आणि इंग्रजांच्या लष्करी क्षमतेमधील दरी जवळपास भरून निघाली आहे.

इंग्रजांना सर्वात आधी दक्षिणेतील हैदर अलीकडून आव्हान मिळालं होतं.

लेविन बी बोरिंग यांनी 'हैदर अली अँड टिपू सुलतान' हे पुस्तक लिहिलं आहे.

फोटो स्रोत, Pharos Book

लेविन बी बोरिंग यांनी ‘हैदर अली अँड टिपू सुलतान’ हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात ते लिहितात, “18 व्या शतकात इंग्रजांच्या विरोधातील संघर्षाचं केंद्र म्हैसूर होतं. म्हैसूरला जगाच्या पूर्व भागाच्या इतिहासातील सर्वात शूर, धाडसी आणि रोमहर्षक घडामोडींचं जन्मस्थान मानलं जातं.”

“याच भागात इंग्रजांना त्यांच्या सर्वात धोकादायक शत्रूचा सामना करावा लागला होता. या व्यक्तीचं नाव होतं हैदर अली.”

“अर्थात, हैदर अली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतानची राजवट 38 वर्षेच होती. मात्र, या छोट्याशा कालावधीत देखील अशा घटना घडल्या, ज्यांनी ब्रिटिश साम्राज्याला हादरवून टाकलं होतं.”

जन्मत: योद्धा असलेला हैदर अली

हैदर अलीबद्दल म्हटलं जातं की, त्याचं मूळ पंजाबी होतं. तो म्हैसूरच्या सैन्यात वरच्या पदावर होता. त्यानं 1776 मध्ये म्हैसूरच्या वाडियार राजाला पदावरून हटवून सत्ता काबीज केली होती.

त्यानंतर हैदर अलीनं म्हैसूरच्या फौजेची ताकद वाढवली. त्यानं शेजारची छोटी राज्यं ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

इरफान हबीब यांनी ‘रेझिस्टंस अँड मॉडर्नायझेशन अंडर हैदर अली अँड टिपू सुलतान’ हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते लिहितात, “हैदरनं त्याच्या सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी फ्रेंच लष्करी अधिकाऱ्यांना बोलावलं होतं. श्रीरंगपट्टणमची सुरक्षा भक्कम करण्यासाठी हैदरनं फ्रेंच इंजिनीअर्सची मदत घेतली. तसंच त्यानं नौदल उभारण्याचेही प्रयत्न केले.”

“1766 मध्ये हैदरकडे दोन मोठ्या युद्धनौका, सात छोट्या युद्धनौका आणि 40 छोट्या नौका होत्या. त्याच्या या नौदलाचा प्रमुख एक युरोपियन व्यक्ती होता. त्याचं नाव होतं स्टेनेट.”

घोडेस्वारी आणि बंदूक चालवण्यात तरबेज असलेला हैदर अली

फोटो स्रोत, Getty Images

हैदरबद्दल म्हटलं जातं की, तो एक जन्मजात सैनिक होता. तो घोडेस्वारीत निपुण होता. तसंच तलवार आणि बंदूक चालवण्यात देखील तितकाच तरबेज होता.

लेविन बोरिंग लिहितात, “हैदरमध्ये थकवा सहन करण्याची जबरदस्त क्षमता होती. सैनिकांचं नेतृत्व करताना त्यानं स्वत:च्या जीवाची पर्वा कधीही केली नाही. त्यामुळेच सैनिकदेखील त्याच्यासाठी कोणताही धोका पत्करायला नेहमीच तयार असत.”

“हैदरचं वैशिष्ट्यं म्हणजे लढाईच्या वेळेस शांत राहणं आणि वेगानं अचानक हल्ला चढवणं. यात त्याला बहुतांश वेळा यश मिळालं होतं.”

हैदर अलीची दिनचर्या

मेस्थर ला टू यांनी ‘द हिस्ट्री ऑफ हैदर अँड हिज सन टिपू सुलतान’ हे पुस्तक लिहिलं आहे. यात त्यांनी लिहिलं आहे की हैदरची उंची जवळपास 5 फूट 6 इंच होती. त्याचा रंग गव्हाळ होता. त्याचा चेहरा खडबडीत होता.

अनेक मैल पायी चालण्याची किंवा घोडेस्वारी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये होती. हैदरला पांढरे मलमलचे कपडे आणि पगडी घालायला आवडत असे.

“त्याला दागिन्यांची आवड नव्हती. हैदर जरी दिसायला आकर्षक नसला, तरी देखील त्याच्या उपस्थितीमुळे विश्वास आणि ऊर्जा निर्माण होत असे. तो रोज मध्यरात्री झोपायला जात असे आणि सकाळी सहा वाजताच उठत असे.”

म्हैसूरचा राजा हैदर अली

फोटो स्रोत, Getty Images

मेस्थर यांनी लिहिलं आहे की, “म्हैसूरचा राजा झाल्यानंतर हैदर अलीनं त्याच्या चेहऱ्यावरील सर्व केस काढून टाकले होते. त्याला दाढी नव्हती, मिशा नव्हत्या, पापण्या नव्हत्या आणि भुवयादेखील नव्हत्या. तो सकाळी 8 ते 9 दरम्यान राजमहालातून दरबारात यायचा.”

“त्यानंतर तो बाल्कनीत जाऊन हत्ती आणि घोड्यांची सलामी घ्यायचा. हैदरला लिहिता-वाचता येत नव्हतं. मोठ्या कष्टानं तो त्याच्या नावाचं सुरुवातीचं अक्षर ‘है’ लिहिण्यास शिकला होता.”

हैदर अतिशय सहजतेनं कन्नड, तेलगू, मराठी आणि तामिळ भाषा बोलायचा. मात्र त्याला फारसी आणि अरबी अजिबात येत नव्हती.

त्याला लिहिता-वाचता येत नसलं तरीदेखील त्याची स्मरणशक्ती अतिशय जबरदस्त होती. कित्येक वर्षांपूर्वी भेटलेल्या व्यक्तीला ओळखण्याची अद्भुत क्षमता त्याच्यात होती.

हैदरची सहिष्णुता

हैदरच्या राजवटीत धार्मिक गोष्टींना खूप अधिक प्राधान्य दिलं जात नव्हतं. म्हैसूरचा प्रसिद्ध दसरा उत्सव 1610 पासून साजरा केला जात होता. तो सुरू ठेवण्यास हैदरनं परवानगी दिली होती. तो स्वत:देखील त्या उत्सवात भाग घेत असे.

दसऱ्याच्या दिवशी निघणाऱ्या मिरवणुकीत तो सर्वात पुढे हत्तीवर बसलेला असायचा. मार्क विल्क्स यांनी ‘हिस्टॉरिकल स्केचेज ऑफ द साऊथ ऑफ इंडिया इन ॲन अटेंम्प्ट टू ट्रेस द हिस्ट्री ऑफ मैसूर’ हे पुस्तक लिहिलं आहे.

यात त्यांनी लिहिलं आहे, “सर्व मुस्लीम राजांमध्ये हैदर अली सर्वात सहिष्णु होता. त्याला त्याच्या धर्मानुसार प्रार्थना करणं आणि रोजे ठेवणं येत नसे आणि त्याला ते शिकवण्यातदेखील आलं नव्हतं. त्यानं जाहीर केलं होतं की, सर्व धर्म देवाचीच देणगी आहेत आणि देवाच्या नजरेत सर्व धर्म समान आहेत.”

हैदर अली

फोटो स्रोत, Getty Images

हैदर अलीनं 27 एप्रिल 1769 ला श्रृंगेरीच्या मठाचे जगतगुरू शंकराचार्यांना एक पत्र लिहिलं होतं. ए. के. शास्त्री यांनी ‘द रेकॉर्ड्स ऑफ द श्रृंगेरी धर्मस्थान’ हे पुस्तक लिहिलं आहे.

यात ते लिहितात, “एका पत्रात उल्लेख आहे की, हैदरनं जगतगुरूंना एक हत्ती, पाच घोडे, एक पालखी, पाच उंट आणि देवी शारदा अंबासाठी एक साडी, दोन शाली आणि 10 हजार रुपयांची थैली भेट दिली होती. त्यानं जगतगुरूंना एक महान आणि पवित्र आत्मा असं म्हटलं होतं.”

सर्वात आधी रॉकेटचा वापर

ऑगस्ट 1767 मध्ये हैदरनं ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात लढाई पुकारली. त्यावेळेस हैदरकडे 50 हजारांचं सैन्य होतं. तोपर्यंत ईस्ट इंडिया कंपनीला माहित नव्हतं की हैदर अलीकडे या दर्जाचं आधुनिक सैन्य आहे.

हैदरच्या सैनिकांकडे फ्रेंच तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक बंदुका आणि तोफा होत्या. त्याच्या तोफांचा व्यास (बोअर) आणि पल्ला ईस्ट इंडिया कंपनीकडे असलेल्या तोफांमध्ये अधिक होता.

हैदर अली

फोटो स्रोत, Gyan Publishing House

फ्रेंच इतिहासकार ज्यां मेरी लाफो यांनी ‘इंडिका: एसेज इन इंडो-फ्रेंच रिलेशन्स 1630-1976’ हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात त्यांनी लिहिलं आहे, “अनेक बाबतीत हैदरचे सैनिक इंग्रजांच्या सैनिकांपेक्षा अधिक सक्षम आणि लष्करीदृष्ट्या निपुण होते. ते शत्रूच्या सैन्याला विस्कळीत करण्यासाठी उंटांवरून रॉकेटचा मारा करण्यात पारंगत झालेले होते.”

“हैदरनं त्याच्या सैन्याला पुढे नेण्यासाठी आणि रसदचा पुरवठा करण्यासाठी बैलांचा वापर करायचा. त्या काळी ती नवीन गोष्ट होती. नंतर इंग्रजांनी देखील या पद्धतीचा वापर केला.”

हैदर अलीनं सर्वात आधी रॉकेटचा वापर केला

फोटो स्रोत, Getty Images

शेवटी इंग्रजांना हैदरशी तह करावा लागला. यामुळे भारतातील अनेक राजांना जाणीव झाली की इंग्रजांचा लढाईत पराभव केला जाऊ शकतो आणि त्यांना आश्चर्यचकित केलं जाऊ शकतं.

इंग्रजांवर हल्ला

7 फेब्रुवारी 1780 ला वादगाव कराराच्या एका वर्षानंतर मराठ्यांचा सत्तेचा गाडा हाकणारे नाना फडणवीस यांनी मराठ्यांच्या जुन्या शत्रूला म्हणजे हैदर अली पत्र लिहिलं. त्यात त्यांनी म्हटलं की, त्यांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊन इंग्रजांवर हल्ला चढवला पाहिजे.

एक महिन्यानं हैदराबादच्या निजामानं देखील हैदर अलीला पाठिंबा देण्याचं ठरवलं. उन्हाळा येईपर्यंत या तीन शक्तींनी इंग्रजांना भारताबाहेर हाकलण्याच्या योजनेवर काम करण्यास सुरुवात केली.

एक महिन्यानं इंग्रजाच्या मद्रासमधील तळावर बातमी पोहोचली की, हैदरकडे फ्रान्सच्या शस्त्रांचा मोठा साठा आला आहे. शेवटी 17 जुलै 1780 ला हैदर अलीनं इंग्रजांवर पुन्हा एकदा हल्ला केला. यावेळेस त्याच्याकडे आधीपेक्षा दुप्पट सैन्य होतं.

त्याच्या सैन्यात 60 हजारांचं घोडदळ, 35 हजारांचं पायदळ आणि 100 तोफा होत्या. कागदावर मद्रासच्या रक्षणसाठी कंपनीचे 30 हजार सैनिक तैनात करण्यात आले होते. मात्र खऱ्या अर्थानं त्यावेळेस कंपनीला फक्त आठ हजार सैनिकांची फौजच उभारता आली होती.

हैदर अली

फोटो स्रोत, Getty Images

मार्क विल्क्स यांनी ‘हिस्टॉरिकल स्केचेज ऑफ द साऊथ ऑफ इंडिया’ या पुस्तकात लिहिलं आहे, “हैदर ज्या वेगानं पुढे सरसावला, त्यामुळे इंग्रजांची सैनिकांची संख्या आणखी कमी झाली. यातील बहुतांश सैनिकांची कुटुंबं आरकोटमध्ये राहत होती. कुटुंबाच्या सुरक्षेसाठी या सैनिकांनी इंग्रजांची साथ सोडली.”

“त्यांनी एकतर हैदरसमोर शरणागती पत्करली किंवा पैसे घेऊन त्यांच्या तळाचे दरवाजे उघडले. हैदरनं मद्रास, वैल्लोर आणि आरकोटजवळच्या गावांमध्ये आग लावून कंपनीच्या रसदचा पुरवठा पूर्णपणे नष्ट करून टाकला.”

मुनरो आणि बेली यांच्या फौजेची दाणादाण

25 ऑगस्ट 1780 ला दक्षिण भारतात इंग्रजांच्या सर्वात मोठ्या सैन्यानं हैदरच्या सैन्याशी लढण्यासाठी मद्रासमधून कांचीपुरमच्या दिशेनं कूच केलं. या फौजेचं नेतृत्व जनरल हेक्टर मुनरो करत होता. याच मुनरोनं 15 वर्षांपूर्वी बक्सरच्या लढाईत शुजाउद्दौलाचा पराभव केला होता.

यावेळेस त्याच्या सैन्यात फक्त पाच हजार सैनिक होते. कित्येक महिन्यांपासून या सैनिकांचा पगार झाला नव्हता. कंपनीच्या या सैन्याचा सामना हैदर अलीच्या एक लाख सैनिकांच्या भल्यामोठ्या फौजेशी होणार होता.

त्यांच्यापासून 30 मैल उत्तरेला असलेल्या कर्नल विलियम बेलीला आदेश मिळाला की, त्यानं त्याच्या फौजेनिशी मुनरोच्या सैन्याला जाऊन मिळावं.

हैदर अलीचा मुलगा टिपू सुलतान

फोटो स्रोत, Getty Images

गुलाम हुसैन खाँ यांनी ‘सैर मुताखरीन’ हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यानं लिहिलं आहे, “हैदरची फौज इतकी मोठी होती की त्यांनी सर्व जमीन समुद्रातील खवळलेल्या लाटांप्रमाणे झाकून टाकली होती. त्यांच्यामागून चालणाऱ्या तोफखान्याचा शेवटच दिसत नव्हतं. यादरम्यन प्रचंड पाऊस पडू लागला.”

“बेलीला त्याच्या सैनिकांसह कोर्तालॅयर नदी ओलांडायला अकरा दिवस लागले. हैदरचा मुलगा टिपूला यामुळे पुरेसा वेळ मिळाला आणि त्यानं मुनरो आणि बेलीच्या फौजेदरम्यान त्याची 11 हजारांची फौज घातली.”

हैदरच्या फौजेकडून बेलीच्या फौजेची कोंडी

या दोन्ही फौजामधील पहिली लढाई 6 सप्टेंबरला झाली. कॅप्टन मुआत यांनं त्याच्या ‘अकाउंट ऑफ द डिफीट ऑफ पोलिलूर’ या पेपरमध्ये लिहिलं आहे, “सतत पडत असलेल्या पावसामुळे धान्याच्या शेतांमध्ये गुडघ्यांपर्यंत पाण्यात लढणाऱ्या बेलीच्या फौजेतील उणीवा पूर्णपणे उघड झाल्या. त्याचं मोठं नुकसान झालं. दोन्ही फौजा समोरा-समोर येऊन नाहीत, दूरून लढल्या.”

हैदर अली

फोटो स्रोत, Getty Images

“काही वेळानं त्यांना थोडं पुढे ढोल आणि नगाऱ्यांचा आवाज ऐकू आला. बेलीला वाटलं की मुनरोची फौज त्याच्या मदतीसाठी येते आहे. जेव्हा ती फौज समोर येऊन ठेपली, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हैदर त्याच्या 25 हजारांच्या फौजेनिशी त्याच्या समोर आला आहे.”

“नंतर बेलीच्या छोट्या भावानं ‘अकाउंट ऑफ पोलिलूर’मध्ये लिहिलं, हैदरच्या घोड्यांनी आम्हाला घेरलं. त्यांच्या मागे त्यांच्या तोफा होत्या. जवळपास 50 तोफांनी आमच्या सर्व बाजूंना अर्धवर्तळुकार गोळा बनवला.”

“हैदरनं थोड्या वेळासाठी लढाई थांबवण्याचा आदेश दिला. मग मागून येत असलेल्या त्यांच्या मोठ्या तोफांना त्यानं पुढे आणलं. त्यांच्यासमोर आम्हाला कोणतीही संधी नव्हती.”

इंग्रजांचा दारूण पराभव

बेलीकडचा सर्व दारूगोळा संपल्यानंतर त्यानं शरणागती पत्करण्यासाठी त्याच्या तलवारीला एक रुमाल बांधला आणि ती हवेत धरली. बेलीनं त्याच्या सैनिकांना आदेश दिला की त्यांनी शस्त्र खाली ठेवावीत.

मात्र काही सैनिकांना त्याचा आदेश ऐकू आला नाही. त्यामुळे ते गोळीबार करत राहिले. त्याचा परिणाम असा झाला की हैदरनं त्यांची शरणागणी स्वीकारण्यास नकार दिला.

हैदरच्या घोडदळानं लढाई हारलेल्या इंग्रजी फौजेची कत्तल करण्यास सुरुवात केली. ॲलन ट्रिटन यांनी ‘व्हेन द टायगर फॉट द थिसेल’ हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात त्यानं 73 व्या हायलँड रेजिमेंटच्या एका लेफ्टनंटचा संदर्भ देत म्हटलं आहे, “मरणापासून वाचलेले लोक मोठ्या कष्टानं उभे राहू शकत होते. काहींचा जीव गुदमरत होता. काही सैनिकांचा तर हलताही येत नव्हतं. कारण त्यांच्यावर इतर सैनिकांचे मृतदेह पडले होते.”

“काही सैनिक हत्तीच्या पायांखाली चिरडले गेले होते. काहींचे सर्व कपडे फाटले होते आणि ते रणरणत्या उन्हात तहानलेल्या अवस्थेत पडलेले होते.

त्यामुळं जंगली प्राणी सहजपणे त्यांची शिकार करत होते. इंग्रजांच्या फौजेतील 86 अधिकाऱ्यांपैकी 36 अधिकारी मारले गेले. तर 34 जखमी झाले आणि 16 जणांना कैद करण्यात आलं होतं.”

हैदर अलीसमोर शरणागती पत्करताना कर्नल बेली

फोटो स्रोत, Getty Images

बेलीच्या डोक्याला आणि पाठीला दुखापत झाली होती. त्याला त्याचा एक पायदेखील गमावावा लागला. शेवटी बेलीला एका तोफगाडीला बांधून हैदरसमोर आणण्यात आलं.

त्याला इतर कैद्यांबरोबर जमिनीवर बसवण्यात आलं. कंपनीच्या सैनिकांना पहिल्यांदा या गोष्टीची जाणीव झाली की पराभव काय असतो आणि कैदी होण्याचा अर्थ काय असतो.

इंग्रज कैद्यांचे हाल

जवळपास सात हजार इंग्रज सैनिकांना कैद करण्यात आलं. जेम्स स्करी या एका कैद्यानं ‘द कॅप्टविटी, सफरिंग अँड एस्केप ऑफ जेम्स स्करी’ हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात त्यानं लिहिलं आहे, “दहा वर्षे हैदरच्या कैदेत राहिल्यानंतर खुर्चीवर कसं बसतात, सुरी आणि काट्यानं कसं जेवतात, हे मी पूर्णपणे विसरलो होतो. मी इंग्रजी भाषेचा वापर करणंदेखील विसरलो होतो. माझी कातडी काळी पडली होती. मला युरोपियन कपडे आवडत नव्हते.”

माया जासानॉफ यांनी ‘एज ऑफ द एम्पायर कॉन्क्वेस्ट अँड कलेक्टिंग इन द ईस्ट 1750-1850’ हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात त्यांनी लिहिलं आहे, “जर बेलीच्या पराभवानंतर हैदर अलीनं लढाई सुरू ठेवली असती तर इंग्रजांचं खचलेलं मनोधैर्य लक्षात घेता, फोर्ट सेंट जॉर्ज जिकण्यात त्याला अपयश आलं असतं, याची शक्यता फारच कमी होती.”

“हे कंपनीचं सुदैवंच होतं की हैदरला त्याचे सैनिक सांभाळून ठेवायचे होते. त्यानं कंपनीशी थेट लढण्याचं धोरण सोडलं आणि एखाद-दुसरा हल्ला करून निघून जाण्याचं तंत्र अंमलात आणलं.”

हैदर अली

फोटो स्रोत, Bloomsbury

आगामी काही महिन्यांमध्ये गव्हर्नर जनरल हेस्टिंग्सला हैदर आणि मराठ्यांमध्ये झालेला करार तोडण्यात यश आलं. हेस्टिंग्सनं मराठा सेनापती महादजी शिंदे यांच्याबरोबर एक करार केला.

त्याअंतर्गत मराठे इंग्रजांचे मित्र झाले. त्याचा परिणाम असा झाला की इंग्रजांविरुद्धच्या पुढच्या लढाईत हैदरला पुन्हा आधीच यश मिळू शकलं नाही.

विलियम डेलरिंपिल यांनी ‘द अनार्की’ हे पुस्तक लिहिलं आहे. त्या ते लिहितात, “जर 1780 मध्येच हैदर आणि त्याच्या मित्रांनी कंपनीवरील दबाव कमी केला नसता, तर इंग्रज त्याचवेळेस कायमचे भारतातून बाहेर पडले असते. नंतर पुणे आणि म्हैसूरच्या दरबारांना या गोष्टीचा नेहमीच पश्चाताप वाटत राहिला की त्यांना त्या परिस्थितीचा पूर्ण फायदा घेता आला नाही.”

पाठीच्या कर्करोगानं मृत्यू

हैदरला 1782 मध्ये पाठीवर एक फोड आला. हळूहळू त्या फोडाचा आकार वाढतच गेला. नंतर माहीत झालं की, हैदरला पाठीचा कर्करोग झाला होता.

दुसऱ्या अँग्लो-म्हैसूर युद्धाच्या वेळेस, या गंभीर आजारामुळं हैदर अलीची शक्ती आणि गती बऱ्याच अंशी कमी झाली होती. 7 डिसेंबर 1782 ला जमिनीवरून शिखरावर पोहोचणाऱ्या या राजानं वयाच्या 60 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला.

शामा राव यांनी ‘मॉडर्न मैसूर फ्रॉम बिगिनिंग टू 1868’ हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात त्यांनी लिहिलं आहे, “ज्यावेळेस हैदर अलीचा मृत्यू झाला, ती भारताच्या इतिहासातील एक सामान्य घटना नव्हती, हे म्हणण्यात कोणतीही अतिशयोक्ती नाही.

हैदर अलीच्या मृत्यूमुळे भारतात ब्रिटिश साम्राज्याचा पाया घातला. हैदर अली जिवंत असताना कदाचित ते शक्य झालं नसतं.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC