Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, ANI
सोमवारची (28 एप्रिल) संध्याकाळ भारतीय क्रिकेट नव्हे तर जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी अनोखी ठरली. आयपीएल 2025 च्या रोमांचक सामन्यात अवघ्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध विक्रमी शतक नोंदवून संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे.
अशक्य वाटणारं धावांचं लक्ष्य आपल्या वादळी खेळीनं त्यानं किरकोळ ठरवलं. आपल्या शानदार खेळीने त्यानं केवळ मैदानावरच नाही, तर आयपीएलच्या इतिहासातही एक नवा अध्याय जोडला आहे.
स्कोअरबोर्डवर गुजरात टायटन्सच्या 209 धावा होत्या. पॉइंट टेबलमध्ये 9 व्या स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्ससाठी हा धावांचा डोंगर होता.
काही दिवसांपूर्वी याच गुजरात संघाच्या 217 धावांच्या आव्हानासमोर राजस्थानच्या टीमने गुडघे टेकले होते. राजस्थानने हा सामना 58 धावांनी गमावला होता.
परंतु, 28 एप्रिल 2025 च्या रात्री वैभव सूर्यवंशी या 14 वर्षांच्या मुलानं मॅचची स्क्रिप्ट त्याच्या बॅटने लिहिण्याचा निर्धार केला होता.
आयपीएलच्या केवळ दोन सामन्यांचा अनुभव घेऊन खेळपट्टीवर उतरलेल्या वैभव सूर्यवंशीसमोर टीम इंडियाचा दिग्गज गोलंदाज मोहम्मद सिराज होता.
त्याच्या पहिल्या चेंडूवर स्ट्रेट ड्राईव्हने षटकार ठोकल्यानंतर, वैभवनं पुढील काही चेंडूंवर सावध खेळी केली. पुढच्या सात चेंडूत त्याच्या फक्त नऊ धावा झाल्या होत्या.
मग मैदानात आलं वादळ…
पण नंतर चौथ्या षटकात वैभवनं आपला इरादा स्पष्ट केला. ही ओव्हर घेऊन आला होता, 100 पेक्षा जास्त कसोटी आणि 100 पेक्षा जास्त आयपीएल सामन्यांचा अनुभव असलेल्या इशांत शर्मा.
या षटकात पहिल्याच चेंडूवर वैभवनं हुक करुन स्क्वेअर लेग बाऊंड्रीवर षटकार ठोकला. दुसरा चेंडू मिडविकेट बाऊंड्रीच्या वर टोलवला, तोही षटकार होता. तिसऱ्या चेंडूवर चौकार, पाचवा चेंडू पुन्हा एकदा थर्ड मॅन बाऊंड्रीवर सीमारेषेच्या बाहेर टोलवला. हा षटकार बघण्यासारखा होता. सहाव्या आणि अखेरच्या चेंडूवरही त्यानं दयामाया न दाखवता चौकार लगावला.
या षटकात एकूण 28 धावा त्यानं काढल्या. ईशांत शर्माच्या आयपीएल करिअरमधील ही सर्वात महागडी ओव्हर ठरली.

फोटो स्रोत, ANI
पहिल्या चार षटकांतच टीमने 50 पेक्षा जास्त धावा केल्या.
पाचव्या षटकात वैभवने आणखी दोन षटकार आणि एक चौकार ठोकून केवळ 17 चेंडूत आयपीएलच्या या हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक नोंदवले. त्यावेळी टीमच्या 16.20 च्या सरासरीने 81 धावा झाल्या होत्या.
वैभवच्या या वादळी खेळामुळं त्यांना हवा असणारा 10.50 चा रनरेट कमी होऊन 8.60 वर आला होता.
त्यानंतर दहावं षटक वैभवसाठी धावांचं पाऊस पाडणारं ठरलं. शुभमन गिलच्या जागेवर गुजरातचं नेतृत्त्व करणाऱ्या राशिद खानने चेंडू करीम जन्नतच्या हाती सोपवला.

गुजरातसाठी आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अफगाणिस्तानच्या या अनुभवी वेगवान गोलंदाजासाठी हे षटक अत्यंत दुर्दैवी ठरलं.
वैभवने या षटकातील सर्वच्या सर्व सहा चेंडू सीमारेषेपार धाडले. पहिल्या चेंडूवर स्क्केअर लेगला षटकार, दुसऱ्या चेंडूवर डीप पॉइंटला चौकार ठोकला, तिसऱ्या चेंडूवर डीप स्क्वेअर लेगला षटकार, चौथ्या चेंडूवर स्ट्रेट ड्राइव्ह चौकार, पाचव्या चेंडूवर लाँग ऑफवर चौकार आणि सहाव्या चेंडूवर डीप मिड विकेटवर पुन्हा एकदा षटकार ठोकला.
वैभवने या षटकात तीन षटकार आणि तितकेच चौकर ठोकत तब्बल 30 धावा कुटल्या.
राशिद खानच्या पुढच्या षटकात त्याला स्ट्राइक मिळाल्यावर त्याने पुन्हा एक षटकार लगावला. अशा पद्धतीने 11 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने त्याने आयपीएलच्या इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान शतक आपल्या नावावल केलं.
वैभवचा पराक्रम अन् द्रविड व्हीलचेअर सोडून उभे राहिले…
वैभवच्या या पराक्रमावर संपूर्ण स्टेडियम टाळ्यांच्या गजराने दुमदुमले होते, प्रत्येक व्यक्ती वैभवच्या सन्मानार्थ उभा राहिला होता.
वैभवच्या सन्मानार्थ प्रशिक्षक राहुल द्रविडही आपल्या व्हीलचेअरवरुन उठले आणि टाळ्या वाजवू लागले. पायाला झालेल्या दुखापतीमुळे द्रविड यांना सध्या व्हीलचेअरचा वापर करावा लागत आहे.
1996 मध्ये पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने केवळ 37 चेंडूंमध्ये वनडे शतक ठोकलं होतं, तेव्हा ते अविश्वसनीय वाटलं होतं. पण सोमवारी रात्री 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने जे केलं, ते खरंच अकल्पनीय होतं.
वैभवनं आपल्या डावात आणखी एका धावेची भर टाकली आणि प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर तो बोल्ड झाला. याचबरोबर आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात आश्चर्यकारक खेळी संपुष्टात आली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
मजकूर उपलब्ध नाही
Xवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.
पॅव्हेलियनमध्ये परतण्यापूर्वी यशस्वी जयस्वाल आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या नितीश राणाने त्याला मिठी मारली, तर सिराज, साई सुदर्शनसह गुजरात टायटन्सच्या अनेक खेळाडूंनी जवळ जाऊन त्याचं अभिनंदन केलं.
सामन्याचे समालोचन करत असलेले माजी क्रिकेटपटू शास्त्री म्हणाले, “काय अफलातून खेळी होती.” शास्त्रींसोबत समालोचन करत असलेले वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू डेरेन गंगा यांनीही, “एका ऐतिहासिक डावाचा शेवट झाला. ही खूप खास खेळी होती,” असं म्हटलं.
शतकीय खेळीनंतर काय म्हणाला वैभव?
‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरलेला वैभव सूर्यवंशी सामन्यानंतर म्हणाला की, आयपीएलच्या तिसऱ्या डावातील माझं पहिलं शतक आहे.
तो म्हणाला, “खूप छान वाटत आहे. आयपीएलमध्ये शतक झळकावण्याचं स्वप्न सत्यात उतरल्यासारखं आहे. मी गेल्या तीन-चार महिन्यांपासून करत असलेल्या मेहनतीचे परिणाम आता दिसत आहेत.”

फोटो स्रोत, ANI
समोर जागतिक दर्जाचे गोलंदाज पाहून तुला कसं वाटतं, असं जेव्हा त्याला विचारलं, तेव्हा तो म्हणाला, “मी जास्त विचार करत नाही, फक्त बॉलवर लक्ष केंद्रित करतो.”
आता गोलंदाज तुला लक्ष्य करतील, असं विचारलं असता वैभव म्हणाला, मी याबद्दल विचार करत नाही, मी फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करत आहे.
सचिन, युवराजसह अनेक दिग्गज वैभवच्या खेळीचे झाले चाहते
वैभवच्या या वादळी खेळीचे प्रत्येकजण कौतुक करताना दिसत आहे.
वैभवचं अभिनंदन करणाऱ्यांमध्ये युसूफ पठाणचाही समावेश होता, ज्याचा 37 चेंडूंतील शतकाचा विक्रम सूर्यवंशीने मागे टाकला आहे.
यूसुफ पठाणनं लिहिलं, “छोट्या #वैभवसूर्यवंशीला खूप खूप शुभेच्छा, ज्यानं माझ्याकडून करण्यात आलेला कोणत्याही भारतीय खेळाडूचा सर्वात जलद @IPL शतकाचा रेकॉर्ड मोडला! हे पाहणं आणखी खास आहे, कारण त्यानं हा कारनामा त्याच टीमसाठी @rajasthanroyals कडून खेळताना केला, जसं मी केलं होतं. या फ्रँचायझीत तरुणांसाठी खरंच काही जादू आहे. अजून खूप मोठा पल्ला तुला गाठायचा आहे, चॅम्पियन!”

फोटो स्रोत, X/@iamyusufpathan
युवराज सिंगनं लिहिलं, “वयाच्या 14 व्या वर्षी तुम्ही काय करत होतात? हा मुलगा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांना आव्हान देत आहे! वैभव सूर्यवंशी – हे नाव लक्षात ठेवा! निर्भयपणे खेळत आहे. नवीन पिढी अशी चमकताना पाहून अभिमान वाटतो!”
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी एक्सवर लिहिलं, “वैभवची बेधडक शैली, वेगानं बॅट फिरवण्याची क्षमता, बॉलची लाइन आणि लेंथ लगेच ओळखणं आणि फटक्यांमधील ताकद हा त्याच्या चांगल्या खेळीचा जादूई फॉर्म्युला होता. अंतिम निकाल: 38 चेंडूत 101 धावा. अफलातून खेळलास वैभव!”
माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी लिहिलं, “एक युवा भारतीय क्रिकेटपटूनं अविश्वसनीय क्रिकेट खेळलं आहे. आज रात्री वैभव सूर्यवंशीचं लाँचिंग झालं आहे.”
सामन्यानंतर राजस्थानचा कर्णधार रियान पराग म्हणाला, “पहिल्या वर्षी शतक झळकावणं, तेही तुम्ही फक्त 14 वर्षांचे असताना, जगभरातील कोणत्याही लीगमध्ये अशी गोष्ट ऐकलेली नाही.”
तर यशस्वी जयस्वाल म्हणाला, “आज तो फुल फॉर्ममध्ये होता आणि मी त्याच्या फटक्यांचा दुसऱ्या टोकावरुन आनंद घेत होतो.”
रेकॉर्ड बुक
आपल्या शतकाच्या जोरावर राजस्थानला विजय मिळवून देणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये अनेक विक्रम मोडले आणि नवीन विक्रमांची नोंदही केली.
– आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारा भारतीय, युसूफ पठाणचा विक्रम मोडला
– आयपीएलचे दुसरे सर्वात वेगवान शतक. सर्वात वेगवान शतकाचा विक्रम ख्रिस गेलच्या (30 चेंडू) नावावर आहे.
– 14 वर्षे 32 दिवस वय असलेला वैभव टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयाचा शतकवीर बनला आहे.
– 11 षटकार ठोकून वैभवने आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या मुरली विजयच्या विक्रमाची बरोबरी केली.
– वैभवच्या 93.06 टक्के धावा (101 पैकी 94 धावा) या चौकार आणि षटकारांनी झाल्या आहेत. टी 20 मध्ये केलेल्या शतकांमध्ये हे सर्वाधिक आहे.

त्याबरोबर करीम जन्नतच्या षटकात वैभवने 30 धावा केल्या, कोणत्याही आयपीएल गोलंदाजाच्या करिअरच्या पहिल्या षटकातील या सर्वाधिक धावा आहेत. हा विक्रमही सोमवारी नोंदवला गेला आहे
राजस्थानने 15.5 षटकात 210 धावा करत विजय मिळवला. टी 20 मध्ये 200 पेक्षा जास्त धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी घेतलेल्या सर्वात कमी षटकांचा हा नवा विक्रम आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC