Home LATEST NEWS ताजी बातमी 14 प्रसूतींच्या वेदना सहन करणाऱ्या मुमताज महलची कहाणी

14 प्रसूतींच्या वेदना सहन करणाऱ्या मुमताज महलची कहाणी

4
0

Source :- BBC INDIA NEWS

उत्तर प्रदेशमध्ये आग्रा येथे ताजमहाल आहे.

फोटो स्रोत, Getty Images

17 जून 1631 रोजी, दख्खनमध्ये (दक्षिण भारत) असलेल्या मुघलांच्या बुऱ्हानपूर येथील मुख्यालयात प्रचंड उकाडा होता. त्याच वेळी पाचवा मुघल बादशाह शाहजहाँची लाडकी पत्नी मुमताज महल 14 व्या बाळंतपणाच्या वेदना (प्रसूतीवेदना) सहन करत होती.

शाहजहाँ आणि मुमताज यांच्या विवाहाला 19 वर्षे झाली होती. या काळात 13 मुलांचा जन्म झाला होता. त्यापैकी 7 मुलांचा लहानपणीच मृत्यू झाला होता.

जिवंत राहिलेल्या 6 मुलांमध्ये जहानआरा ही सर्वात मोठी होती. त्यावेळी ती 17 वर्षांची होती आणि आईच्या बाळंतपणावेळी ती तिच्या सोबतच होती.

शाही हकीम (राजवैद्य) आणि प्रसूतीसाठी मदत करणाऱ्या सुईणीही तिथे उपस्थित होत्या. 17 वर्षांच्या जहानआराने यापूर्वीही आईच्या अनेक प्रसूतींच्यावेळी तिची मदत केली होती.

परंतु, 14 व्या बाळंतपणाच्या वेळी काहीतरी गंभीर गडबड झाली होती.

सुप्रिया गांधी यांनी त्यांच्या ‘द एम्परर हू नेव्हर वॉज: दारा शिकोह इन मुघल इंडिया’ या पुस्तकात लिहितात की, प्रसिद्ध युनानी हकीम (ग्रीक वैद्य) जालीनूस (गॅलेन) यांच्या विचारांचा मुघल राजवैद्यांवर प्रभाव होता.

त्यांच्या मते, मानवी शरीर चार द्रव्य किंवा घटकांच्या मिश्रणांनी बनलेले असते आणि आरोग्य हे त्या घटकांमधील संतुलनावरच अवलंबून असते.

आणि यानुसार, मुमताज महलच्या शरीरातील हे संतुलन वेगाने बिघडत चालले होते.

सुमारे 30 तास प्रसूतीच्या वेदना सहन केल्यानंतर मुमताज महलने एका मुलीला जन्म दिला. परंतु, त्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला आणि तिची प्रकृती झपाट्याने खालावली.

बहुधा याला आजच्या आधुनिक वैद्यकीय भाषेत ‘पोस्टपार्टम हॅमरेज’ म्हणजेच प्रसूतीनंतर होणारा अतिरक्तस्राव म्हणतात.

वेदनांनी तडफडणाऱ्या मुमताज महलने जहानआराला आपल्या वडिलांना, म्हणजेच शाहजहाँला बोलावण्यास सांगितलं.

ही बातमी कळताच दुःखी झालेला बादशाह लगेचच मुमताज महलजवळ पोहोचला आणि तिच्या शेजारी बसला. त्याच्या इतर मुलांना मात्र तिला शेवटचं भेटता आलं नाही.

मुमताज महलने बादशाहला मुलांची आणि आपल्या आईची काळजी घेण्याची विनंती केली. त्यानंतर, वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी तिचे निधन झाले.

प्रेमाने भरलेलं आयुष्य

शाहजहाँ आणि मुमताज महल यांचा विवाह 1612 मध्ये झाला होता. त्यावेळी शाहजहाँला ‘राजकुमार खुर्रम’ म्हणून ओळखलं जात असत, तर मुमताज महलचे नाव ‘अर्जुमंद बानू बेगम’ असं होतं.

लग्नानंतर काही काळातच राजकुमार खुर्रमने अर्जुमंद बानो बेगमला ‘मुमताज महल’ ही पदवी दिली. याचा अर्थ ‘राजवाड्यातील सर्वांत प्रतिष्ठित किंवा मानाची स्त्री’ असा होतो.

इतिहासकारांच्या मते, मुमताज महल आणि शाहजहाँ यांचं वैवाहिक जीवन प्रेम आणि आपुलकीने भरलेलं होतं.

1628 मध्ये शाहजहाँ बादशाह झाल्यानंतर त्याने मुमताज महलला ‘पादशाह बेगम’, ‘मलिका-ए-जहाँ’, ‘मलिका-ए-झमानी’ आणि ‘मलिका-ए-हिंदुस्तान’ या मानाच्या पदव्या दिल्या. त्याचबरोबर तिला सर्व प्रकारच्या सुख-सुविधाही दिल्या.

ॲलिसन बँक्स फाइंडली यांच्या ‘नूरजहाँ: एम्प्रेस ऑफ मुघल इंडिया’ या पुस्तकानुसार, शाहजहाँने अर्जुमंद बानूशी (मुमताज महल) विवाह करण्यापूर्वी एक आणि विवाहानंतर आणखी एक असे दोन विवाह केले होते.

दरबारी इतिहासकारांच्या मते, हे दोन्ही विवाह राजकीय युतीसाठी झाले होते. या दोन्ही विवाहांमधून शाहजहाँला प्रत्येकी एक अपत्य झाले होते.

“परंतु, इतर कोणत्याही राणीचा महाल ‘खास महाल’ इतका भव्य दिव्य नव्हता. या महालात मुमताज महल शाहजहाँसोबत राहत होती. शुद्ध सोनं आणि मौल्यवान रत्नांनी सजवलेल्या या महालात गुलाबपाण्याचे कारंजेही होते.”

“मुघल बादशहाच्या प्रत्येक पत्नीला दरमहा ठराविक भत्ता (वझिफा) दिला जात असत. त्यापैकी सर्वाधिक रक्कम, म्हणजे वर्षाला 10 लाख रुपये, शाहजहाँने मुमताज महलला दिले होते. याशिवाय तिला भरपूर उत्पन्न देणाऱ्या जमिनी आणि मालमत्ताही दिल्या होत्या.”

राज्यकारभार असो किंवा वैयक्तिक गोष्टी, मुमताज महल या शाहजहाँच्या सर्वात जवळच्या आणि विश्वासू सल्लागार होत्या.

वाल्डेमार हॅन्सन हे आपल्या ‘द पीकॉक थ्रोन’ या पुस्तकात लिहितात की, मुमताज महल आपल्या आत्या नूरजहाँप्रमाणेच बादशाहसोबत खासगी आणि सार्वजनिक दरबारात उपस्थित राहत असत.

“मुमताज महल पडद्यामागे बसत. एखाद्या निर्णयाबाबत तिचं मत वेगळं असेल, तर ती शाहजहाँच्या पाठीवर हात ठेवत असत. तिच्या सांगण्यावरून शाहजहाँ अनेकदा आपल्या शत्रूंना माफ करत किंवा मृत्युदंडाची शिक्षाही कमी करत असत.”

इतिहासकारांच्या मते, शाहजहाँने मुमताज महलला राजमुद्रा दिली होती. शाही आदेशांना मंजुरी देण्यासाठी, त्याची अधिकृतता सिद्ध करण्यासाठी ही राजमुद्रा वापरली जात असत. तिच्या मंजुरीशिवाय कोणताही महत्त्वाचा निर्णय घेतला जात नसत.

मुमताज महलला सत्तेची किंवा राज्य चालवण्याची महत्त्वाकांक्षा किंवा अभिलाषा नव्हती. परंतु, आपल्या प्रभावाचा वापर ती अनेकदा गरीब आणि निराधारांना मदत करण्यासाठी करत असत.

शाहजहाँ आणि मुमताज महल यांचा विवाह 1612 मध्ये झाला होता. त्यावेळी शाहजहाँला 'राजकुमार खुर्रम' म्हणून ओळखलं जात असत, तर मुमताज महलचे नाव 'अर्जुमंद बानू बेगम' असं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

इतिहासकार सुप्रिया गांधी यांच्या मते, आजही मुमताज महलच्या राजमुद्रेचा एक शाही आदेश म्हणजेच हुकूमनामा (फर्मान) उपलब्ध आहे. यात तिने एरंडोल (खानदेशातील (जळगाव) एक ऐतिहासिक शहर) येथील अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

“या आदेशात मुमताज महलने कानोजीची (सरदार) नवीन देशमुख म्हणून नियुक्ती कायम ठेवली. तसेच रयतेची चांगली काळजी घ्या, जेणेकरून लोक बादशाहबद्दल कृतज्ञ राहतील, असे आदेशही दिले. हा कदाचित तिने जारी केलेल्या अनेक शाही आदेशांपैकी एक होता. तिची विश्वासू सहकारी सती-उल-निसाकडे राजमुद्रेची जबाबदारी होती.”

“सती-उल-निसा महिलांच्या तक्रारी आणि अर्ज पाहत असत. त्यातून मदतीस पात्र असलेल्या लोकांची निवड करून त्या मुमताज महलकडे पाठवत असत. त्यानंतर मुमताज महल हे विषय शाहजहाँसमोर मांडत असत. मृत्युदंडाच्या प्रकरणांमध्येही ती अनेकदा शिफारस करत आणि अनेकांना शाहजहाँकडून माफीही मिळवून देत असत.”

दरबारी (शाही) इतिहासकारांच्या मते, शाहजहाँ आणि मुमताज महल यांच्यातील परस्पर संबंध खूपच खास होते. त्यामुळे त्यांनी शाही जोडप्यांबाबत सहसा पाळला जाणारा शिष्टाचार बाजूला सारून, दोघांच्या भावनिक आणि वैवाहिक नात्याचंही वर्णन आपल्या लिखाणात सविस्तरपणे केलं आहे.

मुमताज महल शाहजहाँच्या सुरुवातीच्या लष्करी मोहिमांमध्ये त्याच्यासोबत होती. तसेच त्याचे वडील जहाँगीर यांच्याविरूद्ध केलेल्या बंडावेळीही मुमताज त्याच्यासोबतच होती.

बुऱ्हाणपूरमध्येही मुमताज महलचा भव्य आणि सजवलेला तंबू, बंड मोडून काढण्यासाठी शाहजहाँ जिथे थांबला होता, त्याच्या अगदी जवळ उभारण्यात आला होता.

मुमताजच्या मृत्यूचा धक्का

14व्या प्रसूतीदरम्यान मुमताज महलचं निधन झालं. पण, तिने जन्म दिलेली मुलगी जिवंत राहिली. या मुलीचं नाव गौहर आरा ठेवण्यात आलं. या नावाचा अर्थ ‘दागिन्यांनी किंवा रत्नांनी सजलेली’ असा होतो.

शाहजहाँच्या इतिहासकारांनी बादशाहच्या दुःखाची अधिक माहिती दिली आहे. परंतु, मुमताज महलच्या निधनाचा त्याच्या मुलांनाही मोठा धक्का बसलेला असणार.

शाहजहाँचा दरबारी इतिहासकार अब्दुल हमीद लाहोरीने ‘पादशाहनामा’मध्ये लिहिलं आहे की, “सततचे हुंदके आणि अश्रूंमुळे, सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या बादशाहच्या मनाचा आरसा, ज्याने यापूर्वी कधीही दुःखाचा अंधार पाहिला नव्हता, तो झाकोळला गेला, त्याची चमक हरपली.”

मुमताज महलच्या निधनानंतर शाहजहाँने पांढरे वस्त्र घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर सर्व शहजादे (राजकुमार), दरबारी आणि सेवकही शोक व्यक्त करण्यासाठी पांढऱ्या कपड्यांत किंवा वेशभूषेत दिसू लागले.

मुमताजच्या निधनानंतर शाहजहाँ आठवडाभर जनतेसमोर आला नाही, त्याने राज्यकारभारही पाहिला नाही. पत्नीच्या मृत्यूपूर्वी त्याच्या डोक्यावर फारच कमी म्हणजे मोजता येतील इतकेच पांढरे केस होते. पण या धक्क्यानंतर त्याचे केस झपाट्याने पांढरे झाले. बराच काळ त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत.

16 वर्षांच्या दारा शिकोहने आपली आई मुमताज महलला झैनाबादच्या बागेत, तापी नदीच्या काठी दफन करताना पाहिलं. त्यानंतर शाहजहाँ दर शुक्रवारी या कबरीला भेट देत असत. त्यावेळी दारा शिकोह आणि त्याचे काही भाऊही त्याच्यासोबत जात असावेत.

शायर कलीम यांनी शाहजहाँच्या दुःखाचं वर्णन करताना लिहिलं आहे की, “शाहजहाँची सावली कबरीवर पडताच, त्यांच्या अश्रूंनी कफनही ओले व्हायचे.”

परंतु, इतिहासकार सुप्रिया गांधी यांच्या मते, मुमताज महलची कबर बुऱ्हानपूरमध्ये असावी, अशी शाहजहाँची इच्छा नव्हती. त्यासाठी त्यांची नजर आग्रा येथील यमुना नदीच्या काठावरील एका सुंदर जागेवर होती.

मुमताज महलच्या स्मरणार्थ शाहजहाँने ताजमहाल उभारला होता.

फोटो स्रोत, Getty Images

“शाहजहाँने आपल्या शाही अधिकाराचा वापर करून ही जमीन राजा जयसिंहकडून घेतली होती. त्याच्या बदल्यात त्याने जयसिंह यांना शाही मालमत्तेतील चार भव्य अशा इमारती दिल्या होत्या.”

डिसेंबर 1631 मध्ये मुमताज महलचे पार्थिव कबरीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मुलगा शुजा ताबूतासह आग्राकडे निघाला. सती-उल-निसा पण त्याच्यासोबत होती.

सुप्रिया गांधी लिहितात की, आग्राकडे जाताना अंत्ययात्रेदरम्यान लोकांना नाणी आणि अन्न वाटण्यात आले. आग्रा येथे पोहोचल्यानंतर लोकांच्या नजरेपासून सुरक्षित राहण्यासाठी कबरीवर एक छोटा घुमट बांधण्यात आला.

त्यानंतर दुःखात बुडालेल्या शाहजहाँने मुमताज महलच्या स्मरणार्थ एक भव्य समाधी (मकबरा) उभारण्याचा निर्णय घेतला. पुढे हीच वास्तू ‘ताजमहाल’ म्हणून ओळखली जाऊ लागली. शाहजहाँला तरुणपणापासूनच वास्तुकलेत रस होता.

फ्रेंच रत्न व्यापारी जाँ-बॅप्टिस्ट टॅव्हर्निअरच्या प्रवासवर्णनानुसार, ताजमहालच्या बांधकामासाठी 20 हजारांहून अधिक मजूर आणि 1 हजार हत्ती कामावर लावण्यात आले होते.

ताजमहालचे बांधकाम साधारण 22 वर्षे सुरू होते. त्यासाठी त्या काळात सुमारे 50 लाख रुपये खर्च झाले. या खर्चामुळे मुघलांचा खजिना मोठ्या प्रमाणात रिकामा झाला होता.

इव्हा फर्नांडिस डेल कॅम्पो यांच्या मते, शाहजहाँ ताजमहालाच्या बांधकामात इतका मग्न झाला होता की, राज्यातील इतर अनेक महत्त्वाच्या कामांकडे त्यांचं दुर्लक्ष होऊ लागलं होतं.

1658 मध्ये औरंगजेबने आपल्या वडिलांकडून (शाहजहाँ) सत्ता हिसकावून घेतली. त्यानंतर त्याने आपल्या तीन भावांची हत्या केली. शाहजहाँला आग्रा किल्ल्यात कैद करण्यात आलं आणि 1666 मध्ये मृत्यू होईपर्यंत तो तिथेच कैदेत राहिला.

काळा ताजमहाल : प्रत्यक्षात नाहीच!

असं म्हटलं जातं की, शाहजहाँने स्वतःसाठीही एक असा मकबरा बांधण्याची योजना आखली होती, जो काळ्या दगडाचा असेल आणि त्याच्या दुःखाचं प्रतीक असेल. हा मकबरा पुलाच्या माध्यमातून ताजमहालशी जोडला जाणार होता.

या कल्पनेचा पहिला उल्लेख फ्रेंच प्रवासी जाँ-बॅप्टिस्ट टॅव्हर्निअरने 1665 मध्ये आपल्या लिखाणात केला होता. त्याच्या मते, शाहजहाँने स्वतःसाठी मकबरा बांधण्यास सुरुवात केली होती, पण त्यांचा मुलगा औरंगजेबने त्याला सत्तेवरून पदच्युत केल्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकलं नाही.

परंतु, आधुनिक पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि इतिहासकारांचा मोठा वर्ग ही गोष्ट केवळ ऐकीव माहिती मानतात.

असं म्हटलं जातं की, शाहजहाँने स्वतःसाठी काळ्या दगडाचा मकबरा बांधण्याची योजना आखली होती. (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

ताजमहालमध्ये शाहजहाँची कबर मुमताज महलच्या कबरीच्या अगदी मध्यभागी नाही, तर तिच्या बाजूला बांधण्यात आली आहे.

या विसंगत रचनेमुळे काही लोकांनी असा निष्कर्ष काढला की, शाहजहाँचा मकबरा कदाचित दुसऱ्या ठिकाणी बांधण्याचा विचार असावा.

ताजमहाल फक्त मुमताज महलसाठीच बांधण्यात आला होता. शाहजहाँला त्याच्या मृत्यूनंतर तिथेच दफन करण्यात आलं, त्यामुळे त्याची कबर मध्यभागी नसून बाजूला आहे.

आर. नाथ आपल्या एका लेखात लिहितात की, ताजमहाल 1648 मध्येच पूर्ण झाला होता. “जर एखादी वेगळी योजना असती, तर त्याचे ठोस पुरावे नक्कीच उपलब्ध झाले असते.”

“त्या काळातील फारसी (पर्शियन) इतिहासकारांनी त्याचा उल्लेख केला असता, पण त्यांनी याबद्दल काहीही लिहिलेलं नाही. त्यांनी मौन बाळगलं.”

ताजमहाल आणि प्रसूती

‘मद्रास कुरिअर’नुसार ताजमहालला प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. परंतु, प्रत्यक्षात ते मातांच्या आरोग्याचं (मॅटनिर्टी हेल्थ) महत्त्व सांगणारं स्मारक असावं.

“मुमताज महल ही शाहजहाँच्या सर्व पत्नींपैकी त्याला सर्वात जास्त प्रिय होती. त्यामुळे तिने त्याच्यासाठी 14 वेळा गर्भधारणेचा त्रास सहन केला. त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील जवळपास प्रत्येक वर्षी ती गरोदर होती. त्यापैकी केवळ 7 अपत्यं (3 मुली आणि 4 मुलं) जिवंत राहिली. 14व्या बाळाच्या जन्मादरम्यानच मुमताज महलचा मृत्यू झाला.”

“मुमताज महलचा मृत्यू प्रसूतीदरम्यान झालेल्या गुंतागुंतीमुळे झाला होता.”

अनंत कुमार यांनी ‘मॉन्युमेंट ऑफ लव्ह अँड सिम्बॉल ऑफ मॅटर्नल डेथ’ या आपल्या लेखात लिहिलं की, वारंवार गर्भधारणा झाल्यामुळे मुमताज महलच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. अखेर याच सततच्या गर्भधारणांमुळेच तिला आपला जीव गमवावा लागला.

“दुसरीकडे, 17व्या शतकात स्वीडनची राणी उलरिका एलिनोराने प्रसूतीदरम्यान होणारे मृत्यू कमी करण्यासाठी अनेक महत्त्वाचे उपाय जगाला दिले. त्यांनी सुईणींना प्रशिक्षण देणारी (मिडवाइफरी) जगातील पहिली शाळा सुरू केली. तसेच प्रत्येक गावातील एक-दोन महिलांना सुईण म्हणून प्रशिक्षण देण्याचं धोरणही अंमलात आणलं.”

“स्वीडनमध्ये गावागावांमध्ये सुईणींना प्रशिक्षण देण्याच्या या धोरणामुळे 1900 पर्यंत माता मृत्यूदर मोठ्या प्रमाणात कमी झाला. प्रत्येक 1 लाख जिवंत बाळांच्या जन्मामागे प्रसूतीदरम्यान होणारे मृत्यू 230 वर आले.”

शाहजहाँने पांढरे वस्त्र घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर सर्व शहजादे (राजकुमार), दरबारी आणि सेवकही शोक व्यक्त करण्यासाठी पांढऱ्या कपड्यांत किंवा वेशभूषेत दिसू लागले.

फोटो स्रोत, Getty Images

“विशेष म्हणजे, त्या काळात शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती, रक्त चढवणे (ब्लड ट्रान्सफ्यूजन) आणि प्रतिजैविकेसारख्या (अँटिबायोटिक्स) सुविधा अजून सर्वसाधारण झालेल्या नव्हत्या.”

17व्या शतकातील मुघल साम्राज्यात प्रसूतीनंतर अतिरक्तस्रावामुळे किती महिलांचा मृत्यू झाला, याची अचूक आकडेवारी उपलब्ध नाही. परंतु, वैद्यकीय इतिहासकारांच्या मते त्या काळात प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीनंतर महिलांच्या मृत्यूचा दर खूप जास्त होता. त्यामागे अतिरक्तस्राव हे एक महत्त्वाचं आणि मोठं कारण होतं.

मुघल काळामध्ये सामान्य उपचार आणि शस्त्रक्रिया चांगल्या दर्जाच्या होत्या. याचा उल्लेख त्या काळातील युरोपीय प्रवासी आणि इतिहासकारांनीही केलेला आहे.

‘मद्रास कूरियर’नुसार, “ताजमहाल हा शाहजहाँच्या मुमताज महलवरील प्रेमाची निशाणी म्हणून उभारण्यात आला. पण त्याहून मोठी आठवण म्हणजे माता आणि नवजात बाळांच्या चांगल्या आरोग्याची व देखभालीचे महत्त्व सांगणारं स्मारक म्हणून त्याकडे पाहायला हवं.”

काही विश्लेषकांच्या मते, ताजमहाल उभारण्यासाठी बेहिशोब पैसा खर्च करण्यात आला. यातील थोडे पैसे जरी प्रसूती आणि नवजात बाळांच्या आरोग्यासाठी रुग्णालय उभारण्यात खर्च केले असते, तर ते केवळ प्रेमाचं प्रतीकच ठरले नसते, तर असंख्य सामान्य मुमताज महलसारख्या महिलांचे प्राणही वाचले असते.

प्रसूतीतील गुंतागुंतीमुळे शतकानुशतके अनेक महिलांचा कमी वयात मृत्यू होत आला आहे.

ताजमहाल प्रेमाचं अमर किंवा शाश्वत प्रतीक तर राहिलंच असतं, पण महिलांच्या जीवाचं रक्षण करणाऱ्या आशेचंही प्रतीक ठरलं असतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC