Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Shatali Shedmake
1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामात इंग्रजी सत्तेविरूद्ध एल्गार पुकारून आपल्या प्राणांची आहुती देणारे चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी वीरांचे बलिदान इतिहासपटलावर अमर झाले आहे. यात शहीद क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या नाव अग्रक्रमाने घेतलं जातं.
चंद्रपूर-गडचिरोली क्षेत्रात इंग्रजांकडून सामान्य जनतेवर केल्या जाणाऱ्या अत्याचाराविरोधात तसेच इंग्रजांनी सुरू केलेल्या अन्यायकारक सावकारशाहीविरोधात बाबुराव शेडमाकेंनी आवाज उठवला. स्थानिकांना एकवटून त्यांनी जंगोम सेना उभी केली आणि ब्रिटिशांच्या शोषणाविरोधात लढा दिला. अखेर ब्रिटिश न्यायालयानं त्यांना चांदा येथील कारागृहात खुल्या आवारात आजच्याच दिवशी 21 ऑक्टोबर 1858 रोजी फाशी दिली.
21 ऑक्टोबर हा दिवस शहीद क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसर शेडमाके यांचा बलिदान दिवस म्हणून ओळखला जातो. अवघ्या 25 वर्षांच्या वयात मातृभूमीच्या रक्षणासाठी त्यांनी बलिदान दिले. परंतु, इतिहासात त्यांच्या शौर्याची नोंद फार क्वचित आहे. या दिनानिमित्त या आदिवासी क्रांतीवीराच्या कार्याची माहिती देणारा हा लेख.
फोटो स्रोत, Rajesh Madavi
बाबुराव शेडमाके यांचा जन्म 12 मार्च 1833 रोजी गोंड घराण्यातील अहेरी जमिनीदारीत मोलमपल्ली (किष्ठापूर) येथे झाला. त्यांच्या आईचे नाव जुरजायाल (जुरजाकुंवर होते). लहानपणापासूनच गोटूलमध्ये मल्लयुद्ध, तलवारबाजी, तीरकामठा आणि भाला चालवण्याचे प्रात्यक्षिक शिक्षण त्यांनी घेतलं.
मध्यप्रदेशातील रायपूर येथून इंग्रजी माध्यमातून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते गावी परतले. दरम्यान, आपल्या भागातील सावकार व इंग्रजांकडून सामान्य आदिवासी जनतेचं शोषण सुरू असल्यांचं त्यांच्या लक्षात आलं आणि या अत्याचाराविरुद्ध त्यांनी आवाज उठवण्यास सुरूवात केली.
राजघराण्यात जन्म घेऊनही बाबुराव यांच्यामध्ये अधिकारापेक्षा समाजसेवेबद्दलच्या समर्पणाचा भाव अधिक होता.
त्यांचा विवाह आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यातील चेन्नुर येथील मडावी राजघराण्यातील राजकुमारी राजकुंवर यांच्याशी झाला, ज्या त्यांच्या कार्यात नेहमी सहकार्य करत राहिल्या.
फोटो स्रोत, Vasant Kannake
सावकार, ठेकेदारांकडून सामान्य जनतेवर होणारे अत्याचार आणि इंग्रजांच्या आगमनानंतर सुरू झालेला त्रास त्यांनी जवळून पाहिला. चांदागड व परिसरात धर्मप्रचारकांकडून विकासाच्या नावाखाली भोळ्याभाबड्या आदिवासींचे केले जात असलेले धर्मांतर तसेच ब्रिटिशांकडून वनसंपत्ती व खनिज संपत्तीवर बळजबरी ताबा त्यांना अजिबात मान्य नव्हता.
शासकीय संकेतस्थळावरीला माहितीनुसार, 18 डिसेंबर 1854 रोजी आर.एस. एलिस यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आणि ब्रिटिशांनी गोरगरिबांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. सामान्य जनता धर्मप्रचारकांवर खूश नव्हती.
त्यावेळी गडचिरोली परिसर वनस्पती आणि खनिज संपत्तीने भरलेला होता आणि ब्रिटिशांना त्यांची मालमत्ता चालवण्यासाठी या मालमत्तांची आवश्यकता होती, म्हणून आदिवासींच्या जमिनी ब्रिटिशांनी जबरदस्तीने ताब्यात घेतल्या. बाबुरावांना हे अजिबात आवडलं नाही, आणि त्यांनी आवाज उठवला.
‘जंगोम सेना’ आणि इंग्रजांविरुद्ध युद्ध
आदिवासींची मूळ संस्कृती, सामुदायिकता आणि अस्मिता टिकवून राहावी या विचारातून त्यांनी 24 सप्टेंबर 1857 रोजी ‘जंगोम सेना’ या स्वतंत्र सैन्याची स्थापना केली. त्यांनी अडपल्ली, मोलमपल्ली आणि घोट परिसरातील जवळपास 400 ते 500 आदिवासी व रोहिल्यांना एकत्र करून त्यांना युद्धाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले.
‘जंगोम’ हा गोंडी भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ क्रांती असा होतो. याच क्रांतीची मशाल घेऊन त्यांनी आदिवासीबहुल भागात इंग्रजांविरोधात बंड पुकारलं.
इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी बाबुरावांनी इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या चांदागडजवळील राजगडची निवड केली, ज्याची जबाबदारी रामशाह गेडाम याच्याकडे होती. 7 मार्च 1857 रोजी बाबुराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी राजगडवर यशस्वी हल्ला केला. ज्यामध्ये राजगडचा जमीनदार सरदार रामजी गेडाम मारला गेला आणि हा संपूर्ण परिसर काबीज करत बाबुराव शेडमाकेंनी पहिला विजय मिळवला.
राजगडावरील पराभवाने इंग्रजांना हादरा बसला आणि संतापलेल्या कॅप्टन डब्ल्यु. एच. क्रिक्टनने बाबुरावांना पकडण्यासाठी चांदागडहुन सैन्य पाठवले. 13 मार्च 1858 रोजी नांदगाव घोसरीजवळ इंग्रजी सैन्य आणि जंगोम सेनेत भीषण लढा झाला, क्रिक्टनच्या सैन्याला धूळ चारत बाबुराव यांच्या सेनेने त्यावर विजय मिळवला.
फोटो स्रोत, Rajesh Madavi
बाबुराव यांच्या धाडसीपणाने आसपासच्या क्षेत्रातील लोकांचा आत्मविश्वास वाढू लागला होता. त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन, घोटचे जमीनदार व्यंकटराव हे देखाल त्यांच्या सैन्यासह बाबुराव यांच्या सोबतीला आले आणि जंगोम सेनेचं पाठबळ वाढवलं.
इंग्रजांना त्यांची हार जिव्हारी लागली आहे, याची जाणीव बाबुराव यांना होती. ते केव्हाही आपल्यावर पलटवार करू शकतात, हे त्यांना ठाऊक होतं. त्यामुळे, त्यांनी आपल्या सैन्यासह गढीचुर्ला टेकडीवर आश्रय घेत, तेथे पूर्वतयारी सुरू केली.
इंग्रज बाबुराव यांच्या मागावर होते. त्यांना गढीचुर्लाबद्दल माहिती मिळताच, 20 मार्च 1858 रोजी गढीचुर्ला येथील पहाडावर इंग्रजांनी चारही बाजूंनी घेरले. मात्र, बाबुरावांच्या सैनिकांनी धैर्याने लढा देत इंग्रजांच्या बंदुका व तोफा जप्त केल्या आणि इंग्रजांच्या अधिन असलेल्या ठेकेदारांनी नागरिकांची पिळवणूक करून जमवलेली धान्याचे कोठारं सामान्य जनतेसाठी खुली केली.
दरम्यान, 19 एप्रिल 1858 रोजी सगणापूर या गावी ते जमीनदार राजेश्वरराव व नरसिंहराव राजगोंड यांच्याकडे मुक्कामी आले असता इंग्रजांना त्यांची माहिती मिळाली. इंग्रजी सैन्याने पुन्हा एकदा जंगोम सेनेवर हल्ला चढवला. मात्र, इंग्रजी सैन्याला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला.
यानंतर, 29 एप्रिल 1858 रोजी बाबुरावांनी आपल्या सैन्यासह अहेरी जमीनदारीच्या चिचगुडी येथील इंग्रजी छावणीवर हल्ला चढवला, ज्यामध्ये इंग्रजांचे टेलिग्राम ऑपरेटर्स गार्टलॅन आणि हॉल मारले गेले. ही गोष्ट इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांच्यापर्यंत पोहोचली.
विश्वासघात आणि अटक
बाबुराव शेडमाके यांची वाढते वर्चस्व पाहून ब्रिटनची राणी व्हिक्टोरियाने त्यांना ‘जिवंत किंवा मृत’ पकडण्याचा हुकूम जारी केला. यासाठी नागपूरच्या कॅप्टन शेक्सपियरची नियुक्ती करण्यात आली.
बाबुराव यांची शैली पाहता शेक्सपियरने त्यांना पकडण्यासाठी वेगळं जाळं विणलं. बाबुराव यांना जो कोणी पकडून देईल, त्यांना बहुमानाची उपाधी आणि घोट, अडपल्ली, मोलमपल्ली येथील जमीनदारी बहाल करण्यात येईल, असं जाहीर आवाहन केलं.
इंग्रजांनी अहेरीची जमीनदार असलेल्या बाबुरावांच्या आत्या राणी लक्ष्मीबाई यांच्याशी हातमिळवणी केली. त्यांना शेडमाके जमीनदारीतील 24 गावं तसेच व्यंकटराव राजेश्वर गोंड यांच्या जमीनदारीतील 67 असे 91 गावं गावे इनाम म्हणून भेट दिली जातील आणि विरोध केल्यास जमीनदारी जप्त केली जाईल, असं बजावण्यात आलं.
फोटो स्रोत, UGC
जमीनदारीच्या लोभापोटी राणी लक्ष्मीबाई इंग्रजांसोबत हातमिळवणी केली. दरम्यान, 18 ऑक्टोबर 1858 रोजी बाबुराव त्यांच्या काही साथीदारांसह घोट गावामध्ये पेरसापेन पूजेसाठी येणार असल्याचं लक्ष्मीबाई यांना कळालं.
बाबुराव शेडमाके घोटमध्ये आले असता लक्ष्मीबाईंनी बाबुराव शेडमाकेंना जेवणाचं आमंत्रण दिलं आणि दुसरीकडे इंग्रजांना याबाबत माहिती दिली. लक्ष्मीबाईंच्या घरी जेवण सुरू असतातना इंग्रजांनी चोहोबाजूने घेरून बाबुराव शेडमाके यांना बेड्या ठोकल्या. ही गोष्ट व्यंकटराव यांच्यापर्यंत पोहोचताच ते बस्तरच्या दिशेने निघून गेले.
चंद्रपूरच्या कारागृहात फाशी
कॅप्टन क्रिक्टनच्या न्यायालयात खटला चालवून बाबुराव व त्यांच्या सहकाऱ्यांना गार्टलड आणि हॉल यांच्या हत्या व राजद्रोहाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली गेली. तर त्यांच्या साथीदारांना 14 वर्षांचा कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
21 ऑक्टोबर 1858 रोजी संध्याकाळी 4 च्या सुमारास चांदागड राजमहाल (वर्तमान चंद्रपूर जेल) येथील पिंपळाच्या झाडावर त्यांना फाशी देण्यात आली, जिथे कॅप्टन क्रिक्टन आणि कॅप्टन शेक्सपियर स्वतः उपस्थित होते.
फोटो स्रोत, GOVERNMENT OF INDIA
बाबुराव शेडमाके यांच्या मृत्यूसंदर्भात एका घटनेचा नेहमी उल्लेख केला जातो. तो म्हणाजे, फाशी देताना बाबुराव यांच्या गळ्यातील दोरीचा फास तीन वेळा तुटला होता. त्यामुळे पुन्हा एकदा फाशी देऊन मृत घोषित करण्यात आलं.
परंतु, इंग्रजांच्या मनात त्यांचाबद्दल इतकी भीती होती की, मृत्यूनंतरची खात्री करण्यासाठी त्यांचं पार्थिव उकळत्या चुन्याच्या भट्टीत टाकण्यात आले. हा संपूर्ण घटनाक्रम ‘चांदा डिस्ट्रिक्ट गझेटिअर’ आणि लेखक पुरूषोत्तम शेडमाके यांच्या पुस्तकात सविस्तर नमूद आहे.
बाबुराव शेडमाके यांना फाशी दिल्यानंतर त्यांच्या पार्थिवाचं काय झालं, याची स्पष्ट नोंद कुठेही नाही. परंतु, लेखक पुरुषोत्तम सेडमाके लिखित पुस्तकात त्यांचं पार्थिव गोंडी समाजाच्या परंपरेनुसार कारागृह परिसरात पुरण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
बाबुराव शेडमाके यांच्या स्मरणार्थ त्यांचं स्मारक उभारण्याची आणि वारसा जतन करण्याची मागणी आदिवासी समाजाकडून अनेक वर्षोंपासून सातत्यानं केली जात आहे. परंतु, या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याची खंत आदिवासी समाजबांधव व्यक्त करतात.
फोटो स्रोत, Dheeraj Shedmake
अवघ्या 25 व्या वर्षी देशासाठी व संस्कृतीसाठी प्राण अर्पण करणाऱ्या या अमर हुतात्म्याच्या सन्मानार्थ भारत सरकारने 12 मार्च 2007 रोजी त्यांच्या जन्मदिनी विशेष टपाल तिकीट जारी केले.
21 ऑक्टोबर रोजी हजारो आदिवासी बांधव चंद्रपूर जेलमधील त्याच ऐतिहासिक पिंपळाच्या झाडाजवळ एकत्र येऊन त्यांना आदरांजली अर्पण करतात.
संदर्भ :
- 1857 के स्वाधीनता शहीद वीर बाबुराव पुल्लेसुर बापू राजगोंड – पुरुषोत्तम सेडमाके
- भारतीय स्वातंत्र्य संग्राम में चंद्रपुर – भगवती प्रसाद मिश्र, स्वातंत्र्य संग्राम सेनानी
- आदिवासी संस्कृति, त्यांच्या पुर्वजांचे कार्य व आता नवी दिशा – मधुकर उ. मडावी
- क्रांतीरत्न शहीद वीर बाबुराव पुलेसूरबापू राजगोंड – धीरज सेडमाके
- गोंडवानाचा सांस्कृतिक इतिहास – शेषराव एन. मंडावी
- बाबुराव पुल्लेसुर शेडमाके – विकासपीडिया
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC




