Source :- BBC INDIA NEWS
केरळच्या पथनमथिट्टामध्ये 18 वर्षांच्या एका विद्यार्थिनीबरोबर झालेल्या लैंगिक शोषण आणि गँग रेप प्रकरणात पोलिसांनी 14 आरोपींना अटक केली आहे.
तीन ते चार वर्षांदरम्यान तिच्याबरोबर हा प्रकार घडल्याचं पीडित विद्यार्थिनीनं म्हटलं आहे.
या विद्यार्थिनीनं कुटुंबश्री स्नेहिता इनिशिएटिव्ह मध्ये झालेल्या काऊन्सिलिंगदरम्यान समुपदेशकांना पीडित विद्यार्थिनीनं ही आपबीती सांगितली. तसंच तिच्याबरोबर लैंगिक शोषण करणाऱ्यांबद्दलही तिनं सांगितलं होतं.
या पीडितेचं शोषण करणाऱ्यांमध्ये तिचे शेजारी, वर्गमित्र आणि काही अनोळखी लोकही होते, असं तिनं सांगितलं होतं.
समुपदेशकांनी त्यांना मिळालेली माहिती बाल कल्याण समितीला दिली. त्यानंतर प्रशासनाच्या मदतीनं त्यांनी या प्रकरणी तपास सुरू केला.
पोलिसांना बोलण्यापूर्वी बाल कल्याण समितीचे समुपदेशक आणि एक मानसोपचार तज्ज्ञ यांनी या विद्यार्थिनीबरोबर अनेकदा भेटी घेऊन चौकशी केली.
पथनमथिट्टा जिल्हा गुन्हे शाखेच्या मीडिया सेलचे संजीव एम यांनी बीबीसी हिंदीबरोबर बोलताना सांगितलं की, “विद्यार्थिनीनं तिच्या वडिलांच्या फोनवर आलेल्या 40 जणांच्या कॉलचे पुरावे सादर केले आहेत.
संजीव एम यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोपींच्या फोनमध्ये तरुणीवरील लैंगिक शोषणाचे पुरावे होते. त्याचा वापर ते तिच्या शोषणासाठी करत होते. त्याचा वापर करून तिला ब्लॅकमेल केलं जात होतं आणि तिला त्यांच्या मित्रांकडे घेऊन जात होते.”
“या सर्व प्रकारामुळं विद्यार्थिनी धक्क्यात आहे,” असं ते म्हणाले.
पथनमथिट्टा पोलिसांनी या प्रकरणी पाच गुन्हे दाखल केले आहेत. काही आरोपी इतर जिल्ह्यांमधील असल्याचंही सांगितलं जात आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC