Source :- ZEE NEWS

World Most Expensive Party: पार्टी… फक्त नाव उच्चारलं तरीही अनेकांचाच उत्साह शिगेला पोहोचतो. अनेक पाहुणे, कमाल मेजवानी, नुसत्या गप्पा, नाच-गाणी आणि बरंच काही. असंच एकंदर पार्टीचं चित्र असतं. बरं, या पार्टीची किंवा कथित स्नेहभोजनाची कारणंही एकाहून एक सरस असतात. अशीच एक पार्टी जवळपास पाच दशकांपूर्वी पार पडली होती. 

18 टन जेवण, मद्याच्या 25000 बाटल्या, पाहुण्यांची ने- आण करण्यासाठी 100 विमानं अशी एकंदर सोय असणारी ही पार्टी कोणा व्यावसायिकानं नव्हे, तर इराणच्या एका व्यक्तीन 1971 मध्ये आयोजित केली होती. आतापर्यंत ही जगातील सर्वात महागडी पार्टी ग्राह्य धरली जाते. 

54 वर्षांपूर्वी इराणचं चित्र अगदी वेगळं होतं. इथं महिलांना पाश्चिमात्य कपडे घालण्याची परवानगी होती, अतिशय मॉडर्न लूकमध्ये वावरण्यास वाव दिला जात होता. मात्र 1979 मध्ये इस्लामिक क्रांतीनं सारं चित्र बदललं. या क्रांतिमुळं पहलवी राजवंशाचा शेवट झाला (Pahlavi Dynasty) आणि इस्लामिक प्रजासत्ताक उदयास आलं आणि त्यामुळं देशातील नियम, संस्कृती आणि महिलांच्या स्वातंत्र्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम पडला. 

इराणच्या इतिहासात डोकावताना… 

1941 हा तोच काळ होता जेव्हा रजा शाह, हे इराणचे शासक झाले. श्रीमंतीच्या बळावर ते इराणलाही आधुनिकीकरणाच्या मुख्य प्रवाहात आणू इच्छित होते. त्यांनी कधी नव्हे ते पाश्चिमात्य राहणीमानाला प्राधान्य देत जुनाट रितीरिवाजांना बगल दिली होती, जाहीर विरोधही केला होता. 1971 मध्ये पर्शियन साम्राज्याला 2500 वर्षे पूर्ण झाल्याच्याच निमित्तानं एका जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.पर्सेपोलिसच्या वाळवंटीय भागात या पार्टीचं आयोजन करण्यात आलं जिथं प्राचीन राजा सायरस द ग्रेट यांची कबर होती. या पार्टीमध्ये 65 देश पाहुणे होते आणि त्या काळात या पार्टीसाठी तब्बल 100 मिलियन डॉलर इतका गडगंज खर्च करण्यात आला होता. 

वर्षभर सुरू होती पार्टीची तयारी… 

जवळपास वर्षभर या पार्टीची तयारी सुरू होती. पार्टीसाठी तेहरानमध्ये हॉटेलं कमी पडत होती, याचसाठी अनेक तंबू उभारून एका अस्थायी शहराची निर्मिती करण्यात आली. रस्त्ये तयार करण्यात आले. बरं हे तंबू एखाद्या शाही महालाहून कमी नव्हते. या पार्टीसाठी थेट फ्रान्सहून जेवण मागवण्यात आलं होतं. या पार्टीसाठी 40 ट्रक आणि 100 विमानं फक्त सामानाची ने- आण करण्यासाठी वापरली गेली होती. बरं, इतक्यावरच न थांबता जवळपास 50000 पक्षी आणत या वाळवंटाला एक समृद्ध भाग भासवलं जात होतं. वास्तवात मात्र येथील उष्णतेमुळं यातील बऱ्याच पक्ष्यांचा मृत्यू झाला. 

हेसुद्धा वाचा : 1 लाख कोटींचं झाला Taj Hotel हा ब्रॅण्ड! 1903 मध्ये सहा रुपयला मिळणाऱ्या रुमचं आजचं भाडं…

पार्टीची जगभरात चर्चा, सामान्यांमध्ये मात्र संतापाची लाट… 

18 जन जेवण, देशोदेशीचे पाहुणे आणि डोळे दीपवणारी व्यवस्था असं या पार्टीचं आयोजन असलं तरीही त्या काळात इराणमधील सामान्य जनता मात्र अनेक प्राथमिक सोयीसुविधांपासून वंचित होती. पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा त्यांच्यासाठी करता आली नव्हती. ज्यामुळं या पार्टीसाठी करण्यात आलेल्या शाही खर्चानं सामान्य नागरिकांचा संताप अनावर झाला होता. याच संतापासून शाह यांच्या सत्तेचा लोप सुरू ढाला आणि इथूनच इस्लामिक क्रांती उदयास आली, ज्यामुळं इराणचा इतिहास पुरता बदलला. 

SOURCE : ZEE NEWS